Submitted by निशिकांत on 23 December, 2021 - 07:55
हिशोब करता करता सारे जीवन सरले
तरी न कळले काय कमवले काय गमवले?
अर्धी झाली इतिहासाची पुनरावृत्ती
पांडव सरले! कसे अजूनी कौरव उरले?
वेदनेतही आनंदी जगणारे दिसता
उदास वार्याच्याही ओठी हास्य उमलले
जातायेता अंगावरती थुंकल्यामुळे
नाथांना गोदास्नानाचे पुण्य लाभले
नकोनकोचा सार सखे पडदा आता तू
"होकारासन" मीच कधीचे मला शिकवले
ज्यांच्यावरती जबाबदारी प्रक्षोभाची
करून खच्ची स्फुल्लिंगांना कुणी विझवले?
सेल्यूलरच्या पाटीवरचे नाव खोडले
सावरकरजी माफ करा ना कुणी पेटले
अनर्थ टळला असता पुढचा जर कृष्णाने
सार गितेचे कौरवास असते सांगितले
काय तुला "निशिकांत" पाहिजे? तूच मिळव ना!
नवस बोलुनी प्रभूस का साकडे घातले?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा