Submitted by निशिकांत on 21 December, 2021 - 09:32
रात्र केवढी दरवळणारी
रात्र केवढी दरवळणारी
आठवणींना जागवणारी
कधी वाटते वादळणारी
ज्योत तरीही पाजळणारी
सलज्ज होता तिचा चेहरा
जणू पाकळी ती फुलणारी
दवबिंदूंचे पेलत ओझे
तृणपाते ती थरथरणारी
सैरभैर मन तिचे तरीही
व्यक्त न होता गुदमरणारी
तिचे कल्पना विश्व असू दे
नकोच वास्तव, दुनियादारी
गझलेमधुनी वावरताना
शायरास ती खुणावणारी
नकोनकोचा पडदा गळता
अंतरात ती सुखावणारी
देवाने निर्मिले तिला पण
नियंत्यासही ना कळणारी
पदर असोनी जागेवरती
उगाच त्याला सावरणारी
सखी तुझी "निशिकांत"असावी
खुल्या मनाने निर्झरणारी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--पादाकुलक (मात्रा वृत्त)
मात्रा-- ८ + ८
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !!!
सुंदर !!!