Submitted by निशिकांत on 23 November, 2021 - 09:39
शाप असावा तडे जायचा विश्वासाला
अविश्वास मग हळूच येतो नांदायाला
एकच पुरले निमित्त दंगे भडकायाला
भडकाऊ व्हीडियो लागला फिरावयाला
श्रावण होता तू असताना, पण गेल्यावर
कपार ह्रदयातली लागली वाळायाला
असंख्य ठेचा खात राहिलो, वेळ लागला
अपुल्यामधले कोण आपुले कळावयाला
माय एकटी उदासीन का घरट्यामध्ये?
तिनेच तर शिकविले पिलांना उडावयाला
पाटी, पुस्तक, दप्तर झाले कालबाह्य अन्
एकच आता टॅब पुरेसा शिकावयाला
आरशासही कळू लागले आत कसा मी
शिकला आहे मुखवट्यातले बघावयाला
नवाब झाले मालिक आता असे वाटते
चोर लागला शिरजोरीही करावयाला
स्वप्न नको "निशिकांत" बघू तू हिमालयाचे
सुरुवातीला बरी पर्वती** चढावयाला
** पर्वती--पुण्यातील एक टेकडी जिथे लोक फिरायला जातात.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही गझल चुकून पाच वेळेस पोस्ट
ही गझल चुकून पाच वेळेस पोस्ट झाली आहे आणि डिलीट होत नाही. क्षमस्व.