नवा उपचार शोधूया

Submitted by द्वैत on 18 May, 2021 - 00:13

नवा उपचार शोधूया

नवा उपचार शोधूया नवा आजार झाला की
निखारा पेटवू पुन्हा निखारा गार झाला की

जसे हे देव दगडाचे तशी ही माणसे झाली
दिवा लावू नका कोणी इथे अंधार झाला की

तसा प्रत्येकजण आहेच ना गर्दीत एकाकी
पुढे जा सोडुनी तू हात रस्ता पार झाला की

कशाला ठेवले सांगू तुझ्या माझ्यात मी अंतर
मनाला वाटते भीती जिव्हाळा फार झाला की

प्रजेच्या हुंदक्यांची जाण नाही आज राजाला
उद्या ढाळेल तो अश्रू पुरा व्यवहार झाला की

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy द्वैत भाऊ छान आहे.
शेवटीचे दोन शेर विशेष भावले!

तुम्ही आता barely येताय बरं मायबोली वरती
येणे जाणे वाढवा की जरा Wink