रघु अण्णांचा उद्योग!
कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीतील, रघु नाईकचा वाडा आज मोठा प्रसन्न दिसत होता. अन का दिसू नये? चार दिवस झाले होते, त्याची लेक, जावई आणि बिट्ट्या, गोड नातू आले होते. एरवी गोदाआक्का आणि रघुआण्णा दोघेच रहायचे. त्यामुळे एक उदासवाणी शांतता तेथे नांदायची.
हिरव्या पोपटी शालूवर, एखादी केशरी आंगठी ठेवावी तस वाड्याचं कौलारू छत, लांबून दिसत होत.
सकाळची कोवळी उन्हं, रघु नायकाच्या चौपस वाड्याच्या ओसरीवर पसरत होती. साठी पार केलेले रघुआण्णा नुकतेच पूजा आटोपून, अंगात धोतर कोपरी घालून ओसरी वरच्या बंगईवर मंद झोके घेत, जावई उठायची वाट बघत होते. पूजा नुकतीच आटोपल्याने, त्याच्या गोऱ्यापान कपाळावरचा, दुबोटी गंधाचा टिकला अजून ताजाच होता. घरभर दाटलेला उदबत्त्यांचा सुगंध आता ओसरीवर झिरपु लागला होता. वातावरण प्रसन्न होत.
"दिनू, अरे तुझं आवरलं कि जरा एखादा नारळाचा घड काढून ठेव. अन, विहरी जवळची चार आळूची पान पण खुडून घे. गोदाला नेवून दे." अंगणात काम करणाऱ्या सालगड्यास रघुअण्णांनी बसल्या जागेवरून ओरडून सांगितले.
"आण्णा, नारळ कालच उतरवलाय. रखमान आळु अन केळीची पान सकाळचं सयपाकघरात नेलीत."
दिनू अंगणात नारळाच्या पडलेल्या झावळ्या शेजान झाडाचा बुडाजवळ जमा करून ठेवत म्हणाला. त्याची बायको, रखमा गोदाआक्काला स्वयंपाकघरात मदत करत होती.
तेव्हड्यात गोबऱ्यागालाचा बिट्ट्या डोळे चोळत, रघूआण्णाच्या बंगई समोर येऊन उभा राहिला.
रघूअण्णांनी पायाच्या रेट्याने बंगई थांबली आणि बिट्ट्याला आपल्या मांडीवर घेतले.
"बिट्ट्या, अरे किती उशिरा उठलास? माझी तर पूजापण झाली. काल कसा लवकर उठून, माझ्यासोबत पूजेला बसला होतास? आज किती वाट पहिली तुझी? रात्री जागलास कि काय?"
"आजोबा. आज संडे आहे. आम्ही संडेला लेट उठायचं असत! पण, तू मला सोडून पूजा का केलीस? देवाच्या डोक्यावर मिल्क टाकायचं, आज तुझ्यामुळे मिस झालं माझं!"
"अरे, बापरे! बिट्ट्या, आमच्या देवाला संडे माहित नसतो ना! ते सकाळीच उठून बसतात! बर, आता दात घसा आणि आज्जीकडे जा. दूध तापवून ठेवल असेल. पी, मग तुला आमराई नेतो. जा पळ." बिट्ट्या अण्णांच्या मांडीवरून उतरला आणि घरात पळाला. पण मधेच परतला.
"का रे? काय झालं? माघारी का आलास?"
"आजोबा, ते तुझ्या कानावर तू लाल हिरवं काय घातलास?"
"ते होय? त्याला बिगबाळी म्हणतात."
"ओके! मला पण दे! तुझ्या सारखी मलापण मस्त दिसलं!"
"हो तर! देतो. आता पळा. दातघासायला."
"अन ते आमराई? मीन्स काय?"
"म्हणजे 'मँगो ट्री पार्क!'"
बिट्ट्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने रघु पहात असताना, माडीवरून श्रीधर खाली उतरून अण्णांच्या बंगई समोरच्या खुर्चीत बसला.
"रखमा, जावई उठलेत चाई येऊ दे!" रघुअण्णांनी घरात हाळी दिली. आणि आपला मोरच्या श्रीधरकडे वळवला.
"काय जावईबापू, झोप लागली का नाही?"
"आण्णा, झकास झोप झाली. इथलं वातावरणच इतकं मोहक आहे कि छान करमत. पायी फिरावं लागत पण त्याचा शीण वाटत नाही. त्यामुळं झोप सुद्धा गाढ लागते."
तेव्हड्यात दिनू विलायची घातलेला, घट्ट दुधाचा चहा घेऊन आला. श्रीधरने आज, आण्णा सारखा बशीत ओतून चहा पिला. तसे त्याला करताना पाहून, आण्णा आपल्या मिशातल्या मिशात हसले.
"जावई, बशीतल्या चहा ने चहाची खरी चव कळते, कपाने पिले तर, फक्त त्याचा गरमपणा घश्यात फिरतो! असा आमचा अनुभव आहे. चहा कसा झालाय?"
"आण्णा, चहा फक्कड झालाय. म्हणजे, नेहमीच तसा असतो. आईच्या हाताला वेगळीच चव आहे. त्यांनी नुसतं पाणी दिल तरी, गोड लागत!"
"आहो गोदावरी, ऐकलंत का? जावई तुमचं कौतुक करायला लागलेत!" मोठ्याने हसत रघुआण्णा म्हणाले.
"आण्णा---- आज जेवण करून निघावं म्हणतोय."
"काय? निघायचं म्हणताय?" राघुअण्णांचा चेहरा खर्र्कन उतरला.
"अ, हो. सोमवार पासून बिट्ट्याची शाळा सुरु होईल. माझ्या ऑफिसची कामपण खोळंबली असतील."
राघूआण्णा गप्प बसून राहिले. श्रीधर इकडचं तिकडचं बोलून निघून गेला.
गोदाक्का दाराआडून ऐकत होत्या.
"अहो, शकू, कालच म्हणाली होती 'उद्या निघते' म्हणून! कामाची माणस आहेत. अडवण्यात अर्थ नाही. ते बिट्ट्या साठी ---"
"हो. आहे लक्षात. सोनाराला सांगून ठेवलंय. येतो घेऊन! शकुची साडी, धोतरच पान आहे का घरा?"
"साडी धोतरच पान आहे घरात. पण, जावायाला का धोतर देणार?"
"आग, त्यांनी परवा धोतर नसायचं शिकून घेतलं माझ्या कडून. त्यात त्यांना रुची वाटत होती. म्हटलं आता हेच द्यावं! कस?"
"बाई! हे नव्हतं हो माहित मला."
राघूआण्णा अंगात कोट अन डोक्यावर काळी टोपी घालून वाड्याबाहेर पडले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाटाभोवती रांगोळी काढून, उदबत्या लावल्या होत्या. घवल्याची खीर, कुरड्या - पापड्या, आळूच्या वड्या. वांग्याची खंमंग रस्सा भाजी, रस्स्यावर खोबऱ्याच्या खिसा मुळे आलेला तेलाचा तवंग, पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सोडत होता. हातसडीचा तांदळाचा भूक वाढवणारा भात अन पिवळं धम्मक तुरीचं वरण, असा साधाच बेत केला होता.
शकू, श्रीधर आणि बिट्ट्या, कसे बसे आपापल्या पाटावर बसले होते. कधी पाटावर बसून जेवायची सवय नव्हती ना? रघुअण्णांनी त्यांची अडचण जाणून दिनूला खूण केली. त्याने ताटासाठी एकएक पाट लावला. जेवण शांत पणे उरकली. शेवटच्या भाताच्या वेळेस गोदाक्कानी सगळ्यांना मुरडीचे कानवले वाढले.
"हे काय?" श्रीधरने विचारले.
"जावई, लेक सासरी जाताना, हा मुरडीचा कानवले मुद्दाम जेवणात वाढतात. पुन्हा माहेरी लवकर येणं व्हावं म्हणून."
जेवण झाली. वामकुक्षी घेऊन श्रीधर, शकू बिट्ट्या, माडीवरून खाली आले. त्याच्या मागे दिनू त्यांच्या बॅगा घेऊन पायऱ्या उतरत होता.
श्रीधर आणि शकूला जोडीने बसवून गोदाक्कानी शकुनी ओटी भरली. रघुअण्णांनी श्रीधरला कुंकाचा टिळा लावला. टॉवेल, टोपी, धोतराचे पान आहेर केला. शकूला साडीचोळी दिली. बिट्ट्याच्या हातात रघुअण्णांनी एक छोटी डब्बी दिली.
बिट्ट्याला कसला दम निघतोय? त्याने ती उघडली. आत पहातो तर काय? आजोबाच्या कानात आहे तशीच बिगबाळी! पिल्लू लगेच आजोबाच्या गळ्यात पडलं. त्याला पोटाशी धरताना म्हाताऱ्याच्या डोळ्यात ओलावा झिरपला.
श्रीधर आणि शकुन एकवार एकमेकांकडे पाहिले आणि मग नजरेने सहमती झाल्यावर जोडीने गोदाक्का आणि रघूआण्णाच्या पाया पडले.
"चार दिवस सवड काढून आलात, आमच्या सोबत राहिलात, आमचा हा नाईकांचा वाडा, आनंदानं भरून टाकलात, बिट्टू सोबत, तर मी पुन्हा लहानपण अनुभवलं! उद्या पासून, देवपूजेच्या, वेळेस बिट्टू डोळ्यासमोर दिसेल! सवड काढून येत जा. आम्ही आहोत तो पर्यंत तुमची वाट पाहू!" रघूअण्णांचा गळा नकळत दाटून आला.
दिनूने बॅगा श्रीधरच्या गाडीच्या डिक्कीत टाकल्या. शकू श्रीधर गाडीत बसले. पण बिट्ट्या मागेच थांबला.
"आजोबा, मँगो ट्रीच्या पार्क मध्ये जायचं राहिल कि?"
"बिट्ट्या, उन्हाळ्यात ये, मँगो जूस अन पुरणपोळी खायला. मग, त्या पार्कातच जेवायला जाऊ!" राघूआण्णा म्हणाले.
बिट्ट्या मागून पळत जाऊन गाडीत बसला. टाटा करून हात हलवत मंडळी निघून गेली.
पहाता पहाता श्रीधरची गाडीसुद्धा नजरेआड झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उन्हं उतरणीला लागली होती तरी, गोदाक्का ओसरीच्या पायरीवर आणि राघूआण्णा बंगईवर बसून होते. वाडा ओस पडल्या सारखा उदास झाला होता.
"चार दिवस लेकरु घरभर हुंडल, घर कस भरल्या सारखं वाटत होत. बिट्ट्या खरच गोड पोरग होत, नाही का?" गोदाक्का म्हणाल्या.
"लहान लेकराचं असच असत, चटकन लळा लागतो. बरं गोदा, पुढं काय?" सुपारी कातरत अण्णांनी सवाल केला.
"अहो, तुम्हाला सांगायचंच राहील, तुमच्या त्या 'अनुदाना'च्या डब्ब्यात, शकू काहीतरी टाकून गेलीयय! बहुदा पैसे असावेत."
"असू दे! ते तसेच अपेक्षितच होत! तर मी मघाशी काय विचारत होतो? हा, आता पुढं काय?"
"मी काय म्हणते? नारळी पौर्णिमा जवळ आली आहे. एखादा 'दादा वहिनी' आहेत का पहा!"
"आग, तू फक्त कोणतं नातं जगायचं ते सांग! आपल्या 'कुटुंब पर्यटन!' या योजनेला खूप छान प्रतिसाद मिळतोय!"
"तुमचं डोकं मात्र अफलातून चालत हो! आपला एकुलता एक अजय अमेरिकेत रमला, रिकामं घर खायला उठायचं. नात्याचा ओलावा एकदम आटल्या सारखा झाला होता. इतर नातेवाईक, कशाला या आडबाजूच्या कोकणी खेड्यात येतात? यावर तुमची 'कुटुंब पर्यटन' हा उत्तम तोडगा आहे!"
"गोदा! कुटुंब विस्कटत चालली आहेत. तरी माणसाला नाती हवी आहेत. कुणाल आजोबा हवा, कोणाला आई हवी, कोणाला भाऊ हवा! तर कोठे आजोबा -आजी एकटे पडलेत, कित्येक पोरी 'बाबा' साठी झुरत आहेत, तुझ्या सारखी बाई, भावाचा मायेला पारखी झालीयय! नात्यांची हि पोकळी कमी करता येईल का? या विचारातून ह्या, 'कुटुंब पर्यटन' कल्पनेचा जन्म झाला. आता हेच पहा ना, शकूला चार दिवस का होईना 'माहेर' मिळालं! तुलाहि लेक -जावई-नातू हे नातं जगून पहाता आलं. आपल्याला प्रेम आणि सोबत मिळाली. नाही त्या पेक्षा थोडं तरी पदरी आलं, हेच समाधान! बर, ते अनुदानाचा डब्बा आण, ठरल्या प्रमाणे त्यातली निम्मी रक्कम दाते मास्तरांच्या हवाली करून येतो. शाळेला एक वर्ग बांधायचाय म्हणत होते."
गोदाक्का 'अनुदानाचा' डब्बा आणायला घरात गेल्या.
राघुअण्णांनी बंगई सोडली. डेस्कासमोर बैठक मारली. डेस्कच्या खणातून पोस्ट कार्ड काढले. आणि लिहायला घेतले.
'श्री रा.रा. दत्ता भाऊ,
आपले दिनांक १० चे पत्र पावले. आपण केलेल्या विनंतीस मान देऊन, आपणा उभयतांस सौ गोदावरी (माझ्या सौभाग्यवती) याचे 'दादा -वहिनी' होऊन येण्याची प्रार्थना करतो.
आपल्या गोदाक्कास, आपण निराश करणार नाहीत याची खात्री आहे.
आपली नारळी पौर्णिमेस आम्ही वाट पहात आहोत.
तुमच्या सारखेच आम्हीही मायेला आणि प्रेमाला भुकेली माणसे आहोत, 'कुटुंब पर्यटनाच्या' निमित्याने या पवित्र नात्याला उजाळा देऊ!
काय फुल ना फुलाची पाकळी असेल ती जाताना 'अनुदान' डब्ब्यात टाकावी. शाळा बांधणीसाठी हि रक्कम आम्ही वापरतो.
आपला,
रघु (आण्णा)नाईक.
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
किती छान कल्पना...खूप आवडलं..
किती छान कल्पना...खूप आवडलं..
आवडली कथा !
आवडली कथा !
किती छान आहे.! कुटुंब
किती छान आहे.! कुटुंब पर्यटनाची संकल्पना प्रत्यक्ष असायला हवी!
कथा आवडली.
कथा आवडली.
ही अशा प्रकारच्या पर्यटनाची कल्पना छानच आहे.
शेवटी "अण्णा" नाईक हे नाव वाचल्यावर मात्र हसू आलं.
मनाला भावली ही कथा. ..
मनाला भावली ही कथा. ..
खुप सुंदर.. प्रत्यक्ष आहे का
खुप सुंदर.. प्रत्यक्ष आहे का कुठे 'कुटुंब पर्यटन '?
@शेवटी "अण्णा" नाईक हे नाव
@शेवटी "अण्णा" नाईक हे नाव वाचल्यावर मात्र हसू आलं.
हो हो
हे राम.. काय दिवस आले आहेत...
हे राम.. काय दिवस आले आहेत... कुटूंब पर्यटन.. Horrible
खूप सुंदर कथा, काल्पनीक कथा
खूप सुंदर कथा, काल्पनीक कथा असली तरी हल्लीच्या एकाच किंवा दोन अपत्याच्या काळात असे पर्यटन प्रत्यक्षात येण्याचा काळ लांब नाही.
कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीत
कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीत घडणार्या कथेत बंगई शब्द जरा खटकला.
बाकी कथा ठीक
बिगबाळी > भिकबाळी
बिगबाळी > भिकबाळी
किती छान !
किती छान !
छान कथा
छान कथा
शेवटी "अण्णा" नाईक हे नाव
शेवटी "अण्णा" नाईक हे नाव वाचल्यावर मात्र हसू आलं.
>>> हा काय विनोद आहे? समजावले का कोणी
@च्रप्स - अहो, माधव अभ्यंकर
@च्रप्स - अहो, माधव अभ्यंकर आले डोळ्यासमोर.... राखेचा मालिकेतील.
मला पण अण्णा नाईक आठवले. पण
मला पण अण्णा नाईक आठवले. पण छान आहे हे कुटुंब पर्यटन.
तेवढं आण्णा नाईक नाव बदला
तेवढं आण्णा नाईक नाव बदला प्लीज.
बाकी, लेख भन्नाट आहे.