Submitted by निशिकांत on 2 February, 2021 - 11:32
शुभ्र चांदणे पांघरलेली, दिसावीस तू
रूपगर्विते नकोस खिजवू चांदणीस तू
किती टवटवी चेहर्यावरी आहे तुझिया?
विचार बागेतल्या उमलत्या पाकळीस तू
वसंत नटतो कळ्या फुलांनी, तुला पाहता
श्रंगाराविन वसंतसेना वाटलीस तू
हिशोब कसला प्रेमामध्ये, नफा नि तोटा?
लाख गळूदे टपटप मोती, हसावीस तू
कधी काफिया, रदीफ केंव्हा आशय होउन
गझलांसोबत कलमेमधुनी झिरपलीस तू
प्रपंच माझा जरी फाटका, झेलत दु:खे
हास्य गोंदुनी लाज घराची राखलीस तू
प्रपंच करणे जबाबदारी सार्यांची पण
एकटीच का भोई व्हावे पालखीस तू?
प्रेमापोटी भोगलास वनवास तरी का?
शंका घेई राम कदाचित बाटलीस तू
भणंग "निशिकांता"शी नाते निभावताना
ओबडधोबड वाट खुशीने चाललीस तू
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा