पोसले होते मनी मी गैरसजांना

Submitted by निशिकांत on 24 January, 2021 - 10:37

पोसले होते मनी मी गैरसमजांना
हे कळाले सर्व माझे दूर जाताना

पाहिले स्वच्छंद पक्षी ऊंच उडताना
काळजी नसते उद्याची आज जगताना

वाचले मी देह म्हणजे एक देव्हारा
कोण दिसते मंदिरी या ईश्भक्तांना

वेगळे त्रेतायुगीही फारसे नव्हते
अप्सरा उपभोग्य होत्या नृत्य करताना

चूक का होते कधी केंव्हा निसर्गाची?
एकही दिन पाहिला का वार नसताना?

मूठमाती द्यायचे धोरण असूनीही
नोंदवावी जात का मग अर्ज भरताना?

लादतो संचारबंदी माझियावर पण
भरकटे मन नेहमी तू साथ नसताना

लाउनी का झुंबरे येते झळाळी? जर
दाटला अंधार ह्रदयी घोर असताना

लावला "निशिकांत"का रे लेप हास्याचा?
जाणली मी वेदना तू आर्त गाताना

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--राधा
लगावली--गालगागा गालगागा गालगागागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users