इथे पाहून पत ठरते, करावी का उसनवारी
उधारी खूप देते माय जी नसतेच व्यवहारी
तुला मी कोंडले आहे खरे तर अंतरी माझ्या
तुझी केलीच नाही मी म्हणोनी विठ्ठला वारी
तसा तो गाव होता सज्जनांचा, आस्तिकांचा पण
कधी येता तमाशा, मंदिरी नसतेच रहदारी
करावी ईशभक्ती फक्त मिळवायास मोक्षाला
फळाची आस नसते का? खरे तर सर्व व्यापारी
सुखांचे रंग विटके का असावे? दु:ख नसताना
तुझे दु:खांमुळे तर जीवना रे! वस्त्र जरतारी
जसा येतो शमेवर झेप मारायास परवाना
जळायाचे तया ठाऊक; पण फिरतो न माघारी
चहा पीण्यास गेल्याने जिथे खुर्च्या रिकाम्या ते
नसोनी खाजगी ऑफिस; असावे एक सरकारी
बघाया जो मिळे पैलू, तसा माणूस तो वाटे
मला म्हणुनी दुराचारी; कुणी म्हणती सदाचारी
अता "निशिकांत" रे कसली शिकायत अंत समयी ही!
कसेही वागले जग हे, जगाचा खूप आभारी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो क्र ९८९०७ ९९०२३
वृत्त---वियदगंगा
लगावली--- लगागागा X ४