तूही गाणे गावे
द्वंद्व सोडुनी, रंग भराया, द्वंद्व गीत बसवावे
सुरात माझ्या सूर मिसळुनी तूही गाणे गावे
वर्तुळातले चार कोपरे ज्यांना दिलेत, घ्यावे
असेच भ्रामक आरक्षण का उगाच आम्हा द्यावे?
पाय खेचले माझे कोणी, जरी जाणतो नावे
कुणास सांगू? माझे होते सुगीतले ते रावे
ताजमहल जर असेल स्मारक शाही प्रमाचे तर
प्रेम काय गरिबांनी अपुल्या बेगमचे विसरावे?
शेतकर्यांचे अंदोलनही किती चिघळते आहे!
कोण शिखंडी तेल ओततो, जनतेने शोधावे
कृष्ण धावला पांचालीच्या मदतीला पण त्याने
पांडवास का प्रश्न न केला, पणास का लावावे?
जरी नांदते घरी सुबत्ता तरी एकटे आम्ही
गर्व एवढा! सवाल असतो कुणी कुणा बोलावे?
पाप झाकण्या, एक दावते कचराकुंडी, दुसरी
गर्भामध्ये मुलीस मारी, कुणास माय म्हणावे?
व्यर्थ तुला "निशिकांत" अपेक्षा कौतुक कुणी करावे
आरशातल्या बिंबाला तू तुझिया ओवाळावे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३