तोच तो पणा आयुष्याचा किती भयानक विकार आहे!
हातमिळवणी वादळासवे करावयाचा विचार आहे
परस्पराविन जीवन म्हणजे रखरखणारी दुपार आहे
आठवणींची तिच्या तरीही मनात ओली कपार आहे
संकटांसवे जरी नांदतो, प्रयत्न करतो हसावयाचा
हाच मुखवटा ओळख माझी, सत्य जाहले फरार आहे
असून मध्यमवर्गाचा मी, आत्मवृत्त का उगा लिहावे?
धजेल कोणी का वाचाया? जीवन इतके टुकार आहे
भक्ती करतो तुझी ईश्वरा, आस ठेउनी तुझ्या कृपेची
सेवा घेशी नगदीमध्ये, कृपा तुझी का उधार आहे?
शुभं करोती, श्लोक मनाचे बघता बघता लोप पावले
पाश्चात्यांच्या अनुकरणाची, बालपणाला किनार आहे
नाव कमवण्याअधीच घाई कविता संग्रह छापायाची
विक्री कुठली? सही करोनी भेट द्यायला तयार आहे
दु:ख सांगतो खुशी खुशीने, भिंतीवरच्या आरशास मी
फसवायाचा माझ्याशी मी केलेला हा करार आहे
विचार होते "निशिकांता "चे बाबांच्या तुलनेत नवे, पण
दोन पिढ्यातिल अंतर हल्ली, भव्य जाहली दरार आहे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३