स्वयंप्रकाशित देवापुढती उगा कशाला दिवा लावता?
जरी राहतो अंतरात तो, मंदिरात का व्यर्थ शोधता?
माझ्याशी मी बोलायाची कला घेतली शिकून आहे
अपुल्यांनाही कशी कळावी, सांजवेळची घोर आर्तता?
बाबा माझे कारकून मज कशी मिळावी आमदारकी?
बाप असावा राजकारणी, हाच निकष अन् हीच पात्रता
नराधमांनी कुस्करलेल्या, म्हणे कळीला न्याय मिळाला!
देव तरी का देऊ शकतो वापस तिजला तिची मुग्धता?
गझलीयत जर नसेल तर त्या रचनेला का गझल म्हणावे?
लाख असूदे वृत्त, काफिया, अंगभूत आपुली गेयता
पापांची घागर भरलेली, उन्मादाने तरी वागतो
गंगामाई आहेच देण्या पापापासुन मला मुक्तता
वठलेल्या जर्जर वृक्षाने, शिशिर पाहुनी मनी ठरवले
जगावयाचे! मावळलेली पर्णफुटीची जरी शक्यता
मृगजळ सारे सभोवताली, आभासाचे विश्व जाहले
कपारीस कोरड्या मनीच्या कशी मिळवी जरा अर्द्रता?
जगात ढोंगी काळे धंदे, पाप कराया हरकत नसते
माफक इच्छा एकच असते, फक्त नसावी कुठे वाच्यता
विरोधकांनो सरकारावर करा हवी ती टिकाटिप्पणी
पण लढताना शत्रूसंगे जरा असूद्या एकवाक्यता
काय हवे ते माग म्हणाला देव तसे "निशिकांत "झुकोनी
करी विनंती पुनर्जन्म दे, स्वर्गामधली नको शांतता
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३