भाग १६ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76980
भाग १७ - प्रवास सुरु
रात्री 3 वाजले होते. नुकत्याच घडलेल्या घटनांचा आढावा आणि आता पुढे काय करायचे याबद्दल सुनिल आणि सायली विचार करत होते. दोघांच्या कुटुंबांना एकमेकांच्या प्रेमाबद्दल लवकरच सांगायचे असेही ठरले. सुनिलला आता बरे वाटत होते. स्फोटानंतर झालेल्या त्याच्या जखमा आणि एकूणच त्रास कमी झाल्यात जमा होता.
सुनिलच्या रुममध्ये झोपलेल्या आईला अचानक जाग आली आणि ती पाणी प्यायला उठली तेव्हा तिला सुनिल बेडवर दिसला नाही. तेव्हा पाणी पिऊन ती सुनिलला शोधायला दरवाज्याजवळ यायला लागली.
सुनिल आणि सायली ज्या रूम मध्ये बसले होते त्याच्या खिडकीबाहेर एक वेल होती. ती पार हॉस्पिटलच्या टेरेसवरच्या पाण्याच्या टाकी पर्यंत वाढलेली होती. त्या वेलीच्या आधारे हिरव्या रंगाचा एक साप सरपटत सरपटत आणि लपत छपत टेरेस वरून हळूहळू खाली येत होता. पण नीट जवळून पाहिले असता तो साप खरा नसून यांत्रिक आहे असे दिसून येत होते.
तो साप वेलीवरून काचेच्या खिडकीवर आला. खिडकीवर येऊन त्याने आपला फणा उगारला आणि त्याच्या जिभेच्या भागातून वेगाने दोन बंदुकीच्या गोळ्या निघाल्या आणि खिडकीची काच तडकून त्या आत सुनिलकडे आल्या. सायलीचे तोंड खिडकीकडे असल्याने तिला ते जाणवले आणि तिने प्रतिक्षिप्त क्रियेने सुनिलला बाजूला ढकलले आणि वेगाने त्याचा हात धरून तिने त्याला रूम बाहेर ओढले आणि दरवाज्यातून व्हरांड्यात दोघे पळायला लागले.
तोच सुनिलला आई दरवाज्यापाशी दिसली आणि ही गडबड ऐकून सारंग आत पळत येताना दिसला. त्याने सारंगला खूण करून आईची काळजी घेऊन तिला घरी सुखरूप पोचवण्याची विनंती मोठ्याने ओरडून सांगितले कारण तो दूर होता. इतर पोलीस त्या दोघांच्या मदतीला धावले.
तेवढ्यात हॉस्पिटलमधल्या छतावर पण तसाच एक छताच्या रंगाचा यांत्रिक साप सरपटत होता आणि त्याने फणा उगारून खाली पळत असलेल्या दोघांवर गोळीबार करायला सुरुवात केली.
इतर पोलिसांचे आणखी काही सापांकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी सापांवर गोळीबार करायला सुरुवात केली आणि ते यांत्रिक साप तुटून तुकडे होऊन खाली पडायला लागले. तोपर्यंत विविध खिडक्यांमधून साप सरपटत आतमध्ये आले आणि सुनिल सायलीवर गोळीबार करू लागले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी सुनिल सायली पायऱ्यांवरून पळत पळत सर्वात खालच्या मजल्यावर मोठ्या हॉलमध्ये आले. दरम्यान नवीन साप दिसला की पोलीस त्यांच्यावर गोळीबार करून त्यांचे तुकडे करत होते. या गडबडीत सायली स्वत:जवळ पर्स घ्यायला विसरली नाही कारण त्यात बाहुल्या होत्या.
हॉस्पिटल स्टाफमध्ये एकच हलकल्लोळ माजला. पळापळ सुरू झाली. सुनिल सायली हात धरून गोळ्यांचा भडीमार वाचवत पळतच होते.
एवढ्यात मेन गेट जवळ एक अर्धी लाल आणि अर्धी काळ्या रंगाची मोठी सहा आसनी लांबलचक प्रशस्त कार येऊन थांबली. त्या कारच्या खिडकीतून योध्यासारखा पेहराव केलेली आणि ब्लॅक बॉडी फिट्ट ड्रेस घातलेली एक स्त्री हाका मारू लागली, "सुनिल सायली लवकर गाडीत बसा. काहीच विचार करायला वेळ नाही. गाडीकडे पळत या आणि बसा पटकन!"
ही गाडी कोणाची, ही स्त्री कोण, तिला आपल्या दोघांची नावे कशी काय माहित, आपल्यावर हल्ला झाला हे यांना कसे माहिती आणि आपल्याला इतक्या रात्री एवढी मोठी गाडी घेऊन ते का वाचवत आहेत हे सगळे प्रश्न जितक्या वेगाने त्यांच्या मेंदूत आले तितक्याच वेगाने ते दोघे त्या स्त्रीचं ऐकून त्या गाडीकडे पळाले, गाडीचे स्लायडींग दरवाजे उघडले आणि सर्वात मागच्या दोन सीट्स वर ते दोघे घाईत जाऊन बसले. त्यांना दोघांना योगायोगाने गोळ्या लागल्या नव्हत्या, फक्त थोडेसे हाताला आणि खांद्याला खरचटले होते.
ते दोघे बसताच गाडी वेगाने शहरांतील रस्त्यांवर पळायला लागली. त्यांच्या पुढील सीटवर एक स्त्री आणि एक पुरुष बसलेले होते आणि सर्वात पुढच्या सीटवर ड्रायव्हर आणि ती ब्लॅक ड्रेसवाली हाका मारणारी स्त्री बसली होती. ती मागे वळून म्हणाली, "ठीक आहात ना तुम्ही दोघे?"
सायली आणि सुनिल मानेनेच हो म्हणाले, काय बोलायचे त्यांना सुचतच नव्हते, कारण ते दोघे आधीच घाबरलेले होते. मधल्या सीट वरच्या दोघांनीही मागे पाहिले आणि त्यांना शांत रहा, घाबरू नका असे खुणेने सांगितले. मग त्यांना चालत्या गाडीतच प्रथमोपचार केले गेले.
ती लांबलचक गाडी मुंबईच्या रस्त्यांवरून उत्तर रात्री वेगाने धावत राहिली.
मुंबई महानगराबाबत काय बोलावे? अफाट शहर! प्रचंड माणसे! हे शहर कधीही झोपत नाही म्हणतात! सतत वर्दळ सुरू! मार्केटमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, बसेस मध्ये सतत गर्दी असते. या शहरातून रोज अनेक लोक विविध निमित्ताने जगभरातील विविध देशांत जात येत असतात. अनेक जण शिक्षण घ्यायला, आपले नशीब आजमावून बघण्यासाठी, नोकरीसाठी देशभरातून या शहरात रोज येत असतात.
शेयर बाजारातील चढ उतारामुळे अनेक जण श्रीमंतांचे आणखी श्रीमंत होत असतात, तर कधी रस्त्यावर येतात. या शहरात अती श्रीमंती आणि अती गरिबी दोन्हीही बघायला मिळतात.
मेहनत करायची तयारी असली तर आपल्या अंगभूत गुणांना, कलांना, कौशल्यांचा हे शहरच एक व्यासपीठ मिळवून देत तुम्हाला प्रसिध्दी आणि पैसा मिळवून देतं. भारतीय चित्रपसृष्टीचे केंद्र आणि संपूर्ण भारताला चित्रपटसृष्टीचे स्वप्न दाखवणारे दादासाहेब फाळके आणि मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा याच मराठी मातीतली! अनेक मोठी हॉस्पिटल्सया शहरातच! जवळ असलेला समुद्र किनारा या शहराच्या उपयुक्ततेत आणखी भर घालतो.
देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका हे शहर निभावतं. पण अनेक कारणांमुळे या शहरात वाढलेली गुन्हेगारी, गुंडगिरी आणि टोळीयुद्ध हे मुंबईच्या कर्तव्यदक्ष पोलिसांची एक डोकेदुखी बनून राहिली आहे. मुंबई पोलिसांचे नाव कर्तव्य दक्षतेच्या बाबतीत जगभरात आदराने घेतलं जातं. मग ते सीआयडी असो की विशेष तपास यंत्रणा असो, दहशतवाद विरोधी संस्था असो की नेहमीचे पोलीस दल असो! या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळेच की काय हे शहर नेहमी दहशतवाद्यांच्या आणि समाज कंटकांच्या निशाण्यावर असतं. या शहराला खिळखिळे केले, जखम केली की संपूर्ण देशच वेदना अनुभवतो हे त्यांना माहीत असतं.
मुंबईने आतापर्यंत अनेक हल्ले झेलले आणि मुंबईकरांच्या कधीही नष्ट न होणाऱ्या एकात्मता आणि ऊर्जा उत्साहाच्या आधारे पुन्हा पुन्हा ती नव्या जोमाने उभी राहिली आहे. आता तर पोलिसांवरच हल्ला झाला होता. रणजित सारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना प्राण गमवावा लागला होता. त्या आधी सायन्स फेस्टीव्हल वर हल्ला झाला होता. मुंबई शहरात नवनवीन हत्यारं पसरवण्याचा डाव सुरू होता. आता तर काहीतरी नवीनच षडयंत्राची चाहूल लागली होती आणि पुन्हा एक हल्ला आय टी सेल मधल्या सुनिल वर झाला होता, पण सायली सारख्या डॉक्टरवर सुद्धा हल्ला का झाला असावा? पण आता मात्र पोलिसांचे एक नवे गुप्त दल सावध झालेले होते आणि ही गाडी त्याचाच एक भाग होती.
ती लांबलचक गाडी आता गेट वे ऑफ इंडियाच्या जवळ येऊन पोहोचली होती. दरम्यान गाडीमध्ये जास्त वेळ कुणी एकमेकांशी बोललं नाही कारण गाडीत सुनिल आणि सायली या दोघांना चेहऱ्यावर अतिशय फिट्ट बसतील असे मास्क देण्यात आले. त्या दोघांव्यतिरिक्त गाडीत असलेले इतर चार जण हेसुद्धा मास्क घातलेलेच होते. म्हणजे सायली आणि सुनिलला त्या इतर चौघांचे खरे रूप, खरे चेहरे अजून माहिती नव्हते. सुनिलची शक्तीसुद्धा त्या गाडीतल्या कुणाबाबतही काही नकारात्मक संकेत देत नव्हती त्यामुळे तसे त्याने सायलीला ही हळू आवाजात सांगितले आणि त्यामुळे तो निश्चिंत होता. दरम्यान प्रत्येक गोष्ट सायलीच्या पूर्णपणे लक्षात रहात होती.
ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली ब्लॅक ड्रेस घातलेली स्त्री मागे बघून थोडक्यात एवढेच म्हणाली होती की,
"घाबरू नका. आम्ही पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, सैन्याचे तिन्ही दल, सायबर सुरक्षा, भारतीय औषधनिर्माते आणि डॉक्टर्स संघटना, वैज्ञानिक संघटना, तंत्रज्ञ आणि विविध गुप्तचर विभाग यांनी एकत्रपणे सुरू केलेल्या एका नव्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्याप्ती असलेल्या पण स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्रपणे ऑपरेट होणाऱ्या एका गुप्त पथकाचा एक भाग आहोत, पण हे पथक अजून त्याच्या विकसनशील अवस्थेत आहे आणि तुम्ही दोघे अधिकृतपणे त्याचा लवकरच एक भाग होणार आहात. बाकी माहिती लवकरच मिळेल. त्या आधी आपण लवकर गेट वे ऑफ इंडियाला पोहोचायचे आहे, तिथून कुठे जायचे ते लवकरच कळेल तुम्हा दोघांना. आणि हो, तुमचे मोबाईल फोन सध्या स्विच ऑफ करा!"
सायली आणि सुनिल दोघांनी, "कमीत कमी आम्हाला आमच्या घरी निरोप देऊ द्या!" अशी विनंती केली तेव्हा दोघांनी एकेक फोन करून थोडक्यात झालेल्या हल्ल्याबद्दल घरी माहिती दिली आणि आम्ही सुखरूप आहोत असे सांगितले आणि "लवकरच आम्ही पुन्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, तेव्हा घाबरू नका!" असे सांगितले. सुनिलची आई सुद्धा घरी सुखरूप पोहोचलेली होती. मग दोघांनी आपापले मोबाईल फोन्स स्विच ऑफ केले.
गाडी एका लांबलचक अंधाऱ्या सब वे मध्ये शिरली. तो बोगदा खूप मोठा होता. मग गाडीने अचानक इतका वेग पकडला की जणू काही ती बुलेट ट्रेन आहे की काय असे वाटले! बऱ्याच वेळानंतर त्या बोगद्यातील एका पर्यायी मार्गाने ती बाहेर आली. वेगाने प्रवास करत लवकरच गाडी गेटवे ऑफ इंडियाला पोचली तिथे अजून पोलीस दलातील चार व्यक्ती त्या गाडीची वाट बघत होते.
मग ड्रायव्हर बाजूची ती स्त्री आणि इतर चार जण असे खाली उतरले. मग पटकन त्यांना समुद्राजवळ जायला सांगण्यात आले. मग तो ड्रायव्हर आणि त्या इतर चार पोलिस दलातील व्यक्ती हे त्या लांब गाडीतून पुन्हा भरधाव वेगाने उलट्या दिशेने निघून गेले.
"चला चला पटकन, जहाज येण्यातच आहे, " ती काळ्या कपड्यांतील स्त्री म्हणाली आणि त्यांना तिच्या मागे बंदरावर चालायचा आग्रह करू लागली.
सायली म्हणाली, "जहाज? आपण कुठे जातोय? काहीच स्पष्टता नाहीये. कुणी सांगेल का? निदान तुमची नावं कळू शकतील का आम्हाला?"
ती स्त्री त्या इतर दोघांकडे बोट दाखवून हसून म्हणाली, "ही आहे निद्राजीता आणि हा आहे हाडवैरी!"
ते दोघे हात जोडून म्हणाले, "नमस्ते!"
"निद्राजीता, हाडवैरी? ही काय भानगड आहे?", सुनिल तोंड तिरपे करत म्हणाला.
दोघे हसले. ती स्त्री म्हणाली, "तुम्ही दोघे जसे सुपरनॅचरल पावर मिळालेले व्यक्ती आहात, तसेच हे दोघे सुद्धा आहेत!"
"म्हणजे आमच्याबद्दल आणि आमच्या सुपर पावरबद्दल तुम्हाला सगळं माहित आहे? कसं काय?", सुनिल सायली एकदम म्हणाले.
ती स्त्री म्हणाली, "ते मी नंतर सांगेनच! तोपर्यंत किप गेसिंग! आता फक्त भराभर चालत राहा, नुसते बोलू नका! माझ्या मागे या! तुम्ही चौघे एकमेकांचा परिचय करून घ्या आणि माझा परिचय मी नंतर देईन! तोपर्यंत मला मिस ब्लॅक लेडी म्हटलं तरी चालेल!"
ते दोघे जण सुनिल सायलीला त्यांचा परिचय विचारतांना म्हणाले, "आम्हां दोघांना तुमची नावं माहित नाहीत! फक्त एवढेच माहिती होते की आमच्या सारखे फक्त आम्हीच नसून तुम्ही सुद्धा आहात आणि असे आपण महाराष्ट्रातील फक्त चौघेच नाही आहोत तर असे वेगवेगळी पावर असलेले अनेक जिल्ह्यांत, राज्यांत अनेक आहेत. त्यांची शोधमोहीम सुरु आहे. आता सांगा तुमची नावं काय?"
"मी सुनिल साहसबुद्धे किंवा डिटेक्टिव्ह निगेटिव्ह आणि ही आहे सायली प्रथमे किवा मेमरी डॉल!", सुनिल सांगू लागला.
"हे काय, तुम्हाला मराठीतून नाव नाही?", निद्राजीता ने विचारले.
"न .. नाही, म्हणजे आम्ही तसा विचारच केला नाही!", सायली बोलली.
"आम्हाला तसा तुमच्या पावरबद्दल अंदाज आहे, त्यामुळे आम्ही तुमचे मराठीतून नामकरण केले तर चालेल का?", निद्राजीता म्हणाली.
"नक्की! नक्की!", सुनिल सायली म्हणाले.
"मग.. ऐक तर! तू आहेस नकार शोधक आणि ही आहे अति स्मृती! काय कशी वाटली नावं!"
"नावं छानच आहेत! आवडली. तुमची इंग्रजीतील नावे काय आहेत? आणि तुम्ही दोघे कुठले? मुंबईचेच का?"
"आम्ही पुण्यातील! आमची नावं - ही आहे स्लीपलेस आणि हा आहे बोन ब्रेकर!"
"तुमच्या या नावांवरून आम्ही अंदाज बंधू शकतो की तुला कदाचित कधीही झोपायची गरज पडत नसावी आणि हा इतरंची हाडे ब्रेक करत असावा!"
"वा बरोबर! पण अजून एक आहे, ते म्हणजे माझी हाडे मात्र अनब्रेकेबल आहेत! कधीही तुटत नाहीत! कितीही उंचावरून उडी मारली, कुठेही पडलो आणि धडपडलो तरीही!", हाडवैरी बोलला!
तेवढ्यात सायलीने विचारले, "आणि अजून एक! तुमच्या पण काही मिती नियंत्रक आहेत का?"
याचे उत्तर ते दोघे देणार तेवढ्यात त्या ब्लॅक लेडीने त्यांना चूप केले आणि समुद्रात समोर बघायला सांगितले. रात्रीच्या अंधारात समुद्राच्या त्या अथांग पाण्यातून हळूहळू एक जहाज येतांना दिसले. ते एक दुमजली मोठे प्रवासी जहाज होते जे मोठ्या आणि खोल अथांग समुद्रातून प्रवास करू शकेल. ते पाचही जण त्या जहाजात चढले. त्या काळ्या पोशाखातील स्त्री च्या मार्गदर्शनानुसार प्रथम ते डेकवर चढले, तिथे कित्येक सिक्युरिटी गार्डस होते. त्या ब्लॅक लेडीने तिचे डिजिटल ओळखपत्र दाखवले आणि मगच त्यांना सर्वांना तिच्या मागे जहाजावर प्रवेश मिळाला. जहाज सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांनी सज्ज होते. जसे आग लागल्यास फायर फायटर यंत्रणा होती तसेच जहाजाला कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास, जहाजात पाणी शिरल्यावर जहाजावरील सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारची जीवरक्षक प्रणाली, लहान सुसज्ज होड्या तयार होत्या.
ब्लॅक लेडी म्हणाली, "आता येथे तुम्ही सर्व जण सुरक्षित आहात. या माझ्या मागे पायऱ्यांनी खाली हॉल मध्ये या!"
हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी ठराविक अंतरावर जहाजाचा नकाशा लावलेला होता. प्रत्येक मजल्यावरील खोल्या, कॉरिडॉर यांच्या मार्गिका तसेच हॉटेल्स आणि हॉल वगैरे सगळ्या गोष्टींचा तो मॅप होता. आपत्कालीन परिस्थितीत कुठे जावे याचे मार्गदर्शन आणि इमर्जन्सी फोन नंबर्स तिथे लिहिलेले होते तसेच जीव वाचवण्यासाठी काय करावे याच्या मार्गदर्शक सूचना चित्रांसहित सगळीकडे लावलेल्या होत्या. आता उजाडले होते. सूर्य वर यायला सुरुवात झाली होती. समुद्राच्या अथांग पाण्याच्या पार्श्वभूमीवर सूर्य उगवताना बघणे हा काही वेगळाच अनुभव होता. हॉल मधल्या खिडक्यांमधून ते मनोहारी दृश्य दिसत होते. जहाज अधूनमधून सौम्य हेलकावे खात होते. जहाजाचा संपूर्ण यांत्रिक भाग तळमजल्यावर होता. एव्हाना जहाजाने मुंबईहून निघून भारताच्या दक्षिण दिशेला इंडियन ओशनकडे प्रवास सुरू केलेला होता. हॉल मधून निघून कॉरिडॉर पार करून ते चौघे ब्लॅक लेडी मागे गेले. एका रूमचे दार तिने कोड टाकून आणि फिंगर प्रिंट स्कॅन करून उघडले.
सर्वजण तिच्या सांगण्यानुसार तिच्या मागे रूममध्ये गेले आणि दार बंद झाले.
"आता सर्वांनी मास्क काढण्यास हरकत नाही!", असे म्हणून तिने स्वतःचा ही मास्क काढला आणि सुनिलला तिच्याकडे बघून धक्काच बसला. सुनिलच्या हातातला स्वतःचा मास्क सुद्धा त्या धक्क्याने खाली गळून पडला.
^^^
मस्त! खूप मनापासून वाचते आहे.
मस्त! खूप मनापासून वाचते आहे. खूप छान फुलवत आहात! धक्कातंत्र मस्तच आहे! पुलेशु!
पुढील भाग येऊ द्या.
पुढील भाग येऊ द्या. रहस्यामुळे कथेत रंग भरतोय..