प्रश्न असुनी एवढे, का लुप्त झाल्या चळवळी
चालती टीव्हीवरी नुसत्याच चर्चा वादळी
लाख ह्रदयीच्या कपारी, एक नाही मोकळी
साफ मी करतोच आहे आठवांच्या अडगळी
शोधता दिसला तुला का भक्त एखादा तरी?
माय अंबे, पोट भरण्या कैक झाले गोंधळी
नेसुनी साडी जरीची, दोन वेण्या घालता
मॉड पोरींना दिसे ती एक काकू वेंधळी
मारणार्या शिक्षकांनी घडवली अमुची पिढी
आत ते मउशार, वरचा पोत होता कातळी
ऐकली कोल्हेकुई पण लक्ष ना तिकडे दिले
रूढवाद्यांच्या मते मी क्रांतिकारी, वादळी
जा तुला जर जायचे तर, वायदा माझा तुला
मोकळी ठेवीन ह्रदयी जीवघेणी पोकळी
शुभ्र कपडे, हास्य ओठी अन् तरी नेते असे
चेहर्यावर भारताच्या फासती का काजळी?
वेग पाण्याचा बघोनी थांबसी "निशिकांत" का?
खळखळाटाच्या नदीला खोल नसते पातळी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--गालगागा तीन वेळा प्लस गालगा
अप्रतिम.... सुंदर...
अप्रतिम.... सुंदर... वस्तुस्थिती छान मांडलिये....
सुरुवातीचे 2 शेर.... बेहद्द
सुरुवातीचे 2 शेर.... बेहद्द आवडले.