लागणारा वेळ: दिड तास.
प्रमाण: 16 ते 18 इडल्या.
साहित्य इडलीसाठी :
दीड वाटी रवा
एक वाटी घट्ट आंबट दही किंवा घट्ट प्युअर ताक
(मी ताकापेक्षा दहीच प्रिफेर करतो)
दोन चमचे तेल.
पाणी प्रमाणानुसार
पाव चमाचा खाण्याचा सोडा
मीठ
साहित्य चटणीसाठी:
दोन चमचे तेल
अर्ध्या नारळाची वाटी
पाव वाटी कोथिंबीर
तीन चार हिरव्या मिरच्या
पाव चमचा जिरे/मोहरी
एक चमचा साखर
एक चमचा मीठ
कृती :
सर्वप्रथम एका मिडीयम पातेल्यात रवा घालून पसरवून घ्यावा मग त्यात दही घालून जोरदार फेटून घ्यावं. हे मिश्रण जास्त जाडसर किंवा पातळ होता कामा नये म्हणून consistency अॅडजस्ट करता यावी म्हणून हळू हळू पाणी घालावं.
एकदा मिश्रण परफेक्ट बसलं की, थोडं मीठ घालून ढवळून घ्यावं. ढवळल्यानंतर दोन चमचे तेल घालून झाकून तासभर ठेवावं.
मिश्रण तयार होईपर्यंत घाई नसल्यास मस्त व्हाॅटसअप/ मायबोली उघडून टी.पी. करावा नाहीतर सरळ सकाळी उठल्या उठल्या ब्रश करून, तोंड हात पाय धुवून मिश्रण लावावं आणि मिश्रण लावल्यानंतर आंघोळ वैगेरे उरकावी. सगळं आवरल्यानंतर यु आर रेडी टू गो.
आंघोळ वैगेरे झालीय आणि घाईपण आहे तर सरळ चटणी करायला घ्यावी. अर्ध्या नारळातलं खोबरं व्यवस्थित सुरीने कडेने अख्खी वाटी बाहेर काढावी. ही कला सरावाने जमते नाहीतर सरळ तुकडे तुकडे काढावेत. उगीच सुरीने कुठेतरी लागायचं. खोबरं काढल्यानंतर बारीक तुकडे करावेत. मिक्सरच्या भांड्यात ते तुकडे, मिरच्या आणि कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून फिरवून घ्यावं. मी इथे अर्धा ग्लासापेक्षा थोडं कमी पाणी टाकलं आहे. चटणी मिडीयमच चांगली लागते.
चटणी मिक्सरच्या भांड्यातून छोट्या भांड्यात/पातेल्यात/ वाडग्यात/बाऊलमध्ये काढून घ्यावी. फोडणीसाठी फोडणीच्या खोलगोट डावात दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यावं. गरम तेलात मस्त जिरे- मोहरी तडकले तर गॅस बंद करून तेल थंड होण्याची वाट पाहावी. (जर फोडणीचा डाव नसेल तर साधा डावं पण चालेल पण गॅस मंद आचेवर ठेवावा नाहीतर डाव काळा होण्याची दाट शक्यता आहे नंतर म्हणू नका अजय तु हे सांगितलचं नाहीस) तेल थंड झाल्यावर फोडणी चटणीवरून गोलाकार फिरवावी मग त्यात साखर,मीठ टाकून व्यवस्थित हलवून चटणी फ्रिजमध्ये ठेवावी.
इकडे चटणी पंधरा वीस मिनिटात झाली असेल तर बाकी वेळेत अडगळीत ठेवलेलं किंवा कुठेतरी कोपर्यात पडलेलं इडलीपात्र शोधावं. शोधून झाल्यावर धुवून मस्त स्वच्छ पुसुन घ्यावं. मग एक एक प्लेटा वेगळ्या करून फक्त दोन बोटे तेलात बुडवून हलक्या हाताने त्या वाट्यांवर गोलाकार फिरवावं. जास्त भसाभसा तेलाने फिरवू नये. इडल्या तेलकट होतात मग सगळया सोळा वाटयांना तेल लाऊन झाल्यावर हात धुऊन घ्या. प्रथम करत असाल आणि पाणी टाकायचा अंदाज नसेल तर खालचा थर मोकळा सोडावा (खालचा थर सोडणार असाल तर खालच्या थराला तेल लावायची आवश्यकता नाही)
तासाभराने इडलीच मिश्रण तयार होतं. झाकणं उघडून ढवळून घ्यावं. ढवळून झाल्यानंतर त्यात सोडा टाकून व्यवस्थित हलवून घ्यावं. सोडा परफेक्ट मिक्स झाला पाहीजे. ( सोडा व्यवस्थित मिक्स झाला नसेल तर इडलीला पिवळे डाग येतात मग परत म्हणू नका अजय तु हे सांगितलं नाहीस म्हणून). मग मिश्रण थोडं थोडं वाट्यांवर प्रमाणात पसरावं. सगळे थर भरून घ्यावे.
आता इडलीपात्रात खालचा थर किंचित बुडेल इतपत पाणी घालावं (वाट्या वर असतात खाली स्टॅड असतो..स्टॅड किंचित बुडेल इतकचं पाणी घालावं वाट्यापर्यंत पाणी घालू नये, मिश्रण वाट्यांत टाकण्याआधी पूर्ण स्टॅड पाण्यात टाकून चेक केलं तर उत्तम). मग हळूच भरलेला स्टॅड व्यवस्थित अॅडजस्ट करून झाकण लाऊन इडलीपात्र मोठ्या गॅसवर आठ मिनिटे ठेवावं. आठ मिनिटानंतर गॅस मिडीअम करून परत नऊ दहा मिनिटांनी गॅस बंद करावा.
इडलीपात्र थंड झाल्यावर हळूहळू स्टॅड काढावा. मग हलक्या हाताने चमचा (सुरी अजिबात वापरायची नाही) वाट्यांच्या चारी बाजूने फिरवावा मग एका साईडने हलक्या हाताने न तुटता अखंड इडल्या काढाव्या व गरमागरम थंडगार चटणीबरोबर सर्व्ह कराव्या.
टीप : गॅसवरचा अंदाज हा साडेचार लिटरच्या इडलीपात्रासाठी आहे. पात्र मोठं असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो.
वा, मस्त.
वा, मस्त.
धन्यवाद सामी,
धन्यवाद सामी, सुनिधी.
@आदू - अरे वा, माझी रिसेपी बघून ट्राय केलं हे ऐकून आनंद झाला. हो चवीत बराच फरक आहे मला दोन्ही आवडतात.
च्रप्स - धन्यवाद...
@ Blackcat - हो बट रवा इडलीची केलेल्या चिली इडलीच्या चवीची काही आयडीया नाही..
Pages