स्वप्नामधली प्रिया अप्सरा अवतरली भूतळी असावी
वसंत येता बहार लेवुन फुलणारी ती कळी असावी
हवा छेडता, तिचे लाजणे, बुजणे पाहुन असे वाटते
नवीन फुटल्या पानाहुनही प्रिया जरा कोवळी असावी
ओझरते मी जरी पाहिले मला एवढे कळून आले
जीव जिच्यावर ओवाळावा अशीच ती पाकळी असावी
रेंगाळाया भ्रमर लागले फुलांभोवती भान हरवुनी
त्यांना दिसली कुसुमांच्या का गालावरची खळी असावी?
पुनवेचा पाहून चंद्रमा सागरास का भरती यावी?
कयास माझा विरहाची ती ऊंच ऊंच पातळी असावी
स्वैराचारी उगाच जगलो कैफ उतरता मनात येई
गळ्याभोवती तुझ्या मिठीची करकचून साखळी असावी
तुझ्याविना जर जगावयाचे यदाकदाचित असेल भाळी
जीवन सारे शुन्य बनावे, सदा तुझी पोकळी असावी
गोत्र, कायदे, परंपरांना ठोकर मारुन प्रेम करावे
लैला मजनू तयार असता चर्चा का वादळी असावी?
"निशिकांता" चल पुरे जाहला गुदमर आता नकोच इथला
शोध करू या नव्या जगाचा हवा जिथे मोकळी असावी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
गझल चुकून कविता धाग्याखाली
गझल चुकून कविता धाग्याखाली पोस्ट झली आहे. क्षमस्व.