( २३.०२.२०२० रोजी करम प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या "आदाब अर्ज है--२२" या महाराष्ट्र सहित्य परिषद, पुणे येथे घेण्यात आलेल्या मुशायर्यात मी पेश केलेली गझल.)
नको चंद्र तारे, नको चांदणेही, जरा वास्तवाशी सलोखा करू
भुकेशी लढाई, व्यथांच्या छटाही जरा स्पष्ट काव्यातुनीही भरू
अशाही, तशाही घडाव्यात घटना, अशी रीत आहे तुझी जीवना!
असे का? तसे का? नसे प्रश्न अमुचा, भल्याला, बुर्याला सुखे पत्करू
उभ्या आज पायावरी आपुल्या त्या, सुशिक्षित, मनी आत्मविश्वासही
स्त्रिया आजच्या स्पष्ट म्हणतात हाल्ली, कुठे राम दिसता तया उध्दरू
स्वतःची फसवणूक करते कशाला , जगा सांगते बाळ माझे गुणी
उसासे तिचे प्रश्न करतात हल्ली, उडाले कुठे माय गे पाखरू?
तसाही कलंदर मनाचा म्हणोनी तुला वाकुल्या दावतो जीवना!
जगावे अशी हौस आहे कुणाला? बिलंदर तुझे मी निडर लेकरू
म्हणे करविता तू नि कर्ता जगाचा असा भ्रम जगी पोसला का? कुणी?
जगू दे मला वाटते त्याप्रमाणे, दयाळा नको ना मला वापरू!
जरी विघ्नाहर्ता जगाचा तरी का प्रतिष्ठापनेला हवी शुभघडी?
रुढी कर्मकाण्डात फसलो असा मी, खुला श्वास घ्याया कुठे वावरू?
उद्याची करायास तरतूद, माया उगा मी जमवली असे वाटते
जशी धाड यावी तसा येत मृत्यू, पसारा किती अन् कसा आवरू?
मनाच्या कपारीत "निशिकांत" हिरवळ? जरी सत्तरी पार झाली तरी
खरे सांग तेथे कुणी नांदते का? तिचे नाव घ्याया नको घाबरू
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
छान!
छान!
सुंदर
सुंदर