"घर की मुर्गी दाल बराबर" असा तिच्याशी वागत असतो
मूर्ख कसा मी? मृगजळ पुढती मागे मागे धावत असतो
"आधी केले मग सांगितले" तत्व पाळले जुन्या पिढीने
आज मुखवटे, वरून भगवे, खर्या शुचित्वा शोधत असतो
खांद्यावर खेळवले ज्यांना उडून गेले, कलेवराला
मी मेल्यावर द्या खांदा हे शेजार्यांना विनवत असतो
देवाला मी दगड मानले गुर्मी होती मला यशाची
ठेच लागली अशी ! अता मी वारीमध्ये चालत असतो
शब्द अडकणे ओठामध्ये जुनी बिमारी माझी आहे
व्यक्त व्हावया शब्दफुलांना गजलांमध्ये गुंफत असतो
आयुष्याच्या कंगोर्यांना शाप लाभला दु:खाश्रूंचा
तरी बाभाळीच्या काट्यांना कुर्हाड घेउन साळत असतो
मोजकेच क्षण जीवन ज्यांचे मोत्यासम ते चमकत जगती
भल्या पहाटे दवबुंदूंना भाग्य तयांचे मागत असतो
हातामध्ये हात मिळाला तुझा त्या क्षणी झुंज संपली
बेफिकिरीने आयुष्याला आज वाकुल्या दावत असतो
होश हरवले "निशिकांताचे" मयखान्याविन तुला भेटता
जगावयाचे कारण आता तुझ्या भोवती हुडकत असतो
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३