सायंकाळी पूर्व दिशेला केशरलाली मला दिसावी आश्चर्यच ना!
कबरीवरती घेत उसासे दोन आसवे तिची गळावी आश्चर्यच ना!
मरणानंतर सर्व संपते तरी भ्रमांचे ओझे आपण वृथा पेलतो
अमर असूनी मृतात्म्यासही श्राध्द उरकता खुशी मिळावी आश्चर्यच ना!
श्रीमंतांना तणाव मुक्ती कशी मिळावी? हास्य शोधण्या क्लबात जाती
कष्टकर्यांना स्वप्न नसूदे, पाठ टेकता निद्रा यावी आश्चर्यच ना!
आई, भगिनी, सुना, नणंदा स्त्रियाच देती अर्थ जीवना तरी परंतू
नकोच मुलगी, जन्माआधी स्त्रीभ्रुण हत्त्या कुणी करावी आश्चर्यच ना!
काळी करनी, कलंक माथी तरी मिरवती समाजात ते सन्मानाने
रवी शशीच्या प्राक्तनात मग ग्रहणाची का सजा असावी आश्चर्यच ना!
राज्यशास्त्र हे कसे असावे? जगा शिकवले कौटिल्याचा देश आपुला
राजकारणी सर्व बाटले, जनामनाची लाज नसावी आश्चर्यच ना!
जरी पेटला वणवा होता आण्णा (हजारे) हरले शासन जाता नीच स्तराला
षंढ माणसे बधीरलेली मूग गिळूनी गप्प बसावी आश्चर्यच ना!
जीवंत असता किंमत नव्हती उपेक्षिताचे जीवन जगलो खडतर सारे
मेल्यानंतर कलेवराला नवीन कपडे फुले मिळावी आश्चर्यच ना!
सात जगातिल आश्चर्येही मागे पडली लोक विसरले बघता बघता
आश्चर्याची नवीन व्याख्या "निशिकांता" ना तुला उमगली आश्चर्यच ना!
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३