भाई - व्यक्ती की वल्ली

Submitted by अमितव on 8 January, 2019 - 05:29

***तुम्ही चित्रपट बघणार असाल आणि कोरी पाटी ठेवुन बघणे पसंत करत असाल तर आधी बघा आणि मग इथलं वाचा. हा चरित्रपट आहे, त्यात सिक्रेट असं काही नाही पण तुमचं पूर्वग्रहविरहित प्रामाणिक मत वाचायला नक्कीच आवडेल. ***

आज 'भाई - व्यक्ती की वल्ली' बघितला. पुलंच्या सगळ्या पुस्तकांची, अभिवाचनांची, एकपात्री प्रयोगांची पारायणे केल्यावर आणि सुनिताबाईंच्या आहे मनोहर तरी, जीएंस पत्रे वाचुन प्रेमात पडल्यावर हा चित्रपट कसाही असला तरी बघणे क्रमप्राप्तच होते. ट्रेलर बघुन, त्यातील पुलंचे काम करणार्‍या अभिनेत्याचे हावभाव बघुन आणि पुर्वी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी ह्याची रंगमंचीय आणि प्रकाशवाणी वरील रुपांतरे बघण्याचा भीषण अनुभव पदरी असल्याने आणि त्यात चित्रपट महेश मांजरेकरांनी केलेला असल्याने तो बटबटीत असेल, उगाच हरीतात्या, नारायण, नाथा कामत, चितळे मास्तर, धोंडोपंत जोशी, रावसाहेब दोन चार संवाद म्हणून जातील किंवा एखाद्या संमेलनात ह्या सगळ्या वल्ली आल्या आहेत आणि त्यांना पुलं भेटताहेत गप्पा करताहेत असं काही तरी बघायला मिळेल इतपत माफक अपेक्षा ठेवूनच चित्रपटगृहात पाऊल टाकलेले. असं काहीही होत नाही हा एक सुखद धक्का होता.

गोष्ट सुरु होते ती प्रयाग हॉस्पिटलात. पुलं (विजय केंकरे असावेत) शेवटच्या आजारात मरणाच्या दारात उभे (का आडवे) आहेत, सुनीताबाईंना (शुभांगी दामले) भेटायला आप्त मित्र सगे सोयरे (सकल) येताहेत आणि त्यांचं मन वारंवार भूतकाळात जातंय त्यातील घटना बघतंय अशी साधारण मांडणी आहे. ही चौकट/ फॉर्म मला आवडला. ह्या फॉर्म मध्ये भूतकाळात जाताना कुठले प्रसंग दाखवायचे आणि कुठले दाखवले नाही तरी गोष्ट पुढे जाण्याला काही अडचण असणार नाही हे ठरवणे नक्कीच जिकिरीचे.

पुलंचं बालपण चांगलं दाखवलं आहे, पण नंतर एका सभेत तात्यासाहेब केळकरांना पुलंनी समजेल असे प्रश्न विचार म्हटल्यावर 'अंजिराचा भाव काय आहे?' हा प्रश्न विचारलेला हे आपल्याला माहित आहे, पण त्यासाठी ती सभा दाखवणे, त्यांच्या कॉलेज मध्ये त्यांना शिकवायला मर्ढेकर होते इतकंच सांगण्यासाठी त्यांचा एक तास दाखवणे आणि त्यात पुलं अगदीच काहीतरी पानचट आणि केविलवाणे विनोद करताहेत ते दाखवणे, मर्ढेकर कवी होते हे दाखवायला त्यांनी त्यांची कविता पुलंना चाल लावायला देणे, त्यांचे पहिले लग्न दिवाडकरांच्या मुलीशी कसे जमले ते इत्यंभूत दाखवणे, त्यांना बालगंधर्वांनी पेटी वादनासाठी शाबासकी दिली होती हे ३-४ वेळा वारंवार सांगणे अशा अनेक प्रसंगांची जंत्री कशासाठी दाखवली आहे हे मला नीटसं उमगलं नाही. त्या प्रसंगांचा त्यांच्या जीवनावर, मनावर खोलवर परिणाम झालेला दृष्य स्वरुपात तरी मला दिसला नाही. ना त्या प्रसंगांचा प्रेक्षक म्हणून मला काही फायदा झाला. त्यांचं काही आठवड्यांसाठी लग्न झालेलं आणि त्यांच्या पत्नीचे आजाराने निधन झालेलं हे इतकं डीटेल दाखवलं तर त्यात त्यांच्या मनात काय होत होतंते एका वाक्यात आटपतं घेतलं आहे. नक्की केहेना क्या चाहते हो! असं अनेकदा होतं. बरं पुलं इतके मनस्वी होते की समोरच्याच्या मनात काय चालू असेल याची त्यांना कल्पना ही नसे आणि ते समजुन घ्यायची त्या वेळी तरी त्यांची इच्छा नसे असं सांगायचं असेल तर ते ही नंतर अनेकदा अधोरेखित झालं आहे. थोडक्यात हे हे प्रसंग दाखवायचे आहेत पण का? यावर फार विचार न करता हा चांगला वाटतोय. घेऊन टाकू. अशा अविर्भावात एडिटिंग केलं असेल असं अनेकदा वाटत राहिलं.

त्यांचं आणि सुनिताबाईंचं प्रेम कसं जुळलं, हे नीट दाखवणं आवश्यकच होतं, त्यावर अनेक दृष्य आहेत पण प्रेक्षक म्हणून आपण कन्विंस होतच नाही की सुनिताबाईंना भाईंमध्ये नक्की काय आवडलं. उगाच सुनिताबाईंच्या वर्गात बाळ ठाकरे होते आणि पुलं एक गुणग्राही असल्याने व्यंग्यचित्रे बघुन त्यांना बाळाचे पाय पाळण्यात दिसले ही एक फुटकळ माहिती मात्र आपल्याला मिळते. त्यांचं लग्न लागतं ते (कसं लागतं त्याचं इतकं हृद्य वर्णन आहे मनोहर तरी मध्ये आहे, ते दृष्य स्वरुपात बघणे जिवावर आलं, पण ते ठीकच) आणि मग त्यांच्या सहजीवनात पुलंचा मनस्वी स्वभाव आणि त्यांना भेटणार्‍या एक एक वल्ली आपल्याला भेटतात. हा भाग ओव्हरबोर्ड होणं सहज शक्य होतं, पण मोजक्या व्यक्ती घेउन ते टा़ळलं आहे. नाथा कामत, रावसाहेब काही प्रसंगात दाखवणे अशक्यच, पण गुणवैशिष्ट्ये दाखवुन उगाच पाल्हाळ लावुन त्या व्यक्ती बोर करत नाहीत. रच्याकने: पुलं त्यांच्या कॉलेज वयात कसला बोर आहे, बोर मारतोय अशी भाषा खरंच वापरत असतील का? का? हा प्रश्न वारंवार मला पडत होता. Wink

ते बेळगावला नक्की का जातात? आणि नंतर कशी निराशा होत रहाते आणि ते परत का येतात त्याचा उल्लेखही करायचा न्हवता तर बेळगाव जातात ते कशाला दाखवलं? अरे हो! रावसाहेब कसे दाखवता आले असते नाहीतर ? Wink

नंतर पुण्याला आल्यावर चित्रपट - पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन आणखी जोमात चालू होते, बरोबर भिमसेन, वसंतरावांच्या संगतीत संगीतातील मुशाफिरीही चालूच असते. आणि त्यातच चित्रपट संपतो. या चित्रपट दोन भागात आहे. पुढील भागात चित्रपट लेखन का थांबवलं आणि एकपात्री प्रयोग, नाटकं कशी होत गेली असा पुढील प्रवास असेल.
शेवटी हिराबाईंच्या घरी कुमार, वसंतराव, भिमसेन आणि पेटीच्या साथीला पुलं अशी चांगली तब्बल दहा एक मिनिटांची मैफल दाखवली आहे. अनुक्रमे भुवनेश कोमकली, राहुल देशपांडे आणि जयतीर्थ मेऊंडी या त्यांच्या नातवांनी/ शिष्यांनी सावरे ऐजयो आणि कानडा राजा पंढरीचा गायली आहेत. ही मैफल मात्र सुंदर जमली आहे.

आता विचार करतोय तर, पुलंवर चित्रपट काढायचा - चरित्रपट (बायोपिक) काढायचा म्हणजे कसा करता येईल?
'तो काढूच नये... त्यांची पुस्तकं, नाटकं, ललितं, प्रवासवर्णनं, पेटीवादन, चित्रपट-कथा, संगीत हे जाणून उमजूनचा पुलं समजावून घ्यावेत, पुलं चित्रपटात मावणार नाहीत.' अशा मताचा मी अजिबातच नाही. पण चरित्रपट काढायचा म्हणजे मर्त्य मानवाच्या स्टेप्स की बालपण, शिक्षण, लग्न, मूल.. या दाखवल्याच पाहिजेत का? त्या ऐवजी ठळक मुद्दे घेउन आणखी ठसठशीत (इंपॅक्टफुल) करता आला असता का?

एक मात्र फार फार आवडलेली गोष्ट म्हणजे पुलंना गणपती बनवुन मखरात अजिबात बसवलेलं नाही. त्यांना दुसर्‍याच्या इमोशन्स न समजणे, त्या गृहित धरणे, आत्मकेंदित असणे, घाबरट असणे .. हे जे काही सुनिताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये लिहिलेलं आहे तसेच दाखवले आहे.

पण ज्यांना पुलं माहित नाहीत त्यांच्या दृष्टीने विचार केला तर पुलं कोण होते हे पहिल्या भागात तरी काहीच कळत नाही. घटना घडत आहेत पण एक कथासूत्र नसल्याने आणि ही घटना का निवडली आहे त्याच्या मागे नक्की काय मुद्दा ठोसपणे प्रेक्षकांना सांगायचे आहे ते अजिबातच नक्की नसल्याने मनावर एक खोल परिणाम अजिबात होत नाही.

सगळयात खटकलेली गोष्ट म्हणजे चित्रपट बघून झाल्यावर पुलं एक हरहुन्नरी, विविध क्षेत्रातील फक्त जाणच नाही तर निष्णात कलाकार होते हे कुठे मनावर ठसतंच नाही. त्यांचं पात्र आवडलेच पाहीजे असं नाही पण मनावर ठसलं तर पाहिजे! पण ते ही करण्यात चित्रापट अपयशी ठरतो. आता गटणे आणतील, आता नाथा कामत असं आपल्याला माहीत असल्याने आपण म्हणतो. पण ते ग्रेट का हे नवख्या व्यक्तीला ... कशाला मलाही समाजावण्यात ममां सपशेल हरले आहेत.

शुभांगी दामल्यांनी आणि इरावती हर्षे यांनी सुनिताबाईंची भूमिका फारच सुंदर केली आहे. त्या अगदी सुनिता बाईच वाटतात. पुलं (सागर देशमुख) मात्र काही ठराविक दृष्यात चांगले वठले आहेत, बाकी ते पुलं वाटतच नाहीत. वसंतरावांचं काम केलेला अभिनेता ही वसंतरावच वाटतो. त्यांचे आई, वडील, रमाकांत सगळे चपखल. रावसाहेब आणि अंतू बरवा ही उत्तम. पण पुलं विनोद करतात ते अनेकदा फारच बाश्कळ वाटतात, आणि सागर देशमुखला ही विनोदाचं टायमिंग अगदीच सापडलेलं नाहीये त्याने ही अनेक विनोद गरीब वाटतात.

चित्रपट संपुन बाहेर पडताना सावरे ऐजय्यो डोक्यात रुंजी घालतं होतं. गाडीत बसल्यावर वसंतरावांच्या आवाजात ज-मुना कि-नारे मेरो गाव... गाव.. आणि नंतर गॉव वर घेतलेली मींड परत परत ऐकुन मग नेक्सचं बटण दाबल्यावर दुसरं गाणं न लागता एकदम अचानक 'नामू परीट' लागलं. गूगल फार जास्त स्मार्टनेस दाखवतंय, हा माझी तिकिटं बघुन सर्च टेलर करत असेल तर हा हलकटपणा आहे असलं काही काही डोक्यात न आणता 'सदैव कपड्यांच्या दुनियेत राहुनही इतका नागवा माणूस माझ्या बघण्यात नाही' पर्यंत निमुट ऐकत राहिलो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पु लंवर लिहीलेलं पुस्तक हीच तर त्या पुस्तकाची ओळख
>>>
असहमत- असं लिहावंसं वाटतं. पुलंवर नाही लिहिलंय ते. पुलंसारखा प्रचंड माणूस त्याचा अपरिहार्य भाग होणारच होता. इतकंच काय, पण मुळात त्याचं शीर्षकच मुळात.पुलंसेंट्रिक आहे, असंही आधी वाटत होतं. पण तसं ते नाही, हे पुन्हा वाचल्यावर नीट कळलं. पुलंनी अत्यंत अर्थगर्भी असं गंभीर लिखाणही केलं (लाडक्या व्यक्तिमत्वाचा ज्याशी अजिबात संबंध नाही) त्याच्या तोडीस तोड असं हे लिखाण आहे.

आपल्या प्रत्येकाच्या मनात पु.ल. नावाचं स्वत:च असं स्वतंत्र.. खास बेट आहे! त्यांच्यावरच्या सिनेम्यात,किंवा नाटकात ते ,तस्से बेट भेटणार नाहीच ! ताजमहालाला विटाच त्या! मी नाही पाहणार सिनेमा!

हा सिनेमा पाहायचा नाही हे ठरवण्यामागे इरावती हर्षेनी सुनीताबाईंचे काम केले आहे हा एक मेजर फॅक्टर आहे. मांजरेकर दुय्यम होण्याइतपत मला हा महत्वाचा वाटला.
इरावतीच्या मी पाहिलेल्या सिनेमात ती इरावतीच होती. अस्तु आणि कासवमध्ये तिच्या इरावती असण्याला स्कोप होता. कारण ती जशी आहे तशाच त्या दोन व्यक्तिरेखा होत्या. तिचा अभिनय बघताना "ती सुंदर आहे" याची तिला सारखी जाणीव असते असं वाटतं. तिचे मराठी उच्चार मला अगदीच आवडत नाहीत. आणि सुनीताबाईंसारखी ती कदापि बोलू शकणार नाही हे अगदीच उघड आहे.

पुलंवर लिहीलेलं पुस्तक हीच तर त्या पुस्तकाची ओळख
>>>
असहमत. सुनीताबाई माहितीच नसतील तोपर्यंत ' पुलंची पत्नी' ही ओळख असणं स्वाभाविकच आहे. पण पुस्तक वाचून झाल्यावर ती ओळख पुरेशी नाही. आणि ते पुस्तक पुलंवर नाही.

निर्माता दिग्दर्शकांनीही 'सुनिताबाई काय म्हणतील' या धास्तीनेच सारा सिनेमा केलाय असं वाटतंय >> असाच विचार डोक्यात आलेला.
इरावतीच्या दिसण्या बोलण्यात मला फार काही खटकलं नाही. खरंतर तिचा रोल बराच मोठा (लांबीने आणि स्थित्यंतराचा, अनेकविध भावभावना आणि स्थलकाल वैविध्यपूर्ण आहे) तरी तो नीट डेव्हलपच होत नाही. इरावती असताना सुनीताबाई नक्की कशा होत्या आणि त्यांनी केलेले चॉइसेस त्यांनी का केले हे अगदीच वरवरचं दाखवलंय.
पण तेच शुभांगी दामले जेमतेम 4 5 शॉट मध्ये एकाच रुग्णालय सेटिंग मध्ये 4/5 व्यक्तीना भेटताना दिसतात पण त्यात ही बाई स्वच्छ सॉर्टएड विचारांची, हळवी पण तो हळवा कोपरा मनातून बाहेर येऊ न देणारी, साधी पण टापटीपेची असावी हे लख्ख दिसतं.

गेल्या आठवड्यात पाहिला 'भाई' ! पुलंच्या स्वतःच्या साहित्यातून बायोपिक बनवण्यासाठी जी सामग्री लागते ती फार मिळण्याजोगी नाही त्यामुळे 'आहे मनोहर तरी' आणि एकंदर सुनीताबाईंच्या लिखाणाचाच आधार घेतलेला आहे हे जाणवतं.

सागर देशमुखचं कास्टिंग मला खूप आवडलं ( अतुल परचुरे आणि निखिल रत्नपारखीपेक्षा तर खूपच जास्त.) पुल म्हणून त्याला स्वीकारणं अजिबात जड गेलं नाही. त्याच्या दिसण्यात एक बाळबोध निरागसपणा आहेच जो ह्या भूमिकेसाठी एकदम चपखल. सुनीताबाईंच्या काही क्लिप्स पाहिल्या आहेत आणि लिखाण तर फारच मनापासून वाचलं आहे. त्या तत्त्वाच्या, थोड्या हेकेखोर, तडकफडक, स्पष्टवक्त्या होत्या पण त्याचबरोबर मोठ्या आवाजात मोकळेपणाने बोलणाऱ्या, खळखळून हसणाऱ्या, पारदर्शी, लखलखीत अशाही होत्या असं त्या क्लिप्समधून आणि लिखाणातून दिसतं. तर इरावतीत त्यातला तडकफडक पार्टच दिसलाय जास्त. शुभांगी दामले ह्यांचं रुप सुनीताबाईंच्या जास्त जवळ जाणारं पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तो कणखरपणा अगदीच नाही दिसला. कंटिन्यूटी राखण्यासाठी इरावतीचाच आवाज शुभांगी दामल्यांना वापरलाय पण ग्रिप्सच्या नाटकांमुळे त्यांचा आवाज मला इतका परिचित आहे की इरावतीचा आवाज पॅचवर्कच वाटत राहिला शेवटपर्यंत आणि भयंकर खटकत राहिला कानाला. तरी सुनीताबाई म्हणून मला इरावती जास्त आवडली शुभांगी दामल्यांपेक्षा ( त्यांना अर्थात जास्त स्कोप नाही ह्या भागात त्यामुळेही असेल ...)

ठाकरे प्रसंग गडबड आहे कारण विकीवर सुनीताबाई आणि ठाकऱ्यांचे जन्मसाल एकच दिसते पण सिनेमात ते अगदीच शाळकरी आणि त्या मोठ्या दिसतात. तसेच डाळिंब दाण्यांचा प्रसंग आहे मनोहर तरीत वर्णन आहे त्यापेक्षा वेगळा आहे ! तिथे सिनेमॅटिक लिबर्टी नको होती...
पांढर्‍या चादरीवर डाळिंबांची सालं आणि दाणे असलेली बशी ठेवणे ह्याबद्दल तर अगदी अगदी ! अतिशय खटकलं ते.

स्क्रीनप्ले थोडा तुटक वाटला पण एकुणात साधे वातावरण, हलकेफुलके प्रसंग, निखळ मजेशीर संवाद ह्यांची भट्टी चांगली जमून आली आहे. अगदी फ्लॉलेस उत्कृष्ट चित्रपट नसला तरी दोन घटका मन गुंगवून ठेवणारा चांगला प्रयत्न आहे त्यामुळे जरुर बघावा.

पुलंनी आपल्या लिखाणातून आणि कथाकथनातून एक एक व्यक्तीचित्रं अशी उभी केली आहेत की ते सगळे घरचेच नातेवाईक झाले आहेत. त्यात प्रमुख पात्रं तर आहेतच आहेत पण अगदी 1/6 यमी आणि ती अर्पिता का कपर्दीका नावाची आगाऊ मुलगी, त्यांचं पण एक स्वतंत्र स्थान निर्माण झालंय. मांजरेकरांच्या किंवा कदाचित इतर कोणाच्याही चष्म्यातून ह्या सगळ्यांना बघायचं धाडस होणार नाहीये. त्या व्यक्तींना जरास्सा कोणी हात लावला तरी तिथल्या तिथे तो बुरुज डायरेक्ट ढासळतोच. म्हणून बघावासा वाटूनही अजूनही न पाहीलेला सिनेमा.
जाता जाता - सुनिताबाईंना आहे मनोहर तरी साठी पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा अध्यक्षीय भाषणात (मला नेमके वक्ते आठवत नाहीयेत) वक्ते म्हणाले होते की "हे भाई, आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व, हे नुसते गुणीच नसून त्यांच्यातही बरेच अवगुण आहेत. आणि त्या अवगुणांमुळेही आपलं मराठी साहीत्य अत्यंत समृद्ध झालं आहे ह्याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे.

मी चित्रपट बघितला नाही, पण युट्युबवर एक अप्रतिम सिन बघितला.
कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या महफिलीचा सिन!
जर खरंच असं काही घडलं असेल, तर ज्यांना हा क्षण याची देही याची डोळा बघायला मिळाला असेल, ते किती भाग्यवान असतील!

या परीक्षणाच्या पहिल्या दोन ओळी वाचल्यानंतर आधी चित्रपट पाहून मग आपले मत मांडायचे आणि मगच परीक्षण वाचायचे ठरवले.

कालच पाहिला. मी बायोपिक शक्यतो पाहतोच. माझ्याकडून आतापर्यंत पाहिली गेली आहेत आणि आवडली सुद्धा आहेत. बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, काशिनाथ घाणेकर आणि आता भाई. या सर्वांविषयी लहानपणी प्रचंड उत्सुकता असायची. त्यामुळे हि बायोपिक्स बघण्यामागे माझी मुलभूत अपेक्षा "तो काळ कसा होता हे सगळे लोक कसे जगत होते ते अनुभवणे" हि असते. आणि "भाई" त्या अपेक्षेस पुरून उरला आहे. म्हणूनच चित्रपट पाहून झाल्यावर "भारून टाकले. मन भरून गेले" अशी प्रतिक्रिया होती. काय काळ होता राव. आ हा हा हा! आयुष्य भरभरून जगत होते ते लोक. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली "सोशल नेटवर्किंग" नसताना लोक जास्त "सोशल" होत होते Happy

थोडे विषयांतर झाले.असो. तर चित्रपटाची जाहिरात पाहून चित्रपट पाहण्याची फार अशी उस्तुकता वाटत नव्हती. आणि दुसरे म्हणजे पुलंनी केलेल्या लिखाणावर चित्रपट निघणे वेगळे, पण पुलंच्या व्यक्तिगत आयुष्यावर कधी फार चर्चा होताना त्याकाळात वाचली/ऐकली नाही (वर उल्लेख केलेल्या इतर विभूतींच्या तुलनेत). "आहे मनोहर तरी" ने त्याकाळात वादग्रस्त प्रसिद्धी मिळवली होती. पण तरीही ते पुस्तक वाचणे घडले नाही ते नाहीच. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहायला सुरवात केल्यानंतर मन गुंतत गेले. सुरवातीच्या दृश्यांनी डोळे पाणावले. सगळे थियेटर स्तब्ध. काहीजण अक्षरशः रडत होते. (विशेषकरून सुनीताबाई "जेंव्हा आपण काहीच करू शकत नाही..." म्हणतात ते दृश्य फारच परिणामकारक)

सागर देशमुख पुलंच्या भूमिकेत अगदी चपखल. सुनीताबाईंची भूमिका सुद्धा अप्रतिम. इतर पात्रे सुद्धा खूपच चांगली जमून आली आहेत. गदिमा, भीमसेनजी जोशी, वसंतरावजी देशपांडे या सगळ्यांच्या भूमिका पाहताना मन त्याकाळात जात होते. हेच त्या भूमिकांचे आणि कलाकारांचे यश. अनेक प्रसंग छान, अगदी जिवंत केले आहेत. मनाला भिडणारे, खळखळून हसवणारे, सदगदित करणारे अनेक प्रसंग सुंदर पद्धतीने प्रेझेंट करून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट खूपच यशस्वी झालाय. त्यातून पुलं उलगडत जातात. शेवटचा प्रसंग तर "वाह वा ! क्या बात". क्षणभर असे वाटले कि हि मैफिल समोर खरेच सुरु आहे आणि आपण तिचा भाग आहोत आणि तिचे शुटींग करायला नकळत माझा हात मोबाईलकडे वळलासुद्धा होता, इतके ते सारे डोळ्यासमोर जिवंत झाले आहे.

आता त्यातल्या त्यात नकारात्मक गोष्टी. एक म्हणजे मध्यंतरानंतर थोडासा वेग कमी होतो. दुसरे म्हणजे त्याकाळातले साधे घर दाखवताना गोवा, महाबळेश्वर किवा लोणावळ्यात वगैरे आजकाल जे रिसोर्ट असतात तिथे शुटींग केल्याचे स्पष्ट जाणवते (विशेष करून बेळगाव मुक्कामी असतानाचे घर, सुनीताबाई डाळिंब सोलत बसलेल्या असतात आणि रात्री उशिरा पुलं घरी येतात तो प्रसंग इत्यादी). पुलं आणि सुनीताबाई यांची मने जुळण्याचे क्षण दाखवणे जमलेय जरूर. पण ते अजून चांगल्या पद्धतीने दाखवता आले असते असे वाटले. थोर व्यक्तींच्या जीवनातील असे प्रसंग प्रभावी पद्धतीने दाखवणे हे खरेच जबाबदारीचे काम असते आणि तिथे दिग्दर्शकाची वैचारिक परिपक्वता पणाला लागते. अजून एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि सुनीताबाई हे एकाच वयाचे होते. किंबहुना बाळासाहेब त्यांच्यापेक्षा काही महिन्यांनी मोठेच होते. तरीही सिनेमात सुनीताबाई बाळासाहेबांच्या शिक्षिका दाखवल्यात, शिवाय बाळासाहेबांपेक्षा खूपच मोठ्या दाखवल्यात. हे कसे काय? हा प्रसंग बहुधा राज ठाकरे यांच्या बाबत घडला असावा असे काहींचे मत आहे. खरेखोटे माहित नाही. आणखीन एक बाब म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर, या मोठ्या व्यक्तीनी दारू पीत सिगारेट ओढत आयुष्य काढले होते असा समज नवीन पिढीचा (ज्यांना या मोठ्या व्यक्ती फार माहित नाहीत, विशेषतः शाळेत जाणारी मुले) होऊ शकतो असे एक वाटून गेले. कारण चित्रपटात फक्त तेच दाखवले आहे. त्यांनी घेतलेले कष्ट मेहनत आणि कलेच्या साधनेसाठी काय खडतर दिवस काढलेत हे सुद्धा निदान त्यांच्या संवादातून तरी येणे आवश्यक होते असे खूप जाणवले. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत. याबाबत मतांतरे असू शकतात. असो.

चित्रपट गर्दी खेचत आहे. मी पाहिला तेंव्हा हाऊसफुल्ल होता. एक नंबरचा मोठा स्क्रीन. मोठे प्रेक्षागृह. तुडुंब भरलेलं. मराठी चित्रपटाला ते सुद्धा बायोपिक साठी असे दृश्य पाहून खूप खूप मस्त वाटत होतं.

सागर देशमुखचं कास्टिंग मला खूप आवडलं ( अतुल परचुरे आणि निखिल रत्नपारखीपेक्षा तर खूपच जास्त.) पुल म्हणून त्याला स्वीकारणं अजिबात जड गेलं नाही. त्याच्या दिसण्यात एक बाळबोध निरागसपणा आहेच जो ह्या भूमिकेसाठी एकदम चपखल. >>> अगदी अगदी अगो.

स्क्रीनप्ले थोडा तुटक वाटला पण एकुणात साधे वातावरण, हलकेफुलके प्रसंग, निखळ मजेशीर संवाद ह्यांची भट्टी चांगली जमून आली आहे. अगदी फ्लॉलेस उत्कृष्ट चित्रपट नसला तरी दोन घटका मन गुंगवून ठेवणारा चांगला प्रयत्न आहे त्यामुळे जरुर बघावा. >>> हे छान लिहीलंस अगो.

या मोठ्या व्यक्तीनी दारू पीत सिगारेट ओढत आयुष्य काढले होते असा समज नवीन पिढीचा (ज्यांना या मोठ्या व्यक्ती फार माहित नाहीत, विशेषतः शाळेत जाणारी मुले) होऊ शकतो असे एक वाटून गेले. कारण चित्रपटात फक्त तेच दाखवले आहे. त्यांनी घेतलेले कष्ट मेहनत आणि कलेच्या साधनेसाठी काय खडतर दिवस काढलेत हे सुद्धा निदान त्यांच्या संवादातून तरी येणे आवश्यक होते असे खूप जाणवले. >>> हे मलाही वाटलं बघताना. भाई आईसमोर सिगारेट ओढताना बरेचदा दाखवलेत तेव्हा आई आत्तातरी त्यांना काहीतरी बोलेल, थोडी रागवेल असंही वाटत होतं, उगाच आपलं. पण तसं झालं नाही.

ओवरऑल मला आवडला पिक्चर.

"महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला 'भाई : व्यक्ती की वल्ली' हा चरित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'गानहिरा हिराबाई बडोदेकर; तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी चित्रपटात चुकीचे प्रसंग दाखविण्यात आले असून, चित्रपट म्हणून वाट्टेल ते दाखविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे."

https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

चित्रपट काढण्यापूर्वी संबंधीत व्यक्तींची परवानगी घ्यावी लागते ना, तसे काही झालेले दिसत नाही. काम करणारे कलाकारही एवढे मिंधे असतात का की काहीच बोलू शकत नाहीत. वसंतरावांचं चुकीचं चित्रण झालंय याबद्दल त्यांचा नातू काही बोलल्याचं ऐकीवात नाही. पुलंच्या लेखनावर आधारित हिंदी मालिका निघाली होती तेव्हा पुलंच्या नातेवाईकांनी हरकत घेतली होती मग आता का नाही. एवढ्या मोठ्या लोकांची चुकीची प्रतिमा दाखवणं ही अक्षम्य चूक आहे.

चित्रपट काढण्यापूर्वी संबंधीत व्यक्तींची परवानगी घ्यावी लागते ना, तसे काही झालेले दिसत नाही. >>>>> हम्म्म, तसं दिसतंय, मटातली बातमी वाचून.

खूपच खटकलेली अजून एक गोष्ट म्हणजे भीमसेन, वसंतराव आणि कुमारांच्या मैफिलीत ज्यात हिराबाई पण आहेत, ती मैफील तंबो-याशिवाय कशी होऊ शकेल?

काल इथे पहिला भाग बघितला. दुसरा लगेच येत्या शनिवारी आहे. परीक्षण अगदी 100% पटलंय फक्त इरावती हर्षे नी निराशा केली आहे.
पहिल्या भागात (1950) च्या सुमारास साक्षात पुलं हा बोर आहे, खूप बोर करतोय वगैरे नक्क्कीच म्हणत नसतील.....
शेवटची मेहफिल सुदर झालीये, पण हिराबाईंची व्यक्तिरेखा खुपच तरुण दिसते. वास्तविक हिराबाई बडोदेकर त्यासर्वांहून 15/20 वर्ष मोठ्या होत्या.
माझ्या आठवणीप्रमाणे सुनीता बाईंच मिसकॅरेज झाल असा उल्लेख आहे मनोहर तरी मध्ये आहे पण सिनेमात त्यांनी स्वतःहून अबोर्ट केलय अस दाखवलय. का ते अजिबातच कळल नाही.
लग्नं लावुन घरांत जाताना सुनीताबाईंच्या आईच्या पायातल्या चपला, सिगारेट चा पाकीट आणायला घरात जाताना सुनीताबाईंच्या पायातल्या चपला स्लिपर्स नव्हे, खूप मोठा सोफे वगैरे असलेल घर इत्यादी गोष्टी बळच आणि अनावश्यक होत्या. सुनीताबाईंच्या वडील जेंव्हा प्रथम पुलंकडे येतात तेंव्हा छोट घर आणि लग्न झाल्यावर मात्र पूर्वीचंच मोठ घर, सोफे, छपरी पलंग इत्यादी अत्यंत ढोबळ चुका टाळायला अजिबात हरकत नव्हती. एकूण चित्रपट जन्मशताब्दी वर्षात काढायचा म्हणून अतिशय घाईघाई नी काढल्यासारखा वाटला.
पिक्चर बघुन घरी आल्यानंतर लगेच कथाकथन ऐकावंसं वाटलं ह्यातच सर्व काही आलय.

आजच इथे अटलांटा ला चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पहिला !! पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लगोलग २ शो होते .
सागर देशमुख as पुलं, इरावती, शुभांगी दामले as सुनीताबाई हि कास्टिंग मला आवडली. लगोलग २ भागांच्या सिनेमामध्ये मी तरी रमून गेले.
भाई आणि त्यांच्या सहवासातील किंवा त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती अशा चित्रपट माध्यमातून सलग बघायला खूप छान आणि एक्सायटिंग वाटले.

पुलं ची सगळी पुस्तकं वाचलेल्यांच्या पिढीमधली मी आहे .
चित्रपटात थोड्या त्रुटी आहेतच, पण तरीही आनंद खूप मिळाला .

माझ्या आठवणीप्रमाणे सुनीता बाईंच मिसकॅरेज झाल असा उल्लेख आहे मनोहर तरी मध्ये आहे पण सिनेमात त्यांनी स्वतःहून अबोर्ट केलय अस दाखवलय. >>> आभा, "आहे मनोहर तरी" मधे सुद्धा सुनीताबाईंनी, त्यांनी स्वतःहून अबोर्ट केलय असंच लिहीलं आहे.

लग्नं लावुन घरांत जाताना सुनीताबाईंच्या आईच्या पायातल्या चपला, सिगारेट चा पाकीट आणायला घरात जाताना सुनीताबाईंच्या पायातल्या चपला स्लिपर्स नव्हे, खूप मोठा सोफे वगैरे असलेल घर >> पुलंचं लग्न रत्नांगिरीत सुनीताबाईंच्या माहेरघरी झालं. त्यांचे वडील त्या काळी नावाजलेले फौजदारी वकील होते. त्यांचं स्वतः बांधलेलं मोठं दुमजली घर होतं. थोडक्यात त्या काळच्या रत्नांगिरीमधे ते आधुनिक विचारसरणीचे व श्रीमंत कॅटॅगरी होते असावेत. त्यामुळे सोफे, पायात स्लीपर्स वगैरे शक्य असावं.

मी सिनेमा पाहिलेले नाहीत. पण पुलं आणि सुनीताबाईंचं साहित्य खूप वाचलं ( कोळून प्यायलं ) आहे. त्या आधारावर वरील स्टेटमेंट बेतली आहेत.

अगदी योग्य लिहीले आहे. ममां हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रस्थ आहे आणि दाम करी काम ही त्यांची वृत्ती दिसून येते. भाग दोन बघण्याची ईच्छाच झाली नाही आणि असंही त्याने लवकर गाशा गुंडाळला.

मुळात पु.ल. चे लेखन वाचलेले नाही, त्यांची चित्रफितही पाहिलेली नाही, कारण ममांला तशी गरज वाटली नाही.
'मी पाच कोटी लावणार आहे.. तुम्ही मला त्यांचे ९० प्रसंग सांगा. मी त्यातले साठ निवडून चित्रिकरण करतो, आणि त्यातले ३०/४० घेऊन चित्रपट करतो', असा माज फक्त ममां करू शकतो, कारण महाराष्ट्रात आणि मराठी चित्रपट सॄष्टित त्याची दादागिरी आहे.
आहे मनोहर मधले चांगले चांगले प्रसंग घेऊन त्याचे अर्थ उगाचच बदलून 'सिनेमॅटीक लिबरटी' असे नांव देऊन चित्रपट केला आहे.
...
पुलंच्या भाषेतच सांगायचे तर 'जमत नसताना तर उंटाच्या .. चा मुका घ्यायला.. '
हे सगळे कशाला? तर धंदा करायचा म्हणुन. बाकी काही नाही.
....

तेव्हा पुलंच्या नातेवाईकांनी हरकत घेतली होती मग आता का नाही <<< याबद्दल त्यांनी (पुलंच्या नातेवाईकांनी) हरकत तर घेतली होतीच, पण वेगळे स्टेटमेंटही जाहीर केले आहे.
. पुलंचे आणि जवळपास सगळ्यांचेच चारित्र्यहनन या चित्रपटाने केले आहे. (याबद्दल लवकरच एक web-site येत आहे. )
. अद्दल घडवायला कोर्टात जाऊन १०/२० वर्षे केस लढवावी लागेल. तेवढा रिकामा वेळ नातेवाईकांकडे नाहीय.
. काही नातेवाईक स्वतःला प्रसिध्दी मिळाल्याच्या आनंदात 'चित्रपट कसा मस्त आहे' अशी जाहीरात करत फिरत आहेत.
. पुलंच्या लिखाणाचे पूर्ण अधिकार 'आयुका' कडे आहेत, आणि ते आपले काम सोडून कोर्टकचेर्‍या करू शकणार नाहीत हे सगळ्यांना माहित आहे.
. पुलंच्या लिखाणावर केलेल्या एका चित्रपटाची केस यापूर्वीही कोर्टात गेली होती. हा चित्रपटही फालतू होता.

http://www.pahawemanache.com/review/bhai-marathi-movie-review?fbclid=IwA...

मराठी चित्रपट सॄष्टित त्याची दादागिरी आहे. >> खरं आहे. सलमान जसा हिंदीत तसाच ममां आहे मराठीत.
हा सिनेमा न पाहिल्याचे समाधान वाटले. प्रोमो वरून कल्पना आलीच होती.

Pages