चालून आलेलं ऐश्वर्य, सत्ता असतानाही केवळ स्वत:च्या नाकर्तेपणाने त्यावर बोळा फिरवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातही आहेत आणि आपल्या अवतीभवतीही.
सर्व तऱ्हेची मोकळीक, मुभा असताना, चांगले रिटर्न्स मिळत असताना आणि बजेटचीही विशेष चिंता नसतानाही भारतीय सिनेमेकर्स वेब सिरीजच्या क्षेत्रात कशी चवीचवीने माती खात आहेत, ह्याचं अगदी ताजं ताजं उदाहरण म्हणजे 'अॅमेझॉन प्राईम'वरची 'मिर्झापूर' ही सिरीज.
'मिर्झापूर'च्या पहिल्या सीजनचे ९ भाग प्राईमवर एकत्रच प्रदर्शित झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील 'मिर्झापूर' शहर. ह्या शहरावर वर्षानुवर्षं 'त्रिपाठी' ह्या बाहुबलींचं राज्य आहे. आधी सत्यानंद त्रिपाठी (कुलभूषण खरबंदा) आणि आता अखंडानंद त्रिपाठी उर्फ 'कालीन भैया' (पंकज त्रिपाठी). गालिच्यांच्या निर्मितीआड अफीम आणि देशी कट्ट्यांचा व्यापार करणाऱ्या कालीन भैयाचा बिगडेदिल शहजादा मुलगा म्हणजे 'फुलचंद उर्फ मुन्ना त्रिपाठी' (दिव्येंदू शर्मा) हा ह्या साम्राज्याचा पुढचा वारसदार. मुन्नावर एका खूनाचा गुन्हा दाखल होतो आणि एक इमानदार सरकारी वकील रमाकांत पंडित (राजेश तैलंग) त्याच्याविरुद्ध वकिली करायला उभा राहतो. पंडितजींचे दोन मुलगे गुड्डू (अली फझल) आणि बबलू (विक्रांत मासी) आणि एक मुलगी असते. गुड्डू वर्चस्व आणि सत्तालोलुप असतोच आणि बबलूकडे थोडा सारासारविचार असतो. मुन्नाविरुद्धची केस ह्या दोघा मुलांना वर्चस्वाच्या, इर्ष्येच्या संघर्षात ओढते आणि सगळ्या मिर्झापूरचा चेहरामोहरा बदलतो.
ही सगळी कहाणी आजकालच्या टिपिकल गँगवॉर फिल्म्ससारखीच पुढे पुढे सरकत, पसरत जाते. अनावश्यक भडक चित्रिकरणामध्ये मात्र 'मिर्झापूर' आजपर्यंतच्या सगळ्या भारतीय सिनेमा व सिरीजच्या अनेक पाउलं पुढे आहे. अतिरक्तरंजितपणा जागोजाग भरलेला आहे. एखाद्याला गोळी घातली आणि तो मेला, इतकं सरळसोट तर काहीच नाही. त्याची लिबलिबणारी आतडी पोटातून बाहेर लोंबली पाहिजेत, फुटलेला डोळा बाहेर लटकला पाहिजे, रक्ताचे फवारे तर उडलेच पाहिजेत पण सोबत मांसाचे तुकडेही आलेच पाहिजेत, गळा चिरतानाच्या चिळकांड्या साक्षोपाने दिसल्या नाहीत तर माणूस मेल्यासारखा वाटणारच नाही अश्या अत्यंत कल्पक डिटेलिंगवर भरपूर वेळ घालवला आहे.
जोडीला अनावश्यक आणि अगदी हास्यास्पद सेक्सची दृश्यंसुद्धा आहेत. मग लायब्ररीत बसून मुलीने केलेलं हस्तमैथुन असो किंवा कुणाचे अनैतिक संबंध, एकाही प्रसंगाचा मूळ कथेशी काही एक संबंध नाही आणि ते केवळ धाडसीपणा, बिनधास्तपणा म्हणून चित्रित केलेले असावेत, असंच जाणवतं, कारण झाडून सगळी दृश्यं फसलेलीही आहेत !
इतकी भडक हिंसा आणि उथळ सेक्स दृश्यं असल्यावर शिव्यांनीच काय पाप केलंय ? त्यामुळे त्यामुळे प्रत्येक वाक्यात विरामचिन्हं वापरावीत इतक्या सढळपणे परस्परांच्या माता-भगिनींचं आदरपूर्वक स्मरण केलं जातं. हे तर इतकं अति आहे की ह्या व्यक्तिरेखा सकाळी झोपेतून जाग आल्यावर मनातल्या मनात स्वत:लाही 'उठ की आता मायघाल्या' असं म्हणत असाव्यात. त्याशिवाय त्यांची सकाळच होत नसावी किंवा त्यांना प्रेशरच येत नसावं कदाचित. संवादांतले बहुतांश 'पंचेस' आणि विनोद हे केवळ शिव्यांमुळे आहेत. सर्जनशीलतेच्या दिवाळखोरीचं ह्याहून मोठं दुसरं उदाहरण बहुतेक तरी नसावंच.
['ब्रिजमोहन अमर रहे' नावाचा नेटफ्लिक्स ओरिजिनल सिनेमाही ह्याच पंथातला असावा. मी तो पूर्वी पाहायला घेतला होता आणि पहिल्या काही मिनीटांतच ह्याच सगळ्या दिवाळखोरीचा उबग येऊन बंद केला होता.]
ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. ह्याच्या आधी हा अनुभव 'सेक्रेड गेम्स'मध्ये आला होता. अनुराग कश्यपच्या बहुतांश सिनेमांमध्ये येतच असतो. मोकळीक मिळाली की भडक हिंसा आणि सेक्स दाखवणं, हा अगदी सोपा मार्ग आहे. ह्या मोकळीकीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण किंवा वादग्रस्त विषय, जे एरव्ही हाताळता येणार नाहीत, ते कुणी हाताळत नाही कारण ते अवघड असेल. सोपं हेच आहे की फाडा पोटं, उडवा मुंडकी, काढा कपडे, झवा मागून पुढून ! हिंसा आणि सेक्स अगदी सहज विकले जातील म्हणून दाखवायचे, इतका सरळसाधा व्यावसायिकपणा ह्या मागे असून, त्यावर उद्या सेन्सॉरची गदा आली की मात्र ह्याच व्यावसायिकपणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवणार.
'मिर्झापूर' हा ह्या हलक्या विकृत व्यावसायिकतेचा अजून एक किळसवाणा, तिरस्करणीय चेहरा आहे. हा चेहरा सर्जनशील वगैरे अजिबात नसून मिळालेलं स्वातंत्र्य ओरबाडून उपभोग घेण्यासाठी वखवखलेला आहे.
अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा हे चौघे मुख्य भूमिकांत आहेत. तर श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा अशी सगळी मंडळी सहाय्यक भूमिकांत. सगळ्यांचीच कामं जबरदस्त झाली आहेत. त्यांच्या प्रभावी कामांमुळे सिरीज पाहात राहावीशी वाटते, हे मात्र नक्कीच. कुणाही एकाचा पॉवरहाऊस पर्फोर्मंस असा इथे नसून सगळे एकाच पातळीवर दमदार आहेत, हे विशेष. 'अमित सियाल' ह्या गुणी अभिनेत्यांच्या एन्ट्रीला आपल्या भुवया अपेक्षांसोबत उंचावतात. मात्र तो सिरीजमध्ये कशासाठी आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. त्याला पूर्णपणे वाया घालवला आहे.
कथानकात अनेक ठिकाणी तर्क वगैरे वास्तववादी पाखरांना भुर्रकन उडवून लावलं आहे. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही. किंबहुना, हे त्या त्या वेळी अगदी स्वाभाविक घडायला हवं असतं, ते घडलं असतं तर कहाणी कधीच संपली असती त्यामुळे हा सगळा पाणी ओतून ओतून वाढवत नेण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही.
एकंदरीत प्रभावी अभिनय आणि हिंसक दृश्यांमुळे साहजिकपणे निर्माण होणारा थरार ह्या जोरावर 'मिर्झापूर' उभी आहे. ह्यात कुठल्याही प्रकारची कल्पकता शोधू नका आणि ती शोधणं हा जर तुमचा स्वभावधर्म असेल, तर हिच्या वाटेलाच जाऊ नका !
मिर्झापूर (An Amazon Prime Original Series)
निर्मिती - एक्सेल एन्टरटेनमेंट (फरहान अख्तर, रितेश सिधवानी)
दिग्दर्शक - करण अंशुमन, गुरमीत सिंग, मिहीर देसाई, निशा चंद्रा
लेखक - करण अंशुमन, पुनीत कृष्ण, विनीत कृष्णन,
कलाकार - अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, शीबा चढ्ढा, अमित सियाल
छायाचित्रण - संजय कपूर
पार्श्वसंगीत - जोएल क्रेस्टो
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/11/mirzapur-amazon-prime-web-series....
ब्रिजमोहन अमर रहे' प्राईमवर
पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं<<<<< शंभर लाईक्स
अभिनय सगळ्यांचा छान आहे, काही सवांद मजेशीर आहेत, यूपी लिंगो ऐकायला मजा येते, पण खूपच हाणामारी, हिंसा, उगाच शेक्सी सीन, त्यात त्या नेहमीच्या शिव्या, त्यामध्ये सुद्धा नावीन्य नव्हतं. वैताग आला, कथानक नेहमीच्या वळणांनी पुढे जातं, अपेक्षित शेवट होतो. हे प्रकार काहींना आवडत असतील, पण माझं बहुतेक वय झालंय, आता या गोष्टी बघवत नाहीत
>> ब्रिजमोहन अमर रहे'
>> ब्रिजमोहन अमर रहे' प्राईमवर नाही नेटफ्लिक्सवर आहे <<
ओह्ह ! गडबड झाली.
दुरुस्त केले. धन्यवाद !
कुठे चाललंय हे सगळं आणि
कुठे चाललंय हे सगळं आणि समाजाला कुठे नेणार आहे हरी जाणे. सतत केलेला मारा दगड सुद्धा फोडतो तिथे कोवळ्या मुलांच्या मनांचं काय? हातांमधे स्मार्टफोन्स आणि स्मार्टफोन्सवर हे असे रक्तपात आणि वासनांचे नंगे नाच. हे असं सगळं बघून मनं मुर्दाड नाही का होणार? दया, करुणा, आदर असले मानवी भाव कुठुन यावेत मग मनांत? कसा सामना करणार ह्या सगळ्याचा?
एखाद्या समाजाच्या एखाद्या राजाबद्द्ल, राणीबद्दल, एखाद्या नेत्याबद्द्ल, एखाद्या पुतळ्याबद्दल, एखाद्या चिन्हाबद्दल, जरा कुठे काही बोललं गेलं की खवळून उठणारी माणसं, त्यांना स्त्रियांबद्दल काहिही बोलंवतं कसं? ऐकुन घेववतं कसं?
any ways! काय उपयोग आहे सगळं बोलून म्हणा.
ब्रिजमोहन चांगला आहे, चांगले
ब्रिजमोहन चांगला आहे, चांगले ट्विस्टस आहेत.
उत्कृष्ट परीक्षण!!!
उत्कृष्ट परीक्षण!!!
ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. <<<<< +१००
विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र
विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही.>>>>+11111असच एक पात्र त्रिपाठी ची बायको हे कॅरेक्टर कथेत काहीच प्रभाव टाकत नाही. फक्त जेव्हा ही येत फक्त सेक्ससाठीच येत.. सुमार वेब सिरीज आहे.
असलं काही (पैसे आणि वेळ वाया
असलं काही (पैसे आणि वेळ वाया घालवुन) पाहण्यापेक्षा लोक पुस्तकं का वाचत नाहीत?
सिरीज पाहिल्यावर जे सगळे
सिरीज पाहिल्यावर जे सगळे विचार डोक्यात आले होते, त्याची पर्फेक्ट समरी वाचायला मिळाली. इतक्या योग्य शब्दात मांडता आलं नसतं, पण याच भावना होत्या.
रसपची चिडचिड अगदी वाक्यवाक्यात उतरली आहे. चांगले कलाकार घेऊन योग्य कथानकाअभावी सगळंच वाया घालवल आहे. सॅकरेड गेम बघताना इतकं बोल्ड कथा आणि चित्रण हिंदीमध्ये पहिल्यांदाच पाहिलं आणि त्यामुळे रॅशनल आणि लॉजिक बाजूला ठेवून सिरीज आवडून घेतली, पण आता जर हे रिपीट होत राहील तर वैताग येणार आहे.
सिरीज डिटेल्स वाचूनच ठरवलं
सिरीज डिटेल्स वाचूनच ठरवलं नाही बघणार... आजकाल आता याची च चलती करणार हिंदीवाले. शिव्या, सेक्स सीन्स, भडक हिंसाचार, ओंगळवाणी दृय्ष्यं इ. इ.
तुम्हाला मुभा असताना तुम्ही
तुम्हाला मुभा असताना तुम्ही हे असं करता हा अॅटिट्युड प्रचंड खटकला.
बाकी रक्त आणि हिंसाचार ओंगळवाणा दाखवला आहे याच्याशी सहमत. पण तो तसा न दाखवताही दृष्यात्मक परिणाम साधता आला असता इतपत मत वाचायला आवडलं असतं. तुम्हाला मुभा/ स्वातंत्र्य मिळतंय आणि तुम्ही माजला आहात धर्तीची जजमेंटल वाक्ये वाचून राग आला.
>> विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही. किंबहुना, हे त्या त्या वेळी अगदी स्वाभाविक घडायला हवं असतं, ते घडलं असतं तर कहाणी कधीच संपली असती त्यामुळे हा सगळा पाणी ओतून ओतून वाढवत नेण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही.>> पुढच्या वेळेला अशी जनरलाईज्ड / टेंप्लेट वाक्ये न घालता ठोस काही लिहिलं तर व्हॅल्यू अॅडिशन होईल असं ही वाटलं.
एकूणच चित्रण फार भडक दाखवलं आहे. पण जे दाखवलं आहे ते सफाईदार आहे, पुर्वी बघितलेल्या भारतीय सिरियल्स सारखं हातचं राखून, पॅच वर्क केल्यासारखं नाही. व्यक्तीरेखा नीट डेव्हलप होतात आणि कामं ही उत्तम केली आहेत.
मात्र खून बघवत नाहीत इतके ओंगळवाणे आहेत.
शेवटचे तीन एपिसोड्स बाकी आहेत
शेवटचे तीन एपिसोड्स बाकी आहेत बघायचे, पण मला जबरी आवडली ही सिरीज. पंकज त्रिपाठी, त्या दोघा भावातला तो नॉन-पैलवान भाउ, श्वेता त्रिपाठी या तिघांच्या कामाकरता. बाकी उत्तरेकडचे चित्रीकरण, तेथील बोलीभाषा, जमून आलेले संवाद वगैरे मस्त आहे.
ती ओंगळ दृश्ये इग्नोर केली मी. बाकी मस्त आहे.
बाकी वासेपूर, ही सिरियल इ.
बाकी वासेपूर, ही सिरियल इ. बघून माझ्या मनात युपी बद्दल एक दृष्य स्टिरिओ टाईप तयार झालाय, तसा कदाचित परदेशी लोकांच्या मनात भारताबद्दल झाला असेल. जसा नार्कोज बघून कोलंबिआ बद्दल माझ्या मनात झालेला.
अर्थात यात चांगलं किंवा वाईट असं काहीच नाहीये. लिमिटेड विंडोतुन तो होत असेल तर विंडो विस्तारण्याची जवाबदारी सर्वस्वी फक्त आणि फक्त बघणार्याचीच हवी. त्यात य:किंचितही वाईट नाही हे ही नोंदवतो.
आजकाल आता याची च चलती करणार
आजकाल आता याची च चलती करणार हिंदीवाले. शिव्या, सेक्स सीन्स, भडक हिंसाचार, ओंगळवाणी दृय्ष्यं इ. इ.
नवीन Submitted by अंजली_१२ on 28 November, 2018 - 02:36
राजश्री अजुनही शुद्ध तुपातले सिनेमे बनविते. कोणी पाहतं का?
विवाह
एक विवाह ऐसा भी
हम प्यार तुम्हीसे कर बैठे
लव यू मिस्टर कलाकार
असे असंख्य चित्रपट आहेत जे पुण्या मुंबईत कोणी पाहत नाहीत पण ज्या उत्तरेकडच्या पट्ट्यात हिंसाचारी चित्रपट चित्रीत होतात तिकडे मात्र हे राजश्रीचे सिनेमे आवर्जून पाहिले जातात. अर्थात आपल्याला यूट्यूबवर पाह्यचा पर्याय आहेच.
ओंगळवाणे सीन्स सोडले तर मस्त
ओंगळवाणे सीन्स सोडले तर मस्त ग्रीपिंग आहे. मला आवडली...मला पुढच्या भागात काय होईल याची उत्कंठा लावणार्या सिरीज आवडतात. मग मी बाकीच्या गोष्टी ignore मारतो.
अमित नि अमोल ला अनुमोदन !
अमित नि अमोल ला अनुमोदन ! "एकूणच चित्रण फार भडक दाखवलं आहे. पण जे दाखवलं आहे ते सफाईदार आहे, पुर्वी बघितलेल्या भारतीय सिरियल्स सारखं हातचं राखून, पॅच वर्क केल्यासारखं नाही. व्यक्तीरेखा नीट डेव्हलप होतात आणि कामं ही उत्तम केली आहेत"
एकंदरीत प्रभावी अभिनय आणि हिंसक दृश्यांमुळे साहजिकपणे निर्माण होणारा थरार ह्या जोरावर 'मिर्झापूर' उभी आहे हे साचेबंद असले तरी एकदम परफेक्ट विधान आहे.
ओंगळवाणा हिसांचार हा काहीही विधीनिशेष नसलेली पात्रे establish करण्यासाठी वापरला आहे असे वाटते. You can say that's director's cinematic liberty. थोरला त्रिपाठी नि त्याची सून ह्यांच्यात घडणारे उपकथानक नंतर फुलेल (अर्थात कसे ते उघड आहे) नि त्यांचा संघर्ष समोर यावा म्हणून सेक्सचा वापर केलाय. इथे सेक्स हे पॉवर स्ट्रगलच्या सिंबल ह्या द्रुष्टीने वापरलेले आहे असे वाटतेय GOT सारखे.
मलापण आवडली.
मलापण आवडली.
मराठीत अश्या series निघाल्या तर बघायला ( आणि मराठी शिव्या ऐकायला) नक्कीच आवडेल.
Sacred games मध्ये शिव्या
Sacred games मध्ये शिव्या मराठीत तर आहेत
Sacred games ला मिळालेल्या
Sacred games ला मिळालेल्या यशामुळे मिर्झापुर बनवली असावी.
आणि त्यापेक्षा काहीतरी जास्त करावं म्हणून जास्त भडकपणा असेल.
माझे ४ भाग बघून झालेत. हिंसा,
माझे ४ भाग बघून झालेत. हिंसा, सेक्स वगैरे भडक दाखवले असले तरी कॅरेक्टर्स, कथा, अभिनय हे ग्रिपिंग वाटले.
पंकज त्रिपाठी आवडतोच पण यात अजूनच आवडला! जबरा केलंय ते कॅरेक्टर त्याने. आवाज न चढवता, थंड, खालच्या पट्टीत काही काही एकदम खतरा डायलॉग्ज आहेत त्याचे. मॅनरिझम्स सुद्धा.
बाकी वासेपूर, ही सिरियल इ. बघून माझ्या मनात युपी बद्दल एक दृष्य स्टिरिओ टाईप तयार झालाय >>>+१०० अगदी हेच मनात आले होते पहाताना.