पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २०. एक पहेली (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 22 October, 2018 - 13:53

एका चांगल्या रहस्यप्रधान चित्रपटात काय असावं लागतं? पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच घडलेला गुन्हा किंवा तो घडण्याची शक्यता. दुसरी गोष्ट, एकापेक्षा अधिक असे संशयित ज्यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी सबळ कारण आणि तो करण्याची संधी दोन्ही आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना ज्या पाहणाऱ्याला जे पाहतोय त्याचा अर्थ लावायची संधी तर मिळू देत नाहीतच. वर संशयाची सुई सतत सगळ्या संशयितांभोवती फिरवत ठेवतात. आणि शेवटची - चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जे काही प्रश्न पडले असतील त्यांची समाधानकारक उत्तरं मिळतील अश्या पध्दतीने चित्रपटाच्या शेवटी केलेली गुन्ह्याची उकल. ह्यातली एखादीही गोष्ट फसली तर जेवताना ताटात ठेवलेला चमचमीत पदार्थ उत्सुकतेने तोंडात घातला आणि अळणी निघाला की जशी चडफड होते तशी चडफड होते. कथानक चांगलं असेल पण सादरीकरणात फसलं असेल तर दुप्पट अपेक्षाभंग होतो. ७१ साली आलेला 'एक पहेली' हा चित्रपट पाहताना शेवटी असं अपेक्षाभंगाचं दु:ख पदरी पडलं.

ठिकाण पणजी. डिसिल्व्हा आणि सन्स ह्यांचं Auctioneer चं दुकान. सकाळच्या वेळी दुकानाचा मालक दाढी करत बसला असताना तिथे एक तरुणी येते. 'तुम्ही एका पियानोचा लिलाव करणार आहात ना?’ असं ती त्याला विचारते. तो होकार देतो. ती तरुणी तो पियानो वाजवून बघायची परवानगी मागते. तो परवानगी देतो. फार सुरेल संगीत वाजवते ती. पण त्याची दाढी करून झाल्यावर तो बघतो तर काय? तरुणी गायब झालेली असते. तो आत जाऊन त्याच्या बायकोजवळ चौकशी करतो पण तिने काही त्या तरुणीला जाताना पाहिलेलं नसतं. जणू काही ती तरुणी हवेत विरून गेलेली असते.

मग आपल्याला दिसतो पणजीचा एयरपोर्ट. आपल्या दिवंगत मालकाच्या मुलाच्या, सुधीरच्या, स्वागताला कंपनीमधली सगळी मंडळी जमलेली असतात. तो लंडनवरून शिक्षण पूर्ण करून येत असतो. यथावकाश सुधीर येतो. त्याचा सेक्रेटरी रॉकी त्याचं यथोचित स्वागत करतो. आपल्या कारमध्ये बसून सुधीर घराकडे रवाना होतो तेव्हा एक व्यक्ती त्याच्यावर नजर ठेवून आहे हे मात्र उपस्थितांपैकी कोणाच्याच लक्षात येत नाही. घरी सुधीरचं स्वागत त्यांच्या घरात ४० वर्षांपासून काम करत असलेला नोकर जॉन करतो. जेव्हा सुधीर त्याला जुन्या घराबद्दल विचारतो तेव्हा जॉन त्याला सांगतो की तिथे आता त्याच्या वडिलांचा जुना बिझनेस पार्टनर शंकरलाल राहतो. सुधीरच्या वडिलांचा आणि त्याचा बेबनाव झाल्याने त्यांनी पार्टनरशिप मोडलेली असते.

ह्या नव्या बंगल्यातून बाहेर पाहताना सुधीरच्या लक्षात येतं की जवळच एक चर्च आणि कबरस्तान आहे. वरच्या खोलीत खूप रिकामी जागा आहे तेव्हा तिथे एक पियानो आणून ठेवावा असं सुधीर रॉकीला सुचवतो. डिसिल्व्हा आणि सन्समध्ये चार दिवसांनी एक लिलाव होणार आहे तेव्हा आपण पियानो घेऊ असं रॉकी म्हणतो. लिलावाच्या दिवशी बोली ५० रुपयांपासून सुरु होते. एक स्त्री तो पियानो विकत घ्यायला फार उत्सुक असते पण सुधीर ७०० रूपयांपर्यंत बोली चढवत नेतो आणि तो विकत घेतो.

तो बाहेर येतो तेव्हा एक तरुणी त्याला कारजवळ थांबलेली दिसते. ही तीच तरुणी असते जी डिसिल्व्हा आणि सन्स च्या दुकानातून रहस्यमयरित्या गायब झालेली असते. ती सुधीरला म्हणते की तुम्ही हा पियानो घेतला म्हणून मला फार आनंद झाला आहे कारण एखादी चांगली वस्तू चांगल्या माणसाकडेच जायला हवी. सुधीर तिला तो पियानो तुझा होता का म्हणून विचारतो. पण ती म्हणते 'मला त्या पियानोबद्दल थोडी माहिती होती इतकंच. पियानोला थोडी डागडुजी करायची गरज आहे, मी करणारच होते एव्हढ्यात तुम्ही विकत घेतला. तुम्ही ती एखाद्या जाणकार माणसाकडून करून घ्या.’ ती डागडुजी तिनेच करावी म्हणून सुधीर तिला घरी घेऊन येतो. तिथेही ती पियानो सोडून आणखी कशाबद्दलही बोलायला तयार नसते. तुम्ही सोडून ह्या पियानोला आणखी कोणीही हात लावू नये असं मला वाटतं असं ती म्हणते तेव्हा सुधीरला आश्चर्य वाटतं. पण ती सांगते की ज्यांना ह्याबद्दल काही माहिती नाही त्यांनी हात लावला तर पियानो बिघडू शकतो. तिला पियानोबद्दल एव्हढी कळकळ आहे हे बघून सुधीर तिला केव्हाही आपल्या घरी येऊन तो वाजवायची परवानगी देतो. तो तिला तिचं नावही विचारतो पण ती विषय टाळते. एव्हढ्यात सुधीरच्या घरी आयोजित करत असलेल्या पार्टीची इन्व्हिटेशन कार्ड्स घेऊन रॉकी येतो. त्यातलं एक तिला द्यावं म्हणून सुधीर आत येतो तर आत कोणीच नसतं.

पार्टीच्या दिवशी सुधीरची शंकरलालशी ओळख होते. पियानोच्या लिलावाच्या वेळी जिने सुधीरबरोबर बोली लावलेली असते ती तरुणी ज्युलीसुध्दा पार्टीत असते. ती सुधीरला सांगते की मी ७०० च्या वरही बोली लावली असती पण एक तरुणी आली आणि तिने मला तो पियानो तुम्हाला घेऊ द्यायची विनंती केली. हे ऐकून सुधीर अवाक होतो पण ज्युलीला पियानो वाजवून पहायची विनंती करतो. तिने वाजवायला सुरुवात करताच जवळच असलेल्या चर्चच्या घंटा मोठमोठ्याने वाजू लागतात. ज्युली अस्वस्थ होऊन थांबते पण सुधीर तिला वाजवत रहायचा आग्रह करतो. अचानक खूप वारा सुटतो, ढगांचा गडगडाट सुरु होतो, विजा चमकू लागतात. जॉन, शंकरलाल आणि उपस्थित सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहत राहतात. एव्हढ्यात लाईट्स जातात. ते पुन्हा येतात तेव्हा ज्युलीचा मृत्यू झालेला असतो. तिचं निधन हृदय बंद पडून झाल्याचं निदान उपस्थित डॉक्टर करतात. तिच्या मृत्यूची चौकशी करणारे पोलीसही त्याला दुजोरा देतात. ज्युलीच्या आकस्मिक मृत्यूने हादरलेला सुधीर तिच्या फ्युनरलला जातो तेव्हा तीच तरुणी तिथे फुलं वाहायला आलेली त्याला दिसते. तिच्या विनंतीवरून सुधीर तिला तिच्या शाळेपर्यंत सोडतो.

एके रात्री झोपलेल्या सुधीरला पियानोच्या सुरांनी जाग येते. पुन्हा तीच तरुणी पियानो वाजवायला आलेली असते. एवढ्या रात्री तिला आपल्या घरी पाहून सुधीरला काय बोलावं तेच सुचत नाही. त्यात तिचे हात बर्फाहून अधिक थंड असतात. तो जॉनला हाक मारून कॉफी आणायला सांगतो आणि तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो की इतक्या रात्री तू एकटीने माझ्या घरी येणं बरोबर दिसत नाही. तुला माझ्यासोबत इथे पाहिलं तर लोक काय म्हणतील. ती हसून म्हणते की इथे तर अंधार आहे, मला कोण बघणार? एव्हाना तिने आपलं नाव मारिया असल्याचं सांगितलेलं असतं. सुधीर दिवा लावायला जातो तर मारिया गायब झालेली असते. तेव्हढ्यात जॉन कॉफी घेऊन येतो. त्याला अलीकडचं सुधीरचं वागणं विचित्र वाटत असतं. तो त्याला समजावायला जातो पण मारियाच्या गूढ वागण्याने कावलेला पण तरीही तिच्याकडे आकर्षित होऊ लागलेला सुधीर काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. तो जॉनशी वाद घालतो. कंपनीत १% शेअर आहे म्हणून तू मालकासारखं वागू नकोस असं त्याला सुनावतो. दुखावलेला जॉन खोलीतून निघून जातो.

दुसर्या दिवशी सकाळी रॉकीसोबत आपली प्रॉपर्टी पाहायला निघालेल्या सुधीरला एका टेकडीवरच्या जुन्या पडक्या चर्चमध्ये मारिया फिरताना दिसते. सुधीर तिचा पाठलाग करतो पण शंकरलाल आपल्या मागावर आहे हे काही त्याच्या लक्षात येत नाही. कबरस्तानात एकट्या बसलेल्या मारियाला गाठून सुधीर तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतो. मारिया त्याला दोघांचे भिन्न धर्म, त्यांच्या आर्थिक स्थितीत असलेलं जमीन-अस्मानाचं अंतर ह्या सगळ्यांची जाणीव करून देते. सुधीरला कशाचीच पर्वा नसते आणि तो तिला तसं निक्षून सांगतो. पण घरी आल्यावर जेव्हा त्याला जॉनचा मृतदेह मिळतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. घरातले बाकीचे नोकर त्याला सांगतात की जॉन खूप बेचैन होता आणि तुम्ही आल्यावर आपले पैसे घेऊन गावी जायचं म्हणत होता. जेव्हा सुधीर त्यांना विचारतो की घरात कोणी आलं-गेलं होतं का तेव्हा ते एव्हढंच सांगतात की कोणी आलं नव्हतं फक्त पियानो वाजत होता आणि अचानक शांत झाला.

शंकरलाल अशी शंका व्यक्त करतो की सुधीरच्या वडिलांचा एखादा जुना शत्रू त्याच्या राशीला लागला असावा. तो सुधीरला बिझनेस विकून टाकून लंडनला परत जायचा सल्ला देतो. तर पोलीस ह्या निष्कर्षाप्रत येतात की सिरिंजमध्ये नुसती हवा असताना जॉनच्या शरीरात ती टोचल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. सुधीर मेडिकलचं शिक्षण घेऊन आलेला आहे, त्याचा आदल्या रात्री जॉनशी वाद झाला होता, जॉनला आपले पैसे घेऊन गावी निघून जायचं होतं आणि कंपनीच्या ५० लाखांच्या नफ्यात त्याचा १ लाखाचा हिस्सा होता ही एव्हढी कारणं त्यांना सुधीरवर संशय घ्यायला पुरतात. ते त्याला परवानगीशिवाय शहर सोडून जायला मनाई करतात. मारियाचं गूढ वागणं आणि लागोपाठ होत जाणारे खून ह्या दुहेरी कात्रीत सापडलेला सुधीर पुरता हवालदिल होऊन जातो.

कुठल्याही रहस्यप्रधान चित्रपटाच्या प्रेक्षकांना पडतील तेच प्रश्न आपल्याला इथेही पडतात. सुधीरने जॉनचा खून केलेला असतो का? कश्यासाठी? पैश्यांसाठी? ज्युलीचा मृत्यू कश्याने होतो? मारिया कोण असते? तिचा त्या पियानोशी काय संबंध असतो? ह्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट पाहून मिळतीलही. पण ती ज्या मनोरंजक पध्दतीने देता आली असती तिचा काहीएक विचार न करता अत्यंत सरधोपट मार्गाने ती दिली आहेत ह्याचं वाईट वाटतं. म्हणूनच हा चित्रपट बघा असं मी तरी ठामपणे सांगू शकत नाही. अर्थात पाहणार असाल तर लेखाचा उर्वरित भाग वाचू नका.

चित्रपटाच्या casting मध्ये नाव ठेवायला कुठे जागा नाही. नायक सुधीर हा लंडनवरून शिकून परत आलेला डॉक्टर आहे. अभिनेता फिरोज खान भूमिकेला साजेसा suave दिसलाय. पुढल्या काळात त्याने केलेल्या अभिनयात जो एक प्रकारचा नाटकीपणा आला त्याचा मागमूस निदान ह्या चित्रपटात तरी दिसत नाही. अर्थात अभिनयाचे पैलू वगैरे दाखवायची संधी तशीही सुधीरच्या भूमिकेत फारशी नाही. कदाचित त्यामुळेसुध्दा तो चालून गेला असावा. मारियाचं गूढ व्यक्तिमत्त्व साकारलं आहे अभिनेत्री तनुजाने. इतर चित्रपटातून तिच्या वाट्याला आलेल्या अल्लड, अवखळ भूमिकांपेक्षा ही थोडी वेगळी आहे. पण तरीही त्यात ती उपरी वाटत नाही. ज्युली आणि जॉन ह्यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलिस इन्स्पेक्टरची छोटेखानी व्यक्तिरेखा संजीवकुमारने साकारली आहे. पण चित्रपटाच्या श्रेयनामावलीत अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव कुठेच दिसत नाही. ह्या यादीच्या शेवटी राजेंद्रनाथ (सुधीरचा सेक्रेटरी रॉकी) आणि अरुणा इराणी (शंकरलालची सेक्रेटरी रोझी) ह्यांचीही नावं येतात पण संजीवकुमार कुठेच दिसत नाही ही 'एक पहेली' च म्हणायची. पाताळयंत्री शंकरलाल म्हणून मदन पुरी आपलं काम चोख बजावतो. इतर भूमिकांत जीवन (मारियाचा बाप जोसेफ) आणि टुणटुण (रॉकीची सहकारी लिली) दिसतात.

चित्रपटाचं रहस्य अधिक गडद करणारं टायटल सॉंग 'मै एक पहेली हू बरसोसे अकेली हू' चित्रपटात अनेक वेळा येऊन जातं. पण डाऊनलोड केलेल्या चित्रपटात ते प्रत्येक वेळी कापलं असल्याने पाहायला मिळालं नाही. दुसरं रोमँटिक गीत 'मेरा तुम्हारा साथ तो' सुध्दा पुन्हापुन्हा ऐकण्याजोगं आहे. चित्रपटात बाकी गाणी असल्याचं विकिवरून कळतं पण डाऊनलोड केलेल्या चित्रपटात एकही पाहायला मिळालं नाही.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चित्रपटाची कथा मनोरंजक असली तरी सादरीकरणात साफ गंडली आहे. शंकरलालचा मारियाशी संबंध नाही हे रहस्य आधीच उघड केल्याने मारिया आत्मा असणार हे आपण ओळखू शकतो त्यामुळे चित्रपटाचा शेवट अजिबात धक्का देत नाही. ह्या बाबतीत श्यामलनच्या 'द व्हिलेज' ची आठवण झाल्यावाचून रहात नाही. रॉकी आणि लिली London-returned सुधीरपेक्षा जास्त हुशार वाटतात. ज्युलीने पियानो वाजवला म्हणून तिला मारून टाकणारी मारिया क्रूर वाटते. जॉनचा खून शंकरलालने केलेला असतो तर त्या वेळेला पियानो वाजत होता असं घरातले बाकीचे नोकर सुधीरला का सांगतात? शंकरलाल जॉनला मारत असताना मारिया background music देत असते का? Angry लंडनवरून डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन आलेला सुधीर हॉस्पिटलमध्ये काम करायचं सोडून वडिलांच्या खाण व्यवसायात काय करत असतो? कंपनीत १% हिस्सा असलेल्या जॉनला नफ्यात २% हिस्सा (५० लाखांपैकी १ लाख) का मिळणार असतो? सुधीरच्या वडिलांनी सुधीरला काही झालं तर सगळी संपत्ती शंकरलालला मिळेल असं मृत्युपत्र का केलेलं असतं? ह्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर शेवटी मिळत नाही.

मारिया सुधीरला ओळखत नसते तर पियानो त्यानेच घ्यावा असा तिचा आग्रह का असतो? शेवटी सुधीर तिला कबरस्तानात आपल्यासमोर यायची विनंती करतो तेव्हाही तो तिचा उल्लेख 'साया' असाच करतो आणि 'शेवटचं भेटायला ये' असं म्हणतो. ह्याचा अर्थ त्याला आपलं प्रेम विफल आहे हे मान्य असतं. स्वत:हून जीव वगैरे द्यायचं काहीही त्याच्या डोक्यात नसतं. मग त्याचा अपघाती मृत्यू घडवून आणून मारिया काय साध्य करते? बरं तो मेला तरी त्याचा आत्मा कबरस्तानात भटकत राहायला हिच्याबरोबर जाईलच ह्याची काय खात्री? तो पुनर्जन्म घेईल किंवा अगदीच 'पोचलेला' आत्मा असेल तर त्याला मोक्ष मिळेल. केवळ चित्रपटाच्या शेवटी नायक-नायिका येनेकेनप्रकारेण एकत्र यायलाच हवेत ह्या हव्यासापोटी (आणि नायिका ख्रिश्चन असल्याने पुनर्जन्म वगैरे भानगड दाखवता येत नाही ह्या गोचीमुळे!) केलेला हा शेवट अजिबात पटत नाही.

तस्मात काय तर ह्या त्रुटी सहन करून रहस्यप्रधान चित्रपट पहायची तयारी असेल तरच हा चित्रपट पाहावा. नाहीतर आपला data pack दुसर्‍या चित्रपटांसाठी राखून ठेवणं उत्तम.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तस्मात काय तर ह्या त्रुटी सहन करून रहस्यप्रधान चित्रपट पहायची तयारी असेल तरच हा चित्रपट पाहावा. नाहीतर आपला data pack दुसर्‍या चित्रपटांसाठी राखून ठेवणं उत्तम.>>>
Proud Proud Proud Proud

तुमच्या उत्तम लिखाणा मुळे बराच data वाचला आहे
आणि बराच सत्कारणी सुद्धा लागला आहे..
सहसा एवढ्या जुन्या फिल्म्स बद्दल माहित नसत..
तुमच्या मुळे बर्‍याच जुन्या पण नवीन गोष्टी समजतात.

हा सिनेमा पाहिल्यासारखं वाटतंय. अंधुक आठवण आहे.
मै एक पहेली हु बरसोसे अकेली हु पण लक्षात आहे. कथा आणि शेवट काय नीट आठवत नव्हते.
पण तु जो शेवट लिहिला आहेस फिखाचा अ‍ॅक्सिडंट वैगेरे त्यावरुन अचाट सिनेमा वाटतोय.

लिखाणाची सुरवात मस्त केलीय. कित्येकदा चांगली कथा असलेले चित्रपट शेवटी वेळ अपुरा पडतोय म्हणून गुंडाळले जातात तसा हा गुंडाळला गेला असेल. संजय खानसारखा, फिरोज खानही खूप आवडायचा, एकदम suave सॉफ्ट स्पोकन असे व्यक्तिमत्त्व होते.

त्याचा उंचे लोग म्हणून एक चित्रपट होता. त्यातली नायिका फक्त एका गाण्यात अर्धवट दिसते, बाकी चित्रपटभर ती नाही. त्याचा विषय, कथा काहीच आठवत नाही. जमल्यास तोही बघ. 'जाग दिले दिवाना, रूत जागी वसले यार की' आणि 'आजा रे मेरे प्यार के राही, राह निहारु बडी देर से' ही दोन कलासीक गाणी त्यात आहेत.

{{{ . मग त्याचा अपघाती मृत्यू घडवून आणून मारिया काय साध्य करते? }}}

प्रत्यक्षातही पन्नास वर्षांपुर्वी तनुजाने हिट अ‍ॅण्ड रन अपघात करुन एकाला कारखाली ठार केलंच होतं. सिनेमाचा शेवटदेखील त्यावरुनच सुचलाय की काय?

साधना, 'उंचे लोग' अ‍ॅड केला लिस्टमध्ये. दोन्ही गाणी ऐकली आहेत. जाग दिल-ए-दिवाना तर ऑलटाईम फेव्हरेट आहे. एकदम प्रसन्न वाटतं ऐकलं की.

बिपीन चन्द्र हर.......त्याचा कड्यावरून पडून मृत्यू होतो. कार अ‍ॅक्सीडेंट मध्ये नाही. बाकी तनुजाबद्दलची ही माहिती नवीन आहे.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!