बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?
"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"
पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.
तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.
सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.
ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.
मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!
लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्या नवर्याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.
घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्या खारीला वाचवणारी सेहमत आता....
प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.
आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!
आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.
विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.
रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.
मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.
हा हायजेनबर्ग आता स्वतःच्या
हा हायजेनबर्ग आता स्वतःच्या हिरॉईन कडून असलेल्या अपेक्षा घुसडतो आहे मध्येच. >> अग मी डिरेक्टर/ स्क्रीप्ट रायटर असतो तर स्ट्राँग कॅरॅक्टरला डीवॅल्यू करणारं असं मुळीच काही लिहिलं नसतं स्टोरीमध्ये.
माबोकर कीस पाडायला लागले
माबोकर कीस पाडायला लागले म्हणजे नक्की उत्तम पिक्चर आहे ओळखावे.
सशल subtitles ऑन करून बघा
सशल subtitles ऑन करून बघा
हाहा, धन्यवाद.
हाहा, धन्यवाद.
परत काही दिवसांनीं तिसर्यांदा आणखी लक्ष देऊन आणि सब-टायटल्स ऑन करून बघेन आणि उरलेला कीस पाडेन
लैच कन्फुजन झालं. राझी बघून
लैच कन्फुजन झालं. राझी बघून बरेच दिवस झालेत. आता कुठला प्रसंग कधी घडला याच्यासाठी परत एकदा प्राईमवर बघावा लागणार
अजून एक खुसपट काढायचं राहून
अजून एक खुसपट काढायचं राहून गेलं.
सोनी राझदान चं कॅरॅक्टर फिकं किंवा मिस्फिट वाटतं. तीनेही त्या रोलमध्ये काही जान आणली आहे असं वाटलं नाही.
पुन्हा पाहायचाय मला हा सिनेमा
पुन्हा पाहायचाय मला हा सिनेमा, वरचा कीस जास्त चांगला रिलेट होईल आणि नवीन कीसाचं मट्रेल सापडेल
मला राझी आवडण्याचं आणखी एक
मला राझी आवडण्याचं आणखी एक सॉलिड कारण म्हणजे हा चित्रपट तमाम "मेन्नू तेन्नू, मुंडी कुडा सॉरी कुडी मुंडा, विच्च नाल, पैंदा पैंदा इत्यादींपासूनचा pleasant relief आहे.
राझी मधलं अजून एक खुस्पट
राझी मधलं अजून एक खुस्पट म्हणजे टायटल्सचा फॉण्ट चांगला नव्हता. फॉण्ट कलर्स सुद्धा बॅकग्राउंडला मॅच होत नव्हते.
ती दिराला मारण्यासाठी जात असते तेव्हां तिने घेतलेला हिजाब साडेतीन अंशातून तिरका होता.
अरिफ झकेरिया च्या चेह-यावरचे संशयाचे भाव पावशेर जास्त हवे होते. तो संशय घेतोय की किचन मधे त्याला इनसिक्युअर वाटले हे समजत नाही.
ती दिराला मारते तेव्हा त्या
ती दिराला मारते तेव्हा त्या छत्रीच्या टोकाला विष असत ते त्याच्या अंगात जाण्याईतक काही ते टोक टोकदार दाखवलं नाही.
अजुन एक म्हणजे ज्या खोलीमधे सेहमत ती पिशवी ठेवते त्याच खोली मधे तिचा दिर काहीतरी शोधतोय आणि ती येउन त्याच्याशी बोलतेय अस दाखवल आहे. त्यामुळे तिचे घुंगरु तिथे सापडणं हे तिनेच पिशवी ठेवली आहे ह्याच प्रुफ कस होउ शकतं? दिराबरोबर बोलत असतांना पडलेत अस ही ती म्हणु शकली असती.
अरे बस करा.. उगाच भारी वाटत
अरे बस करा.. उगाच भारी वाटत होता, आता लयच पांचट वाटायला लागलाय राझी ☺️
फुल प्रुफ नाही... पण अगर
फुल प्रुफ नाही... पण अगर तुम्हे लगे ब्ला ब्ला ब्ला.. तो समझो राज खुल चुका है.
ती त्या लपलपत्या स्टुलावरुन उतरताना धडपडणार आणि भांडा फोड... ही जाम भिती वाटत होती, पण सुराग छोडकर गई. हा तरी आंघोळीला जाताना तो सुराग असा उघड्यावर कशाला टाकतो. आणि सुराग मिळाल्यावर आंघोळ का करतात? हे प्रश्न विचारु नये.
आंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक
आंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक होतो ना, रडत असतो बिचारा. तोंडावर पाणी मारतो फक्त.
आंघोळ कुठे हो?
आंघोळ कुठे हो?
तो बिचारा बाथरुममध्ये जाऊन रडत असतो. मग तोंडावर पाणी मारून (रडल्याचे प्रूफ नाहीसे करून) बाहेर येतो.
>> अरे बस करा.. उगाच भारी
>> अरे बस करा.. उगाच भारी वाटत होता, आता लयच पांचट वाटायला लागलाय राझी ☺️
अहो असं काय करता! भारीच आहे की.
ती दिराला मारते तेव्हा त्या
ती दिराला मारते तेव्हा त्या छत्रीच्या टोकाला विष असत ते त्याच्या अंगात जाण्याईतक काही ते टोक टोकदार दाखवलं नाही.>>> त्या टोपणाच्या आत बारीक सुई असू शकते प्रिक करणारी. त्या सुईनेच विष सोडलं असेल. घरी शुगर टेस्ट करायचं मशीन असतं त्यात नाही का बारिकसा खटका दाबला की आत लपलेली सुई क्षणात बाहेर येवून बोटाला प्रिक करून आत जाते!
ती छत्री स्पेशल असते ना?
ती छत्री स्पेशल असते ना? मुद्दाम ती कन्व्हिनिअन्टली ती छत्री विकत घेते ड्रायव्हर च्या ऑब्जेक्शन ला धुडकावून.
ते सगळे त्यांचेच पंटरलोक्स
ते सगळे त्यांचेच पंटरलोक्स असतात... छत्री विकणारा सुद्धा...
सुरेख लिहिलेय !
सुरेख लिहिलेय !
कदचित मी हा सिनेमा पाहिलाही नसता, आता आवर्जून पाहणार
आणि आलिया चा तर मी डिअर झिंदगीपासून फॅन आहे, तिच्यासाठी तर नक्कीच !
आंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक
आंघोळ नसतो करत, हार्ट ब्रेक होतो ना, रडत असतो बिचारा. तोंडावर पाणी मारतो फक्त. >>> कथेची डिमांड होती अंघोळीचा सॉन दाखवण्याची. आता शंका उपस्थित झाल्या न ? अंघोळच करत होता की पाणी मारत होता की पाणीच नव्हतं आलेलं तीन दिवसांपासून ? कसं कळणार हे ?
पिक्चर आवडला. पण सेहमत च्या
पिक्चर आवडला. पण सेहमत च्या आईला एकही शॉट नाहीये. मुलीच्या आयुष्यात इतके सगळे भयंकर घडत असताना आईची त्यावर काहीच प्रतिक्रीया कशी नाही. सुरवातीला नवर्याखातर गप्प बसेल. पण तिचे वडील गेल्यावर सेहमत जेव्हा माहेरी येते तेव्हा देखिल तीची आई तीची काहीच विचारपूस करताना दाखवली नाही. सेहमत पण आईशी काही बोलताना , आईजवळ रडाताना दाखवली नाही. नंतर पण आईला कधीही संपर्क करताना दिसली नाही.
शेवटी सुद्धा परत आल्यावर आईचे आणि तिचे बोलणे तोकडेच वाटते. आई कुठेही तिला धीर देताना किन्वा समजून घेताना दिसत नाही. दोघींच्यात फारसा कनेक्ट जाणवतच नाही. जे बर्यापैकी खटकले.
सगळ्यांचे मनापासून आभार!
सगळ्यांचे मनापासून आभार!
राझी सिनेमा पाहिला रे पाहिला
राझी सिनेमा पाहिला रे पाहिला की एकदम ’वॉव’ वाटतं, त्यात पाकिस्तान हा एक फॅक्टर आहे आणि आलिया हा दुसरा.
पण जरा विचार करता, अनेक लूपहोल्स सापडतात. उदा. तो घुंगरू. अब्दुलच्या खोलीत तो सापडणं त्यावरून ती थेट गद्दार आहे हे सिद्ध होत नाही. त्यापेक्षा तो अब्दुलला ज्या जीपने मारलं त्या जीपमध्ये सापडला असता तर ते कन्क्लुजिव प्रूफ असतं.
तिचं गच्चीवरचं रेडिओ नेटवर्क सेट-अप- अगदीच बालीश.
गाणा-या लहान मुलांची यादी- त्या आधी ती कधीही शाळेत गेलेली नाही. तिनं नेमकीच पोरं कशी शोधून काढली? तीही चांगलं गाणारी?
असो. हा दोष मेघना गुलजारचा आहे. ’तलवार’चं दिग्दर्शन कसलं जबरदस्त होतं. तोच तोच सीन अनेक ऍन्गल्समधून, पण एकही चूक नाही. इथे मात्र अनेक चुका.
ख-या सेहमतचं चरित्र प्रकाशित झालेलं आहे. फार बेटर दॅन द मूव्ही- असं परिक्षण आलं होतं. शिवाय त्यात तिच्या मुलाला तिनं कसं वाढवलं याहीबद्दल लिहिलं आहे. सिनेमातला रडणारा ’सुरी’ तिचा मुलगा असतो का? त्याबद्दल उगाच का ऍम्बिग्विटी ठेवली आहे कोणास ठाऊक!
पण सिनेमा भारी आहे
शीर्षकामुळे मला या धाग्यात
शीर्षकामुळे मला या धाग्यात अजिबात रस नाही. सतत... उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता, उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता... वाचून वाचून डिप्रेशन यायची वेळ आली आहे. मायबोलीवर नवीन धाग्यांचे वाचन बंद करणे किंवा चित्रपट ग्रुप मधून बाहेर पडणे हे दोनच पर्याय आहेत का माझ्यासमोर?
डॉक्टरकडे जाऊ शकता की. एक
डॉक्टरकडे जाऊ शकता की. एक वृद्ध आणि सणकी डॉक्टर लगेच उपलब्ध होतील. पण त्यांच्या इलाजाने बरं वाटायच्या ऐवजी तुम्ही इथले धागे उसवून टाकू लागला तर जबाबदारी माझी नाही.
-या लहान मुलांची यादी- त्या
-या लहान मुलांची यादी- त्या आधी ती कधीही शाळेत गेलेली नाही. तिनं नेमकीच पोरं कशी शोधून काढली? तीही चांगलं गाणारी?>>>>>>
मी या पॉईंट पर्यंत पहिला सिनेमा,
ती वजनदार अधिकार्यांची मुले निवडते, रजिस्टर मध्ये पूर्ण नावे लिहिलेली असतात,
बेग च्या मुलाला गाता येत नाही कळल्यावर त्याला घरी जाऊन शिकवायची तयारी दाखवते, करण पुढच्या बैठका बेग च्या घरी होणारर असतात
अब्दुलच्या खोलीत घुंगरू
अब्दुलच्या खोलीत घुंगरू सापडणे हे बरेच काही सांगून जाते.
आपली शहरी पिढी फ्लॅट सिस्टीममध्ये वाढली आहे. आजच्या काळात नोकराकरता वेगळी खोली ही कन्सेप्ट आपल्याला नक्की आकलन होत नाही. पण ज्यांची स्वतःची घरे असतात आणि नोकराकरता वेगळी खोली असते तेंव्हा आजही मालक नोकराच्या खोलीत सहसा जात नाही, मालकीण तर नाहीच नाही.
आणि त्या काळात तर सेहमतने सहज म्हणून नोकराच्या खोलीत जाणे निव्वळ अशक्य होते.
काही ठिकणी सुरक्षा कमी वाटली पण सुरक्षाच दाखवत बसले असते तर चित्रपटाची लांबी वाढली असती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे मग तो एक हेरगीरीवरचा चित्रपट झाला असता.
मुळात आर्मी ओफिसरचे बंगले
मुळात आर्मी ओफिसरचे बंगले आर्मी एरियात असतात. त्या एरियाच्या बाहेरूनच सिकक्युरिटी लेयर्स असतात. त्याला एरिया डोमिनेटेड सिक्युरिटी म्हणतात. त्यामुळे बाहेरच्या वर्तुळातूनच आत जायला स्केनिंग होते. घरात/घराबाहेर सिक्युरिटी फोर्सचा वेढा द्यायचा म्हणजे त्यांना काही वैयक्तिक प्रायव्हसी आहे की नाही.? आजू बाजूला सतत सिक्युरिटी चे लोक वावरताहेत असे नसते.
कदाचित बाहेरून हला करायचा असेल तर हे कवच भेदून पोचावे लागते. अर्थात आतलेच सुरक्षा कर्मचारी फितूर झाले तर व्ही आय पी ला देवही वाचवू शकत नाही . तो आपल्याइतकाच व्हल्णेरेबल असतो. इंदिरा गांधी व बर्याच व्ही आय पी च्या बाबतीत हे घडले आहे.
एकूण मायबोलीवर उत्तम
एकूण मायबोलीवर उत्तम दिग्दर्शकाचे पोटेंशियल असलेले बरेच लोक आहेत हे पाहून बरेच बरे वाटले
बाका, >>मायबोलीवर उत्तम
बाका, >>मायबोलीवर उत्तम दिग्दर्शकाचे पोटेंशियल असलेले बरेच लोक आहेत हे पाहून बरेच बरे वाटले>> उत्तम दिग्दर्शकच नव्हे तर मयबोलीवर भारताचे पंतप्रधान व्हायचं पोटेन्शियल असलेलीही बरीच मंडळी आहेत.
Pages