मुरंबा

Submitted by सई केसकर on 4 June, 2017 - 07:14

गेले कितीतरी दिवस मराठी चित्रपट पाहायला गेल्यावर, "उगीच आलो" असं वाटायचं. म्हणून आधीच मुरंबा पाहायचा नाही असं ठरवून टाकलं होतं. पण चिनूक्सनी फेबुवर आवर्जून पाहावा असा चित्रपट आहे असं वर्णन केल्यावर तिकीट काढलं.

मुरंबा गोष्ट आहे फक्त एका दिवसाची. आलोक (अमेय वाघ) आणि इंदू (मिथिला पालकर) यांचं ब्रेकअप होतं. इंदूचं तीन चार वर्षं आलोकच्या घरी येणंजाणं असल्यामुळे आलोकला ही बातमी त्याच्या आई बाबांना (चिन्मयी सुमीत - सचिन खेडेकर) सांगावी लागते. त्याची कारणी मीमांसा करताना आलोक जी कारणे देतो ती वरवर पटण्यासारखी वाटतात, निदान आत्ताच्या पिढीला तरी, पण त्याच्या आई बाबांना मात्र इंदूशी बोलायचं असतं. इंदूशी बोलल्यावर आणि एकूण परिस्थिती उलगडल्यावर त्यांच्यातले खरे मतभेद समोर येतात आणि मिटतात, अशी ही गोष्ट आहे.

कुठलही नातं बळकट बनवायचं असेल तर आपल्यातल्या आणि समोरच्या व्यक्तीमधल्या सगळ्या भिंती पाडाव्या लागतात. आणि नवरा बायकोच्या नात्यात (किंवा, हल्लीच्या गफ्रे/बॉफ्रे नात्यात) आपल्याला कशाची भीती वाटते, कशाची काळजी वाटते, हे सगळं जितकं मोकळेपणाने बोललं जाईल तितकं ते नातं घट्ट होत असतं. पण लहान वयात आपल्या जोडीदारासमोर आपली एक प्रतिमा जपून ठेवण्याचा अट्टाहास केला जातो. कधी कधी ती प्रतिमा फक्त आपल्यापुरतीच खरी असते. समोरच्या माणसांनी कधीच त्या प्रतिमेपलीकडे जाऊन आपल्याला ओळखलेले असते. जेव्हा कुणीतरी आपले वर्म ओळखले आहे हे लक्षात येते, तेव्हा त्या व्यक्तीचाच रागराग केला जातो. त्या व्यक्तीला आयुष्यातून काढून टाकले की आपण पुन्हा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपली प्रतिमा कवटाळून जगायला मोकळे आहोत असं वाटायला लागतं. अशीच काहीशी गुंतागुंत ह्या ब्रेकअप मागे आहे, जी चित्रपट पाहून जाणून घेण्यातच मजा आहे.

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच मुरंबा अगदी मुरवून मुरवून तयार केलेला आहे. गोष्ट पटापट सांगायची घाई केली नाहीये, किंवा तिच्यात गरजेपेक्षा जास्त वेलची/साखर वगैरे घालायचा सुद्धा प्रयत्न नाहीये. त्यामुळे वरुण नार्वेकरबद्दल आदर वाटतो. आलोकच्या घरचे वातावरण, घरात चालणारे रूटीन इतके बारकाईने टिपले आहे की आपण चित्रपट बघत नसून त्यांच्या घरातच चहा घेत बसलोय असे वाटते. एका फ्रेममध्ये आलोकची आई डोसे घालताना दाखवली आहे. आणि त्या डोश्यांचा मस्त क्लोजप आहे. तसेच एका फ्रेममध्ये बाबा चहा करताना दाखवलेत. तिथे चक्क भांड्यात असलेला वेलची, चहापूडवाला चहा दाखवला आहे. आणि हे दोन्ही शॉट्स नंतर चर्चा व्हावी इतके लक्षात राहतात. हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

अमेय वाघने शुद्ध पुणेरी मुलाचा अगदी नैसर्गिक वाटावा असा अभिनय केला आहे (तो त्याच्यासाठी नैसर्गिकच असावा). सगळा चित्रपट त्यानी त्याच्या अभिनयाच्या जोरावर उचलून धरला आहे. सचिन खेडेकर नेहमीप्रमाणे प्रामाणिक बाबांच्या भूमिकेला न्याय देतात. मिथिलाची भूमिका छोटी असली तरी तिच्यावर चित्रित झालेला प्रत्येक प्रसंग तिनी समर्थपणे पेलला आहे. पण या चित्रपटाची खरी नायिका चिन्मयी सुमीत आहे. ज्या ताकदीनं कमी शिकलेल्या, "बाहेरून" पुण्यात आलेल्या आईचा रोल तिनी केला आहे त्याला तोड नाही. तिची देहबोली, आवाज, चेहऱ्यावरचे भाव सगळं एकदम जमून आल्यासारखं आहे. आणि कुठेही मालिकांमध्ये जसे कधी कधी आईपण "ओव्हर" होते तसे झालेले नाही. चिन्मयीसाठी हा चित्रपट नक्कीच एक नवीन दार उघडून देणारा असेल यात वाद नाही.

तरुण मुलं/मुली असतील तर त्यांच्याबरोबर आईबाबांनी आवर्जून पाहावा असा आहे . आणि तरुणांनीदेखील "फॉर अ चेंज" आई बाबांबरोबर बघावा असा हा चित्रपट आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मला वाटलं सईला त्या डोश्यांमधून काही प्रतिकात्मकता, गहन अर्थ वगैरे दिसला की काय ? म्हणून विचारलं.
हाहा. काहीही! मला तेव्हा खूप भूक लागली होती. आणि आता माझी आई मला क्वचितच असे आयते डोसे करून देते. म्हणून जळफळाट झाला!

अरे तो भलामोठा फॅनच्या आकाराचा डोसा 'किमया'मध्ये मिळतो पुण्यात. एकाने मागवला, की सगळे त्याच्याकडे बोट करून 'तसला डोसा द्या' असं म्हणतात. स्वानुभव! Proud 'किमया स्पेशल पेपर डोसा' का असं काहीतरी नाव आहे त्याचं, नक्की आठवत नाहीये.

बरोबर. तो दोसा 'किमया'तला, मिसळ 'वैद्य उपाहारगृहा'तली. जेवायला जातात ते ठिकाण १० डाऊनिंग स्ट्रीट. शिवाय 'टेल्स अ‍ॅन्ड स्पिरिट'ही आहे.

अगो, +१ डोसा थोडा अजून क्रीस्पी चालला असता मला पण!
जेवायला जातात ते ठिकाण १० डाऊनिंग स्ट्रीट. शिवाय 'टेल्स अ‍ॅन्ड स्पिरिट'ही आहे. >> पुणेरी नावे ठेवण्याची पद्धत नामशेष होत आहे. पूर्वीचे पूणे राहीले नाही Wink

टेन डाऊनिंग स्ट्रीट म्हणजे ते डीपी रोडचं? टीडीएस? ते फ्यामिली रेस्टॉ झालंय? Uhoh
ते जर तेच असेल तर मग खरंच पूर्वीचं पुणं राहिलं नाही असं म्हणावं लागेल Proud

या चर्चेमुळे आता इथे डोस्याबद्दल जे चर्चा करणारे पुण्यात आहेत त्यांना माझ्याबरोबर डोसा खायला किमयात यावे लागणार आहे. खूप झाला आता "जले पे डोसा छिडकून"

Pages