जाऊ द्या ना बाळासाहेब

Submitted by बेफ़िकीर on 11 October, 2016 - 23:52

एक गुणी परंतु मनाची पकड घेण्यात फसलेला चित्रपट असे माझे 'जाऊ द्या ना बाळासाहेब' ह्या चित्रपटाबद्दल मत आहे. तसेच, विनोदनिर्मीतीवर चुकून जरूरीपेक्षा अधिक लक्ष दिल्यासारखे झाल्यामुळे ऐन गंभीर प्रसंगी प्रसंग, पात्रे, संवाद ह्यांचा मूड एकदम पालटवणे खूपच अवघड झालेले दिसत आहे. त्यामुळे स्वतःच तयार केलेल्या पिंजर्‍यात अडकल्यासारखी अवस्था झाल्याचे वाटले. फार पूर्वी एक झुंज नावाचा मराठी चित्रपट आलेला होता. त्यातील दुर्गुणी पित्याला त्याचा सद्गुणी मुलगा धडा शिकवतो व त्याचे गर्वहरण करतो असे कथानक त्या चित्रपटात होते. जाऊ द्या ना बाळासाहेब साधारण त्याच धर्तीचा चित्रपट आहे.

गरसोळी गावातील राजकारण्याचा मुलाला आपल्या पित्याच्या राजकारणातील फोलपणा समजतो व पीडितांच्या खर्‍या समस्या कळतात. ह्या समस्यांच्या निराकरणासाठी तो पित्याचे छत्र नाकारून स्वतःची एक स्वतंत्र मांडणी करतो. हे करत असताना त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातही स्वागतार्ह बदल होत राहतात. एका मुलीशी प्रेम जुळते. चांगले सोबती भेटतात वगैरे वगैरे! समांतररीत्या एका नाटकाची निर्मीती सुरू असते व नाटक प्रेक्षकांसमोर जाऊन पडते. मात्र ह्या नाटक पडण्याला नायक एक वेगळीच कलाटणी देतो आणि ठसा उमटवतो.

ज्या बाबींची तोंडभरून स्तुती करायला हवी ती म्हणजे गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि प्रत्येक सहभागी कलाकाराचा अस्सल अभिनय! अपवाद दोनच, मोहन जोशी आणि रीमा लागू! इतर प्रत्येकाने ग्रामीण बाज, भाषेचा टोन, देहबोली, अडाणीपणा कपल्ड विथ आत्मविश्वासाचे नेहमी दिसून येणारे काँबिनेशन, मन गलबलून जाईल अश्या प्रसंगी दाखवलेली घालमेल हे सगळेच स्तुतीस पात्र आहे. गिरीश कुलकर्णीने सर्व मार्गांनी चित्रपट स्वतःच्या खिशात घातलेला आहे. सईचे रूप ह्या चित्रपटात अतिशय लोभसवाणे आहे. मला व्यक्तिशः सर्वाधिक आवडली ती गिरीश कुलकर्णीची देहबोली आणि संवाद! अगदी अचूक साधता आलेले आहे त्याला हे सगळे!

कथेचा बराचसा भाग विनोद निर्मीतीतून प्रेक्षकांना हसवत राहतो. समांतरपणे बाळासाहेब आणि त्यांचे वडील ह्यांच्यातील सत्य-असत्याचा संघर्ष उभा राहतो. पण पुन्हा तेच लिहितो की विनोद निर्मीतीवर इतके लक्ष पुरवले गेले आहे किंवा विनोद निर्मीती इतकी परिणामकारक झाली आहे की बहुसंख्य प्रेक्षक पुढील विनोदी प्रसंगाकडेच डोळे लावून बसतात. संघर्षाचा प्रसंग काहीसा दुर्लक्षिला जातो. ह्याचे दुसरे कारण हेही असू शकेल की मोहन जोशी ह्या अभिनेत्याच्या एकंदर वावराचाच आता ओव्हरडोस झालेला आहे. तोच तोच मुद्राभिनय, तीच देहबोली आणि सगळे तेच ते! बरं, असेही नाही की ह्या भूमिकेला ते एकटेच समर्थपणे पेलू शकणारे अभिनेते आहेत. मराठीत इतर कित्येक असे अभिनेते असतील. कदाचित हुकुमी एक्का म्हणून मोहन जोशी असावेत असे वाटते. शिवाय, मोहन जोशींशी संघर्ष करताना बाळासाहेबांच्या तोंडी असलेले संवाद हे रडक्या लहान मुलासारखे आहेत हे आणखी विचित्रच! 'आम्ही ना जा, बघ मला जेवताना बोलतात' वगैरे सारखे संवाद दहा वर्षाच्या मुलाला शोभतील. तेवढा संघर्षाचा भाग सोडला तर गिरीश कुलकर्णी प्रत्येक प्रसंगात एकदम चपखल! रीमा लागू ह्यांच्या रुपाने एक महत्वाचे पात्र पूर्णपणे वाया घालवण्यात आलेले आहे. ह्याही जागी एखाद्या नवीन चेहर्‍याला वाव मिळाला असता तर बरे झाले असते. एके दिवशी अचानकच आपल्या चिरंजिवांना 'ही वाट सोडू नका' वगैरे चांगले सल्ले देणारी आई एरवी मंजूळा नाचणारणीकडे जाणार्‍या आपल्या मुलाला का काही बोलत नसे? तसेच, थेट बारमालकाला फोन करून 'माझ्या मुलाने किती ड्रिंक घेतले आहे' असे विचारून कसे गप्प बसत असे? धड पात्राची भूमिकाही समर्थनीय नाही आणि भूमिका करणारे पात्रही रटाळ! असो!

सत्याने असत्यावर मिळवलेला विजय हा 'आजवर असत्याने मिळवलेल्या विजयांपेक्षा' खूप अधिक प्रभावी व लाऊड दाखवला जाणे हे सामान्य प्रेक्षकाच्या मनासाठी आवश्यक असते. येथे हा विजय फारच सपक झालेला आहे.

शेवटचा संवाद 'नाना पाटेकरसारखा होतो की काय' अशी भीती मनात येत राहते. ह्याचे कारण एकदोनदा क्रांतीवीरमधील शेवटचा संवाद ऐकणे ठीक आहे हो? प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक नायक असाच भाषणे देत सुटला तर बोअरच होणार की? पण नाही. होते असे की एकवेळ नाना पाटेकरच्या वळणावर गेले असते तरी चालले असते भाषण, अशी वेळ येते. ह्या प्रसंगाला उभे करण्यातच गोची झालेली आहे. तेथे नायक ढसढसा रडणे हे नायकाच्या आत्तापर्यंतच्या वावराला शोभतही नाही आणि ती कथेची गरजच कुठे आहे असेही मनात येते. तेथे अपेक्षित असते हे एक सणसणीत भाषण! ज्यात भ्रष्टांना टोले लगावलेले असतील, खर्‍या समस्या समोर आणल्या जातील असे भाषण! पण परिस्थिती अशी होते की नाटक कसे पडते हे दाखवतानाच विनोदाची इतकी (जी नैसर्गीकच आहे, त्याशिवाय नाटक कसे पडेल म्हणा) साथ घेतली गेली आहे की त्यानंतरचे हे भाषण अचानक संपूर्ण कलाटणी देणारे बनवताना दमछाक झालेली आहे. आणि ती दमछाक अयशस्वीही झालेली आहे.

तरीसुद्धा, प्रत्येक पात्र स्वतंत्ररीत्या अत्यंत परिणामकारक झालेले आहे, पुन्हा, तेच दोन अपवाद सोडून!

संवाद, अभिनय, विनोद निर्मीती ह्या सर्वांना पैकी गुण द्यावेत असे वाटते. कथानक ठीकठाकच!

बाकी गीते आणि संगीत - ह्याबद्दल काय बोलावे? एक तर असलेली गीते अनावश्यक आहेत आणि संगीत काहीच्या काही लाऊड आहे. गीतांचे बोल कळत नाहीत आणि गरजही कळत नाही. त्यातून कथा पुढेही जात नाही. आजकाल असे काहीच्या काही संगीत आणि गीते देण्याची लाट आलेली आहे की काय कोण जाणे!

गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर, तसेच, बाळासाहेबांचे दोन जिगरी दोस्त ह्या सर्वांना मात्र एक पसंतीची कडक सलामी!

==============

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅक्स पुनम बदल केले आहेत. बरेचशे शब्दोच्चार रिपिट ऐकुनही कळत नाहीत.
माझ्या कानांचा दोष आहे की अजयचे शब्द जड आहेत काही समजेना. Proud

मोना डार्लिंग Proud

युट्युब चॅनल टीव्हीचा खोकडा खाल्ला पिला साला
अवघड जागचं दुखणं ५७० लाईक्स त्याला
मोशन आणि ईमोशनच बघवत नाही गारा
एक्सप्रेशनची बोंबाबोंब जगण्याचा पसारा

कधी इथंs कधी तिथंs
कधी इथंs कधी तिथंs
अरे इथंs तिथंs शोधु कुठं
मोना मोना मोना मोना
मोना डार्लिंग गेली कुठं ( x2)

बातम्या बातम्या बातम्या
टण टण टण टण
रस्त्यात खडडे स्पीड्ब्रेकर
ढ्ण ढ्ण ढ्ण ढ्ण
डेलीसोपच्या टीआरपीला
गर्दी बघा हाय
दलिंदर कॉमेडीच
छान छान छान छान

अतिरेकी अमेरिकी
चारबाकी झिरोबाकी
चारटाकी इंग्लिश
भाव भाव भाव भाव
जाऊद्याकी जाऊद्याकी
असुद्याकी मरुद्याकी
साळसुद ड्यांबीस
ह्या ह्या ह्या ह्या

दादागिरी मारामारी
हेराफेरी हारकारी
ओंगळ बोंगळ
वा वा वा वा
मारामारी चिंधीचोरी
सॉरी सॉरी देवदारी
प्रयोगाची धिंधाडा

कधी इथंs कधी तिथंs
कधी इथंs कधी तिथंs
अरे इथंs तिथंs शोधु कुठं
मोना मोना मोना मोना
मोना डार्लिंग गेली कुठं ( x2)

ओळखीला स्पर्श नवा लाभला
देहभर जणु मोह चेतला
रेशीमदे रेशीमघे
सलगीत येना जरा
अंतरीचा एक ऋतु जागला
आज मी तुझा रंग घेतला
आता खरी उमलेन मी
वेचून घेना मला

हा ऋतु माझा तुझा
आहे जरा वेगळा
हा असा पाऊस जो
देई जिवाला झळा

I have seen her
oh the little pretty angel
my heart is broken
find her find her for me
मोना गायब झाली पारदर्शी झाली Proud
कोण जाने केव्हा कशी कधी कोणी काशी केली
क्वालिटीत भी नाही
काँटिटीतभी नाही
आमची माती आमची माणसं सोडुन
मोना डार्लिंग गेली

वाटत फक्त थोडा वेळ बोरं
जाऊंद्या ना बाळासाहेब
वो नही तो होगी और कोई
जाऊंद्या ना बाळासाहेब
हे मोना..........
कुठे असेल मोनाडार्लिंग
हे मोना..........
कुठे असेल मोनाडार्लिंग
हे मोना..........
कुठे असेल मोनाडार्लिंग गेली कुठे

संगीत काहीच्या काही लाऊड आहे. गीतांचे बोल कळत नाहीत आणि गरजही कळत नाही. त्यातून कथा पुढेही जात नाही. आजकाल असे काहीच्या काही संगीत आणि गीते देण्याची लाट आलेली आहे की काय कोण जाणे>>>>
+1000
आणि लाऊडनेस बद्दल काय बोलावे

"ह्या" आय एल एस लॉ ला बॅचमेट होत्या आणि प्रोमोमधे बघून एकदम कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले.. स्मित >>>>> आय एल एस च्या सविता प्रभुणेनी पुरूषोत्तमच्या नाटकांमध्ये सुंदर भुमिका केल्या होत्या. त्यांच एक 'कॅलिडोस्कोप' नावाचं नाटक माझ्या अजुनही लक्षात आहे. अतिशय संयत आणि सहज अभिनय केला होता.

आत्ताच सिनेमा पाहून आले..फार आवडला! पुन्हा बघायचा आहे. ह्या सिनेमात काम केलेली सविता प्रभुणे माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिला इतक्या छान भूमिकेत पाहताना आनंद झाला Happy

गिरीश कुलकर्णी फारच जीनियस माणूस आहे. intimate theater (=साहित्य/कला/संस्कृती इत्यादी), प्रायोगिक नाटक, ते बसवताना एका मुळात संवेदनशील व्यक्तीच्या मनात घडणारे परिवर्तन आणि गाव, एकूणच राजकारण/सामाजिक प्रश्न अशा वरवर पाहता आपल्या खऱ्या समाजात कधीही न छेदणाऱ्या दोन वर्तुळांना फार सफाईदारपणे एकत्र आणून दाखवलं आहे.

बरंच काही सांगू पाहणारा सिनेमा आहे पण ते ऐकण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती आणि ज्यांच्यापर्यंत हा सिनेमा खरोखरी पोचायला हवा असे बाळासाहेब ही दोन्ही वर्तुळं प्रत्यक्षात छेदली जातील का असा प्रश्न मात्र पडला! कोण आहेत का असे खरेखुरे बाळासाहेब कुठे? असू देत आणि त्यांना ही वाट दिसू दे! आणि गाठ सुटू दे!

आमच्या इथल्या थेटरात गैरसोयीच्या वेळेचे शोज आहेत , आहेत ते ही कमी . एखादं दुसरेच आहेत . या विकेंडला तर हुकली संधी. होप , पुढच्या आठवड्यापर्यत टिकावा .

माहितीसाठी थँक्स चिनुक्स , पण मला नाही बघायला मिळणार.

बाळासाहेबची डीव्हीडी येणार आहे का ? आणि हो YZ ची पण डीव्हीडी येणार आहे का ?

Pages