सातशे संवादाची 'डायलॉगबाजी'.....

Submitted by अजातशत्रू on 3 August, 2016 - 05:29

हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे अजब रसायनांचे गजब मिश्रण आहे. हिंदी सिनेमा आता शंभरी पार करून गेलाय. दरसाली काही चांगले सिनेमे तर शेकडोनी वाईट सिनेमे येतात आणि जातात. कथानके तीच असतात, गाणीही तशीच असतात. थोडेफार लोकेशन बदललेले असते नाहीतर अभिनेते अभिनेत्री यांची अदलाबदल केलेली असते. पण ९० टक्के सिनेमात जुनी दारू नवी लेबल असाच कार्यक्रम बिनबोभाट सुरु असतो. पाहणारे कंटाळत नाहींत अन काम करणारेही कंटाळत नाहीत. मात्र याला अपवाद होते अशोककुमार. १९८९ ला 'शौकीन' येऊन गेल्यानंतर त्यांनी अगदी ठरवून सिनेमे करणे कमी करून नंतर बंदच करून टाकले. त्यांनी असं का केलं याचे मोठं गमतीदार उतर त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत दिलं होतं. ते म्हणाले होते - "१९३६ पासून मी चित्रपटात काम करतोय. या गोष्टीला आता ४५ वर्षे होऊन गेलीत. इतकी प्रदीर्घ कारकीर्द करताना माझ्या असं लक्षात आलंय की आपल्या चित्रपटसृष्टीत एकूण सातशे संवाद आहेत अन तेच आलटून पालटून शब्दांत थोडेफार बदल करून वापरले जातात. गेल्या चाळीस वर्षात सर्व चित्रपटात वर्षानुवर्षे तेच संवाद बोलावे लागत असल्याने मला त्या शिळ्या डायलॉगबाजीचा उबग आला आहे. त्यामुळे मी वैतागून सिनेमातील काम कमी करत आणलंय !"

अशोक कुमार अगदी त्राग्याने हे बोलले खरं पण त्यांच्या बोलण्यात जबरदस्त तथ्य होतं आणि आहे. हिंदी सिनेमे सातत्याने पाहणारा प्रेक्षक सिनेमात पुढे काय घडणार आहे किंवा पुढं कोणता प्रसंग असणार आहे याचा अचूक अंदाज बांधतात. काही चाणाक्ष प्रेक्षक तर सीन सुरु होण्याच्या आधीच डायलॉग मारून मोकळे होतात. मग 'दादामुनीकी बात में बहोत दम है' असं मनोमन पटू लागतं.
१९४३ च्या बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत' या सिनेमापासून सुरु झालेला अँटीहिरो अजूनही २०१६ मध्येही टिकून आहे. अशोक कुमारच 'किस्मत' मध्ये अँटीहिरो होते. एका प्रसंगात ते जेलमधून 'रिहा' केले जातात. त्यांची 'रिहाई' करताना जेलर त्यांना विचारतो " क्या मै उम्मीद कर सकता हुं. के तुम फिर जेल में नही आओगे ?"
यावर ते उत्तरतात - "मेरी तो हर बार यही कोशिश रहती हैं जेलरसाब. लेकीन एक तरफ मैं अकेला, और दुसरी तरफ पुलिस का इतना बडा काफिला ! मुझे यहांपर आनाही पडता है I"
हाच डायलॉग शम्मी कपूर, देवकुमार व अमिताभ यांच्या तोंडी रिपीट झाला. १९६१ शम्मीचा बॉयफ्रेंड, १९६९ देवकुमारचा 'रात के अंधेरे में' आणि १९७० चा अमिताभचा 'बंधे हाथ' ! सगळं जसंच्या तसं !

हिंदी सिनेमात आपण बारकाईने बघितले तर अशोककुमार जे बोलून गेले ते मनापासून पटते. कारण घासून गुळगुळीत झालेल्या अशा संवादांची रेलचेल आजच्या हिंदी सिनेमात देखील पाहण्यात येते. अशी अनेक उदाहरणे तुम्हालाही आठवतील, वानगीदाखल काही संवाद आपल्यासाठी ...

हिंदी सिनेमात हिरो हिरोईन जेंव्हा एकत्र येतात तेंव्हाचा डायलॉग ठरलेला असतो - "दुनिया की कोई ताकद अब हमें जुदा नही कर सकती !" प्रत्यक्षात मात्र निर्मात्याने पैसे कमी दिले तर हे दोघे बिनदिक्कतपणे काम अर्ध्यात सोडून देतात अन स्वतः होऊन 'जुदा' होतात.

'यारदाश्त' गमावणे हा हिंदी चित्रपटातील पात्रांचा आवडता छंद - "मै कहा हुं ? आप लोंग कौन हो ?"असले बाळबोध प्रश्न ही स्मरणशक्ती गमवलेली पात्रे विचारतात.

"मै तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हुं !" या वाक्याने देखील असाच काव आणलेला ! ती सांगते अन मग एरंडेल पिल्यासारखं तोंड करून ते 'बाळ'बोध वाक्य तो नाकारतो

"सेठ, तुम अमीर लोंग क्या जानो हम गरिबोंका दर्द ?" असं वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. विशेष म्हणजे हा संवाद सिनेमात डोळ्यात ग्लिसरीन घालून म्हणणारे बॉलीवूडवाले गरीबच नव्हे तर कुणालाही जवळ फिरकू देत नसतात. एक नंबरचे अप्पलपोटे असतात हे लोक.

"कह दो की ये झूट है !" नायकाने काही तरी कुटाणा ठेवलेला असतो. त्याच्यावर आलेलं बालंट तो झटकत नाही. तेंव्हा त्याची आई, पत्नी वा अन्य कोणी आप्त अत्यंत मेलोड्रेमेटीक पद्धतीने हे वाक्य उच्चारत असतात.

"भगवान के लिये मुझे छोड दो !" खलनायक नायिकेच्या अंगचटीला लागलेला असतो अन ती कळवळून ओरडत असते, हा आपला घोडा खिंकाळावा तसा खिदळत असतो. एका सिनेमात शक्ती कपूरने या संवादावर आचरटपणाचा कहर केला होता. त्याने उत्तर दिले होते - "भगवान तो अब बुढे हो गये है, उन्हे तो काम भी नही मिलते ! मै हुं ना मुझसे काम चलाओ ना !आऊ !!"
"जी भर के गालीया दो ! और चिल्लाओ ! चीखो. मुझे कुछ फर्क नही पडनेवाला" - रणजीत, प्रेमचोप्रा, शक्तीकपूर, अमरीशपुरी आणि कंपनीचा हा आवडता डायलॉग असावा. कधीकधी ती म्हणते - "मै तुम्हारी बेटी जैसी हुं!" या संवादावर रणजीतने कहर केला होता. त्यात तो म्हणतो- हां तुम बेटी जैसी हो पर मै तुम्हारे बाप जैसा नही हुं . तो क्या ये मेरा कुसूर है?"

"दुनिया में ऐसी कोई जेल नही बनी, जो मुझे रोक ले !" खलनायकाची रवानगी तुरुंगात होताना हातातल्या बेडया पुढे करत तो हे गुळमट वाक्य नायकाच्या तोडावर पोस्टमनने पत्र टाकावे तसे फेकत असतो अन पोलीस मख्ख चेहरयाने हा संवाद ऐकत असतात.

"आखिर तुम चाहते क्या हो ?" खलनायकाच्या लुच्चेगिरीने वैतागलेली चरित्रनायकांची पात्रे हात जोडून, तोंडावर बद्धकोष्टी भाव आणून हा प्रश्न विचारत तेन्व्हा अमजदभाई सारखे मुरलेले लोक डोळ्यानेच बोलत. प्रेमनाथ तर काचेच्या ग्लासवर बोटांनी आवाज करून त्याचं कुटील म्हणणं सांगायचा..

"पुलिस तुम्हारी पीछे पडी है, अब तुम बच नही सकते क्योंकी कानून के हाथ बहुत लंबे होते है..." इफ्तिकार आणि जगदीशराज यांच्या इस्त्री केलेल्या तोंडात हे वाक्य भारी शोभून दिसायचं.
"अब सारे रास्ते बंद हो चुके है, तुम्हारी बचने की कोई गुंजाईश अब बाकी नही. मै कहता हुं अपने आप को पुलिस के हवाले कर दो .." हा डायलॉग पुढची 'कडी' असतो.
"तुम लाख कोशिश करो, अब मैं तुम्हारे हाथ नही आने वाला. तुम्हे जो करना है तुम कर लो " नायक पोलिसांच्या वा खलनायकाच्या हातावर तुरी देऊन असली फडतूस वाक्ये फेकतोच.
"मै जानता था, तुम जरूर आओगे !"

"क्या तुम अब भी इस आदमी पर यकीन करते हो ?'
"अब आ भी जाओ, और कितना तडपाओगे ? मै तुम्हारा इंतजार करते करते थक गयी हुं !"
"तुम्हारा मेरा सफर अब यही खत्म होता है, अगर भगवानने चाहा तो हम फिर मिलेंगे !"
"तुम चाय में शक्कर कितनी चम्मच लोगे ?"
"अब देखना, दुनिया हमसे सिखेगी की प्यार कैसे किया जाता है"
"***मुझे छोडकर मत जाओ, जैसा तुम समझते हो वैसा कुछ भी नही हैं..."
"अब तो तुम्हे मेरी बातो पे यकी आया के नही ?"
हे असले प्रेमीयुगुलाचे संवाद तर निव्वळ डोक्याचे दही करणारे असतात..

"हमने अपने तरफ से पुरी कोशिश की है, अब उपरवालाही बचा सकता है ! इन्हे अब दवाकी नही बल्की दुआ की जरुरत हैं !" लाल दिवा बंद चालू होत असलेल्या खोलीबाहेर काही रोजंदारीची कामं सुटलेली माणसं बसावीत तशी काही माणसं बसलेली असतात अन आतून पांढरे डगले अंगावर घातलेला कोणीतरी विदुषकी 'डागदर' गळ्यातलं स्टेथोस्कोप घंटा हलवावी तसे हलवत हलवत बाहेर येतो, तोंडावरचा मास्क हटवत हे वाक्य तो बोलतो आणि गोळा झालेल्या मंडळीपैकी कुणी तरी स्टुडीओतल्या शंकरभगवान किंवा देवी मांच्या पायरीवर धावत जाऊन लोळण घेतं किंवा हातावर कापूर वगैरे असलं काही तरी पेटवून घेतं. अर्थात गरीब निर्मात्याकडे स्पेशल इफेक्ट्स नसते तर हे लोक कापूर प्लेटमध्ये घेऊन आरती करतात.

"इसका अंजाम बहोत बुरा होगा !" ही तर फार मोठी पोकळ धमकी असते. मतदान झाल्यानंतर राजकारणी मतदारांकडे ढुंकून बघत नाहीत तसं खलनायक या धमक्यांना भिक घालत नसतो.

"अगर तुम्हे अपनी जान प्यारी है तो अपने आदमीयोसे कह दे की वो अपने अपने हथियार डाल दे !" हे वाक्य थोडे फार शब्द बदलून येतच असतं मात्र तिथे राजकुमार, अमिताभ वा शत्रुघ्न असले की वाक्य मसाला तडक्या सारखे वाटे अन्यथा त्याची फ्लॉवर कोबी होऊन जाई.

"अगर तुम में थोडीसीभी शरम हया बाकी है तो चुल्लूभर पाणी में डूब मरो ! लेकीन हमें अपने सहारे छोड दो " नायक वा नायिका या पैकी कुणावर "किचड उछालले' असले की त्याच्या घरातले लोक ही भुणभुण त्याच्या मागे करत असतात. ( हे डायलॉग ज्यांच्या तोंडी असतात त्या मुळच्या काळ्या केसाच्या चरित्रनायक / नायिकाच्या डोक्यावर मेकअपमनने हेअर डाय उधार उसनवारीवर आणल्यागत किंवा डाय अंमळ महाग असल्यामुळे की काय ह्यांचे काळे केस अगदी मोजून पांढरे केलेले असतात)

"दूर हो जाओ मेरी नजरो से .." हे वाक्य दर दहा सिनेमात असायलाच पाहिजे असं संवादलेखकास वाटत असावं. तो तरी किती जिलेब्या पाडणार ?

"क्या अब भी तुम मेरे बारे में ऐसाही सोचते हो ?" हे वाक्य तर फार केविलवाणे वाटते.

"जाओ तुम अब आझाद हो .." जेल मधून बाहेर पडताना हे वाक्य बोलणारा जेलर आपण पडदाघरातून कपडे भाड्याने आणलेले आहेत हे प्रेक्षकांना कळलेच पाहिजे अशा अविर्भावात बोलत असतो.

"जज साहब ये झूट है, मुझे फसाया जा रहा है, ये एक गहरी साजीश है" आरोपीच्या लाकडी चौकटवजा कठडयात उभं राहून नायक रोजाने जेवायला असल्याचे भाव तोंडावर आणून कन्हून कुथून सांगत असतो त्यावेळी तिथे स्थानापन्न असलेला जज असा काही बसलेला असतो की जणू त्याला कुणीतरी सांगितलेलं असावं की आता तोंडावरची रेष जरी हलली की मानधन मिळणार नाही !

"तो फिर सच क्या है ?" हा तिथलाच पुढचा कोर्टरूम डायलॉग नेहमी ऐकयला मिळतो.

"ये अदालत मुजरीम ***को कुसूरवर ठहराकर ताजीराते हिंद दफा ***के तहत दस साल कैदे बा मुशक्कत सुनाती है .." असं म्हणून जज आपल्याला निर्मात्याने पाचशे रुपये कमी दिल्याचा राग पेनवर काढून त्याचे निब तोडून टाकतात !

"इस बस्ती में कोई मर्द नही बचा जो अपने बहन की रक्षा करे..." प्रसंग आणि स्थळ तुमच्या डोळ्यापुढे आले असेलच ...

"मै गरीब जरूर हुं लेकीन इमानदार हुं, खुद्दार हुं ! इन सब बातोंका मोल तुम क्या जानो ?" असे वाक्य सिनेमात लीलया फेकणारे हे लोक दोन नंबरमध्ये सगळे व्यवहार करतात.

"आज की रात तुम्हारे जिंदगी की आखरी रात है, जिसे याद करना चाहते हो उसे जी भर के याद कर लेना !"

मला हे वाक्य आवडते कारण सिनेमा संपत आला की क्लायमॅक्स जवळ आला की असे सीन्स व असे डायलॉग सुरु होतात.

"हो सके तो मुझे भूल जाओ .." हे वाक्य आपल्या उभ्या करिअरमध्ये उच्चारलं नाही अशी अभिनेत्री अख्ख्या इंडस्ट्रीत नसावी इतका याचा वापर झाला आहे.

"ये सब तुम्हारे वजहसे मुमकिन हुआ, तुम्हारा मुझ पर बहुत बडा एहसान हैं..' हे वाक्य येतं. पाया पडण्याचे कार्यक्रम उरकले जातात,दुधो नहाओ पुतो फलोचे आशीर्वाद देऊन होतात अन सिनेमा संपतो.
सिनेमा 'संपवून' घरी गेल्यावर "आजा मेरे ** मैंने तेरे पसंद का गाजर का हलवा बनाया है..." असं कुणीतरी आपल्यासाठी म्हणेल या आपल्या आशेच्या चिंधडया उडतात. अन आपण देवाला विचारावं वाटते की "हे भगवान, क्या यही दिन दिखाने के लिये तुमने मुझे जिंदा रख्खा है ?"

असे जवळपास सातशे डायलॉग आपल्या बॉलीवुडचा अविभाज्य अंग होऊन बसले आहेत. आपण हे सिनेमे पाहतो कारण आपल्याला हवा असतो तो विरंगुळा. मात्र अस्सल व दर्जेदार आपल्या पुढ्यात क्वचित येतं. तरीही काही संवाद आपल्या डोक्यात कायमचे रुतून बसतात अन सिनेमे सुसह्य होतात..

आपण चित्रपट पाहताना आपल्या समोर जे काही येतं ते असल्या वापरलेल्या डायपरसारखं असतं फक्त त्याची पॅकींग बदललेली असते. कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती आकसत गेली की असे होणारच ...
असो आपल्याला हवी असते तीन तासाची करमणूक अन पैसावसूल टाईमपास ! हा हेतू तरी यातून थोडाफार साध्य होतो हेही नसे थोडके ...

-समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_65.html
100-years-of-cinema-poster-collage-ft-130514.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवाच्या देवळात घंटा बडवत रडक्या स्वरात प्रत्येक सिनेमात पोरं हरवणारी आई उर्फ निरूपा रॉयचा डायलॉग का नाही घेतलात?

"मैने आज तक तुझसे अपनेलिये कुछ नही माँगा माँ, लेकीन आज तुझसे अपने बच्चोंकी भिक मांगती हूं, मेरा बेटा मुझे लौटा दे... Proud

छान लिहिलंय...

तमाम सबूतों और बयानात को मद्दे नजर रखते हुए... हे पाहिजे होतं. आणि ती निब तोडण्याची प्रथा फक्त सजा-ए-मौत नंतरच होती.

रीटा, क्या कर रही हो आजकल ?... बस, यूही क्लबोंमे नाचना गाना.... हेलनचा पेटंट संवाद असावा हा !

तमाम सबूतों और बयानात को मद्दे नजर रखते हुए.अदालत इस नतीजेपे आ पहुंची है कि मुजरिम विजयने कत्ल किया है और इसलिये ताजीरात ए हिंद, दफा तीन सौ दो के तहत अदालत उसे सजा ए मौत का हुक्म देती है.....

मस्त लिहिलंय.

"माँ, यह लो मेरी पहली तन्ख्वाह" आणि नंतर "उसे भगवान के सामने रख दो" हे दोन डायलॉगसुध्दा बहुतेक चित्रपटात असावेत.