"नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम….” ही आणि अशीच अजून २-४ गाणी तो ट्रेनमध्ये गाउन दाखवत असे पण तो भिकारी नव्हता. केस विंचरायच्या फण्या पुरूषांच्या डब्यात विकत असे तो. गाणं ही त्याच्या आयुष्यातली एकच जमेची बाजू. बाकी विधात्यानं त्याच्या कुटुंबासहित सगळं सगळं लुटून नेलं. कमावलं नाही तर खायचं नाही. सोप्पच गणित! पण गंधर्वाघरचं लेणं मात्र होतंच त्याच्या गळी.
कुणी वय विचारलं तर १० वर्ष असं सांगायचा. स्टेशनवरचे जागोजागचे टपरीतले रेडिओ ऐकवायाचे याला काही-बाही आणि त्यातलंच आठवेल तसं हा गुणगुणायचा ट्रेनमध्ये. एखादं दिलदार गिऱ्हाईक त्याच्या गायकीवर खूष होउन फणीचे सुट्टे पैसे सोडून द्यायचं. पण त्या पैशासाठी गात नसे तो. हे असंच फुटायचं त्याच्या कंठातून. ते कसं हे बऱ्याचदा त्याचं त्यालाही उमगायचं नाही.
विधात्याला मात्र निराळं काही घडवायचं होतं. म्हणून एक दिवस गाडीत ते चढले. गाण्याच्या कार्यक्रमासाठी ठाण्याला निघालेले. कोवळ्या हातांना न पेलवणारी ती फण्यांची टोपली कशी-बशी वागवत, चेहऱ्यावर केविलवाण हसू दाखवत, अंगीची लक्तरं सावरत, सुरेल आवाजात गाताना त्याला बघितलं त्यांनी. त्याचं गाणं तसं लक्षवेधीच होतं. पण त्यांना त्याहुनही जास्त भावलं ते म्हणजे टोपलीतल्या फण्या पुन्हा एकसारख्या लावताना तो सहज गुणगुणत होता. ते गुणगुणणं तालासुरात तर होतंच पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते उत्स्फूर्त होतं. विधात्याने लावलेलं हे फुलझाड त्यांच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं.
त्यांनी त्याला जवळ बोलावलं. “येतोस बाळा माझ्याबरोबर? गाणं शिकवतो तुला.” दोन क्षण तो काही बोललाच नाही. बघतच राहिला. मनात प्रश्नांचा कल्लोळ आणि बाळा हा शब्द डोक्यात घुमत होता. त्यांना त्याची घालमेल उमगली. हलकेच त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि आश्वासक स्वरात म्हणाले, “माझ्याचकडे रहायचं आणि शाळेतही जायचं. थोडं लिहिता वाचता येतं का तुला?” तो एक टक त्यांच्याकडे बघतंच होता. ते पेनाने एका चिटोऱ्यावर काही भराभर लिहित होते. तेच चिटोरं त्याच्या हाती देत ते म्हणाले, “हे माझं नाव आणि पत्ता. तुझं ठरलं की ये इथे. मी वाट पाहतो.” त्यांनी त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला. ठाणं आलं आणि ते उतरले. हा मात्र हातातल्या चिटोऱ्याकडे आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला.
ट्रेन मधला पोऱ्या सरांकडे शिकायला लागला. सरांनी काही काही हातचं न राखता सगळं सगळं ओटीत घातलं त्याच्या. अगदी आपलं नाव आडनाव सुद्धा. फार मोठ्या मनाचे! तोही चिकाटीने शिकु लागला.
सुरुवातीला सरांच्याच कळ्या आणि सरांचीच फुलं. याने फक्त ती वेचायची आणि गंधभरीत व्हायचं. पण हळू हळू सरांनी ओटीत घातलेल्या कळ्यांची फुलं करणं जमायला लागलं त्याला. सरांना स्फुरलेल्या कळ्यांची तो आपल्यापरीनं फुलं करायला लागला. अजूनही त्यांचं स्वत:चं असं काही त्याला सुचत नव्हतंच. सुचायाचं पण ते फुलं करण्यापुरतंच, सरांचाच विचार पुढे नेण्यापुरतं! सुरुवातीला त्यातली गंमत त्याने खूप अनुभवली पण आता मात्र त्याला स्वत:च कळ्या वेचाव्याश्या वाटल्या. त्याने विचारलंही तसं सरांना, “कुठून आणता ही प्रतिभा…?” सर हसून एवढंच म्हणाले, “ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते आणि जाताना फुले मागते….”
तोही दिवस उजाडला. ती सुखावली. त्याच्या मेहनतीवर खूष झाली आणि याच्याही पदरी कळ्या आल्या. सरांसारख्या पांढऱ्या शुभ्र टप्पोऱ्या नसल्या तरी त्या त्याच्या कळ्या होत्या. त्याला स्वत:ला आतून स्फुरलेलं असं त्याचं गाणं. सरांनी शिकवलेलं सारं सारं त्याचं झालं. अनेकदा केलेल्या मनन-चिंतनातून सरांचा विचार त्याला आपला वाटायला लागला. आपल्या परीने तो मांडता येउ लागला. तसा तो कळ्यांचा बहर त्यालाही आला.
तो एक महान गायक म्हणून नावारूपास आला. सरांचं नावही मोठं झालं पण कितीही मोठा झाला तरी त्याचं श्रद्धास्थान एकमेव कायम होतं. मंदिराची पायरी कधी चढला नाही पण क्लासमध्ये अनेकदा नुसताच जाउन बसायचा. सर म्हणायचे, “नुसताच येउन बसतोस, थोडं शिकवत तरी जा...” स्वत:पाशी महत्प्रयासाने आलेला हा कळ्यांचा वसा कुणाला देणं त्याच्या जीवावार यायचं. काही-बाही सांगून टाळायचा तो.
खूप गायनाचे कार्यक्रम केले त्याने आणि कलेचा अपरिमित आनंद लुटला पण हळू हळू त्याला लोकांसमोर गाणं कंटाळवाणं व्हायला लागलं. खरोखरी मनसोक्त आस्वाद घेणारे रसिक अगदी मोजकेच. बाकीचा सगळाच दिखाउ कारभार. त्याचं गाणं ऐकणं ही प्रतिष्ठेची बाब झाली. त्या प्रतिष्ठेपायी लोक हजेरी लावायचे. नवीन ऐकायची कुणालाच आस नाही. कलाक्षेत्रात उतरलेलं व्यवसायीकरण त्याचाही उबग आला त्याला. त्या व्यावसायीकरणापायी आपण त्या कळ्याच गमावून बसू असं वाटू लागलं त्याला. त्यानं ठरवलं ही सगळी तगमग सरांपुढे नेउन ठेवायची.
एक दिवस क्लासमध्ये गेला. सरांसमोर नेहमीसारखीच कुणी पाकोळी काही गात बसली होती. त्याने घाईघाईने सरांना तिथून आतल्या खोलीत नेलं.
आत जाताच धबधबा कोसळावा तश्या आवेगाने तो बोलायला लागला,“यापुढे मी गायलो तर फक्त तुमच्यासमोर गाणार. तुमच्यासाठी गाणार. पराकाष्ठेने तुमच्याकडून मिळवलेला हा कळ्यांचा वसा त्याची किंमत आता फक्त शोभेच्या वस्तूसारखी झालीये. मला या सगळ्या सगळ्याचा कंटाळा आलाय. आता हा कळ्यांचा वसा मी तुम्हाला अर्पण करणार. तुम्हाला वाहून निर्माल्य होण्यातच या कळ्यांची आणि या जीवाची इतिकर्तव्यता होईल.”
“सर तुम्ही शिकव शिकव म्हणता मला पण मला वाटत नाही इथे कुणाला किंमत असेल माझ्या या अनमोल ठेव्याची. मी जीवापाड जपलाय माझा हा वसा. तो असा सहजासहजी कुणावरतरी उधळण नाही जमणार सर. मला भीती वाटते की हा माझ्या जवळचा कळ्यांचा बहर संपून जाईल. लहानपणी अनुभवलंय मी; जग निष्ठूर आहे,सगळे ओरबाडायलाच बसलेत.”
सरांनी सगळं शांतपणे ऐकलं आणि मग म्हणाले, “अरे माझ्याकडून कुठला वसा घेतलासं तू? हे धुमारणं तुझंच आहे. ह्या कळ्याही तुझ्याच. मी फक्त तुला त्याची जाणीव करून दिली बाळा. धुमारणं हा झाडाचा स्वभाव असला तरी वसंत यावा लागतोच नं? ऋतू येउन सांगतो झाडाला अरे तुलाही कळ्या येतात बघ. पण मुळात ते फुलझाडच नसेल तर कळ्या कश्या येणार? तुझ्याकडे गाणं होतंच रे बाळा. जर पुढे न्यायचाच असेल तर हा ऋतू होण्याचा वसा पुढे ने. जिथे जिथे तुला फुलझाड दिसेल तिथे तिथे त्या फुलाझाडाला जाणीव करून दे त्याच्या धुमारण्याची. तर तुझ्या जीवनाचं खऱ्या अर्थी निर्माल्य होईल.संपूर्ण समर्पणाशिवाय निर्माल्य कसं होणार? तुझी कला दुसऱ्याला दिल्याशिवाय मोठी कशी होणार? तू फार मोठा कलाकार झालास आता तुझ्याजवळचं सारं सारं देउन त्याहुनही मोठा हो. शिकवायला सुरुवात कर. तुझ्या कळ्यांचा बहर हा सदैव तुझाच राहणार रे बाळा.”
बाळा! पुन्हा तो शब्द घुमला त्याच्या डोक्यात. तो तसाच स्तब्ध, नि:शब्द सरांसमोर बसून राहिला. त्या नीरव शांततेत दोन क्षण गेले आणि बाहेर बसलेल्या पाकोळीचा आवाज ऐकू आला त्याला. ती गायचा प्रयत्न करत होती. तिच्या वयाला न पेलवणारं गाणं.
गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
माझ्या पास म्हणताना श्वास फुलला पोरीचा. सर उठलेच. तेवढ्यात यानं सरांना थोपवलं. “थांबा, मी बघू?” असं म्हणत तो त्या मुलीसमोर जाउन बसला देखील. ती पोर भांबावली. साक्षात तो तिच्या समोर येउन बसला. एवढा नावाजलेला गायक. काही क्षण ती डोळे विस्फारून पहात राहिली. सर आतल्या खोलीच्या दाराशी उभे होते. तो तिला म्हणाला, “ शांत हो. बघ हं मी श्वास कुठे घेतो ते. ऐक.” त्यानं त्याच ओळी परत तिला म्हणून दाखवल्या.
सर भरल्या डोळ्यांनी पहात होते. त्यांच्याच अंगणातलं फुलझाड त्यांनीच घडवलेल्या ऋतूत बहरत होतं….
खुप छान.. मलाही आधी तेच गाणे
खुप छान.. मलाही आधी तेच गाणे आठवले. ज्या वयात ते ऐकले त्यावेळी त्याच्या काही संदर्भच लागला नव्हता... आज तो गवसला असे वाटतेय.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
खुप सुंदर लेख.... वाचताना कधी
खुप सुंदर लेख.... वाचताना कधी आसवे ओघळली... कळलेच नाही.
खूप खूप आभार!
खूप खूप आभार!
सुंदर लिहिलंय
सुंदर लिहिलंय
अतिसून्दर...आवडली
अतिसून्दर...आवडली
सुं>>दर!!!!!!!!!!!!
सुं>>दर!!!!!!!!!!!!
सही !
सही !
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
अतीशय आवडली..
अतीशय आवडली..
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
अतिशय तरल आणि सुंदर
अतिशय तरल आणि सुंदर लिहिलेय,
कालच मोबाईलवरून वाचलेले, प्रतिसाद द्यायचा राहिलेला.
आवडली कथा. सुरेख !
आवडली कथा. सुरेख !
मायबोली वर लिहीण नेहमीच
मायबोली वर लिहीण नेहमीच सुखावह असत....खूप खूप आभार!
सुरेख , छान लिहिलंय.
सुरेख , छान लिहिलंय.
खुपच सुंदर लिहिलंय.
खुपच सुंदर लिहिलंय.
सुंदर कथा!
सुंदर कथा!
खुप मस्त
खुप मस्त
सुरेख! फुलाने कळ्यांच्या
सुरेख!
फुलाने कळ्यांच्या फुलण्याविषयी लिहिलेली कथा!
मला तर दादने लिहील्येय ही कथा असाच भास होत होता.
आणि पहिल्याच पानावर दादची दाद दिसली.
साती... तुम्ही कित्ती अचूक
साती...
तुम्ही कित्ती अचूक टिपलंत... केवळ याच नव्हे तर माझ्या एकूणातच लेखनाचं प्रेरणास्थान दादच आहेत... त्यांचं वाचून शिकतेय, लिहितेय, मोठ्ठी होतेय... "मला तर दादने लिहील्येय ही कथा असाच भास होत होता".>>>> माझ्या साठी ही फार फार मोठी दाद आहे...
बाकी सर्वांचेच आभार!
Sundar. Phar chaan upama
Sundar. Phar chaan upama vaparalya ahet.
<<तुम्ही कित्ती अचूक
<<तुम्ही कित्ती अचूक टिपलंत... केवळ याच नव्हे तर माझ्या एकूणातच लेखनाचं प्रेरणास्थान दादच आहेत... त्यांचं वाचून शिकतेय, लिहितेय, मोठ्ठी होतेय... "मला तर दादने लिहील्येय ही कथा असाच भास होत होता".>>>> माझ्या साठी ही फार फार मोठी दाद आहे... >>
बापरे.. फुला, इतका मोठा मान नको देऊस. तुझं लेखन अगदी अगदी तुझच आहे..
आपण कदाचित एकाच मातीच्या घडल्या असू... त्यामुळे मला फुलवणारा ऋतू तुलाही तस्साच फुलवत असावा... अजून काय म्हणू?
लिहीती रहा.. आयुष्यं सर्वांगानं भेटू येवो तुला. खूप खूप मोठी हो.
संक्षिप्त पण सुंदर
संक्षिप्त पण सुंदर कल्पनाविलासाने मांडली आहे. लिहित रहा.
अप्रतिम __/\__
अप्रतिम __/\__
खुप सुन्दर!!
खुप सुन्दर!!
खुप खुप सुंदर कथा !!!!
खुप खुप सुंदर कथा !!!! मनाला अगदी भिडली !
अतिशय अवडलंय! नेमकं सगळं
अतिशय अवडलंय! नेमकं सगळं लक्ष्यात येतंय वाचताना!!
धुमारणं हा झाडाचा स्वभाव असला तरी वसंत यावा लागतोच नं? ऋतू येउन सांगतो झाडाला अरे तुलाही कळ्या येतात बघ. >>>> केवढं इंटेन्स आहे हे. सर आठवले माझे!
सुंदर...बर्याच दिवसांनी दोन
सुंदर...बर्याच दिवसांनी दोन सुंदर अशा कथा वाचल्या. ही आणि तुमची "दृष्ट" ही कथा..!!
अप्रतिम
अप्रतिम
"अंगणातलं फुलझाड त्यांनीच
"अंगणातलं फुलझाड त्यांनीच घडवलेल्या ऋतूत बहरत होतं"
सुंदर
Pages