बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस तुमच्यासारख्याच काही सहिष्णू लोकांमुळेच आज आमीरखान देश सोडून गेला नाही.. नाहीतर या पिक्चरनंतर संजयलीलाभन्साळी सुद्धा गेला असता.

अरे बाहेर लोकांच्या भावना दुखावताहेत, आणि तुम्ही इथे टाईमपास करताहात >>> इथे लोकांनी निरुपद्रवी टाईमपास सुरू केला, पण काहीही करून विषय वादग्रस्त वळणावर न्यायचा आणि स्वतः सेफ राहून गंमत बघण्याच्या या वृत्तीचा निषेध ! इथे भावना दुखावतात म्हणून पुन्हा खपली काढून त्याची जबाबदारी तुम्ही वर टाकलीय. तुझे धागे पण याच पद्धतीचे असतात ऋन्म्या. त्यात तू घेतोस ते बावळटपणाचं सोंग म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतंय टाईपचं असतं.

ही गंमत वाटते का ?

अरे देवा.. एखादे वाक्य आपण बोलतो कोणत्या टोनमध्ये आणि लोकं वाचतात कोणत्या टोन मध्ये.. सोशलसाईटस आणि आंतरजाल

तुझ्या इतक्या धाग्यांवर स्वतः अंगाला तेल लावून निसटायचं आणि लोकांची झुंज लावून द्यायची हे माहीत असल्याने लिहीलेलं आहे. वास्तविक लोक निरुपद्रवी टीपी करत असताना तिथेही ही वृत्ती दाखवायची आवश्यकता नव्हती. हे माझं मत नोंदवावंसं वाटलं. तुला हवी ती मतं तू लोकांकडून वदवून घेतोस, ते ही अगं अगं म्हशी करत, हे ही ध्यानात आलंय हे तुझ्या ध्यानात आणून देतो.

निधी

लोक टीपी करताहेत. तर लोकांच्या भावना दुखावतात हे लक्षात आणून देण्याचा प्रकार आहे तो. खरंच यावरून एखादा माझ्या भावना दुखावल्या अशी तक्रार करू शकतो. या खेळात भाग घ्यायचा सोडून ही कमेण्ट भडका उडावा याचं काम करू शकते हे लक्षात येत नसेल यावर विश्वास कसा ठेवायचा ? उद्या त्यावरून कुणी तक्रार केली तर सगळे वेड्यात निघतील ना ?

हे पहिल्यांदा होत नाहीये म्हणून मला मस्करी वाटली नाही या नोटवर थांबतो.. ही सवय आहे हे लक्षात आलेलं असल्याने नोंदवावंसं वाटलं. काहीही करून धागा पेटता ठेवण्यासाठी अधून मधून अशा काड्या टाकायचा...

तसंच माझ्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा मागतो.

बाकी

ग्गं, स्स, iii, iiiii , ही मज्जा आम्हाला कळालेली आहे. या मनाचे त्या मनाला कळावे तस्स्सं. Biggrin

ही सवय आहे हे लक्षात आलेलं असल्याने नोंदवावंसं वाटलं. काहीही करून धागा पेटता ठेवण्यासाठी अधून मधून अशा काड्या टाकायचा...>>
ही सवय माझ्याही लक्षात आली होती. पण आत्ता वरच्या पोस्टमध्ये त्याचा तसा उद्देश असावा असं वाटलं नाही मला तरी. Happy

बाकी

ग्गं, स्स, iii, iiiii , ही मज्जा आम्हाला कळालेली आहे. या मनाचे त्या मनाला कळावे तस्स्सं. >> हे काय कळलं नाही.

कापोचे,
वरचे मी मस्करीतच म्हटलेले पण,
ऑन ए सिरीअस नोट, जर एखादा विषय खरेच लोकांच्या भावना दुखावणारा असेल आणि काही लोकं त्यावर टीपी करत असतील तर ते त्यांच्या निदर्शनास आणून तो दंगा तिथेच थांबवायला बघणे यात देखील काही वावगे नाहीये.

म्हणजे हॉस्पिटलबाहेर काही लोक फटाके फोडत आहेत. तर त्यांना जाऊन सांगणे की जवळ हॉस्पिटल आहे आणि सण साजरा करायच्या नादात तुम्ही ते विसरला आहात याची जाणीव करून देणे याचा अर्थ फटाके फोडणारे आणि हॉस्पिटल यांच्यात काड्या करणे होत नाही.

@ धागा पेटता ठेवणे - हा आरोप मान्य. हे मी करतो कधीकधी. माझाच धागा असे नाही तर कुठचाही आवडीचा विषय पेटता ठेवतो, नाहीतर बोअर नाही का होणार.
पण हे देखील या केसमध्ये गैरलागू Happy

मात्र तिच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री गेल्या वीस वर्षात तरी झाली होती का हो.>>>>>>>>>>>>>>> कोणाला काय सुंदर वाटावं हे व्यक्तीसापेक्ष आहे पण तरीही ऑऑऑऑऑऑ????? असं झालंच. Lol

लोक टीपी करत होते ते भावना दुखवायला नव्हे. तुझ्यासारखं कुठलंही मत न मांडता, लोकांनाच मतं विचारून भडका उडवण्याच्या उद्देशाने धागे काढत सुटणे, त्यावर बावळट समजून दिलेल्या प्रतिक्रिया असं काही कुणी करत नव्हतं. त्यावरूनही जमल्यास आणखी भडका उडावा या उद्देशाने ती प्रतिक्रिया दिली होती हे आजवरच्या अनुभवाने सांगू शकतो. मस्करीने कसली प्रतिक्रिया ? मस्करीने थांबण्यासाठी ? कैच्याकै !!

कोण सुन्दर आहे? मधुबाला? बीना रॉय? वैजयन्तीमाला? नलिनी जयवन्त? नूतन? माला सिन्हा? हेमा मालिनी? की आताच्या सुन्दर्‍या, माधुरी ? जुही ? रवीना? ऐश्वर्या? सुश्मिता सेन?

कोण बर?

.
.
.
.
.
.
.
.
.
.
- आणि "बाजिराव" मल्हार मल्हार करत नाचला.!! Proud

रणवीर सिंग अजिबातच शोभला नाही पोशाखी सिनेमात. केस काढावे लागल्याने बारीक मिचमिचे डोळे अजून करुण वाटायला लागलेत. त्यावर बारीक खुरट्या दाढीमुळे एखाद्या रुग्णाला भरजरी कपडे नेसावेत तसं दिसतंय ध्यान !
सायकाल रिक्षेवाल्याच्या रोलमधे एकदम फिट्ट होईल गडी.... ए बाजू म्हणत फाटका कोट घातलेला रणवीर सिंग दिल्लीच्या सदर बाजारातून चाललाय !!

(दिवानी मस्तानी गाण्यात थोडा सहनेबल झालाय. सिनेमा रीलीज होईपर्यंत कदाचित सवयीचा होऊन जाईल रणवीर द "बाजीराव पेशवा" )

ता.क. - बाजीराव पेशव्याचे डोळे कसे होते याबद्दल पुरावा मागू नये. मागितल्यास त्या काळात बाजीरावास पाहीलेल्या व्यक्तीने माबोवर लॉगिन करेपर्यंत धीर धरावा.

टीझर आवडलं, पण बाजीराव जरा अजून मजबूत पाहिजे होते. अजिंक्य देव जमले असते.

बाकी ते बिंधास होते ... त्यांनी भंडारे नक्कीच उधळले असतील, कदाचित शिपायांसमावेत डान्सही केला असेल. पैजेखातर पुर आलेल्या नर्मदेत उडी घेतली होती त्यांनी.

Pages