माझे सर्व सोपस्कार म्हणजे तिकिट, व्हीसा, हॉटेल बूकींग वगैरे भारतात पोहोचायच्या आधीच, थॉमच कूकच्या
मानसी गोरे यांनी पार पाडले होते. फक्त डॉलर्स घ्यायचे होते, तेही काम एका दिवसात झाले.
त्या एका दिवसात मी रुटीन ब्लड टेस्ट वगैरे करून घेतल्या. माझ्या नेहमीच्या डॉक्टरनी थोडी काळजी व्यक्त केली, पण त्यांनीच मोठ्या मनाने सेकंड ओपिनीयन घे, असे सुचवले. मग मी डॉक्टर शिरीष माळगीं यांना भेटलो, तर त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितले. औषधे बदलून दिली आणि आठवडाभराने परत टेस्ट करून बघू, असे सांगितले. ( हे मुद्दाम लिहायचे कारण म्हणजे श्री लंकेत आपसूक खादाडीवर बंधने आली. परत टेस्ट करून त्यांना भेटल्यावर मात्र त्यांनी काळजीचे अजिबातच कारण नाही असे सांगितले. )
श्रीलंकेला जाताना फारसे सामान न्यायचे नव्हतेच ( पण येताना असणार होते ) म्हणून बॅगेत बॅग घालून नेली.
आता मुंबईचा विमानतळ खुप सुंदर झालाय. पण तरी इमिग्रेशनला रांग असतेच. माझ्या बाबतीत तिथले अधिकारी नेहमीच गप्पा मारायच्या मूडमधे असतात. ते ठिकच पण तिथे बसायची सोय नाही, हे मात्र त्रासाचे आहे.
एकदा इमिग्रेशन ओलांडले कि बरीच रेस्टॉरंट्स आहेत. त्यापैकी अमरेली मधे मी नेहमी काहीतरी घेतो. किमान
मसाला चहा तरी. (त्यांच्याकडे ढेबर्यापासून उंधीयूपर्यंत सर्व असते. ) पण यावेळी चेंज म्हणून दुसरीकडे समोसे घेतले तर ते अगदी भयाण होते.
आता तिथे एक छोटीशी बागही आहे, तिथे छान निवांत बसता येते. आतमधे बोर्डींग गेटवरही छान सजावट आहे. ( व्हर्टीकल गार्डन ) तिथलेही काही फोटो देतोच.
श्रीलंकनचे विमान छोटे होते पण सेवा उत्तम होती. दोन तासाच्या प्रवासाच्या मानाने खाणेही भरपूर आणि चविष्ठ
होते. विमान वेळेवर सुटले आणि पहाटे ५ वाजता मी कोलंबोला पोहोचलो. तो विमानतळ छोटा असला तरी
सुंदर आहे. मी उतरलो त्यावेळी तिथे पाऊस पडत होता ( मुंबईत नव्हता. )
इमिग्रेशनसाठी थोडकीच रांग होती. तिथे एक छोटासा फॉर्म भरावा लागतो, त्यात श्रीलंकेतील वास्तव्याचा पत्ता द्यावा लागतो. ( म्हणून हॉटेल बुकिंग आधी केले तर चांगले ) पण ते सर्व सोपस्कार आटपून, बॅग घेऊन मी अर्ध्या
तासाच्या आतच बाहेर पडलो.
बाहेर माझ्या नावाचा फलक घेऊन, थॉमस कूकचे एजंट असलेल्या अॅपल हॉलिडेजचा, श्री थिवांका वाट बघत उभाच होता. अगदी पहिल्याच भेटीत हा माणूस आवडून गेला. पुढे पाच दिवस आम्ही एकत्रच होतो. ( श्रीलंकेतील हि एक खास बाब. मी ज्या हॉटेलमधे रहात असे त्याच हॉटेलतर्फे गाईडसना देखील स्वतंत्र रुम दिली जात असे. त्यामूळे गाडी आणि गाईड सतत आपल्या दिमतीला असतात. )
थिवांकाने मला भरपूर डिसकाऊंट कूपन्स, पाणी आणि सिमकार्ड दिले. ( श्रीलंकेतून भारतात फोन करणे अगदी स्वस्त आहे. ) शिवाय नाश्ता वगैरे करायचा आहे का त्याची विचारपूस केली. त्यादिवशी आम्हाला नुआरा एलिया या ठिकाणी जायचे होते. थोडा लांबचा प्रवास होता, म्हणून मी वाटेत कुठेतरी चहा वगैरे घेऊ असे सुचवले.
एअरपोर्टच्या बाहेरच भरपूर झाडे आहेत. हा एअरपोर्ट कोलंबो शहरापासून २२ किमीवर आहे, पण आम्हाला आज
कोलंबोला जायचे नसल्याने आम्ही कँडीच्या दिशेने निघालो. ( नुआरा एलिया ला जाताना कँडी टाळूनही जाता येते, पण व्हाया कँडी गेल्यावर वाटेत काही ठिकाणे बघता येतात. शिवाय मी ज्या हॉटेलमथे राहणार होतो, त्यांचा
चेक इन टाईम, दुपारी २ वाजताचा होता, त्यामूळे तिथे लवकर जाऊन चालण्यासारखे नव्हते. )
मुख्य रस्त्याला लागल्यावर थिवांकाशी गप्पा सुरु झाल्या. ( मी नेहमीच ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसतो. मागे बसायला आवडत नाही. ) वाटेत तुरळक ट्राफिक होते, गावं जागी होत होती. पावसाची रिपरिप चालूच होती.
रस्ता दोनपदरीच असला तरी अगदी सुस्थितीत होता आणि रस्त्याच्या कडेने दुतर्फा सुंदर हिरवाई होती.
बोडके डोंगर दिसलेच तर ते मोठे खडक होते ( तेही गोलाकार पर्वताप्रमाणेच होते. )
पावसामूळे मला चहा प्यावासा वाटू लागला. थिवांका मला एका मस्त हॉटेलमधे घेऊन गेला. मी एअरपोर्टवर डॉलर्स बदलले नव्हते, म्हणून चहाचे पैसे त्यांनीच दिले. मग मात्र यापुढचे तूझे सर्व जेवण माझ्या खर्चाने असे त्याला सांगून टाकले. ( त्याची तशी अजिबात अपेक्षा नव्हती. )
वाटेत त्याचे घर लागले. तो मला आग्रहाने घरी घेऊन गेला. त्याची बायको घरातच एक हॉटेल चालवते. तिने चहाचा खुप आग्रह केला. नुकताच चहा झाल्याने मी नकार दिला तर तिने परत जाताना, जेवायला आलेच पाहिजे,
असे कबूल करून घेतले. ( मी अर्थातच नंतर त्यांच्याघरी जेवलोही. )
मग आम्ही कँडीच्या जवळ असलेल्या हत्तींच्या अनाथाश्रमात गेलो. श्रीलंकेत पुर्वी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. त्यातही काही ब्रिटीश अधिकार्यांनी हजारो हत्ती मारल्याची नोंद आहे. म्हणून काही ठिकाणी हत्तींची खास जोपासना केली जाते. हे अनाथालय त्यापैकीच.
इथे भारतींयाना सवलतीच्या दरात तिकिटे मिळतात. इथे जवळपास ७०/८० लहानमोठे हत्ती आहेत. ते माणसांना
अजिबात बिचकत नाहीत आणि मजेत बागडत असतात. त्याचा दिवसभराचा म्हणजे खाण्याचा, अंघोळीचा वगैरे
कार्यक्रम ठरलेला असतो. त्या वेळात आपल्यालाही त्यांना भरवता येते, अंघोळ घालता येते. ( पण मी तोपर्यंत
थांबलो नाही, कारण त्याला बराच वेळ होता. ) आणि त्यांचा सर्व कारभार अर्थातच गजगतिनेच चालणार होता.
तो परीसर खुप मोठा आहे, जंगलच आहे शिवाय त्या भागातून एक नदीही वाहते. त्यामूळे हत्तींची छान सोय होते.
तिथेही काही सुंदर बहरलेली झाडे दिसली.. ती नंतर सर्वत्रच दिसली. त्या त्या जागी त्यांचे फोटो देईनच. मधे एका ठिकाणी फार सुंदर परीसर नजरेच्या टप्प्यात होता. तिथे मुद्दाम थांबून थोडे फोटो काढले.
हत्तींच्या अनाथालयाजवळच काही दुकाने आहेत. त्यापैकी एका खास ठिकाणी मला थिवांका घेऊन गेला.
तिथे हत्तीच्या शेणापासून ( बरोबर आहे ना शब्द ? ) कागद केला जातो. हत्तीचा आहार विविध असतो पण त्यात चोथ्याचे प्रमाण लक्षणीय असते. हत्तीचे शेण वाळले कि त्याला दुर्गंधी येत नाही. हे शेण मग धुवून घेतात आणि
निर्जंतूक करण्यासाठी उकळत्या पाण्यात काही काळ ठेवतात. मग यंत्रानेच एकजीव करून त्याचा लगदा करतात.
हि सर्व प्रक्रिया तिथे प्रत्यक्ष बघता येते. तिथे हा कागद आणि त्यापासून केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी होत्या.
( पण त्या मी घेतल्या नाहीत. ) तिथेच इतर खरेदी मात्र केली.
श्रीलंकेत फिरताना अनेक ठिकाणी स्पाईस गार्डन असे बोर्ड दिसतात. तिथे मसाल्यांच्या झाडासोबत काही स्थानिक औषधी वनस्पतींची पण लागवड केलेली असते. अशीच एक जागा होती आणि तिथे एक भारतीय डॉक्टर आलेले होते म्हणून मला तिथे थिवांका घेऊन गेला. डॉक्टर साठीपार होते तरी रुप आणि उत्साह चाळीशीचा होता. त्यांनी अनेक झाडे दाखवली. भरपूर माहितीही दिली. अशा ठिकाणी अर्थातच औषधे विकायला असतात पण जबरदस्तीचा आग्रह नसतो. तूम्ही नकार देऊ शकता. मी काही औषधे विकत घेतली. तिथेही भारतीयांना सवलत मिळते. औषधे वापरून बघतो. जर परिणाम कारक वाटली तर सविस्तर लिहितो. अशा ठिकाणी सहसा मसाजही ( मोफत ) केला जातो.
वाटेत कँडीला आम्ही जेवण्यासाठी थांबलो. त्याच हॉटेलमधे एक लग्न समारंभ चालू होता. थिवांका मला आग्रहाने तिथे घेऊन गेला. मला खुप संकोच वाटत होता. नवरा नवरी खुप छान सजले होते. नवरी शुभ्र साडी नेसली होती. अंगभर दागिने ल्याली होती. अगदी भारतीय वाटत होती ( कुंकू तेवढे नव्हते ) नवराही एखाद्या शिलेदाराप्रमाणे सजला होता. थिवांका म्हणाला फोटो काढलेस तरी चालतील, पण मला ते प्रशस्त वाटले नाही. तेवढ्यात तिथल्या
एका माणसाने मला जेवायचा आग्रह सुरु केला, मग मात्र मी निग्रहाने बाहेर पडलो. तिथेच वरती आम्ही बफे
जेवलो. जेवणात भरपूर व्हरायटी होती आणि पदार्थ चवदारही होते.
पण मला स्थानिक सामान्य लोकांचे जेवण चाखायचे होते म्हणून मी थिवांकाला तसे सांगितले पण त्यानंतर आम्ही अगदी स्थानिक लोकांप्रमाणेच जेवलो. जेवून खाली आलो तर समोर उर्वशीची झाडे ( अम्हेर्स्टीया नोबिलीस , Pride of Burma ) बहरलेली होती. ती देखणी झाडे बघून मला थोडीच राहवणार. मी रस्ता क्रॉस करून त्यांचे फोटो
काढायला गेलो. थिवांका म्हणाला कि आपल्याला परत यायचे आहे इथेच, म्हणून मी आवरते घेतले.
वाटेत काही फळविक्रेते दिसले, झाले, परत थांबणे आले. रामबुटान आणि मॅगोस्टीन बघून मी थांबल्याशिवाय कसा राहीन. त्याबरोबरच काही स्थानिक फळेही घेतलीच. ती पण खुप चवदार होती.
कँडी पासूनच चहाचे मळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसायला सुरवात केली. तसे मी केनयामधल्या केरिचोमधे
चहाचे मळे बघितले होते पण तिथे थेट मळ्यात शिरता आले नव्हते. ते इथे साधले.
दुसरे म्हणजे आपल्या मामीने चहाच्या फुलाचा फोटो इथे दिला होता, ते फुल बघायला मिळावे असे मनापासून
वाटत होते, ते मिळालेच.
चहाच्या रोपाची उंची वाढू दिली जात नाही ( खुडायला सोपे जावे म्हणून ) पण ते झाड अनेक वर्षांचे असते. त्याची
फक्त दोन किंवा तीन कोवळी पाने तोडतात. अगदी कोवळे पान असते ( ते फिक्कट हिरवे असते ) त्यावर काहिही प्रक्रिया न करता ते वाळवतात, व त्याला सिल्व्हर लीफ म्हणतात. मधली दोन पाने प्रक्रिया न करता वाळवतात, तो ग्रीन टी. आणि तिन्ही पाने, मळून किंचीत आंबवून थोडी भाजून त्याची पूड करतात तो आपण पितो तो ब्लॅक टी.
चहाची खुडणी वर्षभर चालते. प्रत्येक स्त्री कामगाराला कमीत कमी २० किलो चहापत्ती गोळा करावी लागते. हे काम स्त्रियाच नेमकेपणे करू शकतात. पण हे काम तितकेसे सोपे नाही, कारण ही खुडणी करताना पुर्ण लक्ष द्यावे लागते ( कारण नेमका फुटवाच खुडावा लागतो ) आणि हे मळे डोंगर उतारावर असल्याने तोलही संभाळावा लागतो. चहाच्या मळ्यात सावली असणे आवश्यक असते त्यामूळे तिथे मोठी झाडे लावलेली असतात. त्या गारव्यासाठी या मळ्यात सापही वास्तव्याला असतात. तो धोका असतोच. क्वचित बिबळेही येतात.
या रस्त्यावर चहाच्या अनेक फॅक्टरीज लागतात. अश्याच एका फॅक्टरीतही आम्ही गेलो. प्रत्यक्ष फॅक्टरीपेक्षा मला तो परीसरच खुप आवडला. तिथे चहाची सर्व प्रोसेस बघता येते आणि अर्थातच चहाही विकत घेता येतो. तसा मी तिथे नमुन्यादाखल घेतलाही पण मला मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, असा चहा आपल्याला सपक चवीचा वाटू शकतो. म्हणून भेट देण्यासाठी घ्यायचा चहा, मी तिथल्या सुपरमार्केटमधून विकत घेतला.
जसजसे आम्ही नुवारा एलियाकडे जायला लागलो तसतशी हवा थंड आणि आल्हाददायक होऊ लागली. आधी मी खिडक्या उघडल्या पण मग वारा बोचरा झाला.
रस्ता अतिशय सुंदर होता. वळणावळणाचा आणि सतत चढ असलेला. खुपदा एखाद्या ठिकाणी जरा थांबावे असे मला वाटत होते, पण तशी जागा सापडत नव्हती. एका वळणावर मी गाडी थांबवलीच. तिथून अप्रतिम नजारा दिसत होता. पण आता माझे डोळे पेंगुळत होते. आदली रात्र तसे जागरणच झाले होते. माझ्या विमानाची वेळ गाठण्यासाठी थिवांकानेही पहाटे ३ वाजताच घर सोडले होते. त्यामूळे जास्त न थांबता आम्ही माझ्या हॉटेलवर, अरालिया ग्रीन वर गेलो. चेक इन लगेच झाले, थिवांकाला मी निरोप दिला ( त्याची सोय त्याच हॉटेलमधे
झाली होती. ) सध्या तरी थोडा वेळ झोपणे आवश्यक होते.
तिथल्या मॅनेजरला, जाफरीला माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. मी परत भेटीचा वायदा केला आणि रुमवर आलो. रुम सुंदर होतीच आणि खिडकितून मस्त नजाराही दिसत होता. अंघोळ वगैरे करून मी मस्तपैकी ताणून दिली.
सहा वाजता मला जाग आली. छान विश्रांति झाली होती. ते टुमदार गाव खूणावत होते. थिवांकाला न घेता मी एकटाच पायी पायी गाव फिरून आलो. बस स्टँड जवळ थोडी गजबज होती बाकी गाव निवांत. एक भले मोठे गोल्फ मैदान, त्याच्या सोबतीने जाणारा एक सुंदर रस्ता, त्यालाच लागून एक मोठे उद्यान. छोटी छोटी पण सुबक हॉटेल्स.
अनेक पर्यटक असेच मनमुराद भटकताना दिसले ( पण भारतीय कुणी दिसले नाही. )
एक फळबाजारही लागला. वाटेत घेतलेली फळे मी वाटेतच फस्त केली होती. रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी फलाहारच करू असे म्हणत मी परत फळे घेतली. अगदी माफक किंमत होती त्यांची. स्ट्रॉबेरीपासून बहुतेक फळे स्थानिकच होती.
आता हवेत चांगलाच गारवा होता. आलो तेव्हा १७ अंश सेल्सियस तपमान होते ते आता १४ अंशावर आले होते ( ते हॉटेलवर आल्यावर कळले ) उद्या पहाटे ४ वाजता उठून, ५ वाजताच बाहेर पडायचे होते, म्हणून हॉटेलला पॅक्ड
ब्रेकफास्ट ठेवायला सांगितला ( तो थिवांकाने आधीच सांगितला होता. )
5) On the Road in Sri Lanka, Buses of Lanka Ashok Leyland
9) Mural at Elephant Orphanage
13) Area of Elephant Orphanage
16) This is Gokura. Peel of this fruit is used in curries ( as our Cocum )
17) Fruit shops
18) Thiwanka selecting some fruits for me.
20) At the spice garden.. Note the use of coconut husk for gardening. It is stronger than bricks and provides nutrition to the trees also.
22) This is herbal pineapple ( not the ordinary one. )
23) Tailbela !!!
24) Taken from running car, note the bald mountain !
25)
26) Greenery and bio diversity too
28) A small tunnel for small cars !
29) A buffet at Kandy ( this is only first serving )
31) beauty has a name.. Urvashee !!
32) Tea Estate
36) This is what is to be picked.. ( not the flower though )
37) Note the slope at the edge of the estate.
40) Tea Factory
41)
42) At the Tea Factory
43)
44) Inside the restaurant at Tea Factory
45)
46)
47) View from Restaurant
48)
49) A lovely bend !
50)
51) Our Car
52) View from that spot, where I stopped the car.
53) Araliya Green Hotel
55)
अरे पण एवढ्या पहाटे उठून कुठे जायचे होते ? ते पुढच्या भागात..
क्रमशः
खुपच छान. परिसर, फोटोज सगळंच
खुपच छान. परिसर, फोटोज सगळंच सुंदर.
ती डिश तर एकदम भारी दिसतेय
वॉव.... Thanks for sharing.
वॉव.... Thanks for sharing.
रम्य ही स्वर्गाहुन लंका...
तिसरीच प्रतिक्रीया माझी
तिसरीच प्रतिक्रीया माझी असल्या मुळे सगळे शब्द वापरते.
सुंदर!
अप्र्तिम!
सुरेख!
मस्त!
खुप सुंदर फोटो आहेत सगळे आम्ही पण गेलो होतो काहि वर्ष आधी सगळ्या आठवणी जागृत झाल्या.
पुन्हा एकदा जायची इच्छा आहे.
बेस्ट फोटोज साप फार आहेत अशी
बेस्ट फोटोज
साप फार आहेत अशी माहिती मिळाल्याने श्रीलंकेबद्दल भीती आहे जरा पण ही मालिका वाचून मत बदलते का पाहुया
व्वा मस्त लेख, फोटो. तूम्ही
व्वा मस्त लेख, फोटो. तूम्ही श्रीलंकेला गेलात हे कळल्यापासून वाटच बघत होतो.
व्वा! मस्त, देखणी,
व्वा! मस्त, देखणी, चविष्ट(दिसणारी) लेखमाला !वाचनानंद घेतेय....
मस्त फोटो आणि माहिती. लिहायची
मस्त फोटो आणि माहिती.
लिहायची ही पद्धत आवडली. आधी सगळं वर्णन लिहून उत्सुकता वाढवायची, मग १-१ फोटो द्यायचे
व्वाह ! मस्त .. लेखन आणि
व्वाह ! मस्त .. लेखन आणि फोटोज दोन्ही..
तोपासू डिश
मस्त फोटो आणि वर्णन!
मस्त फोटो आणि वर्णन!
वॉव ........दिनेश मस्त माहिती
वॉव ........दिनेश मस्त माहिती आणि अप्रतीम फोटो.
आणि ते बफे मील टेस्टी! तोंपासु!
मस्तं चाललीय ही
मस्तं चाललीय ही सहल.
पु.भा.प्र. आहेच.
वाचतोय.. मज्जा येतेय. पुढल्या
वाचतोय.. मज्जा येतेय. पुढल्या वेळी भारत वारी व्हाया श्रिलंका.. निश्चित!
>>हत्तीच्या शेणापासून ( बरोबर आहे ना शब्द ? ) << मला वाटतं हत्तीचीही लिद च असावी.
मस्त वाटलं वाचून , मांडणी
मस्त वाटलं वाचून , मांडणी आवडली. अगदी सहज शब्द-पर्यटन करून आणणारी.
हत्तींच्या कारभारावरचा हा शेरा " आणि त्यांचा सर्व कारभार अर्थातच गजगतिनेच चालणार होता." खूप क्यूट! प्र चि सर्वच सुंदर.
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
दिनेशदा मस्त! मला नवीन मुंबई
दिनेशदा मस्त! मला नवीन मुंबई विमानतळ खाण्यापिण्याच्या बाबतीत फार नाही आवडले. मागे तिथे चहा घेतला तो इतका गार आणि कधीकाळचा होता की मी तो रीटर्न केला आणि पैसे परत मागतले तर त्यांनी तो परत गरम करुन दिला. मी तो तसाच ठेवून दिला. जुने विमानतळ छान होते. अनेक पर्याय होते खायला प्यायला. ती तेंव्हाची सर्व दुकाने कुठे हटवली.!!!! नवीन विमानतळावर जागेचा चांगला उपयोग नाही केला असे वाटते. असो.
श्रिलंकेचे शाकाहारी पदार्थ मस्तच असतात.
चंबू, हत्तीच्या विष्ठेला विष्ठा असेच म्हणतात. लिद ही घोड्याची, गाढवाची असते. बकरीच्या लेंड्या असतात. गायी म्हशीचे शेण असते. (काय पण एकेक विषय :))
खूप छान. मला पण असेच हिंडायला
खूप छान. मला पण असेच हिंडायला आवडते. कार व गाइड बरोबर आणि गुड रूम टू रिलॅक्स. सुट्टीवर असताना सर्व हॉटेलच्या हाउसकीपींगवरच सोडून द्यायला आवडते. मला त्या हत्तींच्या अनाथालयात स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. सहा महिने वगिअरे राहून. त्यामुळे ही माहिती उपयोगी पडेल. ते औषधी वनस्पतींचे पण खोल जाउन बघण्या सारखे आहे. सी मॅप भारतातील संस्था आहे जी अॅरोमाटिक व मेडिसिनल झाडा झुडपांच्या लागवडी संदर्भाने काम करते. त्यांच्या बरोबर पूर्वी हैद्राबादेत काम केले आहे. जिरनियम लागवडी च्या संदर्भाने त्यामुळे हया दोन आवडीच्या गोष्टी मिळतील. फोटो सर्व छानच आले आहेत कार्डमम फूल बघून तर हर्षभरित झाले.
स्पाइसे आर अवर हार्ट.
संगकारा मलिंगा दिसले का हो?
मस्त फोटो. वर्णनही खुप छान
मस्त फोटो. वर्णनही खुप छान केलेयत तुम्ही. कोणाला जायचे झाल्यास फायदा होईल असे.
मस्त फोटोज दिनेश दा
मस्त फोटोज दिनेश दा !!
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
मनातली लन्का. अप्रतीम!
मनातली लन्का. अप्रतीम! शब्दच तोकडे.
मस्तच! उल्लेखनीय म्हणजे तिथली
मस्तच! उल्लेखनीय म्हणजे तिथली स्वच्छता.
dinesh daa khup chhan
dinesh daa khup chhan maahitee
छान लिहिलंय. मी अनेक
छान लिहिलंय. मी अनेक वर्षांपूर्वी गेले होते. लेक अगदीच लहान होती आणि नवर्याच्या ऑफिसमधला गृप होता. त्यामुळे जास्त साईटसिइंग झालं नाही. काही दिवस बेंटोटा आयलंडवर होतो आणि मग दोन दिवस कोलंबोला होतो. तेव्हा २००४ च्या डिसेंबरात आलेल्या भयानक त्सुनामीला जेमतेम एक वर्षं झालं होतं आणि त्या खुणा ठिकठिकाणी दिसत होत्या.
मला मात्र श्रीलंकन फूड अजिबात आवडलं नाही. सगळे आपल्यासारखेच मसाल्याचे पदार्थ असूनही ते जेवण चवीला काहीतरीच लागले.
बेंटोटा आयलंड
संगकारा मलिंगा दिसले का
संगकारा मलिंगा दिसले का हो?
तिकडचे लोकं पण हा प्रश्न हमखास विचारतात.सचिन्,धोनी,विराट्,शाहरुख.
वा मस्त फोटो आहेत सगळे.
वा मस्त फोटो आहेत सगळे.
दिनेशदा, छान वर्णन केलेत.
दिनेशदा,
छान वर्णन केलेत. अगदी तुमच्याबरोबर फिरतोय असे वाटले.
फोटो पण मस्त आलेत.
चहाच्या फुलासोबत छोटी छोटी फळे पण दिसतायत. त्या फळांचे काय करतात?
तुम्ही नक्कीच एखाद दोन श्रीलंकन पदार्थ बनवून पाहिले असतील ना?
वाह!! मस्त आहेत फोटो आणी
वाह!! मस्त आहेत फोटो आणी सुपर्ब माहिती!!! बहुत काम की है!!!
सही ! मला श्रीलंकेबद्दल सुप्त
सही !
मला श्रीलंकेबद्दल सुप्त आकर्षण आहे. कदाचित रावणाच्या कुळातला असीन मागच्या जन्मी ! त्यामुळे कधी न कधी नक्की जाणार आहे तिथे फिरायला.
काही किरकोळ प्रश्न -
१. कोणत्या महिन्यांत गेला होतात ?
२. मला समुद्रकिनारा म्हटला की मासे आणि बियर प्रकर्षाने हवीच असते ! त्याची सोय कशी आहे ?
३. आपण आपलेच जाऊ शकतो का ? ट्रॅव्हल एजंट आवश्यक आहे का ?
आभार ... सर्वांच्या
आभार ...
सर्वांच्या प्रश्नाना मिळून एकत्र उत्तर देतो.
हे लेखन आधी स्वतंत्र केले आणि मग फोटो अपलोड केले, त्यामूळे अशी रचना आपोआप झाली.
श्रीलंकेत खुप घनदाट जंगल आहे, त्यामूळे साप असणारच. मी पण अस्सल नाग आणि अजगर बघितला, पण ते दोन्ही गारुड्याकडे. जंगलात फिरताना साप दिसू शकतात, पण तसा धोका नाही. आणि ते फार आहेत असेही नाही.
मुंबईच्या विमानतळावर अजून नवनवीन दुकाने होताहेत. एक विंग अजून पुर्णपणे वापरात नाही.
हत्तींबरोबर इतर काही प्राण्यांशीही थेट भेट झाली.. त्याबद्दल पुढच्या भागात. वनौषधींबद्दल तिथे बरेच काही होताना दिसले. पण तिथून भारतात फारशी निर्यात होत नाही, असे थिवांका म्हणाला. ( काहीतरी इश्यूज आहेत, त्याला नक्की माहित नव्हते. नाहीतर एक्सॉटीक फळांसाठी भारतात बराच वाव आहे असे वाटते )
मी अर्थातच सगळीकडे शाकाहारी जेवलो. हॉटेल निवडताना स्थानिक लोकांची गर्दी हा निकष होता. त्यामूळे चवदार पदार्थ मिळाले.
मी तिथे असताना क्रिकेटची मॅच तोंडावर आली होती तसेच त्यांच्या निवडणुकाही. पण कुठेही भरमसाठ पोस्टर्स, गदारोळ दिसला नाही. निवडणुकांबाबत पुढे लिहितोच. मी गाडीत त्यांचे एफेम पण ऐकत होतो. तिथेही निवेदक
फार बकबक करत नव्हते. एकंदरीत मला ते लोक, शांतताप्रिय वाटले.
चहाच्या झाडाला दिसताहेत त्या कळ्या आहेत. फळेही येत असावीत. पण फुलांना गंध नव्हता. तसा तो पानांनाही नसतो. ती चव प्रोसेस केल्यावरच येते.
मी ऑगस्ट महिन्यात गेलो होतो. समुद्रकिनारे अजेंडावर नव्हते. तिथे सर्व दिशांना समुद्रकिनारे आहेत आणि तिथे बरेच पर्यटक जात असतात. मासे भरपूर आणि स्वस्त मिळतात. मद्यपानावर काही वेळेची आणि जागेची बंधने आहेत. दर पोर्णिमेला तिथे ( धार्मिक कारणासाठी ) सार्वजनिक सुट्टी असते आणि तो बहुदा ड्राय डेही असावा.
ही सहल तूम्ही स्वतः अरेंज करू शकता. माझ्या रेफरन्सने काही हॉटेलमधे सवलतही मिळेल. तसेच थिवांकाही मदत करेल ( त्याचा संपर्क शेवटी देतोच ) पण शक्यतो भारतातून हॉटेल बूकिंग केले तर बरे पडेल. ती हॉटेल्स डे एस्कर्शन अरेंज करू शकतात. सार्वजनिक वाहनाने फिरण्यात काहीच धोका नाही. गरज वाटेल तिथे स्थानिक लोक सहज मदत करतील.
व्वा मस्त लेखन आणि
व्वा मस्त लेखन आणि फोटो
पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहेच
धन्यवाद दिनेशदा, खूप छान
धन्यवाद दिनेशदा, खूप छान लिखाण आणि सुंदर फोटो.
Pages