माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत

Submitted by सूनटून्या on 28 May, 2015 - 05:33

माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत

कल्याणपासून साधारण ९० किमी दूर कल्याण-नगर रस्त्यावर असलेला माळशेज घाट पावसाळ्यातल्या झिंगणाऱ्या खेकड्यांमुळे बराच कुप्रसिद्ध झाला असला तरी आमच्यासाठी मात्र हे दुर्दम्य इच्छाशक्तीचं तीर्थक्षेत्रच. माळशेज घाट म्हणजे डोंगर भटक्यांच्या उनाडक्या आणि पिकनिककरांसाठी पावसाळी 'ओली' सहल. या ओल्या सहली वाढल्यामुळे घाटात कचऱ्याच प्रमाण खूप वाढलं आहे. नाहीतरी माळशेज घाट विकणे आहे या धर्तीवर आपले निसर्गप्रेमी ''भ्रमंती''कर मिलिंद गुणाजी यांच्या जाहिराती फुटा-फुटावर आपल स्वागतच करतात. असो!

माळशेज परिसरातील तीन-चार हजार फुटी उंच कातळकडे पाहताना सामान्य माणसाला अक्षरशः भिरभिरायला होते. कल्याणहून निघाल्यावर मुरबाडच्या पुढे घाट चढण्यास सुरु करण्यापूर्वी टोकावडे गावात चहा व शेवभाजीचा समाचार घ्यायचा हा नेहमीचा शिरस्ता. पण सध्या का कोण जाणे २४ तास उघडे असलेल्या त्या हॉटेलची जी दुर्दशा करून ठेवली आहे ती पाहिल्यावर आत पाऊल सुद्धा टाकावेसे वाटत नाही. टोकावडेला आपलं स्वागत करतो नानाचा अंगठा, त्याच्या शेजारी जिवधन किल्ला, त्याच्या उजव्या बाजूला ढाकोबा आणि दुर्ग.

टोकावडेवरून साधारण ३ किमी अंतरावर असलेल्या वैशाखरे गावापासून माळशेज घाटाची सुरुवात होते. वैशाखरेच्या पुढे एक रानवाट नाणेघाटाकडे जाते आणि मग सुरु होते माळशेजची रौद्रता. खरतर घाटातील रस्ता तसा अवघड किंवा भयानक नाही, पण चहूबाजूचे कातळकडे मात्र धडकी भरवतात. यातील पहिल्या टप्प्यात येतो मोरोशीचा भैरव आणि त्याच्या मागे धावत जाणारी कमानदार घाटघरची डोंगररांग (या डोंगररांगेच्या पलीकडे आहे जीवधन किल्ला, नाणेघाट परिसर). घाटघरची डोंगररांग संपली कि लागतो, लांबवर पसरलेल्या दौंड्याची माळशेज घाटातील बाजू, या डोंगराचे घाटावरील एक टोक निमगिरी किल्ल्याला जाऊन बिलगते. यानंतर साधारण दीड-दोन किमी लांब असलेली भोजगिरीची घाटातील बाजू (यांच्या मागील बाजूस आहेत, सिंदोळा, हडसर, निमगिरी किल्ले) आणि यांच्या विरुद्ध बाजूस रोहिदास, कोकणकडा आणि हरिश्चंद्रगड परिसर. भोजगिरीच्या शेजारी आहे घोण्या डोंगर आणि तिवईचे सुळके. या घोण्या डोंगराच्या हरिश्चंद्रगडाच्या दिशेने उतरणाऱ्या धारेच्या पोटातच आहे माळशेज घाटातील देऊळ आणि बोगदा. देवळाजवळ हरिश्चंद्रगडाकडे पाठ करून उभे राहिल्यास समोर तिवई सुळक्यांच्या खालीच डोंगराच्या पोटात दिसते ती माळशेजची लिंगी.

तुम्ही माळशेज घाटातून प्रवास केला असल्यास बोगदा येण्याअगोदर एका 'U' वळणावर एक अजस्त्र कातळभिंत आपल्यासमोर दिसते. तीच हि भोजगिरी.

१.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

भोजगिरी आणि घोण्या डोंगर यामधील खिंडीने घाटातील सावर्णे आणि इतर गावकऱ्यांचे ऋणानुबंध घाटावरील जुन्नर विभागाशी जोडले गेले आहेत. या खिंडीतून दीड-दोन तासात अंगावर येण्याऱ्या वाटेने घाटावरील भोजगिरीच्या पायथ्याशी असलेल्या तळेरान गावात पोहोचता येते. अशीच एक वाट बोगद्याच्या पुढील वळणावर दिसणाऱ्या रेलिंग लावलेल्या पायऱ्यांवरून जाते. हि वाट थोडी प्रशस्त आहे आणि चढही जास्त नाही.

तळेरान गावातील काही गावकऱ्यांनी भोजगिरीच्या पायथ्याला असलेल्या पठारावर शेती सुरु केल्याने इथल्या जनावरांचा अधिवास आणखी कोमेजून गेला आहे . आता पक्की घरेसुद्धा बांधल्यामुळे माणसाचा वावरही वाढलाय. तिची आता पाचकेवाडी अशी ओळख आहे.

या वृत्तांतात तांत्रिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. उगीच वाचताना डोक्याला शॉट नको.

एव्हढ्या मोठ्या भिंतीवर चढाई करायची असल्यावर तिला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये (Pitch) विभागण्यात येते. तुम्ही जर या भिंतीचे निरीक्षण केल्यास आढळेल की काही ठराविक अंतरावर एक हिरवाईचा पट्टा भिंतीला आडवा समांतर रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलेला आहे, ज्याला आमच्या भाषेत 'लेज' म्हणतो. हि हिरवाई म्हणजेच कारवीची बेट. हि लेज काही ठिकाणी चांगली ४-५ फुट रुंद तर काही ठिकाणी फक्त एखादेच पाऊल राहील एव्हढीच रुंद असते. या भिंतीची डावी बाजू एका खिंडीत उतरत असल्याच दिसत असेल.

दिवसभराची चढाई थांबविल्यानंतर चढाईपटू आणि त्याचे सहाय्यक रात्रीच्या विश्रांतीकरिता खाली लेजवर उतरतात. पण त्या लेजवर राहणे सुरक्षित नसते. एकतर तंबू मावेल एव्हढी जागा उपलब्ध नसते आणि वरून दगड वगैरे पडण्याची शक्यता असते. अशावेळेस मग बेसकॅम्पवर परत जाणेच योग्य असते. पण प्रत्येकवेळेस बेसकॅम्पवर जाण्यास मिळेलच असे नाही. पण या भिंतीची डावी बाजू शेजारील खिंडीत उतरताना दिसतेय. त्यामुळे त्या खिंडीतच बेसकॅम्प लावणे यथोचित होते. म्हणजे त्या उतरत्या धारेने आम्ही लेजवर पोहोचू शकत होतो आणि लेजवरून आडवे चालत चढाई मार्गापर्यंत. जसजशी उंची वाढत जाते, त्याप्रमाणे वरवरच्या लेजवरून नियंत्रण करणे सोपे पडते आम्हीही बेसकॅम्प त्या खिंडीच्या वरील मुखावरच लावला होता. बेसकॅम्पपासून चढाईमार्ग जवळपास तासाभराच्या अंतरावर होता.

२.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

या कार्यक्रमासाठी कधी नव्हे ते प्रथमच प्रायोजक मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि भरघोस पाठींबा मिळाला. जेव्हढी गरज होती तेव्हढीच घेतली. लोकांमध्ये संस्थेबद्दल एव्हढी आपुलकी असल्याचे पाहून आम्हीही अचंबित झालो.

जात जाता डोंबिवलीत सिमेंटच्या जंगलात सापडलेले हे काही वळवळणारे मित्र रानात सोडण्यात आले. Sand Boa, घोणस, नाग आणि धामण. एक घोरपडही सोडण्यात आली.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

सह्याद्रीमध्ये प्रथमच? प्रस्तरारोहणाचे हवाई फोटो काढण्यासाठी आमचा सोलापूरमधील एक मित्र 'इम्रान' आपले Cam Copter घेऊन आपल्या कुटुंबियांसमवेत भेटायला आला होता. या Cam Copter ची रेंज फक्त १२०० फुटांपर्यंत मर्यादित असल्याने आम्हाला प्रत्यक्ष चढाईचे वेगळ्या कोनातून फोटो काढण्याची संधी मिळाली नाही आणि बॅटरीची क्षमताही फक्त दहा मिनिटे होती, त्यामुळे ते Cam Copter दूरवर जाऊ शकत नव्हते. एकतर चढाईमार्गाकडे जाण्यासाठी लेजवरच्या खडतर मार्गातून जायचे असल्याने आम्ही त्याला तिकडे नेले नाही. वर डोंगरातील वेडावाकडा वाहणारा वारा Cam Copter ला स्थिर राहण्यास देत नव्हता. त्यामुळे मग बेसकॅम्पच्या आसपासचा नजारा यात कैद केला. हे त्यातलेच काही फोटो.

३.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

४.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

एके दुपारी बेसकॅम्पवर नेहमीची कामे चालू असतांना अचानक गावाकडील रानातून जोरजोराने पत्रा बडवण्याचा आणि पुकाऱ्याचा आवाज यायला लागला. आमच्या अनुभवाने अंदाज बांधला कि गावकऱ्यांनी पारध उठवली असावी. लगेच सावध झालो कारण आम्ही रणांगणाच्या मध्यभागी होतो. जिथे बेसकॅम्प होता तो चिंचोळा पट्टा म्हणजे दोन डोंगरांना सांधणारी वाट होती. आता गावकरी आणि डुक्कर यांच्या लढाईमध्ये आपसूकच अडकलो होतो. तेव्हढ्यात दोन गावकरी धावत धावत पुढे आले आणि वाटेच्या बोळावर जाळ लाऊन हातात भाले परजत लपून बसले. डोंगराच्या दोन कडाना दरी असल्याने सावज बरोबर या वाटेवरच येणार हे त्यांना त्यांच्या पुर्वानुभवावरून माहित असणारच.

त्यांच्या त्या लगबगीने जाणवलं कि आपल्यालाही आता कुठेतरी सुरक्षित आश्रय शोधावा लागणार, लगेच बेसकॅम्पच्या शेजारी एक छोटेसे झाड होते, त्याच्यावरच दाटीवाटीने तिघांनी आश्रय घेतला आणि गडबडीमध्ये मी नेमकी डुक्कर ज्या दिशेने येण्याची अपेक्षा होती त्याच दिशेने धूम ठोकली आणि एका खडकावर जाऊन बसलो. बडवण्याचा आवाज जवळ यायला लागला तसतशी धाकधूक वाढायला लागली. मनीष टेण्टमध्येच मान बाहेर काढून कानात इअरफोन लावून गाणी ऐकत डुकराची पारध बघण्यास सज्ज झाला. आम्ही श्वास रोखून आजूबाजूच्या झाडोऱ्यामधून काही बाहेर येतंय का पाहत होतो, तेव्हढ्यात मनीषने त्या निरव शांततेचा भंग केला. झाडावर आश्रय घेतलेली मंडळी त्याच्यापासून फक्त १५-२० फुट लांब होती आणि तो त्यांना जोरजोरात ओरडून डुक्कर आलं का याची विचारणा करीत होता. कानात इअरफोन असल्याने त्याला आपण काय करतोय याची जाणीवच नव्हती. त्याच क्षणाला आजूबाजूच्या रानातून १५-२० गावकरी हातात भाले घेऊन बाहेर आले. डुक्कर नाही पण डूकाराच्याच जातकुळीतल्या आम्हाला त्या रणक्षेत्रात उपस्थित पाहून हताश झाले. त्यात मनीषने वेगळाच गोंधळ घातलेला. आम्ही डुकराच्या वाटेवरच असल्याने तो इथे येण्याची शक्यता नव्हतीच, त्याने मागच्या मागे कधीच धूम ठोकली होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत असली तरी त्यांनी आम्हाला बोलून दाखवले नाही कारण यातील काही गावकऱ्यांना आम्ही ओळखत होतो. गेल्या होळीमध्ये रेखी ला आलो असताना यांच्याच घरी पुरणपोळीच जेवणसुध्दा जेवलो होतो. त्याचे चांगलेच पांग फेडले होते.

५.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

एके संध्याकाळी सूर्य डोंगरापल्याड जाण्यास तयारी करीत होता. मी बेसकॅम्पवर चहा करण्याच्या तयारीला लागलेलो. तेव्हढ्यात एक ससाणा सुंसुं करीत माझ्या डोक्यावरून झाडोऱ्याच्या दिशेने जमिनीवर झेपावला. जमिनीवर उतरल्यावर त्याने पंख पसरलेले असल्याने मला काही दिसत नव्हते. काही कळण्याच्या आतच त्याने परत झाडोऱ्याच्या आत उड्डाणसुद्धा केले होते. मला फक्त चींची असा आवाज येत होता. पहिल्यांदाच थेट शिकार पाहिली होती. दोन मिनिटांसाठी स्तब्ध झालो, कारण याआधी शिकार फक्त टिव्हीवरच पाहिली होती.

हे कमी कि काय म्हणून पाचच मिनिटात परत डोक्यावरील आकाशात भोजगिरीच्या कड्यावर सुंसुं चा आवाज यायला लागला. मान वर करून बघतो तो पाकोळ्य़ाचा (Alpine Swift) कल्ला चालू होता. हे नेहमीच दृश्य होत. रोज संध्याकाळी त्या अशाच कड्यावरील कपारींमध्ये रात्रीच्या विश्रामाला जाण्यापूर्वी पिंगा घालायच्या. या पक्षाना 'पाकोळी' हे मुळमुळीत मराठी नाव अजिबात शोभत नाही, त्यांच इंग्रजी मधले Swift हे नाव त्यांच्या तेजतर्रार उड्डाणाला अगदी शोभते. पण आज काहीतरी वेगळेच होते. आज त्या खूपच खाली आल्या होत्या, तेव्हढ्यात माझी नजर आणखी वर गेली, पाहतो तर मोरघार (Boneli's Eagle), आम्ही रोजच पाहत असलेल्या मोरघारीच्या जोडप्यामधली हि एक होती. जेंव्हा हि मोरघार पंख जवळ करून सूर मारत खाली यायची तेंव्हा अगदी एखादे क्षेपणास्त्र सोडल्यासारखा आवाज यायचा. म्हणजे नक्कीच शिकार चालू असणार. ती मोरघार वरून सूर मारत खाली यायची आणि पाकोळ्य़ामध्ये अफरातफर माजायची. त्यांची तिच्यापासून सुटका करून घेण्यसाठी धडपड चालू होती. दोन्ही पक्ष हवाई कसरतीमध्ये एकदम तरबेज असल्यामुळे पाहण्यात मजा येत होती. मी या मोरघारीवर लक्ष केंद्रित करून होतो आणि एका क्षणाला माझ्या पाठीमागुनही जोराचा सुंसुं आवाज आला, मी मागे वाळून पाहणार तोच दुसऱ्या मोरघारीने दुसऱ्या दिशेने येऊन माझ्यापासून अवघ्या काही फुटावर हवेत एका पाकोळीला आपल्या पंजात पकडले होते. सगळ अगदीच अविश्वसनीय. रोजच या मोरघारीच्या जोडप्याला वर उंच आकाशात उडताना पाहत होतो पण त्या दोघी शिकारीच Live Coverage देतील आणि तेही अगदी समोर यावर विश्वासच बसत नव्हता. अशा गोष्टी टिपण्यासाठी डिस्कव्हरीवाल्याना महिनोन्महिने वाट पाहावी लागते ते मला अचानक गवसलं होत. थोड्यावेळाने आमचा पक्षीतज्ञ तुषार परबला हि घटना सांगितली तेंव्हा त्याने मोरघार जोडीने शिकार करीत असल्याची आणि शिकार वाटून घेत असल्याची पुष्टी केली.

६.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

७.
हा 'Swamp Eel' - भाताच्या खाचरांमध्ये असतो. सुकत आलेल्या पाण्याच्या डबक्यात मातीमध्ये स्वतःला लपवून घेतो. कातडी डोळ्यांवर आलेली असल्याने जवळपास आंधळाच असतो. त्वचेच्या साहाय्याने पाण्यातला Oxygen घेतो पण पूर्ण वाढ झालेला हवेतून श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर डोके काढतो.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

या मोहिमेदरम्यान आम्ही एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार झालो. आमचा पंचवीस वर्षीय पक्षीतज्ञ तुषार परब ला Warblers जातीमधील एक दुर्लभ पक्षी सापडला, जी महाराष्ट्रातली फक्त दुसरी नोंद होती. तळहातावर मावणारा हा पक्षी थेट इंडोनेशियातून इथे स्थलांतर करतो. यावर तो एक नोट लिहित असल्याने आणखी माहिती देऊ शकत नाही. एकतर या पक्षाच्या ३२ जाती, आम्हाला मात्र सगळ्या सारख्याच दिसतात. हा महामानव सगळ्यांना अक्षरशः वेगवेगळे ओळखू शकतो. पुढील २-३ वर्षात या पक्षांवर एक इंग्रजी पुस्तकही लिहिण्याच्या बेतात आहे.

आता काही चढाई चे फोटो. या चढाई साठी जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागला. नेहमीप्रमाणे काही सदस्यांना जास्त मेहनत करावी लागली. मी स्वतः, प्रदीप, तुषार आणि किरण काका संपूर्ण पंधरा दिवस या मोहिमेसाठी या डोंगरावरून त्या डोंगरावर उनाडक्या करीत होतो. कधी फोटो काढायच्या निमित्ताने तर कधी चढाईच्या निमित्ताने. इतर मंडळी येऊन जाऊन होती. एकूण सहा pitch मध्ये विभागलेल्या या ३००० फुट उंची असलेल्या कातळभिंतीचा साधारण १२०० फुट भाग कारवीने व्यापला आहे, त्यामुळे खरी चढाई जवळपास १८०० फुट आहे. या कातळभिंतीची शेवटच्या टप्प्यातील ४०० फुट चढाई खडतर ठरली. हा भाग किंचित overhang पद्धतीचा असल्याने संपूर्ण बोल्टिंग करावे लागले आणि वेळही खूप गेला. बेसकॅम्पसाठी निवड केली होती भोजगिरी आणि घोण्या डोंगर यामधील खिंड. माळशेज घाट संपल्यावर पारगाव फाट्यातून आत गेल्यावर तळेरान गाव लागत. तिथून समोरच भोजगिरी आणि घोण्या डोंगर यामधील खिंड दिसते. गावातील टेकडीवरून गेल्यास पाउण तासात या खिंडीत पोहोचता येते.

८. पहिला दिवस:-
खिंडीतून खाली उतरल्यावर लागणारी पहिलीच लेज. चढाई मार्गापर्यंत साधारण तासभर चाल.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

९. हि हवाई नजर
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

१०.
सुरुवात - प्रदिप म्हात्रे
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

११.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

मनीष पिंपळे आणि हितेश साठवणे
१२.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

१३.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

प्रदीप म्हात्रे आणि सतीश कुडतरकर

१४.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

१५.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

मोरेश्वर कदम आणि मनीष पिंपळे
संध्याकाळी खूपच उशीर झाला आणि वर जवळपास २००-३०० फुट घसाऱ्यावर कारवीच्या रानातून जाण्यास खूपच वेळ गेला असता. म्हणून अंधारातून धडपडण्यापेक्षा दोघांनीही तिथेच उघड्यावरच माळशेज घाटातील गाड्या पाहत रात्रीचा मुक्काम केला.
१६.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

१७.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

१८.संध्याकाळी खूपच उशीर झाला आणि वर जवळपास २००-३०० फुट घसाऱ्यावर कारवीच्या रानातून जाण्यास खूपच वेळ गेला असता. म्हणून अंधारातून धडपडण्यापेक्षा दोघांनीही तिथेच उघड्यावरच माळशेज घाटातील गाड्या पाहत रात्रीचा मुक्काम केला.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

हितेश साठवणे, मनीष पिंपळे आणि सन्नी वैती

१९.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२०.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

आता चढाई वरच्या लेजवर पोहोचल्याने मग लेज सुरक्षित करण्यासाठी अवघड ठिकाणी दोर बांधण्यात आले. आता नेहमीच येजा करावी लागणार असल्याने हे करावे लागले.
२१
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२२.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२३.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२४.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२५.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२६.चेन बोल्टिंग
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२७.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२८.किशोर मोरे
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

२९.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

३०. ५५ वर्षीय किरण अडफडकर
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

३१.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

३२.
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

३३.जिंकलो
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

उनाडक्या
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

पाहुण्यांबरोबर फोटोग्राफी
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

गुरुदेव किरण अडफडकर
From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटून्या,

सहज कुतूहल म्हणून विचारतोय. वर दाखवलेली डुक्कर मारायची जागा ही आहे का? : http://www.google.co.uk/maps/place/19°19'10.6"N+73°46'11.3"E/@19.319615,73.76982,705m

आणि उजवीकडचं गाव कोकटवाडी असेल ना?

आ.न.,
-गा.पै.

गामा
थोडे वर उत्तरेकडे जा. दोन डोंगरामधली खिंड दिसतेय पाहा. त्या खिंडीच मुख तीच जागा.
भोजगिरी पायथ्याला एक पठार आहे आणि त्या पठाराच्या खाली रस्त्याला तळेरान आणि कोकाटेवाडी गाव आहे. कोकाटेवाडी गावातून तास दिडतासच अंतर आहे.

आता माझी शंका: डुक्कर कशाला हवय तुम्हाला. Happy

सूनटून्या,

मला डुक्कर नकोय हो! Proud ते पकडायची जागा हवीये फक्त. ती मिळाली बरंका : https://www.google.co.uk/maps/place/19°19'47.7"N+73°46'18.9"E/@19.329929,73.77192,387m

तुम्ही तिवईच्या डोंगराला (सुळक्यांना नव्हे) अगदी खेटून होतात हे कळल्यावर जीव शांत झाला. तोवर समजून चाललो होतो की भोजगिरीच्या उत्तरदिशेच्या कड्यावरून चढाई करताय. पण मग कळंत नव्हतं की फोटोत तळेरान दिसलंच कसं? एकवेळ नीमगिरी उंच असल्याने भुईतून डोकावू शकतो. शिवाय भर म्हणून कोकाटेवाडी असं न दाखवता नुसतं गाव असाच फोटोत उल्लेख आहे. जाम गोंधळ उडाला. पण आता निस्तरला गेलाय. धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

सूनटून्या,सर्व प्रथम तुमच्या या अचाट कामगिरीला मानाचा मुजरा.....!
आमचा एक १८ डॉल्फिन्स ग्रुप आहे. आम्ही कोणी तुमच्या सारखे ट्रेकर नाही पण डोंगर,गड-किल्ले ,जंगलात असे आम्ही भटकत असतो. आम्ही बेसकॅम्पपर्यंत पर्यंत जाउ शकतो का ? भोजगिरी आणि घोण्या डोंगर यामधील खिंडी पर्यंत जाण्याची इच्छा आहे. किवा माथ्यापर्यंत पोहचन्यासाठी कोणता इतर मार्ग आहे का ? मार्गदर्शन करा.

_/\_

जय@

भोजगीरी आणि घोण्या डोंगर यांच्या मधल्या खिंडीत जाण्यासाठी.

१. माळशेज घाटात भोजगीरीच्या पायथ्याला यावे लागते. शासनाने घाटात ठिकठिकाणी sightseeing साठी सिमेंटचे कठडे बांधलेले आहेत. या पायथ्यालाही वळणावर असाच एक कठडा आहे. इथे एसटी थांबत नाही, त्यामुळे घाटाच्या पायथ्याला सावर्णे गावात उतरून ३-४ किलोमीटर वर चालत जायचे. अन्यथा घाटातील मंदिराजवळ उतरावे आणि परत ३-४ किलोमीटर मागे चालत यावे (चढण्यापेक्षा हे उतरणे सोपे आहे).

स्वतःचे वाहन असल्यास याठिकाणी पार्क करावे. इथून संपूर्ण भोजगिरीची भिंत आपल्यासामोर असते. तिची डावी उतरती बाजू हीच ती खिंड. या भिंतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूने दोन ओढे धडपडत खाली येऊन या रस्त्यावर कठड्यासमोरच उतरतात. अगदी कठड्यासमोरच उजवीकडचा धबधबा रस्त्यावर उडी मारतो. आपण या धबधब्याच्या थोडेसे डावीकडे चालत जायचे. पुढेच वळण आहे, त्यादिशेने निघायचे आणि शंभरेक पावले चालल्यावर समोर रस्ता पार करून पलीकडे जंगलात घुसायचे.

खिंडीच्या रोखाने चालत गेल्यास एक वाट वर चढत असलेली दिसेल. खरतर हा भिंतीच्या डावीकडचा ओढाच आहे, त्यामुळे वाट कधी ओढ्यातून तर कधी त्याच्या शेजारून जाते. वाट अंगावर येणारी आहे आणि काही ठिकाणी कसरत करावी लागेल पण नेहमीच्या ट्रेकर्सना त्रास नाही होणार. दीडदोन तासात खिंडीच्या वर पोहोचाल. वाटेत पाणी नाही, खिंडीच्या वर गेल्याशिवाय पाणी नसल्याने घरूनच पाण्याची पुरेशी व्यवस्था करून निघावे. उन्हाळ्याच्या आधी एखादा झरा सापडला तर कदाचित. सूचना: पावसाळ्यात जाऊ नये.

खिंडीच्या वर आल्यावर डाव्या हाताचा घोण्या डोंगर, त्याच्या शेजारी तिवईचे सुळके, त्यांच्या शेजारी उधळ्या डोंगर (याच्या माथ्यावर एक देऊळ दिसते), त्याच्या शेजारी सिंदोळा किल्ला. उजवीकडे शेजारी भोजगीरी आणि समोरच लांबवर पसरलेला मशेडीचा डोंगर, याच्या उजव्या बाजूस सुळका आहे आणि त्याच्या शेजारी निमगिरी किल्ला, निमगिरीच्या शेजारी दौंड्य़ा.

२. मार्ग दुसरा - खूपच सोपा
माळशेज घाट संपल्यावर पिंपळजोगा धरण लागते आणि नंतर एक छोटीशी खिंड लागते, हि खिंड पार केल्यावर लगेच मढ-पारगाव फाटा लागतो. एसटीने आल्यास इथे उतरावे. इथून टमटम करावी आणि ८-९ किलोमीटरवर असलेल्या तळेरान गावातील काळूबाई मंदिराच्या पायथ्याला उतरावे. स्वतःचे वाहन असल्यास इथेच पार्क करावे. रस्त्याच्या अलीकडे शाळा आहे. एका छोट्याश्या टेकडीवर हे मंदिर आहे. ओळखीसाठी रस्त्यालगत एक कमान आहे. या टेकडीवर आल्यास समोरच भोजगीरी आणि घोण्या डोंगर यामधील खिंड दिसते आणि आपल्या पाठीमागे असतो निमगिरी किल्ला. या टेकडीवरून नाकासमोर या खिंडीच्या दिशेने चालत राहायचे, वाट समांतर रेषेतच आहे आणि साधारण पाऊण तासात खिंडीत पोहोचतो. परत जाण्यासाठी टमटमची तजवीज आधीच करून ठेवायची. कोपऱ्यातले गाव असल्याने रहदारी जास्त नाही.

कुठल्याही मार्गाने वर आल्यानंतर तुम्ही भोजगिरीच्या माथ्यावर जाऊ शकता. खिंडीत आल्यावर भोजगिरीच्या पायथ्याकडून एक पाउलवाट जाताना दिसेल (फोटो क्र. ५ पहा, हिरव्या शेताच्या शेजारून वाट जाते, फोटोमध्ये 'गाव' अस मार्क केले आहे, त्या दिशेने जायचे). हि पाउलवाट कधी शेतातून तर कधी रानातून भोजगीरीच्या पायथ्याला असलेल्या पठारावरील ८-१० घरांच्या पाचकेवाडी या छोट्याश्या गावात जाते. भोजगीरीच्या माथ्यावर जाणारी वाटेची माहिती या गावातूनच घ्यायची. शेती असल्याने वाट थोडी वेडीवाकडी आहे. दीड-दोन तासात भोजगिरीच्या माथ्यावर जाता येते. वर पाहण्यासारखे काही नाही.

वाटेत किंवा माथ्यावर पाणी नाही, तेंव्हा गावातूनच पाणी भरून घ्यावे. पण चारही दिशेस दिसणारे उत्तुंग डोंगर पाहणे एक दुर्मिळ अनुभव. आभाळ मोकळे असल्यास AMK, आजोबा, कलाड, कोकणकडा, हरीश्चंद्रगड तर विरुद्ध दिशेस समोरच निमगिरी, हडसर, चावंड पलीकडे जीवधन वगैरे दिसतात.

जर तुम्हाला खिंडीतच मुक्काम करायचा असल्यास तंबू लावण्यास उत्तम जागा. दिवाळीपर्यंत पाणी शेजारीच असते. अन्यथा घोण्या डोंगराच्या शेजारून जी वाट जाते त्या वाटेवरच साधारण पाच मिनिटांच्या अंतरावर एक घर आणि विहीर आहे.

From Malshej Bhojgiri Oct-Nov 2014

जय
दुसऱ्या वाटेने कधीही जाऊ शकता, भोजगिरी आणि घोण्या मधील खिंडीत जाण्यासाठी तळेरान गावातील छोट्याश्या टेकडीवरून जावे लागते. सरळ वाटेने पाउण तास फक्त. भोजगिरीच्या माथ्यावर जायचे असल्यास मात्र वर उल्लेखिल्याप्रमाणे नेहमीसारखा ट्रेक करावा.

तुम्हाला जर खिंडीत जायचे नसेल आणि थेट भोजगिरीच्या माथ्यावर जायचे असल्यास एक कच्चा रस्ता तळेरान गावातून पाचकेवाडी वस्तीमध्ये जातो. म्हणजे गोल फिरस्ती न करता थेट भोजगिरीच्या पायथ्याशी जाता येईल.

gooooooooooooooooooooood,,,,,,,,,,, Kharatarnak... BOle to Lay Bhari...
Tussi Great ho Yaar,,, all of u jss great.. ani "Kiran SIR" tar Showstopper for me

Pages