"तो मामा आहे तुझा! बबन काय म्हणतोस?"
हे मला सुनावताना आईचा चेहरा जरी कठोर झाला असला तरी बबनचा छप्पन टिकली चेहरा जिवणी फाकून हसत होता. बबन त्याच्या नेहमीच्या फाटलेल्या आवाजात म्हणाला........
"बबनच म्हण रे. मामा म्हंटलं की म्हातार्यासारखं वाटतं"
मी आईकडे पाहिलं. आईने मान उडवली. त्याचा अर्थ 'करा काय करायचे ते' असा असतो हे मला सवयीने माहीत झालेले होते. आत्ता आई तिच्या माहेरपणात आकंठ बुडल्यामुळे, बबन हा तिचा प्रत्यक्षात कोणीच नसल्यामुळे, तो तिच्यापेक्षा खूप लहान आणि माझ्यापेक्षा थोडासाच मोठा असल्यामुळे आणि तो वर्षातून कधीकाळी दोन चार दिवस भेटत असल्यामुळे मी बबनला काय म्हणतो ही बाब तिच्यासाठी प्राधान्याची नव्हती.
मी बबनचा हात धरून बाहेर पडलो.
बबनचं कुळ आणि बबनचं मूळ शोधू नये! आईची मावशी विधवा होण्याआधी तिला एक मुलगा झाला होता. विधवा झाल्यानंतर काही वर्षांनी एका भलत्याच माणसापासून तिला आणखी एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तो मुलगा म्हणजे बबन! आता आधी आईची मावशी म्हंटल्यावर तिची मुले ही माझी मावस मामा किंवा मावस मावशी होणार! त्यात हा बबन भलताच कोणी! बरं त्याचे वयही विचित्रच. आई जेव्हा एक्केचाळीस वर्षांची होती तेव्हा मी दहा वर्षांचा होतो आणि बबन एकवीस वर्षांचा! मी आईला तिच्या लग्नानंतर लगेच झालो असतो तर बबनपेक्षा वर्षभराने मोठाच असतो. हा बबन धड ना आधीच्या पिढीतला धड ना आमच्या पिढीतला! त्याला म्हणे देवी झाल्या होत्या. म्हणजे काय ते आम्हा मुलांना माहीत नव्हते. आम्ही आमच्या दंडावर जाळपोळ करून घेतल्याच्या खुणा दिसायच्या आम्हालाही! बबनला लस टोचली होती की नव्हती आणि देवी होऊ नयेत म्हणून नक्की काय करतात हे काहीच आम्हाला नव्हते. बबनचा चेहरा म्हणजे पावसाची वाट पाहणारी आणि ढेकळांनी भरलेली सावळी माती! त्यावर खुरटे गवत उगवावे तशी दाढी मिश्यांची खुंटे! एखादे बेरकी मांजर बसलेले असावे तसे हिरवेगार डोळे! देवीच्या खुणा सर्वत्र! अंगात कॉटनचा ढगळ शर्ट आणि सामान्य माणसाला कोणत्याही रंगांच्या मिश्रणाने अॅचिव्ह करता येणार नाही अश्या रंगाच्या काँबिनेशनची पँट!
बबनबद्दल मला असलेल्या अनेक आकर्षणांपैकी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे हे, की तो अक्षरशः अचानक उगवायचा. एकेक वर्ष गायब असणारा हा इसम एकदम घरच्यासारखा येऊन आठ दिवस राहून पुन्हा कुठे जातो हे कळायचेच नाही. तो गेला की गेला म्हणायचे आणि आला की आला! बरं आला तर स्वतःच्या आईची भाड्याची खोली होती तिथे न उतरता माझ्या आजीकडे उतरणार! त्या घरात कोणत्याही क्षणी किमान पंधरा व कमाल सत्तर माणसे असायची आणि हा विनोद नव्हे. सत्तर माणसे आम्ही भावंडानी मोजलेली आहेत एका लग्नाच्या दरम्यान! तीन दिवस सत्तर माणसे होती त्या घरात! अश्या घरात बबन आला काय आणि गेला काय, कोणालाही फरक पडायचा नाही.
जणू सकाळी ऑफीसला गेलो होतो आणि संध्याकाळी येताना भाजी आणि मुलांसाठी गोळ्या घेऊन आलो अश्या आविर्भावात बबन उंबर्यात येऊन उभा राहायचा. त्याला पाहून आम्ही भावंडेच नव्हे तर आमच्या आया, मावश्या, मामे, माम्या सगळेच हसत बसायचे. आधीच घरात इतके तुफान हास्यविनोद चालत. त्यात ध्यानीमनी नसताना दारातून येणारा प्रकाश का अडला बघावे तर दारात बबन! लोकं नुसते टाळ्या देऊन हसत सुटायचे. न्हाणीघरापर्यंत बातमी फिरायची.
"बबन आलाय"
सांगणाराही हसायचा आणि ऐकणाराही! बबन आला ह्याचा अर्थ इतर सर्व विषय बंद! घरात एकच विषय! बबन!
ह्याची अनेक कारणे होती.
बबन म्हणजे अद्भुत इसम होता. एके दिवशी असाच प्रकट झाला आणि सगळ्यांच्या मधोमध बसत म्हणाला....
"हाप मर्डर करून पळून आलोय राजस्थानातून"
छातीच दडपायची असली वाक्ये ऐकून!
कोणीतरी विचारायचे.
"हाफ मर्डर म्हणजे?"
आम्हाला वाटायचे की ह्याने माणूस अर्धवट मारून तसाच ठेवलेला असेल. बबन म्हणायचा....
"रागाच्या भरात पत्थर घातला एकाच्या डोक्यात! अर्ध डोकं फाटलं! तस्सा आलो"
"चालता हो"
आजोबा ओरडायचे.
"काका, मी कधी मच्छर तरी मारलाय का? घ्या तंबाखू"
सुस्कारे सोडत सगळेजण बबनवर भडकायचे. आजोबा येड्यात निघाल्यामुळे आधी वैतागायचे आणि दोन्ही हातांवर तंबाखू आणि चुना मळायचे. बबन आला की पोरे खुष! बबनचा मेहुणा अलका टॉकीजवर दोन्ही मजल्यावरचे कॅन्टीन चालवायचा. बबन आला की वरचा मजला बबन बघायचा. मग आम्हाला कमीतकमी दोन तरी पिक्चर बघता यायचे. पण दोन्ही इंग्लिश! कळायचे काहीच नाही. एखादे भयानक दृश्य,
दोन चार धसमुसळी चुंबने आणि क्लायमॅक्स! पिक्चर सुरू व्हायच्या आधी इन्टरव्हल करणार्या इंग्लिश साहेबाचा मेंदू पायाच्या टाचेत असावा असे आम्हाला वाटायचे. ह्या इन्टरव्हलला बबन आम्हाला गोळ्या द्यायचा.
बबन घरी उतरला की बबनचा एकपात्री अंक सुरू व्हायचा. नुकत्याच गाजलेल्या पिक्चरची स्टोरी सांगायला तो जवळजवळ प्रत्यक्ष पिक्चरइतकाच वेळ लावायचा. हिरोचे आणि व्हीलनचे डायलॉग त्याच शैलीत ऐकवायचा. अधल्यामधल्या हिरोच्या धक्कादायक एन्ट्रीच्यावेळेसचे म्युझिक घशातून विचित्र आवाज काढून ऐकवायचा. आम्ही आजोळच्या घरातल्या मागच्या जिन्यावर जितक्या पिक्चरच्या स्टोर्या ऐकलेल्या आहेत तितक्या एखाद्या निर्मात्याने कारकीर्दीच्या भर सोनेरी टप्प्यावरही ऐकल्या नसतील. 'माध्यान्ह झालीय, जरा पडा' असे म्हणत आजी आडवी झाली की बबन गपचूप सगळ्यांना जिन्यावर बसवायचा आणि सुरू करायचा.
"स्टार्टिंगला बच्चन एकदम बारकाय! काय? ह्या मोन्याएवढा असेल. डोळे सेम दाखवलेत हां पण? हेर्स्टायल पण सेम! तस्सेच्या तस्से केस ठेवलेत मोठा होईपर्यंत! त्या बारक्या बच्चनकडे बघूनच आपल्याला कळतं की हा पुढे बच्चन होणार! आधी नुसते डोळे! मग अंधारातून एक घोडा येतो घोडा! हा असा! नुसता घोडा! ब्बास! त्या घोड्यावर व्हीलन असतो. अंधारात कळत नाही. पण अंधूक दिसतं बच्चनला. बच्चन लागलीच खुर्चीमागे लपतो. व्हीलन बच्चनच्या आईवडिलांना डायरेक गोळ्याच! बच्चन शांत! लागली टायटलच! ढँटॅढँ"
आम्ही इंच इंच पुढे सराकयचो. पापणीही न लवता डोळे बबनच्या चेहर्यावर रोखलेले असायचे. तिकीट न काढता जंजीर पाहणारे फक्त आम्हीच असू त्याकाळी जगात! बबनने जर एखाद्या निर्मात्याला नव्या पिक्चरची स्टोरी ऐकवली असती तर आज खूप वेगळे स्वरूप पाहायला मिळाले असते हिंदी चित्रपटांचे!
बबन सकाळी नऊला अलकावर जायचा. अलका म्हणजे अलका टॉकीज! तिथे गेला की पोस्टर्स पाहायचा. मॉर्निंगला एकदा 'ह्योच नवरा पाहिजे' लागला होता तिथे! बबन तो पिक्चर पाहायला मोठ्यांना घेऊन गेला होता. त्याचे खरे कारण असे होते की मराठी कळणार्या आम्हाला दादा कोंडकेंचे नको ते डायलॉग समजले असते. इंग्लिशमधलं त्या अख्ख्या अलकामधल्या कोणालाही काहीही कळायचं नाही. त्यामुळे नुसते नेत्रसुखासाठी आसूसलेले काय जात असतील तितकेच! त्या वयात तर आम्हाला तसले काही सीन पडद्यावर आले की लाजच वाटायला लागायची. आम्हाला मात्र तो जंगल बूक बघायला घेऊन गेला. त्या चित्रपटाचा निर्माता जर आज कुठे मला भेटला तर त्याला मी तुडवून काढीन. इतका भिकार कंटाळवाणा पिक्चर त्या काळातील लहान मुलांना दाखवण्याच्या अपराधाबद्दल! तसेच त्या 'बेन हर'चे! तो बेन हर पिक्चर तेव्हा ओ का ठो कळला नव्हता. एक शेवटचे रेसचे की कसलेसे दृश्य सोडले तर आम्ही अक्षरशः फोडणीला घातलेल्या मोहरीच्या दाण्यांसारखे उडत होतो खुर्चीत! पण बबनमुळेच आम्हाला फिस्ट ऑफ फ्युरी, रिटर्न ऑफ द ड्रॅगॉन, असे ब्रूस ली चे पिक्चर्स पाहायला मिळाले. शेवटी तर एक दोन बॉन्डपटही दाखवले त्याने आम्हाला! बहुधा त्याला वाटले असावे की आता ही पोरेही मोठी झाली.
एकदा एका तुफान चाललेल्या पिक्चरची दोन तिकिटे बबनने मला आणून दिली. मी आणि माझा मामेभाऊ तो पिक्चर बघायला अलकावर पोचलो तेव्हा बबनचे एका भल्या मोठ्या पहिलवानाशी कशावरून तरी भांडण चाललेले होते. बबनसारखा ठेंगणा ठुसका मनुष्य त्या पहिलवानाला झापत आहे हे पाहूनच आम्हाला धक्का बसला. त्यात शेवटी बबनने एक डेंजर वाक्य टाकले.
"हात पाय मोडून बाँबेत पळून जाईन, सहा महिने पत्ता नाही लागायचा कोणाला"
पहिलवान मुकाट निघून गेला होता.
हा बबन होता कोण हेच आम्हाला समजेना! आमच्याशी बोलताना मात्र एकदम नेहमीच्या आवाजात बोलला. आम्ही घरी येऊन हे मोठ्या माणसांना सांगितले तर कोणीच काहीच बोलले नाही. रात्री जेवणे झाल्यावर सगळे नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसले होते तेव्हा दुपारचा विषय कोणीतरी काढला. मग सगळेच म्हणू लागले की बबन डेंजरस आहे. त्याला आपण त्याच्या खोलीवर राहायला सांगत जाऊ. अचानक बबन अलकावरून परतला आणि सगळे जागेच पाहून माझ्या एका बर्याच मोठ्या असलेल्या मावस भावाला म्हणाला......
"अवि, त्या शालीमारच्या वागळेंना भेट उद्या! बायो डेटा घेऊन जा. आत्ता काहीच काम नाहीये तोवर काहीतरी तरी सुरू होईल"
अचानक सगळ्यांचे बबनबद्दल मत पालटले. हास्यविनोद सुरू झाले. मध्यरात्री पुन्हा दार वाजले. मोठ्या मामाने दार उघडले. दोघांनी बाहेरून बबनला बाहेर पाठवायला सांगितले. आम्ही साधी माणसे! मामाने आपली बबनला हाक मारली. बबनने आतूनच मामाला खाणाखुणा सुरू केल्या आणि कुजबुजत म्हणाला....
"हाक मारू नको, हाक मारू नको, नाहीये म्हणून सांग"
आजीने सर्वांदेखत बबनला विचारले की ती दोन माणसे कोण आहेत?
बबनने उत्तर दिले आणि सावकाश चपला घालून त्या दोघांबरोबर निघून गेला. बबनचे उत्तर ऐकून सगळे हादरलेले होते. बबनने उत्तर दिले होते......
"विश्रामबाग पोलिस चौकीचे हवालदार आहेत! अवि तू उद्या वागळेंना नक्की भेट! माझी अन् तुझी भेट आता कधी होईल माहीत नाही"
बबन गेला. त्याला का नेले, त्याने काय केले होते, किती दिवसांसाठी गेला, काहीही माहीत नाही.
दुसर्या दिवशी अविला नोकरी मात्र मिळाली. आठशे रुपये महिना!
बबनची आई आमच्या घरी येऊन ढसाढसा रडली. मग सगळेच रडले.
सहा महिने झाली असावेत. भर दुपारी एक दिवस बबन दारावर आला. खंगलेला होता. सरळ आत येऊन बसला. तो बबन आहे हे कळायलाच आम्हाला वेळ लागला. मोठ्या मामाने शांतपणे त्याला निक्षून सांगितले. ह्या घराच्या दारात आजवर पोलिस आलेले नव्हते, तुझ्यामुळे आले. चालता हो. बबन उठला आणि निघून गेला. मागोमाग मामी पाण्याचा तांब्या घेऊन धावली. बबनने वळून तिच्याकडे पाहिले. परत आला. पाणी प्यायला आणि म्हणाला........
"वहिनी, मागचे घाणेकर आहेत ना? ते आपल्या पत्र्याच्या मागे येऊन काहीबाही फुंकून जात! असली करण्या करणारी माणसे मला आवडत नाहीत म्हणून त्याला त्याच व्हरांड्यात धरून धुतला होता. म्हणून आतमध्ये होतो. आता नाही यायचो, तेवढं भाऊला सांगा"
घाणेकरांची क्षुद्र मनोवृत्ती आम्हा सर्वांना ज्ञात होती. पण एक तर त्यांच्या त्या फालतू कृत्यांबद्दल आम्हाला काही वाटायचेही नाही आणि त्यात पडून त्यांच्याशी भांडायची इच्छाही नसायची. बबनने मात्र त्या घाण्याला धुतला होता आणि ते आज समजले.
पुन्हा बबन गायब झाला.
बबन ह्या इसमाचे अस्तित्त्व असे नकळतपणे घरात भरून राहू लागले. म्हणावे तर मवाली, बेकार, कुठल्याही कामाचा नसलेला! म्हणावे तर ऐनवेळी कसा उपयोगी पडेल सांगता येणार नाही. म्हणावे तर अतिशय बेकार वर्तुळात आयुष्य घालवणारा! म्हणावे तर उत्तम संस्कार असल्यासारखा वागणारा! अविची अजूनही तीच नोकरी चालू होती आणि आता त्याला मुलीही पाहात होते. बबन मात्र विस्मरणात गेलेला होता.
मधे काही वर्षे अशीच गेली असावीत. आता आमच्यासाठी बबन कोणीच नव्हता. बबन कसा स्टोरी सांगायचा हा आता आमच्या विनोदाचा विषय झाला होता. अवि आता शालीमारमध्येच स्टोअर मॅनेजर झाला होता. त्याला एक मुलगीही झाली होती. मीच आता दहावीला गेलेलो असेन! आता आम्ही तसे मोठे झालेलो असल्याने बबनचे कूळ आणि मूळ ह्यावरून जे विनोद आमच्या अपरोक्ष होत असत ते आमच्यासमोर होऊ लागले. बबन आपला कोणीच नाही, नव्हता, हे समजू लागले. कोणी बबन ह्या नावाचा इतर माणूस कुठे भेटला तर आमचा बबन क्षणभर अस्पष्टपणे आठवायचा इतकेच!
काळाचा महिमा! एक काळ असा होता की बबनचे येणे म्हणजे मुलांसाठी सुगी! मोठ्यांसाठी मनोरंजन! बबन मोठ्यांनाही एकेक असले किस्से सांगायचा की वेड लागल्यासारखे मोठे बसून राहायचे. मग त्या कहाण्यांंमध्ये कुठे मध्यप्रदेशातील एखादा बुवा कश्या जादू करतो येथपासून ते काशीला भाविकांना कसे लुटतात येथपर्यंत काहीही असायचे. रेल्वेत कश्या चोर्या होतात येथपासून ते नक्षलवादी खरे कसे चांगले असतात येथपर्यंत काहीही!
बबन ही अशी व्यक्ती होती की जिच्या असण्यामुळे फायदा व्हायचा पण नसण्यामुळे तोटा व्हायचा नाही.
एखाद्यासाठी असा परिचय किती घातक असेल ह्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आपल्याला एखाद्या सिच्युएशनमध्ये आपले नसणेही लोकांना खूप खूप जाणवावे हे किती प्रकर्षाने वाटते.
'आत्ता बबन पाहिजे होता इथे' असे आजवर कोणालाही, एकदाही वाटलेले नव्हते. त्याच्या आईला सोडून!
बबन हा 'सोज्वळपणे आणि असेल त्यात सुख मानून राहणार्या' त्या माणसांच्या समुहावर खुष होऊन देवाने दिलेला इन्टरिम बोनस होता. जो मिळेलच असे नसते, मिळायलाच हवा असे म्हणता येत नाही, मिळाला नाही तर दु:ख होत नाही आणि मिळाला तर कोणी नाकारत नाही.
विचार केला की असे वाटायचे की लहानमोठ्या सगळ्यांचे मन रिझवू शकणार्या, अविला नोकरी लावून देऊ शकणार्या आणि अलकावर व्यवस्थित एक मजला सांभाळू शकणार्या बबनला आपल्या आजोळी चार-आठ दिवसांपुरतेच का यावेसे वाटत असेल? नेहमीसाठी का येत नसेल तो? मग मन उत्तर द्यायचे. त्याच्या रुक्ष एकाकी आयुष्यात घरपणाची जी काही किरकोळ गरज उरलेली असते तेवढीच भागवण्यासाठी तो इथे येत असेल. अधिक ओलावा निर्माण झाला तर कदाचित त्याचे बबनपण त्यात भिजून कुजेल आणि त्यालाच ते फेकून देताना कष्ट होतील. स्वतःची स्वतःला सगळ्यात जास्त आवडत असलेली ओळख कायमस्वरुपी टिकावी म्हणून तो येथील वास्तव्य आठ दिवसांपुरतेच मर्यादीत ठेवत असेल. किंवा कदाचित ह्या अश्या वातावरणात आपण अजूनही प्रवेश करू शकतो का, स्वीकारार्ह असू शकतो का हे जाणून घेऊन त्याची कोणतीतरी आंतरीक गरज भासत असेल. कदाचित त्याला असे वाटत असेल की त्याच्यात अजूनही पांढरपेशेपणा, सोज्वळपणा आहे. कदाचित इथल्या आठ दिवसांचे वास्तव्य तो त्याच्या स्मरणात जपून वर्षभर प्रांतोप्रांती हिंडताना अनोळख्यांना कौतुकाने ऐकवत असेल. किंवा कदाचित, सगळ्या भारतात त्याची अशीच घरे असतील. जबलपूरला एक, रांचीला एक, अंबाल्याला एक, बेळगावात एक! इकडच्यांना तिकडचे आणि तिकडच्यांना इकडचे तो कधीच कळू देत नसेल. आणि जर तसे असेल तर आपल्यापेक्षा तो कितीतरी अधिक पांढरपेशा म्हणावा लागेल कारण एकटेच राहून त्याने इतक्या पांढरपेश्या घरांंमध्ये स्वतःसाठीची एक वेगळी जागा बनवलेली असेल. आणि शेवटचे उत्तर म्हणजे, कदाचित तो काहीबाही किरकोळ गुन्हे करून इथे पळून येत असेल.
असेल तो असो!
बबन ह्या घराचा पाया नव्हता, भिंत नव्हता, छप्पर नव्हता, खिडकी / कोनाडा नव्हता, वीट / माती नव्हता, ह्या घरातील माणूस नव्हता आणि तरीही बिनदिक्कत ह्या घरात केव्हाही, कितीही राहू शकत होता. माणसाने खरे तर आयुष्यात असेच असावे. येथील आपण कोणीच नसावे पण तरीही येथे हवेहवेसे असावे. बबन होणे हे कदाचित माणसासाठी ईश्वराने नेमून दिलेले सर्वात मोठे कर्तव्य असेलही, ज्याचा बहुतेकांना विसर पडलेला असणेही शक्य आहे.
अलका टॉकीजवर एकाच दिवशी दोन प्रचंड मोठ्या घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे टायटॅनिक अलकाला लागला. आणि दुसरी घटना म्हणजे त्याच दिवशी बबन परतला.
बबन!
हा बबन इतक्या काळाने आलेला होता की मोठ्या मामाचा रागही केव्हाच गेलेला होता. इतक्या काळाने आलेला होता की आम्हा मुलांना आता त्याच्या येण्यात काडीचा रस राहिलेला नव्हता. पण लहानपणची आपुलकी अजून तशीच होती. आम्ही सगळे बबनभोवती बसलो. बबनने कसलातरी अंगारा काढून आजीकडे दिला. आजीने तो देव्हार्यापाशी ठेवला. मग बबनने आणलेले दिड डझन ब्लाऊज पीसेस सगळ्या बायकांनी बघितले आणि वाटून घेतले. ते त्याने म्हणे महेश्वरहून आणलेले होते. तिकडच्या खर्या तर साड्या प्रसिद्ध म्हणे, ह्याने ब्लाऊजपीसेस का आणले हे कोणी विचारले नाही. मग तो जेवत असताना सगळेजण बघत बसले. सात पोळ्या खाल्ल्या त्याने! उठला आणि अलकावर जाऊन येतो म्हणाला. अर्थातच टायटॅनिकच्या तिकिटांचा आग्रह त्याला करण्यात आला. कोणीतरी दहा तिकिटांचे पैसे त्याच्याकडे दिले. रात्री कधीतरी बबन घरी आला तेव्हा परवाच्या शोची दहा तिकिटे त्याच्याकडे होती. आम्ही सगळ्यांनी टायटॅनिक पाहिला. काम झाले. आता बबनचा आम्हाला काय उपयोग? त्याचीही काहीच अपेक्षा नव्हती. पण बबन आठ दिवसांनी परत गेला नाही. त्याच्या बेरकी घार्या डोळ्यांना सुगी दिसत होती. टायटॅनिकमुळे अलका टॉकीजला आलेली सुगी!
वरच्या मजल्यावरचे कॅन्टीन आधी जे महिन्याला कमवे ते आता तीन दिवसांत कमवू लागले. त्या अतीप्रचंड वाढीव नफ्यात एक बबन सहन करणे त्याच्या मेहुण्यांना सहज शक्य होते. बबनने अक्षरशः चांदी करायला सुरुवात केली. बबनच्या 'रहनसहन'मध्ये ठळक फरक जाणवू लागले. अंगाला उग्र अत्तर लागू लागले. एक दोन नवीन शर्टही झळकले. मागच्या खिशात पाकीट वगैरे! घराच्या दाराबाहेर उभा राहून बबन बिनदिक्कत चारमिनार किंवा पनामा ओढू लागला. मोठ्या मामाकडे त्याने काही पैसे देऊ केले. म्हणाला महिना दोन महिने राहावे लागेल. मामाने नाही नाही म्हणत निव्वळ बबनच्या मनाच्या समाधानासाठी ते स्वीकारले. मामाला एक बबन घरात राहिल्यामुळे काहीच फरक पडणार नव्हता. पण बबन बदलू लागला. शिट्टी वगैरे वाजवू लागला. मधेच कुठूनतरी समजले की तो टायटॅनिकची तिकिटे ब्लॅकमध्येही विकत आहे. पण हे बबनला विचारण्याचे धाडस फक्त आजीमधे होते. तिने ते केले नाही, तिला गरज वाटली नाही. एका धाकट्या मामाने एकदा बबनला सिटी पोस्टापाशी नको त्या गल्लीकडे वळताना पाहिले आणि घरी येऊन सांगितले. त्या रात्री एक वाजेपर्यंत दारात उभे राहून आजीने एक वाजता आलेल्या बबनला आल्यापावली हाकलून दिले. तो त्याच्या भाड्याच्या खोलीवर, म्हणजे आईच्या खोलीवर गेला. नंतर कोणा मित्राकडे राहू लागला म्हणे! एक दिवस बबन पुन्हा घरी आला. त्याचा अवतार एकदम कडक होता. एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या भेदक नजरेने सर्वत्र पाहात होता. आजीने त्याच्यासमोर उभे राहून त्याला विचारले, काय हवे आहे? त्यावर तो म्हणाला, जयाताईला भेटायचंय! जयाताई ही माझी एक मावशी! आईपेक्षा दोन वर्षांनी मोठी! ती आतून बाहेर आली. तिला बबन म्हणाला........
"जयाताई, आता चांगला मार्गी लागलो आहे. हाताशी पैसा आहे. नोकरी आहे. इतकी वर्षे बोलत नव्हतो, आता बोलू का?"
"........काय?"
सगळे भोवती जमलेले होते. आम्ही भावंडे, सगळे मामा, मावश्या!
"तुझी, तुझी मोठी मुलगी वंदना मला दे"
वंदनाताई तिथेच होती. ते वाक्य ऐकूनच ती गार पडली. ती लग्नाची होती. तिला बघतही होते. पण हे असले कुणी कल्पनेतही पाहिलेले नव्हते. ते वाक्य ऐकून ती मागच्या पावली जिन्यावरून धावत वरच्या मजल्यावर गेली. सगळे एकमेकांकडे पाहात राहिले. आजी पुढे झाली. त्यावेळी आजी शहात्तर वर्षांची असावी! तिने एक खणखणीत आवाज काढला बबनच्या गालावर! बबनला उत्तर मिळाले.
तो मान खाली घालून उठला आणि निघाला. दारात क्षणभर थांबला. वळला. उंबर्यातच त्याने संपूर्ण घराला साष्टांग नमस्कार केला. कोणा एकाला नव्हे, संपूर्ण घराला. उठला. म्हणाला........
"इथे राहायचो तितकेच चार आठ दिवस वर्षभर पुरायचे. आपल्यालाही असे चांगले राहता येईल, कायम ह्या लोकांंमध्ये राहता येईल अश्या इच्छेने मी तो प्रश्न विचारला. पण मी वाया गेलेला मुलगा! माझ्याशी कोण लग्न करणार? एकच सांगतो. समोरच्या वाड्यातला पळशीकरांचा निन्या वंदनाला फसवत आहे. गावात बभ्रा होऊन अब्रू जाऊ नये म्हणून तसे म्हणालो. नाहीतर कोणीही गरीब घरची मुलगी करेनच माझ्यासाठी"
जे ऐकले ते ऐकूनही बबनबद्दल अजिबात कणव वाटली नाही. त्याने फक्त तितकेच सांगितले असते तर वंदनाला मोठी झाप पडली असतीच, जी तशीही पडलीच. पण म्हणून काही वंदनाचे लग्न इतरत्र झालेच नसते असे नव्हे. बबनने काहीतरी भलताच ग्रह करून घेतलेला दिसत होता.
टायटॅनिकच्या उत्पन्नामुळे वाया गेलेला बबन स्वतःला इतका दिडशहाणा समजू लागला होता की थेट आमच्या घरातील मुलीशी नाते जोडायला निघाला होता. त्यावर घरात घमासान चर्चा झाली. वंदना ढसाढसा रडत सगळे सांगत होती की निन्याबरोबर फिरत होते पण आता तो लक्ष देत नाही वगैरे!
घाईघाईने एक लिमये म्हणून स्थळ कळले होते तिथे वंदनाताईची पत्रिका द्यायला मावशी गेली. तिला लिमयेंनी दारात सुनावले. सदाशिव पेठेतले ना तुम्ही? आम्ही तर ऐकलंय त्या पळशीकराच्या मुलाबरोबर फिरते म्हणे तुमची मुलगी? नाक कापून घेऊन होय स्वतःचे?
जमानाच तसला होता तो! वंदनाताईचे लग्न ठरायला अडीच वर्षे लागली. पण चांगल्या ठिकाणी ठरले. बबनचा शाप खोटा ठरला.
पण मी असा विचार करतो. की बबनला मावशीने नाकारणे किंवा वंदनाताईला लिमयेंनी नाकारणे ह्यात नेमके काय करत असतो आपण? दुसरा बदनाम आहे म्हणून आपणही बदनाम होऊ असे धरूनच चालतो ना? आपण चांगले आहोत तसा दुसराही चांगला होऊ शकेल असे का नाही गृहीत धरू शकत? आणि कोणी लग्नानंतर बिघडले तर काय?
वडीलधार्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार किती आवश्यक असतात हे बबनकडे पाहून मला समजते. आईची मावशी विधवा झाली नसती आणि एका वेगळ्याच माणसापासून तिला बबन झाला नसता तर कदाचित तो आमच्यातीलच एक ठरला असता. पण त्याच्या संगोपनाकडे लक्षच पुरवले गेलेले नव्हते. एवढे असूनही त्याने त्याच्यापरीने किंवा त्याला जे चांगले वाटेल ते करायचा प्रयत्न केला होता. त्याचे समज, गृहीतके कदाचित चुकीची असतील, पण हेतू चांगले असायचे. आणि त्याला आपल्यासारखा होण्याची संधी नाकारण्यात आली होती.
ज्याला जगात विशेष कोणीही नाही, जे सख्खे आहेत ते दुबळे आहेत आणि जे मावस आहेत ते कायम उंबर्यातलाच मानत आले आहेत त्याला बहुधा फक्त संधीच हवी असते एखादी! तीच नाकारली तर उरले काय?
मला जगात सगळे आहेत. सख्खे आहेत ते ठाम आहेत. इतरजण आहेत त्यांना मी त्यांच्यातला व्हायला हवा आहे. नशीब मला रोज नवनवी संधी देत आहे.
मी आणि बबन!
मी बबनबद्दल लिहू शकतो. बबन फक्त बबन बनू शकतो.
===================================
-'बेफिकीर'!
आवडला लेख! अगदी अश्शीच एक दोन
आवडला लेख!
अगदी अश्शीच एक दोन माणसे आयुष्यात येऊन गेलीत.
वाचताना मध्यावरच वाटलं आता हा आमच्या त्या लांबच्या मामासारखा नात्यातल्याच एका मुलीला प्रपोज करेल , आणि तसंच झालं.
खूप छान रंगवलंय हे कॅरॅक्टर.
खरंय. अफाट लिखाण. सगळंच
खरंय.
अफाट लिखाण. सगळंच आवडलं.
एका क्षणी बबन आवडला, एका ठिकाणी त्याची दया आली, राग आला किळस वाटली.
सगळंच.
लेख आवडला.. एका क्षणी बबन
लेख आवडला..
एका क्षणी बबन आवडला, एका ठिकाणी त्याची दया आली, राग आला किळस वाटली. >> +१
solidddddddddddd
solidddddddddddd
आवडले.
आवडले.
लेख अतिशय उत्तम आणि छान आहे
लेख अतिशय उत्तम आणि छान आहे
साती, >> वाचताना मध्यावरच
साती,
>> वाचताना मध्यावरच वाटलं आता हा आमच्या त्या लांबच्या मामासारखा नात्यातल्याच एका मुलीला प्रपोज करेल ,
>> आणि तसंच झालं.
बेफिकीर कशी अचूक पकडतात नाही असली व्यक्तिमत्वं! मला व्यक्ती आणि वल्ली याची आठवण येतेय.
आ.न.,
-गा.पै.
आवडलं. एका क्षणी बबन आवडला,
आवडलं.
एका क्षणी बबन आवडला, एका ठिकाणी त्याची दया आली, राग आला किळस वाटली.>>>>>+१
प्रत्येक घरात अस एखाद पात्र
प्रत्येक घरात अस एखाद पात्र असतच असत ! आणि गावोगावी उचापती करून झाल्यावर यांना नेमक घर आठवत !
घरचेही कुरबुरत का होईना निस्तरतातच सगळ
लिखाणाची शैली नेहमीप्रमाणेच मनाच्या अंगणात रेंगाळणारी
-सुप्रिया.
जबरदस्त .............
जबरदस्त .............
बबन हा 'सोज्वळपणे आणि असेल
बबन हा 'सोज्वळपणे आणि असेल त्यात सुख मानून राहणार्या' त्या माणसांच्या समुहावर खुष होऊन देवाने दिलेला इन्टरिम बोनस होता. जो मिळेलच असे नसते, मिळायलाच हवा असे म्हणता येत नाही, मिळाला नाही तर दु:ख होत नाही आणि मिळाला तर कोणी नाकारत नाही. >>>
ज्याला जगात विशेष कोणीही नाही, जे सख्खे आहेत ते दुबळे आहेत आणि जे मावस आहेत ते कायम उंबर्यातलाच मानत आले आहेत त्याला बहुधा फक्त संधीच हवी असते एखादी! तीच नाकारली तर उरले काय? >>
आवडले. छान लिहिले आहे.
टॅाप एका क्षणी बबन आवडला, एका
टॅाप
एका क्षणी बबन आवडला, एका ठिकाणी त्याची दया आली, राग आला किळस वाटली.
सगळंच. >>> अगदी, अगदी.
आवडलं व्यक्तीचित्रण.
आवडलं व्यक्तीचित्रण.
Exlnt
Exlnt
मार्मिक वर्णन... बेफी उत्तम
मार्मिक वर्णन... बेफी उत्तम लिहिले आहे... धन्यवाद...
आवडली... आधीच्या तुमच्या
आवडली... आधीच्या तुमच्या कथा/कादंबर्यांमधल्या अनेक व्यक्तिरेखांची थोडी थोडी झलक जाणवली..
छान नेहमी प्रमाणेच
छान नेहमी प्रमाणेच
छान लेख
छान लेख
छान लेख! आवडला.
छान लेख!
आवडला.
बहिणीच्या मुलीशी लग्न? हे
बहिणीच्या मुलीशी लग्न?
हे मद्रासी तामिळ करतात एकलेलं होतं.
बाकी, बबन हे पात्र अवलिया होते. चांगलं बनण्याची संधी द्यायला हरकत नाहे पण ह्यांची वृती व मूड कधी बदलेल सांगता येत नाही.
आणि साध्या सरळ मार्गी लोकांना अब्रुची चिंताच ज्यास्त असते, तेव्हा ते शिवधन्युष्य उचलण्यासारखं आहे. असो.
एकदम मस्त लेख, खास बेफी
एकदम मस्त लेख, खास बेफी स्टाईल.
एका क्षणी बबन आवडला, एका ठिकाणी त्याची दया आली, राग आला किळस वाटली.>>>>>> +१००
पैलवानांशी अगदी सहमत. किती
पैलवानांशी अगदी सहमत. किती सुरेख चित्रण करता, बेफिकिर...
खूप आवडली कथा.. व्यक्तीचित्रण
खूप आवडली कथा.. व्यक्तीचित्रण अतिशय सुरेख करतात बेफी,
आवडली
आवडली
व्यक्ती तितक्या प्रकृती!
व्यक्ती तितक्या प्रकृती! व्यक्तिचित्रण आवडले! तुमची शैली नेहमीप्रमाणे खास!
बबन ही अशी व्यक्ती होती की
बबन ही अशी व्यक्ती होती की जिच्या असण्यामुळे फायदा व्हायचा पण नसण्यामुळे तोटा व्हायचा नाही. >>> हि अशी आणि कित्येक वाक्ये अध्येमध्ये छान पेरता...
एकंदरीतच कडक लिहिलेय.. बबन उभा राहतो डोळ्यासमोर!
छान
छान
वर्षू नील | 1 February, 2015
वर्षू नील | 1 February, 2015 - 00:46 नवीन
खूप आवडली कथा.. व्यक्तीचित्रण अतिशय सुरेख करतात बेफी, स्मित
>> +१ बारीक आणि अचुक निरीक्षण.
माझ्यामते एखादी मालिका छान लिहितील.
खूप आवडली कथा.. व्यक्तीचित्रण
खूप आवडली कथा.. व्यक्तीचित्रण अतिशय सुरेख करतात बेफी <<< +++ १
बेफिकीर कशी अचूक पकडतात नाही
बेफिकीर कशी अचूक पकडतात नाही असली व्यक्तिमत्वं! मला व्यक्ती आणि वल्ली याची आठवण येते>>> +१
Pages