माझी शाळा

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

इतकं प्रशस्त आवार असलेली ही मुंबईतील एकुलती एक शाळा असेल. Wilson College, Wilson High school ह्याच मिशनच्या दोनशे वर्षें जुन्या संस्था आहेत. माझी शाळा मुलींची होती.

दक्षिण मुंबईत दाट लोकवस्तीत निगा राखलेली बाग हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे. अजूनही तशी बाग आहे का कल्पना नाही कारण गेल्या दहा वर्षांत मी शाळेला भेट दिलेली नाही. बागेत माळी रोज काम करताना दिसत असे. वेगवेगगळे वृक्ष होते, बदामाची, रायावळ्याची झाडं होती, गुलमोहर, पिंपळाची गडद छाया होती. रातराणी, बोगनवेलिया सुगंध व रंगाची उधळण करायचे. शिवाय माळीबुवा प्रत्येक सीझनप्रमाणे फुलांचे वाफे रंगवायचे. गुलाबाचे कितीतरी प्रकार दिसायचे. मला अजुनही कर्दळीची फुलं दिसली की शाळेची बाग डोळ्यापुढे तरंगू लागते. माझ्या सातवीच्या वर्गासमोर एक जुनं बदामाचं झाड होतं. वर्ग चालू असताना आमचं लक्ष असायचं केव्हां पिकलेला बदाम खाली पडतो. तास संपला की दुसर्‍या बाई वर्गावर यायच्या आंत पुढच्या रांगेतल्या मुली बदाम उचलायला पळायच्या, अर्थात् माझा कधीच नंबर लागला नाही कारण मी सर्वांत वर्गांत उंच असल्याने मागच्या बाकांची भागीदार होते...

व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आमची शाळा त्यावेळी खूप संधी देत असे. शिवणकाम, विणकाम शिकवलं जायचं. सर्वप्रथम पाचवीमधे एक शिवणाची पिशवी शिवायला शिकवीत असत. वरती भरतकाम करायचं असे. पिशवीवर भरतकामाने नावाची आद्याक्षरं काढून आपापाल्या लॉकरमधे शाळेतच ठेवायची असे. शिवणाचं सामान घरी न्यायची परवानगी नव्हती, आईच्या मदतीने शिवणांत मार्क्स मिळवणं शक्यच नसे. पुढची सहा वर्षे तीच शिवणाची पिशवी वापरात होतो. दहावीपर्यंत आम्ही स्वतचे ब्लाउज व स्कर्ट तयार केले होते... विणकाम भरतकाम आमच्याकडून काटेकोरपणें करून घेतलं जाई. आम्ही चीनी आक्रमणाच्या वेळी शाळेच्या हिरवळीवर बसून जवानांसाठी लोकरीचे पुलोव्हर, हातमोजे व पायमोजे विणले होते. शाळा सुटल्यावर एक तास व शनिवारी सकाळी मुलींना हिरवळीवर गोलाकार बसवत असत. कर्णिकबाई आमच्याकडून विणून घेत असत. हसत खेळत विणकाम चाले. आता लिहितांना ते दिवस मी पुन्हा जगले..... (सरकारी लोकर होती तेव्हा घरी विणायला देत नसत)

पी.टी. (physical training) साठी एक बुटाची पिशवी आम्ही शिवणाच्या तासाला शिवली होती. ही पिशवी लॉकरमधे टेनिसचे बूट व मोजे ठेवण्यासाठी बनवली जायची. प्रायमरीमधून पाचवीच्या वर्गांत आलं की पहिल्यांदा ही पिशवी शिवायला लागायची. आम्हाला टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल शिकवत असत. वर्गावर्गांमध्ये सामने होत होते. उत्तम खेळणार्‍या मुली निवडून व्हॉलिबॉलसाठी टीम तयार करत, त्यांचे मग मुंबईतल्य दुसर्‍या शाळेच्या मुलींबरोबर सामने होत असत. तयारीच्या वेळी एक चुरशीचं वातावरण असे, आम्हाला तोच विषय पुरून उरत असे. शत्रुच्या गोटांतील खेडाळूंच्या बातम्या काढून आणायच्या, त्याप्रमाणे आपल्या टीमचे पवित्रे आखायचे, एखाद्या वेळी हरलो तर का हरलो व जिंकायला पवित्रे कसे बदलायचे वगैरे, वगैरे... मस्त मजा यायची! छोटीशी चुरस, छोटे छोटे तणाव आमचं चिमुकलं विश्व व्यापून टकत असे.

आठवड्यातून एकदा आम्हाला गाण्याचा तास असे. चिक्कार गाणी व थोडे रागही शिकलो. वर्षातून एकदा नाट्यछटा, नाच व गाण्यांचा कार्यक्रम होत असे. मग आधीचे तीन महिने समुहगीतं, नाच, नाट्यछटा बसवण्यची धमाल असे. इथे शिक्षक भाग घेत नसत. सुत्रधार, दिग्दर्शक, संचालक मुलीच असायच्या. रंगीत तालिमीला सर्व शिक्षक हजर राहून मार्गदर्शन करीत असत. ह्यातूनच भक्ती बर्वे निर्माण झाली. ती माझ्याच बॅचला होती.

आमच्यावेळी फक्त दहावी व अकरावीच्या वर्गाला दोन शिक्षक होते, तोपर्यंत सर्व शिक्षिका होत्या. एक स्वतंत्र लॅब होती, तिथे प्रयोग करायला नेत असत. दर महिन्याच्या शेवटी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी टेस्ट असायची, त्यामुळे नियमित अभ्यास होत असे. शिवाय सहामाही व वार्षिक परिक्षा असायच्या... होमवर्क भरपूर मिळत असे. तें नीट तपासलं जाई. बोर्डाचा रिझल्ट नेहमीच १०० टक्के असे. डॉ. शरदिनी डहाणूकर आमच्या शाळेतून शिकल्या! माझ्या काही समकालीन विद्यार्थीनी जगांत ठिकठिकाणी स्थायीक झालेल्या आहेत. तिथेही त्या आपापल्या क्षेत्रांत कर्तुत्व गाजवून आहेत. त्यांना भेटल्यावर व बोलल्यावर कळतं की शाळेने आम्हां सर्वांना किती भरभरुन दिलं आहे!

या शाळेने मला प्रचंड आत्मविश्वास दिला. खूप कला शिकवल्या. शाळेच्या लायब्ररीचा उपयोग करयला वर्गात नेहमी सांगितले जाई, संदर्भ कसे बघावे, त्यांचा उपयोग कसा करावा हे शाळेतच आम्हाला शिकवलं होतं. ही शिस्त खूप उपयोगी पडली. वाचनाची गोडी लागली.

मिशनरी शाळा असल्यामुळे रोज प्रार्थनेला बायबलमधील एक गोष्ट सांगितली जायची व नंतर येशूची प्रार्थना व्हायची. सरस्वती वंदना रोज सुरावर म्हटली जाई. पण येशूची प्रार्थना व बायबलातील एखाद्या गोष्टीशिवाय आमच्यावर कुठलेही ख्रिश्चन संस्कार झाले नाहीत. ख्रिश्चन विद्यार्थिनी व हिंदू विद्यार्थिनीत भेदभाव केला जात नव्हता. तेव्हा प्रत्येक वर्गांत फक्त ३५ मुली असत, त्यांतल्या जास्तीत जास्त ५ मुली वेगळ्या धर्माच्या असत. माझ्या वर्गांत एक ज्यू, दोन ख्रिश्चन व एक मुस्लिम मुलगी होती.

शाळेत एक शेड बांधलेली होती. वरती कौलांचं छप्पर होतं व लाकडाचे मजबूत खांब होते. तो एक लांबलचक व्हरांडा होता. त्यांत दोन्ही बाजूला बाकडे ठेवलेले होते. तिथे आम्ही पावसाळ्यांत मधल्या सुटीत डबा खात असू. उन्हाळ्यांत तिथे गार असायचं कारण आजूबाजूला झाडी होती. शेडच्या पलिकडे गांवदेवी पोलिस स्टेशन होतं. त्यांचा लॉकप आमच्या शेडला समांतर होता. कधी कधी कैद्यांचा आरडाओरडा ऐकू यायचा.

शाळेच्या आवाराला दोन दरवाजे होते. एक नाना चौकातून व दुसरा गांवदेवीच्या बाजूने. मला गांवदेवीची शांत बाजू खूप आवडत असे. तो रस्ता अगदी शांत असे. रस्त्याच्या दुतर्फा लॅबर्नमची झाडं होती, अजूनही आहेत असं ऐकलं आहे. ती हिवाळ्यांत पांढर्‍या गुलाबी छटांच्या फुलांनी भरून जायची. त्यांचा सुगंध सगळ्या रस्त्यावर दरवळत असे. शाळेत शिरताना मन प्रसन्न होऊन जाई.

अरेच्या! मी माझ्या शाळेच्या आठवणी सांगताना शाळेचं नाव सांगायला विसरलेच की! माझ्या शाळेचं नाव व पत्ता आहे...
St. ColumbA High School
Alexandra Road
Gamdevi, Mumbai 400 007

विषय: 
प्रकार: 

सहि...मी पन St. ColumbA High School मधेच शिकले....

मस्त School

मस्त बरयलां गे ललिताताई Happy

ललिता ताई, मस्त वर्णन केलंय तुम्ही. शेवटचा परिच्छेद वाचायच्या आधीच मी ओळखले की तुम्ही सेंट कोलंबा बद्दल लिहिताय ते. मी विल्सन कॉलेज मधे होते तेव्हा माझ्या ग्रुप मधील काही मैत्रिणी त्या शाळेतीलच होत्या.

ललिता : छान जमलाय लेख. आवडला........... Happy

    तुमच्याच शाळेतली अजून एक मायबोलीकरीण आहे. ती वाचेलच हा लेख ......... Happy

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा
    उलगडला धारांतून अवचित हिरवा मोरपिसारा

    ललिताताई छान लिहिलयं. शाळेबद्दल लिहितांना किती भरून येतं.. नाही?

    हो आजुनहि शाळा तशिच आहे तुमचि. आमचे शामक चे क्लास असतात तिथे.