'आम्हाला मातृभूमी नाही'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2014 - 14:49

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता. आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला! "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण काय करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं.<<<

मायनस वन थाऊझंड!

आपण काय करायचं हे :

१. प्रत्येकाच्या हातात नसते

२. पूर्णपणे हातात नसते

३. 'केव्हा काय करावं लागेल' ह्याचा विचार आत्ताच करण्याची कुवत प्रत्येकाची नसल्यामुळेही हातात नसते (जसे, त्या उदाहरणातील मुलीला मांसाहार करावा लागला. कदाचित तिची ही अव्यक्त अपेक्षा असू शकते की निदान मला तसा आग्रह कोणी करणार नाहीत. 'केलाच तर मी कसाकसा विरोध करायचा' ह्याचा विचार आधीच करून ठेवणं व वेळीच तो कृतीत आणणं ह्याला जर तुम्ही परिपक्वता म्हणत असाल तर हो, तुमच्यासारखे परिपक्व जगात दुर्मीळ आहेत. कारण ते वय, त्यावेळेसचे मोठ्यांचे वैचारीक दबाव, आर्थिक परावलंबित्व, कशीबशी मिळालेली परवानगी, ह्या सगळ्या बाबी अश्या असतात ज्या तुमचे मन पूर्णपणे व्यापतात व त्यामुळे उदाहरणार्थ 'उद्या मला येथे मटन करायला सांगितलेच तर?' असे विचार तेव्हा मनात येऊ शकत नाहीत / नसतात).

संदीप , Happy

बघा ना, या दांभिक समाजात न कमवणारी , नवर्याच्या पगारात संसार करू म्हणणारी मुलगी चालते.
बायकिच्या पगारावर बिझनेस करू म्हणणारा नवरा चालत नाही.
Wink

"....पण एकदा निर्णय घेतल्यावर निभावायची हिंमत पाहिजे...."

~ व्हेरी ट्रू...! नो डाऊट. पण हे निभावण्यासाठी सोबतीला नगद नारायणराव हवे असतात अन् तेही पुरेशा प्रमाणात. जर तसे गणित चुकत असेल तर तितपत मिळविण्यासाठी जी हिम्मत लागते ती दाखवायची असेल आजच्या काळात तर तुमची शैक्षणिक अर्हता अगदी वाखाणण्यासारखी नसली तरी बर्‍यापैकी असावी लागते. पदवीधराला सोबतीला एम.एस.सीआयटी, इंग्रजी मराठी टायपिंगच्या परीक्षा दिलेल्या असाव्या लागतात. नोकर्‍याही रस्त्यावर यांची वाट पाहात बसलेल्या नसतात. कॉलेजमध्ये रेग्युलर राहू देतच पण सीएचबी तत्वावर लेक्चरर म्हणून नोकरी करायला आलेल्या पदव्युत्तरांची संख्या १५० होती....त्यातही डझनभरापेक्षाही जास्त नेट सेट वाले होते. सीएचबीचा पगार तरी किती ? जास्तीतजास्त पाच ते सहा हजार....ही झाली हायली प्रोफिशिअंट क्वालिफाईड लोकांची कथा... मग दहावी बारावी झालेला स्टेशनवर ओझीही उचलणार नाही अशी अवस्था.

बाजारातील महागाई आणि चढते भाव पाहाता नियमित नोकरी करणार्‍यांचेही डोळे पांढरे होत असतात हे आपण पाहात असतोच.....परिस्थिती चिघळत जाते ती अशा बाजारावर होणार्‍या खर्चातून.

"...निदान स्वतःचा विचार करायला तरी सुशिक्षित मुलींनी शिकलं पाहिजे...." ~ हेच तर मीही म्हणत आलो आहे. जर सुशिक्षित मुलगीच रोखठोक विचार करायला तयार नसेल तर तो अर्धवट मुलगा तरी असली खाली मान घालून प्रेम करणारी मीनाकुमारी का सोडेल ? "पुढचे पुढे पाहून घेऊ..." हीच पळपुटी मनोवृत्ती अशा प्रेमविवाहात पाह्यला मिळते.

"पुढचे पुढे पाहून घेऊ..." हीच पळपुटी मनोवृत्ती अशा प्रेमविवाहात पाह्यला मिळते<<<

+ १००

फक्त, हा पळपुटेपणा म्हणजे अपरिपक्वपणा मुळीच नव्हे, कारण त्या क्षणी त्यांचे प्राधान्यच मुळी 'एकमेकांचे होण्याला' असते. भावनेने भारलेल्या त्या मनांना 'उद्या मटन करा सांगितले तर?' असे विचार शिवत नसतात. आणि असे विचार शिवत नसतात म्हणून त्यांचे शिक्षण, सुसंस्कृतपणा व सुशिक्षित असणे 'निरर्थक' व 'निरुपयोगी' नसते.

येथे परिपक्वतेची परिभाषाच वेगळी दिसते.

बायकोच्या पगारामधे रोजचा खर्च भागवून नवर्‍याने काहीतरी धाडस करू पाह्यले आणि त्या दोघांनी तो निर्णय घेतला असेल तर त्यात चूक काय आहे?

"पुढचे पुढे पाहून घेऊ..." हीच पळपुटी मनोवृत्ती अशा प्रेमविवाहात पाह्यला मिळते.>>>>>>>

ही पळपुटी असेलंच का?
जुगारी असू शकते, शेतकर्‍यासारखा जुगार पावसाच्याकलाने घेण्यासारखा जुगार,
आलं तर उदंड पीक नाही तर मेहनत सुरू ठेवू.

बायकोच्या पगारामधे रोजचा खर्च भागवून नवर्‍याने काहीतरी धाडस करू पाह्यले आणि त्या दोघांनी तो निर्णय घेतला असेल तर त्यात चूक काय आहे?>>>>>>>>> +++१११

उदा. जर नवरा बिझनेस स्टार्ट करत असेल आणि तो सेट होईपर्यंत जर बायकोचा पगार घरासाठी वापरण्यात येत असेल तर त्यात चुक काहीच नाही....घर दोघांच असतं.... . बायको ऐवजी नवर्याने जेवण बनवलं तरी जगबुडी येणार नसते...पण मानसिकताच चुकीची असेल तर त्याला कोण काय करणार....माझा नवरा केर काढणे, लादी पुसणे , टॉईलेट-बाथरूम साफ करणे, कपडे मशीनला लावणे...सुकत घालणे ही कामं करतो...स्वखुशीने...हे फक्त बायकोचं काम नाही या भावनेने.....तरी अरे बापरे हा बायकी कामं पण करतो? असे रीमार्क्स आम्ही झेलुन त्यांना तड की फड उत्तर देउन त्यांची थोबाडं बंद ही केलीत...

माझही लव्ह मॅरेज आहे....पण प्रत्येकाच्या मेंटॅलिटी मधे फरक असतो... जर दोघही ईक्वली कमवत आहेत, तितकीच मेहनत करत आहेत तर घरी आल्यावर बायकोने घरकाम करणं आणि नवर्याने तंगड्या पसरुन टिव्ही बघत बसण हे माझ्या समजुतीच्या पलिकडलं आहे

तरी अजून आंतरजातीय विवाह नक्कोच म्हणणारे नाही आलेत.
>>>>>
अच्छा असेही आहेत का इथे, पण ते संपूर्णता गैर नाहीये.
अजूनही आपल्या समाजात लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सोयरीक जुळणे असल्याने शक्यतो एकमेकांच्या चालीरीती, आचारविचार, संस्कृती, खाद्यसंस्कृती जुळेल हेच बघितले जाते. त्यानुसार ठरवून केलेली लग्ने (अरेंज मेरेज) जातीतच केली जातात.
तर यात जुनाट विचारांचे लोक आहेत असा शिक्का मारणेही योग्य नाही. एका अर्थाने हा सेफ गेम देखील झाला.

मात्र प्रेमविवाह म्हटले की १०० पैकी ९५ वेळी तुम्हाला आंतरजातीय विवाहाला तयार व्हावेच लागते. आमच्या ऑफिस ग्रूपमध्ये ८ पैकी ७ विवाहीत आणि त्यापैकी ५ प्रेमविवाह, सारेच्या सारे प्रेमविवाह आंतरजातीय. त्यामुळे कोणाला कोणाचे मेले कौतुकच नाही Sad

मी क्षत्रिय आणि माझा नवरा मराठा...सासरच्या मंडळीना वाटतं की आम्ही सर्वात वरचे .....आणि मला ही सुरुवातीला ऐकवण्यात अलेलं हे आडुन आडुन....पण एक दिवस नवर्यानेच सर्वांना सुनवलं की आपण मराठे आहोत पण ती क्षत्रिय आहे.....आपल्या वरची तेव्हा तीला टोमणे मारणं बंद करा....आणी ते वर्क आउट झालं..... ही गोष्ट मला लग्नाच्या अडिच वर्षानंतर कळली....अर्थात मला जाती वरुन फरक असाही पडत नव्हता....घरी नेहमी एकच गोष्ट शिकवण्यात आली आहे की जाती माणसांनी बनवल्यात...मनाला आणि बुद्धीला पटेल तेच करा

बायकोच्या पगारामधे रोजचा खर्च भागवून नवर्‍याने काहीतरी धाडस करू पाह्यले आणि त्या दोघांनी तो निर्णय घेतला असेल तर त्यात चूक काय आहे?<<<

सहमत आहे.

हे अंडरस्टँडिंग कसेही असले तरी ते योग्यच म्हंटले पाहिजे. म्हणजे नवर्‍याच्या पगारामध्ये घर चालवणे व पत्नीने व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करणे हेही स्तुत्यच आहे.

नीधप आणि बेफ़िकीर....

"...बायकोच्या पगारामधे रोजचा खर्च भागवून नवर्‍याने काहीतरी धाडस करू पाह्यले आणि त्या दोघांनी तो निर्णय घेतला असेल तर त्यात चूक काय आहे?..."

या मताविषयी लिहितो. मी दिलेल्या उदाहरणाचा या वाक्याशी संबंध आहे असे दिसते. मी जरूर असे लिहिले आहे, तो मुलगा बायकोच्या पगारावर बिझिनेस करू पाहतो.....ही गोष्ट स्वागतार्ह नाही असे मी म्हणत नाही, म्हणत आहे ते हे की, तो मुलगा त्या दर्जाचा आहे का ? बारावी नापास आणि काम करतोय ट्रान्स्पोर्ट कार्यालयात. याला अशी किती माहिती आहे बाहेरील उद्योगधंद्याची वा विश्वाची ? बायकोचा पगार चार हजार रुपये. याची बेभरवशाची दोन हजाराची असेल नसेल इतपत कमाई. सहा हजार कसेबसे जमतात...त्यातील तीन हजार तर हक्काने घरभाड्याला गेले. उरलेल्या तीन हजारात काय काय आणि कसे कसे बसवायचे यादी काढली तर हातभर प्रतिसाद होईल. मुद्दा असा की बायकोच्या पगारामध्ये रोजचा खर्च भागवून नवरा धाडस करतो म्हणाला तर ते अभिनंदनीय ठरेल. तरीही मुळात उसातून निघेल तितका रस काढून झाल्यावर शिल्लक चिपाडातून उरणार तरी किती ? आणि त्यावर बिझिनेस करायचा तरी कोणता ?

एवढ्यासाठी आम्ही त्या रोमिओला सल्ला दिला होता की लेका अगोदर बारावी पूर्ण कर....दोन पेपर राहिले आहेत, ते दे....पुढील शिक्षण वा कोर्सच्या दृष्टीने हालचाल करता येईल....पण याचे ते नेहमीचे दुनिया मेरी मुठ्ठीमेचा आविर्भाव ! कोण आणि किती समजाविणार अशांना ?

सबब निर्णय कितीही स्तुत्य असला तरी प्रात्यक्षिक जीवनात तो अंमलात येईल असे म्हणणे धारिष्ट्याचे वाटते. किमान मी दिलेल्या उदाहरणाबाबत.

अंबानी नाही पण नारायण मुर्तींनी नक्कीच बायकोच्या पगारातून बिझिनेस सुरू केला.

काय वाईट झालं का,>>>>>>>> नारायण मुर्ती आणी गोण्या उचलणारा अर्धशिक्षीत मुलगा यान्च्यात बरोबरी? त्या मुलाने सन्धीचा फायदा घेऊन पुढे शिकण्याचा तरी प्रयत्न केला का? काय कष्ट केले आतापर्यन्त?:अओ:

अशोकमामान्शी सहमत.

लेख खूप आवडला.

हेही खरे आहे की then they lived happily ever after असं कधीच होत नसतं. सगळे प्रॉब्लेम्स त्रास वाद त्यानंतरच सुरू होतात, फार कमी केसेस असतात जिथे then they lived happily ever after खरे ठरते. जिथे त्रास प्रॉब्लेम्स वाद सुरू होतात तिथे मोस्टली स्त्रिलाच त्रास होतो.

पण माझे वैयक्तिक मत असे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या हातात असते आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही.
जर एखादी स्त्री कोणताही छळ सहन करते तर तिचा तो स्वतःचा चॉईस असतो ते सहन करायचा. कारण काहीही असेल, नवर्‍यावर खूप प्रेम असेल, माहेरचे स्वीकारणार नाहीत किंवा समाज टोमणे मारेल ही भीती असेल, पैसे नसतील, फिजिकल अब्युअजची भीती असेल. स्वतःबरोबर कोणतीही गोष्ट होताना ती होऊ द्यायची की नाही. स्वत:च्या मतावर ठामपणे उभे राहायचे की नाही, आपल्यावर कोणी कसलीही जबरदस्ती करत असेल तर त्याला हाणून कसे पाडायचे हा विचार जिचा तिने करायचा.

आणि तो विचार ती करू शकत नसेल तर ती दुबळी आणि अपरिपक्व आहे असेच म्हणावे लागेल.
मुळात लग्न करताना पुढे काय काय होऊ शकेल ह्याचा विचार परिपक्वपणे करणे गरजेचे आहे. आजकाल जवळ जवळ सगळ्याच मुली पेपर वाचतात, बातम्या ऐकतात त्यामुळे लग्न जातीत असो वा जातीबाहेर हे असे झाले तर मी असे वागेन आणि १,२,३,४ .... गोष्टी मी चालवून घेणार नाही असा कडक बाणा हवाच.

जातीबाहेर / जातीमध्ये आई वडिलांच्या मनाविरुद्ध किंवा आई वडिलांचा विरोध असताना त्यांना कन्व्हिन्स करून लग्न करणार्‍या मुलींच्या अकला लग्न केल्यावर काय माहेरी राहतात का? लग्न करून दिले नाहीत तर जीव देईन म्हणणार्‍या मुली, मला छळलेत तर जीव घेईन का म्हणू शकत नाहीत? खून करणे कायद्याच्या आणि इतर सगळ्या दृष्टीने चूक आहे पण जीव देणे त्याहून मोठे पाप आहे असे का नाही वाटत कोणाला?

नवरा हा दोन्ही कुटुंबात एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो तर अगदी याच्या उलट बायको मात्र माहेरचे तेवढे नातेवाईक जपायला आग्रही असते. बायकाना फार स्वातंत्र्य देऊ नये मी या मताचा आहे. कारण ते दिल्यास बायका सगळ्यात आधी सासरच्यांची सुट्टी करण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य भरभरुन वापरतील. बायकांच्या या मनोवृत्तीमुळे पुरुषानी थोडे डॉमिनेटींग राहून दोन कुटूंबाना एकत्रीत ठेवणे कधिही बेहत्तर.

बायका खूप बिचा-या दिसतात पण आतून नसतात.
पुरुष हेकट दिसतात खरे, पण आतून बिचारे असतात.

म्हणून वरवर जरी बायकांचा छळ होतो असे दिसले तरी बरेच वेळा तो छळ नसून स्त्री हट्टाला घरच्यानी प्रतिसाद न दिल्यामुळे केलेले आकांडतांडव असते. याला काही अपवाद नक्कीच असतील पण स्त्री हट्ट व बायकांची संकुचीत वृत्ती याचा तो एकूण परिपाक असतो. या स्त्री हट्टाची सुरुवात कधी सून तर कधी सासू कडून होतो. यात होरपळला जातो तो प्रुरुष... कधी नवरा म्हणून तर कधी सासरा, दीर वगैरे रुपात.

थोडक्यात पेटतं बायकांचं, पण जळतो पुरुषच.

<जातीबाहेर / जातीमध्ये आई वडिलांच्या मनाविरुद्ध किंवा आई वडिलांचा विरोध असताना त्यांना कन्व्हिन्स करून लग्न करणार्‍या मुलींच्या अकला लग्न केल्यावर काय माहेरी राहतात का? लग्न करून दिले नाहीत तर जीव देईन म्हणणार्‍या मुली, मला छळलेत तर जीव घेईन का म्हणू शकत नाहीत? खून करणे कायद्याच्या आणि इतर सगळ्या दृष्टीने चूक आहे पण जीव देणे त्याहून मोठे पाप आहे असे का नाही वाटत कोणाला?>>>>

आईवडिलांनी निवडलेल्या स्थळाच्या गळ्यात मान खाली घालून माळ घालणार्‍या मुलींच्या अकला जिथे असतात, तिथेच अशा प्रेमविवाह करणार्‍या मुलींच्या अकला असतात. प्रेमविवाह करणार्‍या मुलींना परतीच्या वाटा बंद असतात, तर ठरवून केलेल्या लग्नाच्या किती मुलींना त्या वाटा खुल्या असतात?

प्रेमविवाह करणार्‍या मुलींना परतीच्या वाटा बंद असतात, तर ठरवून केलेल्या लग्नाच्या किती मुलींना त्या वाटा खुल्या असतात?

>>>
nahi tar kai!

हतोडावाला, कृपा करून ही असली बिनडोक विधानं करू नका. तुमची संकुचीत मनोवृत्ती घडी घालून कपाटात बंद करून ठेवा.

विषय खूप नाजूक आहे, असल्या विधानांनी आग लावू नका.

भानुप्रिया, असल्यांसाठी ते इग्नोरास्त्र आहे Happy
कोणीच त्यांच्या पोस्टीची दखल घेतलेली नाही, तूही घेऊ नकोस... उगाच कशाला स्वतःच्या डोक्याला मनःस्ताप? Happy

लेख पटला नाही. मराठी सून केवळ परजातीची म्हणून नको म्ह्णणारे लोक रशियन सुनेला केवळ ती ’गोरी’ म्ह्णून कौतुकाने स्वीकारतील हे realistic वाटत नाही. म्ह्णजे- विरोध करायचा तर ते दोन्हीला करतील.
मुलाने अमेरिकेत राहून गोरी अमेरिकन बायको केली म्हणून सुतकी- कोणीतरी वारल्यासारखा चेहरा करुन बसलेले लोक पाहिले आहेत. (आता इतरांसारखं ६-६ महिने हक्काने अमेरिकेला जाऊन जॉईन्ट फॅमिली बनवून राहता येईल का, सून टॉलरेट करेल का- ही चिंता असेल!).
बाकी लेखापेक्षा बऱ्याचशा प्रतिक्रियांशीच संमत. केवळ आंबेडकरांचा फोटो असलेल्या घरातल्या मुलीने बामणाशी लग्न केलं म्हणून तिला त्रास झाला असा anti-brahmin लेख आहे. पण प्रतिक्रियांत म्हटल्याप्रमाणे मुलीला सासरी त्रास अनेकवेळा होतो- ती ब्राम्हण असली तरीही होतो, सासरचे स्वजातीय- विजातीय- कसेही असले तरीही होऊ शकतो. ह्यात माणसांच्या जातीपेक्षा मेन्टॅलिटीचा मुद्दा आहे.
’आम्हाला मातृभूमी नाही’ हे इन जनरल भारतीय बायकांच्या बाबतीत- १८-१९ च्या शतकातल्या तरी- लागू पडतं.

गोष्ट / लेख जे काय असेल ते अजिबात पटलं नाही .

' आम्हाला मातॄभूमी नाही' हे ही उगाच घुसडलेलं आहे. दुसरी सून जर नवबौद्ध नसली, अगदी जातीचीच जरी असली तरी कंपेरिझन झालीच असती . अन गोर्‍या सुनेला नक्कीच झुकतं माप मिळालं असतं.

बौद्ध घरात सुद्धा एक सून गोरी परदेशी अन दुसरी नात्यातलीच असती तरी दोघींना समान वागणूक मिळाली नसती.

लेखाच्या शीर्षकावरून आत काय असेल याचा अजिबातच अंदाज आला नाही.
बाकी इथे मेधाचं पटतय. स्वैपाक आपल्यासारखा नव्हता वगैरे टाइपचे टोमणे हे जातीतल्या लग्नांमध्ये पण असतातच.

वरदा जे म्हणते आहे तो आदर्शवाद आहे आणि बेफी लिहित आहेत ती आजूबाजूला दिसणारी परिस्थिती आहे.
वरदा म्हणते आहे तशी आदर्श साधक-बाधक चर्चा आणि मग निर्णय होण्याकडे प्रवास व्हायला हवा हे अगदीच मान्य; पण वास्तव तसं नाही दुर्दैवाने.
वरदा आणि नीधप म्हणत आहेत की स्वतःच्या अनुभवांवर आधारितच बोलत आहेत पण त्या १-२ टक्यांतल्या आहेत असं आपलं मला प्रामाणिकपणे वाटतं.

निर्णय घेतल्यावर पण तक्रार नको हे माझ्या पचनी नाही पडत. निर्णय चुकतात कधीकधी तेव्हा ते मान्य करून त्यातून बाहेर पडायला हवं. उगाच भोगा आपल्या कर्माची फळं ...लव्ह मॅरेज हवं होतं आणी हट्टाने केलं न मग आता तक्रार करायला तोंड नाही अशी स्वतःची मुस्कट्दाबी करून घेणं शहाणपणाचं नव्हे.

मला बेफी काय म्हणताहेत हे लक्षात येतंय. सगळ्याच गोष्टी अ‍ॅन्टिसिपेट करणं त्या वयात / मन:स्थितीत शक्य नसतं. अरेन्ज्ड मॅरेजमधेसुद्धा (जिथे घरची वडीलधारी मंडळी चार ठिकाणी चौकशी वगैरे करून स्थळ निश्चित करतात) कालांतराने 'असे निघतील असं नव्हतं हो वाटलं' असे उद्गार निघतातच की. मुलींनी खंबीर व्हायला हवं यात दुमत असायचं कारणच नाही, पण मान तुकवा किंवा एक घाव दोन तुकडे करा - मनस्ताप चुकतो का? चर्चेत तात्त्विक पातळीवर मुद्द्यांना अनुमोदनं देणारे लोक प्रत्यक्षात निराळं वागू शकतात/वागतात हा अनुभव नित्याचा नाही का?

या सगळ्याचं मूळ मुलीने घर सोडून नवर्‍याच्या कुटुंबात रहायला जाण्यात आहे. दोघांनीही आपापली घरं सोडून बाहेर पडावं आणि आपला स्वतंत्र संसार थाटावा. कोणीच कोणाची ताबेदारी करू नये.

निर्णय चुकतात कधीकधी तेव्हा ते मान्य करून त्यातून बाहेर पडायला हवं.>> हो, हवंच ना. पण तेही करायला स्वतःच निर्णय घ्यावा लागतो तो घ्यावा एवढंच म्हणणं. तक्रार करायला तोंड हवंय कशाला? कुणापाशी? आपण आपला निर्णय घ्यावा की... किती काळ घरच्यांच्या भावनिक आधारावर निर्णय घेणार आहात? वरती केश्विनीच्या पोस्टवर तोच प्रतिसाद दिला होता की छळ सोसता येत नाही म्हणून घर सोडण्यापेक्षा मरण पत्करणारी नोकरदार शिक्षित मुलगी असेल तर तिच्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे तो..

मी आदर्शवादी लिहिलं असेल कदाचित इतरांच्या मते पण मी जशी वागते तसं लिहिलं आहे
जेव्हा तुम्ही आयुष्यातला एखादा मोठा निर्णय घेता आहात तेव्हा विचार, चर्चा असं काहीच नको? भावना आणि वास्तव यात जो फरक असतो तो सुशिक्षितांनी तरी लक्षात घ्यायला नको का? जिथे दोन कुटुम्बांमधे, त्यांच्या राहणीमानामधे उघड फरक आहे, तिथे आधीच संभाव्य संघर्ष न लक्षात यायला काय कुक्कुलं बाळ असतो का आपण? जर फक्त शारिरिक आकर्षणाला प्रेम समजलं जात असेल तर मग त्या शिक्षणाने, किंवा नोकरी करून जगात वावरल्याने आपल्याला काही शहाणीव आली नाही असंच म्हणावं लागेल.
आजच्या काळातही सुशिक्षित व्यक्तींच्या/मुलींच्या बाबतीत जिथे आख्खं आयुष्य कुणाबरोबर तरी काढायचंय - भारतीय संदर्भात तर एखाद्या कुटुम्बाविषयी - आणि तिथे चर्चा, विचारमंथन होणार नसेल तर मग मात्र कठीण आहे.. अनेक ठिकाणी होत नसेल तर आपण मुलींनीच ती परिस्थिती बदलायला नकोय का?
आणि वास्तव अनेक प्रकारचं असतं. मीही ग्रामीण, अर्धग्रामीण परिसरांतूनही स्वतःचा आवाज जिवंत ठेवणार्‍या, स्वतःची मतं मांडणार्‍या मुली बघितल्या आहेत. अल्पसंख्य असल्या तरी उंबराच्या फुलाइतक्या दुर्मिळ नाहीयेत.
असो.

मला लिहायचंय ते लिहून झालंय. आणखी तेच उगाळण्यात रस नाही

मुलींनी खंबीर व्हायला हवं यात दुमत असायचं कारणच नाही, पण मान तुकवा किंवा एक घाव दोन तुकडे करा - मनस्ताप चुकतो का? >> मला वाटतेय कि वरदाला असे सांगायचेय कि मनःस्ताप दोन्हीकडे चुकत नाही. Pick your own poison.

मेधाचे गोर्‍या सूनेबद्दलचे मत पटले. गोरी विरुद्ध देशी नि जातीबाहेरची विरुद्ध जातीतली असे दोन कंगोरे आहेत मूळ लेखात.

शुम्पी, स्वातीआंबोळे >> अनुमोदन.
खास करुन स्वाती मी पण हेच लिहिणार होते, ' सगळ्याच गोष्टी अ‍ॅन्टिसिपेट करणं त्या वयात / मन:स्थितीत शक्य नसतं'... ३५व्या वर्षी माझे जे विचार अनुभवातुन तयार झाले ते २१-२२व्या वर्षी नव्हते...

वैयक्तिक मत -
एक गोष्ट पालकांनी लहानपणापासुन मुलांना शिकवावी की, एखादी गोष्ट आवडत नाहीये तर बोलुन दाखवा मग ती कितीका फडतुस असेना. तोंडाने विरोध करायला जमले नाही तर निदान मनात नसलेली कृती दडपणाखाली येऊन करु नका. म्हणजे उघडपणे 'मी नाही करणार' हे बोलुन दाखवता येत नसले मनात स्वतःला 'मी हे करणार नाही' हे सांगा व तसेच करा. मुलांन शिकुन, नोकरी करु लागल्यावर एकदम जादू झाल्यासारखा शहाणपणा येत नसतो. it is a long process ज्याची सुरुवात पालकांनी करावी लागते.

लग्न करुन दोघांनी आपापला संसार वेगळा"च" थाटायला हवा असे माझे मत नाही.. ते केल्याशिवाय पण आयुष्य छान जाऊ शकते का ह्याची चाचपणी करायला हरकत नाही. प्रत्येकावर ते अवलंबुन आहे.

दोघांनीही आपापली घरं सोडून बाहेर पडावं आणि आपला स्वतंत्र संसार थाटावा.>>येस्स!

अल्पसंख्य असल्या तरी उंबराच्या फुलाइतक्या दुर्मिळ नाहीयेत.>> म्हणजे १-२ % नसतील तर १५-२० % असतील अशा आत्मनिर्भर मुली. तरिही मेजॉरिटी नाहीच अजून.

वरदा, तुझं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की तू म्हणतेस तशी परिस्थिती हवी पण तरिही हे असं जगात सर्रास घडताना नाही दिसत आजूबाजूला.
हा नेव्हरएंडिंग टॉपिक आहे तेव्हा मी पण पुरे करते आता Happy

Pages