हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?
लोकांना लोकशाहीमध्ये त्यांना आवडेल ते काम करण्याची मुभा, स्वातंत्र्य आणि सोयी असणं हेच जास्तीत जास्त लोकांना अपेक्षित आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा नसताना देखील लोकं वर्षानुवर्षे बँकेत काम करत राहतात कारण त्यांना जे करायचा आहे त्यासाठी उपलब्धता नाही. स्वतःची शेती असताना BPO आणि Call Center मध्ये काम करतात कारण आधुनिकता, व्यापकता, सर्जनशीलता, धोरण, अंमलबजावणी याचा अभाव. कसलीच guarantee नाही. मग स्वप्नं बघायची कशाच्या आधारावर?
शिक्षण हा व्यवस्थेचा पाया मानून जर आपण चालत राहिलो तर खूपश्या गोष्टी बदलतील. पण खूपशा प्राथमिक सुविधांकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. अगदी साध्या गरजा पूर्ण करू शकत नाही या बद्दल तरुण मतदारांच्या मनात राग आहे. रस्ते चांगले का नसावेत? जगभरात खूप देशांमध्ये उत्तम दर्जाचे रस्ते अनुभवायला मिळतात मग माझ्या देशात का नाही? माझ्या देशात पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ का यावी? माझ्या देशात वीज पुरवठा कायमस्वरूपी का नसावा? माझ्या देशात सत्ता आणि संपत्तीचा इतका माज का असावा? कोणतेही सरकारी काम करायचं तर पैसे द्यावेच लागणार अशी मानसिकता माझ्या देशात का असावी? माझ्या देशातले माझे तरुण मित्र परदेशात नोकरी मिळावी म्हणून धडपडतात पण त्यांना त्यांच्याच शहरात नोकरी का उपलब्ध होऊ नये? इंटरनेटच्या माध्यमातून काम करायचे असेल तर ते कुठेही बसून करता येते मग खेडेगावात development का होत नाही? माझ्या आसपासची नेतेमंडली आमच्या मध्ये कधी वावरणार? सर्व जिल्हा आणि तालुका पातळीवर उत्तम शिक्षणाची सोय का नसावी? योग्य त्या वैद्यकीय सोयी न मिळाल्यामुळे लोकांना प्राण गमवावा लागतो व आयुष्यभर झगडा करावा लागतो याची जवाबदारी कुणाची? इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी दिसत असताना कायदा आणि त्याची अंमलबजावणी यामध्ये इतकी तफावत का?
हे आणि असे खूप प्रश्न मनात आहेत. आपला देश खूप विशाल आहे. विविध संस्कृती, जाती, पंथ इथे एकत्र आहेत. मग हे आणि असे अनेक प्रश्न सोडवताना अडचणी येणारच, वेळ लागणारच पण त्यासाठी कायमस्वरूपी, निष्ठेने, एकाग्रतेने, प्रगतीशील विचाराने आणि लोकांना विश्वासात घेऊन काम करताना कुणी दिसत नाही. कायम काहीतरी लपवून ठेवायचं अशी एक वेगळीच system आपल्याकडं आहे. मला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण मी माझ्या प्रभागासाठी कायम काम करेन असा सांगणारा एक तरी नगरसेवक भेटेल का? मी सत्तेवर असेन आणि एखादी बेकायदेशीर गोष्ट घडली तर मी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देतो अस सांगणारा (आणि करणारा) नेता आहे का? आपल्यावर आरोप झाले तरी आपल्याला लाज वाटत नाही आणि आपण निर्लज्जपणे सत्तेचा उपभोग घेत राहतो अशी मानसिकता कशी असू शकते. राजकारण आणि समाजकारण याचे फायदे आपण आणि आपले सगे यांनाच मिळाले पाहिजेत, बाकीचे उपाशी मेले तरी चालेल हि 'सभ्यता' कुठल्या संस्कृतीमधली आहे?
मात्र कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी यातली कुठलीच गोष्ट झाकून राहत नाही...
पण सगळ्याच गोष्टी वाईट आणि अत्यंत निराशाजनक आहेत अस नाही. अरविंद केजरीवाल सारख्या लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने सत्तांतर करून दाखवलं आणि हे अभिनंदनीय आहेच. स्वच्छ चारित्र्याचे, शिकलेले, सर्वांगीण प्रगती आणि देशाला पुढे नेण्याचा विचार करणारे नेते लोकांना आवडतात. आणि तरुण मतदार याच शोधत आहेत. कुणीतरी एक माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा म्हणून तरुण मतदार एका ठराविक पक्षाला मतदान करणार नाही, कारण तो सर्वांगीण विचार करणाऱ्या उमेदवाराच्या शोधत आहे. मात्र तोच एक माणूस देशाला पुढील पाच वर्ष स्थैर्य, प्रगती, संरक्षण, योजना, अंमलबजावणी, कायदा आणि सुव्यवस्था देणारा असेल आणि देशाबद्दल प्रचंड अभिमान आणि आदर बाळगू शकत असेल याची खात्री पटली तर तरुण मतदार त्या एक माणसाला पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करतील देखिल.
खरी परीक्षा त्या नंतर सुरु होइल.….
आपल्या आसपास खूप छोटे छोटे देश आहेत, गरीब आहेत, साधे आहेत पण प्रचंड स्वाभिमानी आहेत. दुसऱ्याची मदत घेतात पण लाचार नाही होत. गरिबीत राहतात पण अभिमानाने राहतात. एक तरुण मतदार म्हणून मला माझ्या नेत्याकडून देशाप्रती प्रचंड अभिमानाची अपेक्षा आहे. १० सिलेंडर कि १२ सिलेंडर, लग्न झालं आहे कि नाही, संपती १ लाख आहे कि १०० कोटी, घराण्याचा वारसा आहे किंवा नाही, त्याचा झेंडा हिरवा आहे, भगवा आहे कि बहुरंगी आहे याच्याशी मला काडीचेही देणे घेणे नाही. देशाप्रती अभिमान, प्रगतीचा ध्यास आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी करणारा नेता मला हवा आहे आणि याबद्दल कोणतेही compromise करण्याची मला इच्छा नाही.
- कौस्तुभ बंकापुरे