दिवस प्रेमाचा

Submitted by चाऊ on 14 February, 2014 - 04:19

आज राणी आठव कधी प्रेम केलं होतं
खुळ्या झुल्यावर मन उंच गेलं होतं
काही दिसेना जगात, फक्त दोन उरलं होतं
गुलाबी धुक्यात मन गुलाबी झालं होतं

डोळे पाहती तुलाच, बाकी काहीच दिसेना
तुझ्या आठवणीविना दिनरातही सरेना
जप तुझ्याच नावाचा, घुमे सदा अंतरात
फक्त तुच आणि तुच, दुजं काहीच सुचेना

वेडा वाराही आणतो तुझाच धुंद गंध
स्पर्शाच्या कळ्यांना जाणवे तुझाच अनुबंध
भाषा तेवढीच उरे, तुझे नाव, एक शब्द
पहाया प्रेमाचा उत्सव, सारे जग झाले स्तब्ध

आज आठवूया पुन्हा हा दिवस प्रेमाचा
पुढे आयुष्य चालाया आधार प्रेमाचा
खुळवील मन सदा असा नाद प्रेमाचा
साजरा करु या हा दिवस प्रेमाचा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users