वाढदिवस

Submitted by vaiju.jd on 2 February, 2014 - 02:52

|| श्री ||

आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
पहिल्या वाढदिवसाला एक किलोचा केक आणला होता. पण वाढदिवसाला आलेल्या कितीतरी पाहुण्यांनी केक भेट म्हणून आणलेला, भरपूर मजा! दुसर्या वर्षी दोन किलोचा, तिसर्या वर्षी तीन किलोचे कार्टून, चवथ्या वर्षी चार किलोची मोटार, कारण आशिषला गाड्यांची खूप आवड! घराचा बिझिनेस असल्याने दारात आठ दहा गाड्या उभ्याच असायच्या. आणि आता पाचव्या वाढदिवसाला मी गेले तर माणसे भरपूर जमली होती पण नेहेमीच्या जागेवर टीपॉयवर केक नव्हता, मी आशिष च्या आईला म्हटले," आज काय केक अजून यायचं कां?"
" अहो काकू, तो बघा नं कोपऱ्यात ठेवलाय. अहो, या वर्षी पांचवा म्हणून मोठा 'बर्थडे' करायचा ठरवला म्हणून अकरा किलोचा केक आणलाय तो टीपॉयवर मावेना म्हणून टेबलावर ठेवलाय. बघा नं काकू, या वर्षी क्रिकेटचा केक आणलाय. आशिषलाही हल्ली क्रिकेट फार आवडतं ना, म्हणून!"
कोपऱ्यात केकरुपी क्रिकेटचे मैदान, त्यात किंचित, उगवलेली हिरवळ, खेळाडू. स्टंप्स, बॅट, सगळे काही अंपायरसकट हजर होते. केक भला मोठा आणि सुरेखच होता. त्यावर पांच आकड्याची रंगीत मेणबत्ती होती.
उत्सवमूर्ती आशिष सफारी घालून, बरेच सगळे दागिने घालून होता. लहान मुले गोडच दिसतात. तो पण फारच गोजिरा ' पप्पी घ्यावी' असा दिसत होता. मुळात आशिष वयापेक्षा थोडा जास्त समंजस होता. मेणबत्तीला फुंकर मारून , केक कापून, फुगे फोडून, फुसफुस उडवून, वाढदिवस साजरा झाला. सगळ्यांना मोठासा केकचा तुकडा, सामोसा, वेफर्स असा नाश्ता दिला गेला. कोल्ड्रिंक्सचे शिसे रिकामे होत होते. मी निघाले तशी आशिषची आई म्हणाली," सात वाजता खाली अंगणात जेवण आहे हं काकू. या नक्की आणि सगळ्यांना घेऊन या."
" अरे बापरे, परत जेवण!" अभावितपणे मी म्हटले.
नंतर माणसांची रीघ लागली. खालच्या मजल्यावरच्या आमच्या फ्लॅट च्या दारावरूनच बोलत बोलत माणसे वरखाली करत होती. कितीशे माणसे आली असतील काय माहीत? माणसे नटून थटून , भरपूर दागिने घालून लग्नकार्याला आल्यासारखी येत होती आणि जेऊन जात होती. नंतर सत्यनारायणाच्या प्रसादाचे पातेले खाली बुफेच्या पदार्थाच्या ओळीत ठेवले असल्याने वर घरात जाण्याचीही जरूर नव्हती आणि आशिष खाली मुलांच्यात खेळत असल्याने त्याचे 'गिफ्ट' त्याला खालीच देता येत होते.
जरा उशिराच आम्ही गेलो जरा येणाऱ्या माणसांची गर्दी कमी झाल्यावर! मी आशिषला शोधत त्याच्या आईला ,"तो कुठे आहे?" म्हणून विचारले. ती माणसांच्या सरबराईत इतकी गुंतलेली, घाम पुसत म्हणाली," असेल बघा इथेच कुठेतरी!" मला काही तो दिसला नाही. मी नवऱ्याला आणि मुलीला ,"तुम्ही घ्या जेवायला." असे म्हणत आशिषला बघायला वर गेले. माणसे वावरत होती. गप्पा मारत होती. आपण कुणाच्या वाढदिवसाला आलो आहोत एवढी गोष्ट विसरून, सगळ्या गोष्टी चालू होत्या.
सगळे घर शोधल्यावर मला आशिष सापडला. बेडरुममध्ये दिवाणाच्या आणि भिंतीच्या मधे थोडी जागा होती. तिथे आतल्या छोट्या चड्डीवर शांत झोपला होता. दागिने अंगावर तसेच होते. सफारी मात्र त्याने काढून टाकला होता. मी त्याला उचलून दिवाणावर ठेवले. मला टॉवेल मिळाला, तो त्याला पांघरला. पंख चालू केला आणि मी खाली आले. त्याच्या आईजवळ जाऊन थोडक्यात सांगून वर कुणाला तरी विश्वासातल्या माणसाला पाठवायला सांगितले.
कॅटरर्सची वेळ होत आली होती. त्यामुळे चटकन 'जेवायला घ्या' असा आग्रह झाला. मी जेवण घेतले पण मला ते घशाखाली उतरेना, मला कोपऱ्यात झोपलेला आशिष दिसत होता.
रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप लागेना. कशासाठी करतो आपण वाढदिवस? ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, शुभेच्छा द्याव्यात म्हणून वाढदिवसाला खरेतर फक्त त्याच माणसांना बोलवावे ज्यांच्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या असण्याने काही बदल झाला आहे, त्याच्यामुळे काही फरक झाला आहे. आईवडील, आजी आजोबा , भावंडे, अगदी जवळचे नातेवाईक किंवा जीवाभावाच्या मित्रमैत्रिणी ज्यांना त्या व्यक्तीबद्दल आस्था, प्रेम असेल. त्या व्यक्तीलाही आपल्याभोवती असलेली माणसे आपल्यावर प्रेम करतात, आपण त्यांच्यासाठी महत्वाचे आहोत, असे वाटायला हवे. त्यातून ज्याचा वाढदिवस आहे ते लहान मूल असेल तर त्याची शक्ती येणाऱ्या पाहुण्यांच्या उत्साहाइतकी टिकत नाही. त्याचे आणि मोठ्या माणसांचे विश्व वेगळे असल्याने ते बाजूला पडते , कंटाळून जाते. आपण साजरा करत असलेल्या उत्सवाचे प्रयोजन काय असा प्रश्न पडायला लागतो. एकूण काय वाढदिवस हा वैयक्तिकरित्या साजरा करायचा प्रसंग. त्याचा उत्सव होऊ नये असे मनोमन वाटते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटले वाचुन. लहान जीव किती दमला असेल. त्याने काही खाल्ले पिल्ले की नाही याची पण कुणाला काळजी वाटली नाही? तुम्ही शोधले नसते तर कदाचीत आईलाही उशिरा सगळा कार्यक्रम झाल्यावर कळले असते. खरे आहे तुमचे. दिखावा न करता आनन्दाने साजरा करता आला असता वाढदिवस.

मी या वेळेस लेकी च्या वाढदीवसाला आधीच एक आश्रम शोधलेले तिथे जाउन चौकशी करुन आले
१> तिथे वाढदीवस करु देत नव्हते
२> अन्न दान करा म्हट्ले
३> मी ३ किलो सगळे तिथे घेउन गेल्या वर आतील आवार पाहिले तर माझ्या सारख्या मध्यमवर्गीयाने तीथे दान करायची गरज नाही असे लक्शात आले कारण fixdonar होते ते खुप श्रिमंत कॅटॅ गरीतले होते

मग मी गावालाच असे काही कराय्चे ठरवले

माझ्या मुलीच्य पहिला वाढदिवस मी घरिच केला ,चारजणच घरातले...
माझ्या गावाजवळच्या शाळेत गरजु मुलांना युनिफोर्म ,आणि शाळेत लागणारे सहित्य घेतल...

वाढदिवस हा खुप वैयक्तिक दिवस आहे अस माझ मत आहे..
मुलांचा वाढदिवस , मोठ्यांची पार्टी असच होत खुप ठिकानी..मुलांचे हाल होतात यात..

माझ्या मते वाढदीवसाला एक झाड लावावे. तेच खुप जास्त होइल.
मि तरि निदान तसेच करते>>> खुप छान