सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं. किशोरने नवीन निश्चलसाठी गायिलेला भाग आनंदी मूडमध्ये होता तर रफीचा आक्रोश अमिताभसाठी होता. जिच्यावर आयुष्यभर प्रेमे केलं ती प्रेयसी दुसर्याच्याच प्रेमात आहे हे कळल्यावर उध्वस्त झालेल्या अमिताभच्या हातून गाण्याच्या शेवटी संतापाने दारुचा ग्लास हातातच फुटतो. या नैराश्याला जोड आहे ती रफीच्या धारदार परंतु आर्त स्वराची, मदनमोहनच्या विस्मयकारक संगीताची आणि अमिताभ नावाच्या येऊ घातलेल्या वादळाच्या पोटातील आगीची. ही आग अधुन मधुन “आनंद” चित्रपटात देखिल दिसते.
“जंजीर” पासून अमिताभच्या “अँग्री यंग मॅन” चं साम्राज्य हिन्दी चित्रपटसृष्टीत सुरु झालं. या नायकाने दाखवलेला संताप हा त्याच्या पुर्वासूरींपेक्षा फारच वेगळा होता. अन्याय सहन करत असताना व्यवस्थेविरोधी सतत साठत असलेला राग, द्वेष ज्याचा भडका कुठल्याही क्षणी होऊ शकेल अशा प्रकारे हा अंगार पडद्यावर साकार केला गेला.अमिताभला अमाप लोकप्रियता लाभल्यावर या विशिष्ठ तर्हेच्या सिच्युएशनचा वापर जवळपास प्रत्येक चित्रपटात झाला. मात्र ज्या तर्हेने “दिवार” चित्रपटात हा अंगार वापरला गेला त्याला तोड नाही. म्हणुन या लेखाद्वारे मला असं म्हणायचं आहे की अमिताभच्या कारकिर्दीतला सर्वोच्च पातळीवरचा “अँग्री यंग मॅन” हा “दिवार” (१९७५)चित्रपटातच साकारला गेला.या आधी आणि नंतरही त्याने “अँग्री यंग मॅन” साकारले पण या सम हाच. पुढे जाण्याआधी एक गोष्ट येथेच स्पष्ट केलेली बरी. हा लेख “दिवार” चित्रपटाबद्द्ल नाही. त्या चित्रपटातील एका कालखंडाबद्दल आहे. निळा गणवेश घातलेला, खुरटी दाढी वढवलेला, संपूर्ण व्यक्तीमत्वातच राख वर पडलेल्या निखार्यांप्रमाणे धग दाबुन ठेवलेला, ओझी उचलणारा डॉक मधला हमाल अमिताभ या लेखाचा नायक आहे. त्यानंतरचा सुटाबुटातला, स्मगलर झालेला अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिला आहे. त्याचा विचार येथे केलेला नाही.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच युनियन लिडर असलेल्या अमिताभच्या वडीलांना कामगारांशी गद्दारी केल्याच्या आरोपावरुन कामगारांकडुन मारहाण होते. कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी ते मालकांशी तडजोड करतात.मात्र हा अपमान सहन न होऊन ते परागंदा होतात. येथुन त्या कुटंबाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतात. समाजाकडून होणार्या कुचेष्टा, हेटाळणी, अपमानांना मर्यादा राहात नाही. लहानग्या अमिताभच्या हातावर “मेरा बाप चोर है” हे गोंदलं जातं. एका झंझावाताची ही नांदी असते.वय वाढतं तसा हा द्वेष सघन होत जातो. अमिताभची “एंट्री” च मुळात देवळाच्या बाहेर बसलेला दाखवुन झाली आहे. हमालाचा निळा गणवेश घातलेला, देवावर विश्वास नसलेला, गप्प बसलेला हा तरूण पोटात ज्वालामुखी दडवुन आहे याची सुजाण प्रेक्षकांना तत्काळ कल्पना येते.पुढे गूंड हप्ता मागायला येतात. तो न दिल्याने एका साथिदाराचा अपघातात मृत्यु ओढावतो. ही उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरते. अमिताभ हप्ता न देण्याचं ठरवतो. आणि त्यानंतर ती गोदामातली प्रसिद्ध हाणामारी होते.
आपल्याकडे हाणामारीच्या दृश्याकडे पाहण्याची प्रेक्षकांची दृष्टी चमत्कारीक आहे. काही फक्त देमार चित्रपटाचे प्रेक्षक असतात. काहींना वास्तवाशी कसलाही संबध नसलेली हिंसक दृश्ये आवडतात. बर्याचशा दक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणारी नारळाच्या बागेत अर्ध्या लुंग्या लावुन चाललेली हाणामारी देखिल चवीने पाहणारे प्रेक्षक असणारच. (यात नायकाच्या एकेका फटक्यात माणसे उंच आकाशात उडतात आणि गरगर गिरक्या घेत खाली कशावर तरी आदळतात.)तर काहिंना हे सारेच खोटे वाटते. मात्र “फाइट” सीन चांगला होण्यासाठी उत्तम अभिनयाची आवश्यकता असते, तो सीन जर चांगला झाला असेल तर त्यात काम केलेल्या अभिनेत्यांनी चांगला अभिनय केलेला असतो हे बहुधा प्रेक्षक मंडळी विसरलेलीच असतात. मारामारीचा अभिनयाशी संबंध काय??? पण “दिवार” मधील हे गोदामातील हाणामारीचं दॄश्य बारकाईने पाहिलं तर जाणवेल कि अमिताभच्या प्रत्येक हालचालित अभिनय भरला आहे. त्या त्वेषाचं “बेअरिंग” त्याने शेवटपर्यंत टिकवलं आहे.
गुंड अमिताभला शोधत गोदामात येतात आणि तो बर्फाळ थंड पण अंगावर काटा उमटवणारा आवाज त्यांच्या कानावर पडतो. “पिटर…. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूं”. पुढचं वर्णन करण्यात अर्थ नाही. ते पाहायलाच हवं. हातात फावड्यासारखं काहीतरी गावल्यावर अमिताभ प्रत्येकाला तो खाली पडेस्तोवर हाणत राहतो.सत्तरच्या दशकाच्या मानाने हे दृश्य अतिशय हिंसक आहे. मात्र त्याने कथा पुढे जाते. ते ठिगळ जोडल्यासारखं किंवा काही प्रेक्षकांची सोय करण्यासाठी टाकलेलं नाही हे जाणवतं. गळ्यात दोरखंडाने जेरबंद केलेला अमिताभ त्वेषाने दोन्ही बाजूंना खेचुन एकमेकांवर आपटतो हे अतिरंजित वाटत नाही केवळ अमिताभच्या अभिनयामुळे. हा सीन कमालिचा नैसर्गिक वाटण्यात अमिताभच्या अभिनया बरोबरच दिग्दर्शक यश चोप्रा , पटकथाकार सलिम जावेद, संगीतकार आर. डी. बर्मन आणि फाइट कंपोजर शेट्टीचाही हात आहेच. युनुस परवेझचा (हा एक अतिशय कसलेला अभिनेता) रहीम चाचा, मास्टर अलंकार (लहानगा अमिताभ)निरुपा रॉय, शशी कपूर या सार्या सहकलाकारांच्या अभिनयानेच अमिताभमधील द्वेष जास्त गडद वाटु लागतो. त्यांच्या अगतिकतेच्या, आदर्शवादाच्या आणि मध्यमवर्गिय विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर हा संताप आणखि अधोरेखित होतो.
अमिताभला “दिवार” मध्ये सुरुवातीपासून पाहताना ह्या ज्वालामुखीचा केव्हा आणि कसा स्फोट होणार हे पाहण्याच्या उत्सुकतेने प्रेक्षक बसलेला असतो. तो जवळपास अमिताभमयच झालेला असतो. त्याच्या सार्या निराशा, व्यवस्थेविषयीची चीड त्याने अमिताभला दिलेली असते. अमिताभच्या गुंडांवर हाणल्या जाणार्या प्रत्येक जोरकस फटक्यागणिक प्रेक्षकाच्या संतापाचा निचरा होत असतो. शेवटी लढाई जिंकुन अमिताभबाहेर येतो. त्याचे सहकारी हमाल त्याचा जयजयकार करतात्.आणि हा त्यांच्या काँडाळ्यातुन बाहेर पडुन नळाकडे जातो. नळ चालु करुन पाण्याच्या धारेखाली डोकं धरतो. त्याच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला तात्पुरतं का होईना शांत करण्यासाठी, काबुत ठेवण्यासाठी. आणि अशा तर्हेने एका परिपूर्ण दृश्याची सांगता होते.
अतुल ठाकुर
चालायचंच!
चालायचंच!
-गा.पै.
पश्चातबुद्धी : हत् सालं पान पण नेमकं बदललं. मागच्या पानावर हा संदेश हवा होता!
>अमिताभ बच्चन "डोळ्यांतून"
>अमिताभ बच्चन "डोळ्यांतून" अभिनय करतो> प्रचंड सहमत.
त्याचं अजून एक उदाहरण - "सरकार राज" मधे अभिषेक मरत असताना व्याकुळ झालेला अमिताभ, मुलानी शेवटाचा श्वास घेतल्यावर वर बघतो आणि त्याच्यातला 'सरकार' परत येतो.. फक्त डोळ्यातून केलेला अभिनय.
Pages