'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)

Submitted by रसप on 29 June, 2013 - 01:53

सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी. कुणाला 'डोक्याला शॉट' नको असतो, कुणाला काही तरी लॉजिकल हवं असतं, कुणाला 'आंबट' हवं असतं, कुणाला सेन्सिबल.. कुणाला गाणी, तर कुणाला कहाणी हवी असते.. कुणाला विशिष्ट नट/ नटी, तर कुणाला चांगला दिग्दर्शक, पटकथाकार..... वगैरे वगैरे. समजा असं सगळं सगळं एकाच चित्रपटात असेल तर ? Here is a flick, which has got the trick ! 'घनचक्कर; इज अ परफेक्ट 'स्ट्रेसबस्टर' !

थोडक्यात ष्टोरी अशी -
संजू (इम्रान हाश्मी) एक प्रतिष्ठित चोर असतो. प्रतिष्ठित म्हणजे किरकोळ हात न मारणारा. पुरेसा 'माल' कमवून झाल्यानंतर संजू आणि त्याची पत्नी नीतू (विद्या बालन) ठरवतात की, 'आता बस्स ! नो मोअर चोरी-चमारी, नो मोअर छक्के-पंजे.' But destiny has a different plan. पंडित (राजेश शर्मा - 'इश्क़िया' मधला 'कुक्कू') आणि इद्रिस (नमित दास - 'वेक अप सिड' मधला 'ऋषी') कडे एक प्लान असतो. बँक लुटायचा. त्यात त्यांना संजूची मदत हवी असते. हिस्सा असतो १० कोटी रु.!! '१० कोटी' ऐकल्यावर बायको म्हणते नवऱ्याला, 'मार एक आखिरी हाथ' आणि नवरा म्हणतो बायकोला, 'यह हुई ना दिल की बात !' संजू 'आखिरी हाथ' मारतो. प्लान यशस्वी होतो. भरपूर पैसा मिळतो. पण पैश्याची वाटणी, वातावरण थंडावल्यानंतर, म्हणजे साधारण ३ महिन्यांनतर करण्याचं ठरतं. पैसे सुरक्षित जागी लपवण्यासाठी संजूकडे दिले जातात. तो सुरक्षित, गुप्त जागी पैसे लपवतो.
तीन महिन्यांनी पंडित आणि इद्रिस परततात, तोपर्यंत 'झोल' होतो. ('विजय' वाला नाही, 'गडबड'वाला.) एका अपघातात संजूला स्मृतिभ्रंश होतो. हा स्मृतिभ्रंश गजनीसारखा नसतो. जास्त विश्वसनीय असतो. त्याला काही गोष्टी आठवत असतात आणि काही नसतात. लक्षात असलेल्या गोष्टीही तो अधून-मधून, हळूहळू विसरत चालला असतो. आणि त्याने अंगावर गोंदवूनही ठेवलेलं नसतं. कारण आधी गोंदवायचं लक्षात राहिलं पाहिजे, मग गोंदवेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे आणि मग गोंदवलेलं पाहण्याचं लक्षात राहिलं पाहिजे !

पुढे काय होतं ?
पंडित-इद्रिस काय करतात ?
पैश्याचा छडा लागतो का ?
खरोखर 'झोल' झालेला असतो की ह्यातही काही 'गेम' असतो ?
इत्यादीसाठी चित्रपट पाहा ! मी पैसे खर्च केले, तुम्हीही करा. इतकी ग्यारंटी देतो की पैसे वाया नक्कीच जाणार नाहीत.

ghanchakkar-movie-wallpaper-1.jpg

'आमिर', 'नो वन किल्ड जेसिका' मुळे राजकुमार गुप्ताकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 'घनचक्कर'मध्ये तो अपेक्षापूर्ती करतो. कहाणीवरील पकड कुठेच ढिली पडत नाही. संजूचा अपघात कसा झाला, त्याला कसं हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरने ओढलेला चेहरा करून 'डोक्यावर आपटलाय' हे कसं सांगितलं, वगैरे अनावश्यक गोष्टी दाखवण्यात वेळ घालवला नाहीये. बिनकामाची गाणी घुसडलेली नाहीत. पात्रांचा फापटपसारा करून ठेवलेला नाही. बांडगुळासारखी उपकथानकं तर नाहीतच. मुद्द्याची गोष्ट, तीसुद्धा मस्त ! एकूणच कहाणीला त्याने हलकी फुलकी ट्रिटमेण्ट दिली आहे. प्रासंगिक आणि संवादातील अनेक विनोद थेटरात हशा पिकवतात. संजूचं हळूहळू अधिकाधिक विसरभोळं होत जाणं अतिशय सहज दाखवलं आहे.

राजेश शर्मा हा एक ओम पुरी टाईप वाईट चेहऱ्याचा उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्याकडे जबरदस्त टायमिंग आणि संवादफेक आहे, हे तो पुन्हा पुन्हा दाखवत राहातो.

नमित दास सुरुवातीला 'टपोरी' म्हणून पटत नाही. कारण त्याच्या डोळ्यांत एक निरागसपणा जाणवतो, पण कहाणीच्या विनोदी हाताळणीमुळे तो हळूहळू 'इद्रिस' म्हणून फिट्ट होतो. तरी काही ठिकाणी त्याचं टायमिंग जरासं हुकतंच. ट्रेनमधील मिटींग्सच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या एका माणसाच्या सोबतच्या त्याच्या ३-४ छोट्याश्या प्रसंगात विनोदनिर्मिती तशी फसलीच आहे.

पंजाबी उच्चार आणि भक्कम अंगकाठीतून विद्या बालनने पंजाबी नीतू जबरदस्त उभी केली आहे. तिचं 'अतरंगी' फॅशन करणं लै भारी आहे ! खूप जाडी दिसत असली, तरी खूप सुंदरही दिसते आणि भूमिकेत घुसते.

इम्रान हाश्मी 'डायन'नंतर पुन्हा एकदा अभिनय दाखवतो. त्याला फक्त तोंडच नसून, चेहराही आहे आणि त्यावर 'इतर'ही अनेक भाव तो सहजी उमटवू शकतो, हे त्याने स्वत:लाच अधूनमधून आठवून देत राहायला हवं. संजूची हताशा, निराशा तो ज्या सहजपणे रंगवतो, तितक्याच सहजतेने त्याच हताशे-निराशेतून विनोदनिर्मितीही करतो !

अमित त्रिवेदीचं संगीत श्रवणीय आहे. लेझी लॅड, घनचक्कर बाबू आणि अल्लाह मेहरबान ही तिन्ही गाणी ठेका धरायला लावतात आणि दिलखेचक आहेत.

अनेक चक्करा मारून, वळणं घेणारा हा घनचक्कर वेगळ्याच शेवटामुळे मनाला अधिक पटतो. ३५ कोटींइतकी मोठी रक्कम पंडित-इद्रिस संजूकडे कसे काय देतात ? त्याचा अपघात झालेला त्यांना कळत कसं नाही ? ते त्याच्यावर नजर ठेवून नसतात की काय ? असे काही प्रश्न चित्रपट पाहाताना पडतात पण शेवटी सुटतात.

बऱ्याच दिवसांनी एक उत्कंठावर्धक विनोदी चित्रपट आला का ? कुणास ठाऊक ! आपल्याला तर स्ट्रेसबस्टर हवा होता.... मिळाला !!

रेटिंग - * * *१/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/perfect-stress-buster.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमरान हाश्मी अभिनय(ही) करतो? स्टोरी फारशी इंटरेस्टिंग नाही पण कदाचित सिनेमा असावा. बघुया, बाकी मंडळी काय म्हणतात ते.

शेवट प्रचंड फसलेला आहे...........दिग्दर्शकाला शेवट काय करायचा हेच सुचले नाही ऐनवेळेला शेवटची १० मिनिटे डोक्याता ताप आणतात... Angry

बाकी .........विद्या बालन चे "ह्हॅ" सारखे विचारणे आणि "खाना कैसा बना" हे मस्त टायमिंग वर येत...

प्रोमो बघितल्यावर पैसे टाकून बघायला जावा असे अजिबात वाटलेले नाहीये. त्यामुळे कुठल्यातरी चॅनेलवर येईलच तेव्हा बघणार.

मला विशेष आवडला नाही हा. मध्यंतरापर्यंत बर्‍यापैकी विनोदी आहे, त्यातही विद्या बालनमुळे जास्त. एक दोन धमाल सीन्स (ते चौघे जेवतात तो ई.) बघण्यासारखे आहेत.

इंटरव्हल नंतर मात्र खूप ताणला आहे. विद्या बालन सोडली तर बाकीच्यांमधे मला काडीचा इंटरेस्ट वाटला नाही. ते इम्रान हाश्मीच्या मागे लागलेले दोघेही जाम बोअर झाले मला.

आणि इम्रान हाश्मी? संपूर्ण चित्रपटभर एकच भाव चेहर्‍यावर ठेवला आहे असेच वाटले मला. कथेतील कॅरेक्टर नव्हे तर इम्रान हाश्मीच आता नक्की काय एक्स्प्रेशन्स द्यायचे आहेत ते विसरलाय असे वाटले Happy अशा कथेला मूळ विनोदी अभिनयाचे कौशल्य असलेला कलाकार पाहिजे. हाश्मीसाहेबांचे ते काम नाही. पूर्वी गोविंदासारख्याने सुद्धा धमाल उडवून दिली असती यात.

एखाद्या अभिनेत्याचे अनेक चित्रपट अनेकदा पाहिल्यावर त्याच्या छोट्या छोट्या एक्स्प्रेशन्स आपल्याला माहीत होतात, त्याचा संदर्भ लगेच जाणवतो (माझ्याबाबतीत अमिताभ, विनोदी रोल्स मधला कादर खान ई हिन्दीत व इंग्रजी सिरीयल्स मधे फ्रेण्ड्स मधले सहाही लोक व बिग बँग थिअरीमधला शेल्डन यात मोडतात). इम्रान हाश्मी चा असा काही फॅन बेस असेल, ज्यांना त्याच्या चेहर्‍यामधे काही अभिनय जाणवला असेल तर कल्पना नाही Happy

शेवट मलाही झेपला नाही नक्की. गाय रिची च्या चित्रपटांसारखे काहीतरी करायला जाताना पुन्हा त्यातही जरा वेगळे करो असे काहीतरी असावे, पण फसलेला वाटला. कोणाला त्यातील काही क्लू मिळाला असेल तर लिहा. एक चालीस की लास्ट लोकल, हेरा फेरी-२ (हा तर पूर्ण ढापलेला असूनही, किंवा त्यामुळेच) मधे जमले होते. येथे जमले नाही.

शेवट प्रचंड फसलेला आहे...........दिग्दर्शकाला शेवट काय करायचा हेच सुचले नाही ऐनवेळेला शेवटची १० मिनिटे डोक्याता ताप आणतात >> +१००

अ‍ॅन्टीक्लायमॅक्स वगैरेचा विचार होता की काय असे वाटते!