“वसंत – स्पर्श चैतन्याचा”

Submitted by vaiju.jd on 15 May, 2013 - 11:19

।। श्री ।।

नुकतीच फुटू लागली चैत्र पालवी, वसंताची झळाळी पानोपानी नवी ।

कुठे गुलाबी कुठे पोपटी नाजुक रंगकळा, सृष्टीचा साज असे आगळा |

लालकेशरी गुच्छ घेउनी उभा गुलमोहोर, आम्रही सुगंधी निजमोहोर ।

सुवर्ण पिवळे घोस झुलवित उभा असे बहावा, वसंताचा उत्साह दाटला नवा ।

आपणही असाच उत्साह घेऊन वसंताचे स्वागत करू या. जेरीला आणणाऱ्या ह्या उन्हाच्या दिवसात माणसांच्या शरीराची लाहीलाही तर झाडांच्या पानांना विलक्षण टवटवी! हा निसर्गातील विरोधाभास आहे. या रखरखाटात कुठून या झाडापानांना फुलण्याचा उत्साह येतो कोण जाणे? वसंतऋतु म्हणजे निसर्गाचे यौवन! अगदी शोडषेचा बहर! नुसती नजर फिरवली तरी निसर्गात इतक्या रंगांची उधळण दिसते, की मन खूष होऊन जाते. खरेतर श्रावणातही सृष्टी फुलून आलेली असते.भरपूर हिरवाई असते सगळीकडे आणि फुलेही! हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असतात पण तरीही वसंतात रंगांची जी विविधता असते, ती श्रावणात नाही. म्हणजे श्रावणातली सृष्टी ‘नवपरिणित वधू’ असते आणि वसंतातली यौवनातली अवखळ कुमारीका!

mohor

वसंताच्या आगमनाची द्वाही फिरवण्याचा मान सर्वप्रथम आम्रवृक्षाचा! सगळ्यात आधी याच्या अंगावर लालसर कोवळी पालवी येणार आणि त्यातून पोपटीसा मोहोर! बरे दुर्लक्ष करायचे ठरवलं तर तसेही जमणार नाही कारण त्याचा दरवळ! कुठल्याश्या भल्या श्रीमंताच्या कार्याला जाताना जरा अत्तराचा फवारा मारून जातात, तसा हा वसंताच्या स्वागतासाठी सुवासिक झालेला! जोडीला कोकिळाबाई, ‘कुहू कुहू’ करत साथीला. मग या उत्साहाची लागण बघता बघता सर्वांनाच होते.

gulmohor

गुलमोहोर बहरतो, हिरवी पोपटी पालवी कोवळीशी अन मधे मधे केशरी फुलांचे घोस! सायंकाळी काळपट लाल पाकळ्यांची पखरण.

bahava

मधेच कुठेसा बहावा दिसतो. पिवळे धमक सोनफुलांचे घोस घेऊन डुलत उभा असतो. ते लोंबणारे सोनपिवळे तुरे पहिली की केसात माळून आपणही डोलावसे वाटते. निसर्ग जणू पृथ्वीला यौवनात आली म्हणून बहाव्याची हळद आणि गुलमोहोराचे कुंकु लावतो आहे असे वाटते.

जांभळ्या फुलांना फुलवत तामण बहरतो. इतका सुरेख प्रसन्न रंग असतो की झाडाजवळून जाताना ज्याची नजर वर वळणार नाही तो अगदीच अरसिक!

taman

अशातच डोंगर पायथ्याशी किंवा उंच डोंगरावर पलाशवृक्ष बहरून येतो. त्याचा रंग जर भडक असतो. कुणीशा लेखकाने बहरलेल्या पलाशवृक्षाला पाहुन ‘ डोंगरावर जणू आगच लागली आहे असे वाटले’ असे लिहिले आहे.

palash

याशिवाय अमलताश, वेगवेगळ्या रंगांचे चाफावृक्ष, रक्तपर्णी कडुलिंब, आणि निवडुंगसुद्धा बरे कां! ह्याच्या काटेरी देहावर जेव्हा फूल फुलुन येते तेव्हा त्याच्यावरूनसुद्धा ममतेने हात फिरवावासा वाटतो.

या वेळेपर्यंत आंब्याचा मोहोर उन्हाच्या वणव्याने काळवंडतो. त्याचे दु:ख करत बसायला वेळ नसतो. कारण तोवर फलभारानी तो वाकलेला असतो. बरे सगळी का एका वयाची, कुणी लहान कुणी मोठी! सगळ्यांकडेलक्ष द्यायचे. दिमाखाने दागिने मिरवावेत तशा कैऱ्या मिरवत उभा राहणार!

जांभळी पाहिलीय बहरलेली?लहानपणी इंग्रजीच्या पुस्तकात चेरीच्या झाडाचे वर्णन असायचे, काळे लाकूड, हिरवी पाने, पांढरट फुले आणि लाल चेरी! आपली जांभळी अगदी तशीच! हिरव्यागार पानामधून पांढरट फुले, काही गुलाबीसर रंगाची तर काही काळीभोर झालेली जांभळे! सुरेख दिसते.

jambhul

याच्या जोडीने करवंद,जांभ आणि हो सुवासिक हांका मारून बोलावणारा फणसभाऊ! हे सगळे वसंताचे वैभव!

या काळात भारद्वाजाचे दर्शन अत्यंत शुभ मानले आहे. जराशाही वाऱ्याने धुळीचे लोट उठतात आणि झाडे पानापानांवर त्याचा मळवट लेवून उभी राहतात .

आणि माणसे सुरक्षितपणे घरात उन्हापासून वाचण्यासाठी दाराखिडक्यावर पडदे सोडून, पंख्याचे वारे घेत, गारसे पेय पित असतात. वसंताचे वैभव बघायलाही घराबाहेर पडायला तयार नसतात. या काळात आकाश अगदी निरभ्र निळ्या रंगाचे असते. भरदुपारी नजर टाकली तर आकाशी रंगावर हिरव्या, तांबड्या किंवा पिवळ्या जांभळ्या रंगाची नक्षी इतकी खुलुन दिसते की असे ‘डिझाईन’ कुणाच्याही साडीवर साडीवर कधीही पाहायला मिळत नाही.

उन्ह लागु नये म्हणून आपण किती जपतो आपल्याला! हा ‘जपण्याचा’ धर्म प्रत्येक मनात जागता राहावा म्हणून तर नसेल ना हा ‘वैशाखवणवा’? ताप काय असतो ते समजते तेव्हाच सुख कशात आहेत ते समजते. रणरणत्या उन्हाने करपून जाण्याच्या बरोबरीने गार झुळुकही सुखावायला येते. दु:खाच्या वणव्यातही जगण्याची इच्छा कशी जागृत ठेवावी, हेच वसंऋतुतुन निसर्ग दाखवत नसेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users