मालकी

Submitted by vaiju.jd on 16 April, 2013 - 11:45

।। श्री ।।

लग्न करून मुंबईत आले.सुरवातीला मोठ्या दिरांनी आश्रय दिला. मुंबई फिरणे, हौसमौज करता करता मध्येच तिसऱ्या जिवाची चाहूल लागली. आणि घराची- स्वतंत्र घराची गरज लक्षात आली. सतरा वर्षाच्या स्वप्नाळू डोळ्यांना मुंबईत एका खोलीची जागा मिळणे कठीण आहे हे दिसल्यावर अंधारीच आली. पण कल्याणच्या नणंदेच्या ओळखीनी डोंबिवलीतल्या तिच्या नातेवाईकांच्या चाळीत दोन खोल्यांची चांगली जागा राहण्यासाठी मिळाली. भाड्याची रक्कमही ऐपतीतली होती.हुश्श झाले. फक्त एकच गोष्ट जरा त्रासदायक ठरू शकत होती ती म्हणजे नवऱ्याने रोज डोंबिवली- बोरीवली प्रवास ट्रेनने करणे त्यातही शिफ्ट ड्यूटी !आणि त्यातही पाच एक महिन्यात एका नव्या बाळाचे आगमन!

पण संसार सुरु झाला की परिस्थिती अंगवळणी पडत जाते, मार्ग सापडत राहतात. बघताना एखाद्या खड्ड्यावरून ओलांडून जाणे अशक्य वाटते पण प्रत्यक्षात आपण सहजच ओलांडून जातो.तसेच झाले. थोडीफार गरजेपुरती भांडी सामान घेऊन संसार सुरु झाला.

बघता बघता माझ्या अठांगुळाची वेळ झाली. तशी पुण्याहून आई, सांगलीहून सासूबाई आल्या.सासूबाई थकलेल्या होत्या. बसून बसून काय कसे करायचे नेटके सांगायच्या. बुद्धीनी अतिशय हुषार आणि अतिशय वास्तववादी! चार दिवस घराचे निरीक्षण करून बरोबर आलेल्या नानाभाऊजींना म्हणाल्या, ' यादी कर, थोडी भांडी आणि जरुरीच्या वस्तू आणायच्या आहेत. '

मग आई, सासूबाई, मी आणि नाना आम्ही दुकानात भांडी घेतली. नांवे घालायची वेळ आली, तशी आई म्हणाली, 'जावयाचे नाव घालायचे कां ?' तशा सासूबाई म्हणाल्या,' नाही , नको, नांव सुनबाईचेच घाला.घराच्या वास्तूवर नेहेमी घरातल्या पुरुषाचे आणि आतल्या सामानावर घरातल्या बाईचे नाव असावे म्हणजे त्या घराच्या ओढीने पुरुषाला सायंकाळी घरी परतावेसे वाटते आणि नवर्याच्या अपरोक्षही कुणीही घरी आले तरी आपल्या भांड्याकुंड्याचा उपयोग करून आलेल्या पाहुण्यांना सुखी, खुश करण्याची बाईला बुद्धी होते. नंतर संसार करताना 'ति.सौ सासूबाईंचे' हे वाक्य सतत स्मरणात असायचे. घर त्यांचे पतीचे असले तरी हा प्रपंच माझा आहे हे सतत वाटायचे.

आजकाल बदलत्या जमान्यात इमारतीच्या खालच्या पाटीवर कितीतरी फ्लॅट मालकीसाठी स्त्रियांची नावे वाचताना किंचित अडखळायला व्हायचे. वास्तवाचे भान ठेवताना बदलती समाज व्यवस्था स्विकारायला हवी हे मी स्वतःला पटवायला शिकले.

आणि आमच्या मुलाच्या फ्लॅटवर सुनेच्या नावाची पाटी लागली तेव्हा मला ते अगदीच जमले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, यांनी एका मतांतराचा प्रवास नेमका मांडला आहे आणि ते मतांतर अभिनंदनीय आहे.
वंदना बर्वेंसारखा अनेक परस्परविरोधी मुद्दे एकाच लेखात घेऊन घोळ घातलेला नाही. तुम्ही नक्की काय सुचवू इच्छिताहात? मायबोलीकरांना वंदना बर्वे यांच्याबद्दल काही वैयक्तिक आकस आहे का? यांच्या लेखावर मत द्यायचं सोडून इथे हे अवांतर कशाला?

<,एका मतांतराचा प्रवास नेमका मांडला आहे आणि ते मतांतर अभिनंदनीय आहे.>>
अगदी अचूक.
खरच गप्पा मारल्यासारखं स्फुट. छानय.

>> इब्लिस | 18 April, 2013 - 00:20
बाई तुम्ही हाच लेख वंदना बर्वे आयडी ने टाका
--------------------------------------------------
सन्दर्भ कळु शकेल का याचा?

नाही. तो मुळातच अवांतर प्रतिसाद आहे. कृपया दुर्लक्ष करावे.

कधीतरी संदर्भ आपोआप समजेल, पण त्यासाठी मायबोलीवर जुने व्हावे लागेल. Happy पूर्वी 'म्हातारा हो' असा आशिर्वाद देत असत. तसेच, जुन्या व्हा असे म्हणतो.

कमी शब्दात नेमकं लिहिलंय. आवडलं.

स्वाती+१.
इब्लिस, उडवा तो प्रतिसाद. उगाच काय!
वंदना बर्वे नी असा लेख लिहिला तर त्यांचंही कौतुक होईलच.

अरे व्वा ! खुप छान .. खरं सांगायचं तर हे ज्याला जमलं त्यालाच आयुष्य उमगलं .. पाटा खेळपट्टीचा सराव असताना तुम्ही गवत असलेल्या खेळपट्टीवर शतक ठोकलेत .. बॅट वर करा.. आम्हाला अभिनंदन करू द्या !

एका मतांतराचा प्रवास नेमका मांडला आहे आणि ते मतांतर अभिनंदनीय आहे>>> +१.

खूप छान आणि सहज लिहिलंय. आवडलं. Happy

सहज सोप्प आणि अप्रतिम................खरतर सोप्प नाही म्हणता येणार कारण यासाथी विचारानी खुपच परिपक्व असायला हव.

खुप छान .. खरं सांगायचं तर हे ज्याला जमलं त्यालाच आयुष्य उमगलं >>>>>>>>>>>>>>+१

इब्लिस, डॉक्टरकी सोबत डीटेक्टिव्ह पण आहात की काय ? Happy
छान लेख. लक्षात ठेवेन.