केवडा

Submitted by अव्या खलिफा on 13 February, 2013 - 02:25

1234.jpg

लहान पणी गणपतीपुळ्यात रहात असताना तिथल्या बाजारात स्थानिक कुणबी बायका टोपल्यांमध्ये केवड्याची फुलं, कोकमं वगैरे घेऊन विकायला बसलेली असायची. जिथे राहत होतो तिथेच एका बाजूला विस्तीर्ण पसरलेलं केवड्याच बन होतं. पण साप असतो वगैरे गोष्टींमुळे तिथे जायचं धाडस कधी झालं नाही.
शाळेतून येता जाता मी त्या टोपलीतल्या हिरवट पिवळ्या सुगंधी सोन्याकडे कुतूहलाने बघायचो.
गणपतीपुळ्यात येणार्या पर्यटक लोकांना सुद्धा बहुदा ते नवीन असायचं, सांगतील त्या किमतीला घ्यायला तयार असायची ती लोकं.
तिथे एक गुरवीण सुद्धा होती, आईला काही घ्यायचं झालं तर ती तिच्याकडेच घ्यायची, त्या गुरवीणीला माहित होतं मला केव्डयाच्या फुलांची किती आवड आहे, ती मला त्यातली एखादी पाकळी काढून द्यायची,
मग मी ती जपून ठेवायचो आणि दुसर्या दिवशी माझ्या शाळेच्या बाईंना द्यायचो.
माझ्या कम्पाउंड ला लागुनच एका हॉटेल च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तेव्हा ते केवड्याचं हिरवगार घनदाट बेट उपटून टाकलं.
पुढे शहरात राहायला आलो त्यानंतर काही ७-८ वर्ष मला केवडा नावाला सुद्धा दिसला नाही.
पण तो केवडा मनात जपला होता, त्याचा तो अद्वितीय सुवास कित्येक वर्ष मनात घर करून होता.
कधी स्वप्न सुद्धा पाहीलं होतं कि माझ्या कडे असं गच्च केवडयाचं बन असावं आणि त्याच्या फुलांमुळे सगळा वावर सुगंधी व्हावा.

एके वर्षी माझ्या गावी मे महिन्यात पर्याच्या बाजूने भटकत असताना हवेच्या झुळकेबरोबर एक उग्र सुगंधी भपकारा आला आणि मला माझी हरवलेली श्रीमंती मिळावी तसा मी उत्साहित झालो, शोध घेतला तेव्हा मला अक्षरशः घबाड मिळालं होतं केवडयाचं.
इतकी वर्ष माझी त्या ठिकाणी ये जा होती तरी सुद्धा मी ह्या बाबतीत अनभिज्ञ होतो ह्या गोष्टीवर मला विश्वासच बसेना.

गच्च हिरवी गार झाडी, त्यावर हिरवट पिवळे केवड्याचे कोके, काही फुललेले.. काही बाळसेदार,वार्याच्या झुळूकेबरोबर येणारा मनाला वेड लावणारा दरवळ , आणि त्यांवर पाण्याचं सुर्यकीर्णांच रिफ्लेक्शन पडून दिपलेले डोळे..............ओह्ह तो सोहळा मी डोळ्यात साठवून घेतला,
काखेत कळसा आणि गावाला वळसा अशातली गत झाली होती माझी.
खरंच माझं गाव खूप समृद्ध आहे ह्याचा अजून एक दाखला मिळाला होता मला.
मी आजही त्या ठिकाणी जातो आणि त्या फुलांकडे बघता बघता आठवणींची मालिका रचतो.
पण थोडयाशा लबाडीने म्हणा किंवा काळजीने म्हणा मी हि अलीबाबाची गुहा कुठे आहे हे मात्र कुणाला सांगत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवि.. खुप छान लेखन.. तुझ्याकडल्या केवड्याचा वास आता इथे बसुनहि येतोय रे . Happy

ही अंबोलीमधली, हिरण्यकेशीच्या उगमाजवळची जागा आहे का ? तिथे एक झाड असेच आहे.
वस्तीजवळ केवड्याचे झाड असले तर कणीस फुटताक्षणीच तोडले जाते, त्यामूळे असा अनुभव अगदी विरळा !

दिनेशदा............
नाही हो हा फोटो माझ्या गावी म्हणजे राजापूर मध्ये घेतला आहे.
Happy