सियाचीन ग्लेशीयर.....भाग ३

Submitted by रणजित चितळे on 4 January, 2013 - 09:15

ह्या आधीचे...

सियाचीन ग्लेशीयर ...भाग २......

Picture12.jpg
(माझ्या सहका-याने काढलेला फोटो)

........हेलिकॉप्टरने त्या हिमखाईच्या वरती होवर करून ‘जीपीएसचे’ संदर्भ घेतले व जरा लांब वर जाऊन हेलिकॉप्टर उतरवले. तेथेच उतरवले असते तर त्याच्या फिरणाऱ्या पंख्याच्या वाऱ्याच्या रेटाने, अडकलेल्या जवानांना त्रास झाला असता. पॅट्रोल लीडरने रेस्क्यू टीमला भेटून हिमखाई दाखवली. तो पर्यंत हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन येण्यासाठी परत बेस कँपकडे उडले.......

रेस्क्यू टीम लीडर एक कॅप्टन होता. हिमखाईत डोकावून, आपल्या विजेरीचा झोत हिमखाईत सगळ्या दिशेने पाडत, डोके नकारार्थी हालवत, कॅप्टन स्वतःशीच पुटपुटला, "विश्वासच बसत नाही". हिमखाई, अंदाजे वीस ते तीस फुटा पर्यंत खोल गेली होती. पुढे अरुंद होऊन घळी सारखी आत गेली होती. अरुंद झालेल्या खाईमुळे तो आत पडलेला जवान वाचला होता. पण खाली पडण्याच्या जोराने तो खाईच्या त्या अरुंद फटीत अडकला होता असे वाटत होते. कारण त्याच्याकडून कसलीच हालचाल होत नव्हती. हिमखाईच्या भिंती इतक्या जवळ होत्या की त्या अडकलेल्या स्थितीत त्याला जोरच लावता येत नसावा.

कॅप्टनने त्याच्या विजेरीचा प्रखर झोत त्या जवानाच्या पलीकडे पाडून अजून आत पर्यंत डोकावायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काळोखा व्यतिरिक्त काहीच दिसले नाही. विजेरीच्या झोतात अडकलेल्या जवानाला कॅप्टनने न्याहाळले, कोठेही रक्ताच्या खुणा नव्हत्या, हिमखाईत पडल्यामुळे त्याला फार इजा झाली असेल असे वाटत नव्हते. त्याचे हातही मोकळे होते, त्यातल्या त्यात हे बरे होते. टीम लीडर कॅप्टनने त्याला हाक देऊन हात हालवायला सांगितले. पण एका तासापासून त्या गोठवणाऱ्या हिमखाईत राहिल्यामुळे तो जवान अशक्त झाला होता. अशक्तपणा आल्याने त्याच्या हात हालवण्यात काही दम राहिला नव्हता. पण जाणीव अजून कायम होती, त्या निमुळत्या होत गेलेल्या खाईमुळे कदाचित त्याचे कमरे खालील अंग दिसू शकत नव्हते.

परिस्थितीचे प्राथमिक अवलोकन करून झाल्यावर, रेस्क्यू टीमने कामाला सुरवात केली. असे ठरले की पहिल्यांदा बरोबर आणलेल्या एका दुसऱ्या दोरीने त्या जवानाला बांधायचे. बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक खाईच्या बाहेर काढायचे व पक्क्या बर्फात पहारीने खणून डांबरी खिळ्यांनी पक्के करायचे. हे केल्याने त्या जवानाचे वजन ती दोरी घेईल व निदान तो वजनामुळे अजून आत जाणार नाही. त्याला बांधायचे म्हणजे टीमला हिमखाईच्या आत उतरावे लागणार होते. हे करण्यासाठी टीम, हिमखाईच्या तोंडाजवळचा बर्फ बाजूला करायला लागून व भक्कम अशी नढासळणारी जागा शोधायला लागले. त्यांना डांबरी खिळ्यांनी रेस्क्यू टीमची दोरी पक्की बांधता यावी अशी जागा पाहिजे होती. थोड्याच वेळात, रेस्क्यू टीम ने वापरायची दोरी बांधलेल्या जागेवरून सुटणार, तुटणार किंवा सटकणार नाही अशी जागा शोधली. हे काम चालले होते तेव्हा जवानाला कसे पटकन वाचवता येईल ह्याचा विचार कॅप्टनला सतावत होता. हिमखाईतून एखाद्याला वाचवण्याचे काम खूप अवघड व धोक्याचे असते. बऱ्याच वेळेला हिमखाईमध्ये वितळळेल्या बर्फाचे पाणी होऊन खाली पडता पडताच परत बर्फ तयार होतो त्यामुळे असंख्य निमुळते बर्फाचे भाले, खाईच्या तोंडातून खाली ओघळलेल्या स्थितीत गोठून तयार होतात. भयंकर कडक व टोकदार. ह्या भाल्यांचे नीट ध्यान ठेवले गेले नाहीतर जवानाला वर खेचताना त्याच्या अंगात हे बर्फाचे भाले रुतूनच तो मरायचा. हे टाळण्यासाठी, असे ठरले की, टीम मधल्या एकाने कमरेला दोरी बांधून खाली जायचे, त्या खाईतल्या जवानाला आपल्या पाठीवर बांधायचे, कारण स्वतःहून काही करायची ताकद त्याच्यात बहुदा राहिली नसावी. त्याला पाठीवर बांधल्यावर, आपले स्वतःचे तोंड खाईच्या भिंतीकडे करायचे व हातात वरून येणारी दोरी धरलेली असताना पायांनी भिंतीला जोरात रेटा द्यायचा. रेटा दिल्याने आपण व तो जवान क्षण भर भिंती पासून दूर जातो, त्याचवेळी, वरती असणाऱ्या टीम मधल्या एकाने ती दोरी वर ओढायची. हिमखाईत असणाऱ्याने भिंतीला रेटा देणे व वरच्याने दोरी ओढणे हे एका वेळेला झाले पाहिजे. नाहीतर वरच्या टीम मधल्या जवानाच्या नुसतेच दोरी ओढण्याने ते खाईतले दोघेही भिंतीवर घसटून वर येत असताना बर्फात तयार झालेल्या भाल्यांनी दोघांनाही भोसकले असते. नशिबाने ह्या हिमखाई मध्ये असे टोकदार भाले कमी होते. पण येथे दुसरेच एक संकट होते. अडकलेल्या जवानाला बराच वेळ झाल्यामुळे त्याच्यावर बर्फाची पुटे चढून तो हालू शकत नव्हता. जमलेल्या बर्फाने त्याचे वजनही वाढले होते. कॅप्टनच्या मनात विचार आला... काहीही झाले तरी त्याचे पाय तर गेलेच आहेत. ५० मिनिटे ह्या गोठणाऱ्या शून्यापेक्षा खाली ४० सेल्सियस तापमानात राहिल्याने त्याला वाचवल्यावर सुद्धा बेस कँपवर गेल्यावर डॉक्टर्स ना त्याचे पाय कापूनच टाकावे लागणार होते. कारण एवढा वेळ गेल्यावर नक्कीच त्याला फ्रॉस्ट बाइट झाला असणार होता. कापण्याशिवाय गत्यंतर नाही. पण कॅप्टनला त्याचे पाय कापले जाण्याची काळजी एवढी वाटत नव्हती किंवा दुःख नव्हते. त्याचे पहिले काम त्या जवानाला हिमखाईतून काढायचे होते. तो मरायच्या आधी. बेस कँपवर त्याच्या पायांचे काय होणार ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या होत्या व सद्ध्य परिस्थितीत गौण वाटाव्या असा प्रसंग होता.

हे करता असताना त्यांना परत एकदा हेलिकॉप्टराचा आवाज कानावर पडायला लागला. हेलिकॉप्टर, रेस्क्यू करणाऱ्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन आले होते. आत उतरण्या आधी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची राहिली होती.... हिमखाई किती खोल आहे ते नेमके समजत नव्हते. त्याचा अंदाज घेणे खूप जरूरीचे असते. हिमखाई खूप खोल असेल तर अडकलेल्या जवानाला वाचवण्यासाठी वेगळे प्रकार करावे लागतात. जोखीम पत्करून टीम स्वतःला बांधलेली दोरी सोडून त्यात उतरतात, कारण मोकळ्या हाताने व न बांधल्या गेलेल्या शरीराने काम करायला सोपे जाते व पटकन होते, हे खाई कमी खोल असेल तरच करता येते.

हिमखाईच्या खोलीचा अंदाज सगळ्यात शेवटी घेतला जातो. अगदी आत उतरण्या आधी. असे करण्याला कारण असते. जे खाईत सापडलेले असतात त्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज बांधता येतो. आत पडल्यावर त्यांचे वागणे जसा वेळ जाईल तसे बदलत जाते. कधी भीतीने आरडाओरड तर मन स्थिरावल्यावर बदलणारे वागणे ह्या सगळ्याचे एक चक्र असते. हिमखाईत पडल्यापडल्या पहिल्यांदा, व्यक्तीला भीतीने घेरले जाते, व आता आपण मरणार ह्या कल्पनेने अशी व्यक्ती, हातवारे व जोरजोरात किंकाळ्या फोडायला लागतात. जे पडल्या पडल्या मरतात त्यांच्या डोक्यात मरायच्या आधी काय विचार येत असतील ते कळायला मार्ग नाही. पण जे काहीच भाग्यवान असतात व ज्यांना खाईच्या बाहेर जिवंत निघता येते, ते सांगतात की पहिल्या काही मिनिटातच मनावर ताबा बसतो व शांत होऊन बाहेर कसे निघायचे त्याचा विचार सुरू होतो. थोड्याच वेळात त्यांना जेव्हा समजते की त्यांच्यासाठी बाहेरून वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तेव्हा त्यांची आशा वाढते व ते पण त्यांच्याकडून प्रयत्न करायला लागतात. अशा भाग्यवानांना मनातून ठाऊक असते की जिवंत राहायची किंमत मोजावी लागेल कदाचित.., कधी हात, किंवा पाय, किंवा हाताची बोटे फ्रॉस्टबाईट मुळे कापावी लागतात. खूप थंड गोठणाऱ्या तापमानात आपले शरीर, बचावासाठी, हाता पायांच्या रक्ताच्या कॅपीलरीज आक्रसून घेतात. हे शरीराचे बचाव तंत्र आहे. त्याने शरीराचे तापमान काही प्रमाणात स्थिर राहते. पण फार वेळ त्या कॅपिलरीज आक्रसलेल्या अवस्थेत राहिल्या तर शरीराचा तेवढा भाग मरून जातो. पण म्हणतातना – सीर सलामत तो पगडी पचास.... ह्या हातपाय गमावण्याच्या विचारांनी ते दुःखी होत नाहीत. पण हे तेव्हाच घडते जेव्हा त्यांना जाणवते की, आपण ज्या हिमखाईत पडलो आहोत ती खूप खोल नाही, मदतीला लोकं आली आहेत, प्रयत्न चालू आहेत, बाहेर हेलिकॉप्टराचा आवाज यायला लागला आहे, व काही वेळातच आपण खाईतून बाहेर येऊ शकू. अशा स्थितीत एकदम मनाला उभारी येते व मना बरोबर शरीर साथ द्यायला लागते. पण काही वेळेला जेव्हा अडकलेल्या जवानाला समजते की परिस्थिती वाटली होती त्या पेक्षा भयंकर आहे तेव्हा कमी झालेली भीती, परत मनात घर करते. अशा अडकलेल्या जवानाच्या मनाला जोरात झटका बसतो. त्याला त्याच्या पुढे उभे ठाकलेल्या मरण ह्या सत्याची जाणीव होते. असा जवान जोर जोरात आरडा ओरडा करायला सुरवात करतो. त्याच बरोबर सुटकेसाठी जेवढे त्राण राहिले उरले असतील ते जमवून तडफड करायला लागतो. आता पण असेच झाले. एका तासाहून जास्त वेळ हिमखाईत पडल्यामुळे प्रचंड थंडीने त्याच्या शरीराच्या सगळ्या संवेदना गेलेल्या होत्या. अशा लोकांना संवेदना गेल्यात हेच समजत नाही व असे वाटत राहते की आपण खाईच्या तळाशी उभे आहोत. जे फसवे असते. फक्त मनाची विचार करायची शक्ती शाबूत असते. नेमक्या अशा वेळेला जर त्या अभाग्याला एकदम जाणीव झाली की खाली हजारो फूट खोल खाईत तो मध्येच लटकला आहे किंवा अडकला आहे, त्या वेळेला त्याला नुकतेच पोहायला शिकलेल्या मुलाला पोहता पोहता एकदम जसे कळते की तो पुलाच्या खोल भागात आला आहे तेव्हा जसे त्याला वाटते तसेच वाटते.

खाईतची खोली जाणून घेण्यासाठी टीम लीडरने हळूच बर्फाचा एक दगड त्या खाईत ढकलला.

'शीट्’. त्या ढकलेल्या दगडाचा खाईच्या भिंतींना आपटत खाली जाण्याचा न थांबणारा किणकिणाट ऐकून कॅप्टन निराशेने उच्चारला. हिमखाई खूपच खोल होती. त्याने स्वतःची दोरी कंबरेला नीट बांधली गेली आहे ते तपासले व अजून वेळ न घालवता खाईत उतरू लागला. खाई बाहेर उभा असलेला त्याचा साथीदार दोरी धरून, हळूहळू जसे लागेल तसे दोरीला ढील द्यायला लागला. हेलिकॉप्टराने आलेल्या टीम मधल्या बाकीच्या दोघांनी सुद्धा खाईत खाली जायची तयारी सुरू केली.

"माइक वन टू बेस. वी आर इन" रेस्क्यू टीम मधल्या एकाने रेडिओत खेकसले.
पंधरा किलोमीटर आणि १०००० फुटा खाली बेस कँपवर एका स्पीकर मधून आवाज प्रसारित झाला. प्रयत्न सुरू झाल्याचे बेस कमांडरला कळले व बेस कमांडरने निःश्वास टाकला. बेस कँपच्या बेस कंट्रोल रूम मध्ये बसलेले अनुभवी नेहमीच अशा संकटाच्या वेळेला रेस्क्यू टीम लीडरला सल्ला लागला तर द्यायला तयार बसलेले असतात. कंट्रोल रूम मध्ये एक डॉक्टर पण असतो. अशीच वेळ आली तर प्राथमिक उपचाराचा सल्ला तो देऊ शकतो. रेस्क्यू टीमला प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिलेलेच असते. काम करताना रेस्क्यू टीमला अजून कशाची जरूर भासली तर ताबडतोब निर्णय घेऊन बेस कमांडर अजून एका हेलिकॉप्टर बरोबर शक्य असतील त्या गोष्टी पाठवतो.

जवानाला वाचवता वाचवता कधी कधी भावनेच्या भरात रेस्क्यू टीमच्या हातून चुकीचा निर्णय घेतला जातो, त्याने बाकीच्यांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अडकलेल्या जवानाला वाचवता वाचवता बाकीच्या सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा वेळेला कंट्रोलरुम मधले अनुभवी असले भावनेच्या भरात चुकीचे घेतलेले निर्णय रद्दबादल करतात. हे त्यांचे काम असते. नाहीतर भावनेच्या भरात खाईत पडलेल्याला वाचवण्यासाठी असे काही विपरीत निर्णय घेतले जातात की सगळ्यांचा जीव धोक्यात येतो.

रेस्क्यू टीमला जाऊन आता एक तास झाला होता. कंट्रोल रूम मधले सगळे घड्याळाकडे बघत डॉक्टरकडे प्रश्नार्थी मुद्रेने नजर वळवली. डॉक्टरने मान हालवत न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले "स्लिम्, व्हेरी स्लिम चांसेस ऑफ हिज सर्व्हायव्हल"

"बेस वि आर कमींग बॅक." चॉपर पायलटचा रेडिओ बोलत होता. रेस्क्यू टीमला पोहोचवण्याचा त्यांच्या कामाचा पाहिला भाग पूर्ण झाला होता. आता दुसऱ्या भागात रेस्क्यू टीम व त्या आठव्या अडकलेल्या जवानाला घेऊन बेसला परत यायचे राहिले होते. सगळ्यात महत्त्वाचे तेच होते. हा दुसरा भाग त्यांना पूर्णपणे नेहमी जमायचाच असे नाही. कधीकधी त्यांच्या परतीच्या लोकांच्या यादीत म्हणजे मॅनीफेस्ट मध्ये घेऊन गेलेल्या संख्ये पेक्षा कमीच नावे असायची! असे झाले तर फार वाईट वाटायचे सगळ्यांना.

अरुंद तोंडाच्या हिमखाईमुळे तेथल्या टीमने असा निर्णय घेतला की एका वेळेला दोनच मदतनीस खाईत उतरतील. दुसरे दोन, आतले दमले की आत जाण्यास किंवा आत गेलेल्यांना मदत करण्यास खाईच्या तोंडाशी तयार राहतील. अजून एका कारणासाठी ते बाहेर सज्ज राहिले होते ते म्हणजे, वाचवता वाचवता रेस्क्यू टीम मधलेच कोणी फसले तर त्याला लागलीच ओढून बाहेर काढायला.

टीम लीडर, खाईत उतरून अडकलेल्या जवाना जवळ गेला. आता पर्यंत एकटे पडलेल्या जवाना जवळ कोणीतरी आल्यामुळे, त्या जवानाच्या तोंडावर कृतज्ञतेचे भाव उमटले. टीम लीडरने त्याच्या हाताचा विळखा त्याच्या अंगा भोवती घातला तेव्हाच खाली गेलेल्या दुसऱ्या मदतनिसाने एका दोरीचा लूप करून अडकलेल्या जवानाच्या वरच्या अंगाला दोरीने बांधले. तो अजून खाली घसरू नये म्हणून व त्याला वर खेचायला सोपे जावे म्हणून पण. विजेरीच्या प्रकाशात अजून जवळून त्याला बघितल्यावर मदत पथकाला असे कळून आले की तो त्या घळीमध्ये अडकला आहे. काम अवघड आहे पण पूर्वी केलेले असल्या कारणाने त्यांना खात्री होती.

टीम लीडरने दोरीला दोनदा ताण दिला, वरच्यांना कळले आता ओढायला सुरवात करायची म्हणून. सगळ्यांनी मिळून दोरी ओढली. काहीच झाले नाही. त्यांना काही कळेना असे का होत आहे, दोरी कोठे फसली तर नाही ते बघितले पण कोठेही फसली नव्हती. खाईत त्या जवाना बरोबर असलेल्या टीम लीडरने ओरडून अजून जोरात ओढा म्हणून ऑर्डर सोडली.

आता जेवढे जवान खाईच्या वरती होते त्या सर्व जणांनी सगळी ताकद लावली तरी काही होईना. त्या ओढण्याने मात्र त्या अडकलेल्या माणसाला बसलेला दोरीचा विळखा अजूनच घट्ट झाला. एवढे करून सुद्धा अडकलेला जवान थोडा सुद्धा सरकला नाही. परिस्थितीचे गांभीर्य टीम लीडरला पहिल्यांदा कळले, मग टीमला कळले आणि शेवटी त्या अडकलेल्या जवानाला देखील. तो पर्यंत तो अडकलेला जवान शांत होता. त्याला वर काढले जायची आशा होती. रेस्क्यू टीम आल्याने त्याच्या आशा उंचावल्या होत्या. टीमने सुद्धा त्याला धीर दिला होता. रेस्क्यू टीमला तशी शिकवणच असते. अशा खाईत अडकलेल्याला पहिल्यांदा आशा दाखवायची. जीवनासाठी अतिशय महत्त्वाची असते. आशेच्या जोरावर माणूस कठीण परिस्थितही तग धरतो. पण आता त्या आठव्या जवानाला समजून चुकले की आपण अडकलो आहोत. हे कशामुळे झाले असेल? ज्या वेळेला तो खाईत पडला तेव्हा पासून सगळे त्याला सांगत होते हालू नकोस म्हणून. कारण हालण्याने, त्या बर्फाच्या खाईत तो अजून अजून रुतेल किंवा अजूनच आत जाईल व एकदा रुतला गेला की मग तिथे मदत पोहचवता येणार नाही. ह्या भयाने सगळे त्याला हालू नकोस अशी सूचना करत होते. त्याचे मन पण त्याला हेच इशारत होते. कारण हालचालीने ठिसूळ बर्फ तुटतो व आधार सुटल्यावर सरळ खाली हजारो फूट पृथ्वीच्या पोटाशी पडणे जेथून सुटका नाही. पण न हालण्याचा ह्याच निर्णयामुळे सगळा सत्यानाश झाला होता. सगळ्यांना एकदम समजून चुकले की जवान खाईत पडल्यावर जेथे अडकला होता तेथला बर्फ नेहमी आढळणारा ठिसूळ बर्फ नव्हता पण त्या उलट येथे असणारा बर्फ टणक होता. त्यामुळे अशी घट्ट पकड बसली गेली होती की त्याला बांधलेल्या दोरीला कितीही जोर लावून ओढले तरी तो जवान काही सुटत नव्हता. ओढण्यामुळे मात्र दोरी त्याच्या शरीराला आवळत चालली होती. साऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. आता काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागणार होता. वेळ निघत चालली होती. तो जेव्हा पडला तेव्हा त्याचे शरीर त्या बर्फाच्या भिंतीला लागल्या मुळे अगदी निमिषासाठी त्याच्या अंगाच्या गरमीने बर्फाचा पृष्ठभाग थोडा वितळता वितळता लागलीच असलेल्या गारठ्याने गोठला गेला असावा व त्या प्रक्रियेत त्याचे अंग बर्फाच्या भिंतीला पक्के चिकटले गेले असावे. आपल्या फ्रीजमध्ये जसे कधीकधी बर्फाचा ट्रे फ्रीझर मध्ये चिकटून बसतो तसा. असे झाले असेल किंवा, ग्लेशीयरच्या पोटामध्ये सारखी हालचाल होत असते, नेमकी तो पडल्या पासून कदाचित खाईचा निमुळता होत गेलेला भाग अजूनच जवळ आला असेल व आपल्या मगर मिठीत त्याला घेतले असेल. हे कारण का ते कारण, कोणालाच कळायला मार्ग नव्हता. ह्या गोष्टीवर विचार करण्या इतका त्यांच्या जवळ वेळ पण नव्हता. त्या घटकेला टीम लीडरला एवढे कळत होते की वरच्या नऊ लोकांची एकवटलेली ताकद त्या दोरीला ओढत होती तरी सुद्धा अडकलेला जवान निघू शकत नव्हता.

टीम लीडरला सुचेनासे झाले. त्याने आपली दोरी दोनदा विशिष्ट तऱ्हेने ओढली, हा वरच्या साथीदारांना बाहेर काढण्यासाठी इशारा होता. त्याला बाहेर येऊन रेडिओवरून बेस कँपच्या कंट्रोल रूम मधल्या अनुभवी लोकांना विचारावेसे वाटत होते. त्यांना माहिती असेल. पूर्वी कधी असे झाले नव्हते. इतकी घट्ट पकड पूर्वी कधी त्याने अनुभवली नव्हती. त्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तो असा एकदम त्या अडकलेल्या जवानाला सोडून वरती आल्याने त्या जवानाच्या मनात काय कोलाहल माजला असेल ह्याचा क्षणासाठी त्याला विसर पडला होता. त्याच्याच्याने हा विचारच झाला नाही. ह्या सगळ्याचा विचार करायची ही वेळ पण नव्हती. त्याला बाहेर कसे काढायचे हा एवढाच विचार काय तो उरला होता.

वरच्या लोकांना दुसऱ्या दोरीची दोनदा झालेली इशाऱ्याची ओढ जाणवली. त्यांनी ओढत असलेली पहिली दोरी सोडली व टीम लीडरला बाहेर काढण्यासाठी, ते दुसरी दोरी ओढू लागले. बाहेर येताक्षणीक टीम लीडरने ऑपरेटर कडून हॅन्डसेट हिसकावून घेतला व हॅन्डसेट तोंडाशी धरून त्यात बोलू लागला "ही इज स्टक. वी कांट पुल हिम आऊट".

बेस कंट्रोल रूम मध्ये ही बातमी विजे सारखी चमकली. बेस कमांडरला विश्वासच बसेना. "माइक वन्, कम अगेन" रेडिओ वरून त्याने विचारले. "ही इज स्टक. डॅम इट. ही इज फ्रोझन लाइक अॅन आईस क्यूब. वी ट्राईड पुलींग हिम. ही इज नॉट बजींग." दुसऱ्या ठिकाणी, बऱ्या परिस्थितीत, बेस कमांडरला बरे वाटले असते त्याला कोणी तरी सल्ला विचारत आहे हे जाणून. ह्या कठीण परिस्थितीत त्याच्या कडे देण्यासारखा सल्लाच नव्हता.

"यू नीड मोर मेन अप?"

टीम लीडरने उत्तर दिले "नो यूज. द रोप ईज स्ट्रेचींग." त्याच्या ह्या वाक्याचा अर्थ कंट्रोल रूम मधल्या साऱ्यांना कळला. त्या दोरीला जर का मन असते तर आज तिला ‘दोरी’ असा शब्दप्रयोग करणआऱ्यांचा राग आला असता व अपमान वाटला असता. ही दोरी विशेष वेगळी असते. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून ह्या महागड्या दोरीची निर्मिती केलेली असते. निर्मिती झाल्यावर प्रत्येक दोरीची वजन उचलण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाते. ही दोरी शक्तिवान धाग्यांनी बनवलेली असते व शक्तिवान धाग्यांची अशी वेणी घातलेली असते की अगदी सडपातळ दिसणाऱ्या दोरीत भयंकर ताकद असते. पण तरी सुद्धा तिच्यावर जर असीम जोर पडला तर ती ताणली जाऊ लागते व इशारा करते की जोर जास्त होत आहे. ती दोरी सहजच पाच सहा माणसांचे वजन घेऊ शकते.

कंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्यालोकांनी काहीतरी सल्ला देणे भागच होते.

(क्रमशः)

सियाचीन ग्लेशीयर ...शेवटचा भाग

आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा

http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
(मराठी ब्लॉग)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे वाचून्च आपण तिथे त्या हिम्खाईच्या बाजूला उभं असल्याचा भास होतोय..
कसला बाका प्रसंग... इथे बसून अंगावर काटा आलाय..
शेवट कसा होईल काही कळत नाही गोष्टीचा...
किती कठीण परिस्थितीत आपली ( न बाकी देशांचीही ) सेना काम करते हे नव्याने जाणवलं...
त्या सगळ्या वीरांना सादर प्रणाम...

खरच किती विश्वास न बसण्याइतकं धोकादायक आहे सर्व. कल्पनाही करता येणार नाही अशा परिथितीत काम करत असतात अपले जवान.

बाप्रे एखाद्या ट्रे सारखे बर्फाला चिकटणे ही कल्पनाच असह्य वाटते.
देवा शेवट जरा तरी बरा असु दे, प्रार्थना!

अक्षरशः जिवन्त वर्णन आहे. 'सुंदर' शब्द वापरायचा मोह मी टाळतोय. पण भयानकता जर सुंदर असु शकत असेल, तर हे वर्णन अप्रतिम सुंदर आहे.

खरंच अप्रतिम.....
चितळे साहेब, एक प्रश्न मला नेहमी सतावतो की हिन्दुस्तानी सैन्य संवाद साधण्यासाठी अजुनही इंग्रजी भाषेचा वापर का करतात ?

हे वर्णन वाचतानाच असह्य ताण येतोय. >>>> अगदी खरय दिनेशदा..

त्या i shouldn't be alive चे भाग बघतानाही असाच असह्य ताण येतो. पण त्यात शेवटी त्यांना वाचवलेल आहे हे बघायला सुरवात करतानाच माहिती असत.

रचक्याने, i shouldn't be alive च्या ४थ्या सिझन मध्ये माऊंट रेनियर च्या ग्लेशियर मधल्या हिमखाईत अडकलेल्यांचा एक भाग दाखवला आहे त्यातल्या एकालाच वाचवता येते व दुसरा जातो.
तोच भाग, तसलीच भिती, आत पडलेल्यांची तडफड डोळ्यासमोर येत आहे हे वाचताना Sad

एक प्रश्न मला नेहमी सतावतो की हिन्दुस्तानी सैन्य संवाद साधण्यासाठी अजुनही इंग्रजी भाषेचा वापर का करतात ? >>

बर्याच दक्षिणकडच्यांना हिंदी समजत नाही.

व्हर्टिकल लिमिट बघताना हा फक्त पिक्चर आहे हे माहिती असल्याने येणारा ताण तरी कमीच होता.
ही सत्यघटना आहे हे माहिती असल्याने टरकलोय. अशा स्थितीत काम करणारे खरेच धैर्यधर.

चितळे साहेब,
आता पुढचा भाग टाकताना पहिल्या ओळीत आधी लिहा 'तो वाचतोय की नाही' नसेल वाचणार तर मी नाही बाबा वाचणार एवढा भयानक प्रसंग!
तो जवान वाचणार असेल तर तुम्ही आजून पाच भाग लांबवलात तरी वाचेन.

रणजितसाहेब,

भारतीय लष्करापुढे असलेली आव्हाने तुम्ही आम्हाला माहीत करुन देताहात.
धन्स !!

दिनेशदा,
+१०००००००

>>आता पुढचा भाग टाकताना पहिल्या ओळीत आधी लिहा 'तो वाचतोय की नाही' नसेल वाचणार तर मी नाही बाबा वाचणार एवढा भयानक प्रसंग!>> कृपया असं काही लिहू नका. त्याने वाचण्यातली उत्सुकता नाहिशी होईल.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद. पुढचा भाग शेवटचा आहे. नाही काही असे लिहिणार नाही, भागाच्या आधी.

रणजित चितळे,

>> पुढचा भाग शेवटचा आहे.

धन्यवाद. मग एकदम चारही भाग वाचेन.

आ.न.,
-गा.पै.

अगदी चित्रदर्शी वर्णन!! आशेच्या जोरावर माणूस कठीण परिस्थितही तग धरतो. यासारख्या वाक्यांचा अर्थ अस काही वाचत असतांनाच कळतो.

Pages