टॉप फ्लोअर वरील फ्लॅटला काय समस्या येऊ शकतात?

Submitted by रंगासेठ on 7 November, 2012 - 00:59

टॉप फ्लोअर वरील फ्लॅटला काय समस्या येऊ शकतात? मला एका प्रकल्पातील टॉप फ्लोअर वरच्या फ्लॅटची ऑफर आहे, काम अजून सुरू आहे, त्यामुळे काही बदल करुन घ्यायचे असल्यास ते करुन घेता येतील. एकूण बिल्डिंग सात मजल्याची आहे आणि माझा फ्लॅट सातव्या मजल्यावर आहे.

१ ) उष्णता
समस्या : सर्वात वर असल्यामुळे सूर्यनारायणाचा प्रसाद मुबलक मिळेल आणि भट्टी होईल.
उपाय : POP करून घेता येईल तसेच बिल्डरच्या म्हणन्यानुसार टेरेसवर जाड प्लास्टर/लेवलिंग होइल जेणे करुन त्रास थोडा कमी होईल. AC लावावा लागेल?

२) पाण्याची गळती
समस्या : पावसाचे पाणी टेरेस वर पडून घरातील छतांना, भिंतींना ओल लागेल. पाण्याची टाकी वरच असल्यामुळे (फ्लॅट वर नाही तर, मधील लॉबी आहे त्याच्या बरोबर वर) कदाचित त्याचेही प्रेशर

उपाय : Dr. FixIt लावता येईल, टेरेसवर. आणखी काही?

३) पावसाचे पाणी
समस्या : पावसाचे पाणी थेट गॅलरीत येणार तसेच खिडक्या उघड्या राहिल्या तर घरात पण :-).
उपाय : फायबर शेड लावता येतील (उघडबंद करता येतील असे) , ड्राय बाल्कनीमध्ये पण काहीतरी असेच करायला हवे.

४) सुरक्षा
समस्या : टेरेस वरून गॅलरी मध्ये उडी मारुन चोर येण्याची शक्यता आहे.
उपाय : ग्रिल दरवाजे बसवून घ्यायचे तसेच खिडक्यांचे फिटिंग पण नीट करून घ्यायचे.

बाकी लिफ्ट बंद पडली तर ती सुरु होईपर्यंत जिना चढणे-उतरणे, भूकंप / आग वेळी सुरक्षित जागी पोहोचण्यास कदाहित अडथळा येणे , कबूतरांचा त्रास आदी समस्या आहेतच.

कुणी माबोकर टॉप फ्लोअर वर राहतात काय? त्यांची मते मला मदत करतील निर्णय घ्यायला. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासेठ उष्णता आणि ओल हे प्रॉब्लेम येतातच असा अनुभव आहे. तुम्ही सुचवलेले उपाय करावे लागतात. पावसाच्या पाण्याचा फारसा प्रॉब्लेम येत नाही. लिफ्ट बंद पडली तर अजून हाल.

शक्यतो टाळा हे मा वै म

सेठजी, तुम्हाला संभाव्य त्रास माहित आहेतच आणि त्यावरचे उपायही. Happy

अजुन एक मिस्ड आउट पॉइंट हा आहे की, टेरेस जर कॉमन असेल तर छोटी/मोठी मुलं टेरेसवर खेळतात त्याचा नुइसन्स होतो. मी पुर्वी टॉल फ्लोअरवर रहायचे. आमच्याकडे एक उत्साही काका मुलांना टेरेसवर खेळ शिकवायचे. तेव्हा धपाधप उड्यांचे आवाज आणि बॉलच्या टप्प्यांचे आवाज वैताग आणायचे. दुसर्‍या समोर रहाणार्‍या आजी कोकणातुन नातवाकडे सणासमारंभाला आल्या कि नातवासाठी कौतुकाने खलबत्त्याने चटणी करायच्या. घरात टाइल्स फुटतील म्हणुन टेरेसवर, माझ्या डोक्यावर. Happy अर्थात ते कौतुक माझ्याही वाट्याला यायचं त्यामुळे तक्रार करु शकायचे नाही शिवाय त्यांच्या नातवाच्या/सुनेच्या चेहर्‍यावरचे अपराधी आणि हेल्पलेस भाव पाहिले कि हसुन वैताग लपवायला लागायचा. Happy

तुमचं टेरेस कॉमन आहे कि तुमचं स्वतंत्र?

कटकट :टेरेसवरून उडी मारून कोणी आत्महत्या केली तर पहिले साक्षिदार तुम्ही व्हाल!!!!
फायदा: सुखावलेल्या दुपारी पत्ता शोधत कोणी बेल मारणार नाही!!!!
Happy

Dr. FixIt लावुनही पाण्याची गळती झाली तर POP ला प्रॉब्लेम नाही होणार का? माझी शंका.
मी टॉप फ्लोअर्वर नाही रहात पण घर घेताना मी, लिफ्ट बंद पडली तर किंवा पाणी गेले तर, असा विचार केला होता. आपल्याला नाही पण आई-वडिल , घरातील वॄद्ध व्यक्तिंना त्रास होऊ शकतो ना.

सगळ्यात वरच्या मजल्यावर फ्लॅट असण्याचे फायदेही लिहुन काढा.. फायदे-तोटे दोन्ही बघुन त्याप्रमाणे ठरवा..

वर असल्याने उजेड भरपुर मिळेल असं वाटतय. टेरेस जरी कॉमन असले तरी दररोज तिथे जास्त वर्दळ्/गोंगाट असतोच असं नाही.

@मनिमाऊ +११११११ . पण शक्यतो हल्ली कॉमन टेरेस असले तरी सोसायट्या त्याच्या वापरावर बर्‍यापैकी निर्बंध घालतात. सो हा त्रास वाच्तो काही अंशी.

खालच्या मजल्यांवर वर्दळ बर्‍यापैकी असते. ते एका अर्थी चांगले असते.

मी बरेच वर्ष (५-६) टॉप फ्लोअरवर राहीलेलो आहे. तुमची बिल्डींग सात मजली आहे म्हण्जे टेरेसला कायम कुलुप असायलाच पाहीजे, सुरक्षिततेच्या कारणासाठी. त्यामुळ टेरेसवरच्या आदळआपटीचा त्रास होण्याची शक्यता खुप कमी आहे. जर टेरेसला कुलुप लावणार नसतील तर तस तुम्ही सोसायटी मिटींगमधे मुद्दा मांडा. उष्णतेचा प्रश्न कमी येतो कारण हवा भरपुर खेळती असते (जरा जास्तच). तरी पण वर आणि पश्चिमेला सन कोट मारुन घ्या. तुमच्या ग्यालरीला सेफ्टी डोअर तर तुम्ही बसवणार आहातच. कबुतर / वट्वाघळांसाठी पहिल्या दिवसापासुन जय्यत तयारी करा. टाकीतल पाणी लिकेज चालेल की वरच्यांच्या संडास बाथरुमच हे तुम्ही ठरवा. (तुमच्या वरती कोणी नाही). लिफ्ट बंद असताना आपला चांगला व्यायाम होतो पण घरातले म्हतारी माणस अक्षरशः वैतागतात.

आम्ही आत्ता टॉप फ्लोअरलाच राहतो (चौथ्या मजल्यावर) आणि नविन फ्लॅट ही टॉप चाच आहे.
आम्हाला काही विशेष त्रास जाणवत नाही.AC लागतोच. पण तो खालच्या मंडळीकडे पण आहे.
अर्थात लोकेशन आणि सोसायटीच्या एकूण कल्चरवर खूप अवलंबून असते.

आम्हाला होणारा मुख्य फायदा म्हणजे आख्खी टेरेस मुलांना अगदी अंगणासारखी खेळायला मिळते.

एक काळजी मात्र घेतो....टेरेसची किल्ली आमच्याकडे असते. कोणीही एकदी साधं वाळवण टाकायला सुद्धा आमच्या कडून किल्ली घेऊन आणि परत देऊन जातात. त्यामुळे unauthorised वावर होत नाही.

घरच्या टेरेसला/गच्चीला ग्रील लावणे किंवा collapsible door लावणे हाही एक उपाय आहे.

Water taps in home will not give you water when more number of taps open in the below floors.
Usualy top floors get saperate water connection.
Its more problematic for common solar water heater pipes.

If AC is installed make sure that the outside unit is easily accessible for servicing.

सोसायटीचे नियम आणि निर्बंध म्हणायला ठीक आहे. पण इंटरपर्सनल रिलेशन्सचं काय हो? Happy सगळ्याच गोष्टी नियम आणि कुलुपाने बंद नाही करु शकत.
अर्थात टेरेसवरचा आवाज हा काही सततचा त्रास नसतो. मी असंच एक मुद्दा द्यायचा म्हणुन दिला. Happy कबुतरं हा मात्र दिवसरात्र सततचा वैताग असतो. त्यासाठी मात्र एकदम तयार रहा.

AC लावावा लागेल?>>> AC लावलात तर त्या खोलीला लागणार्‍या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचा घ्यावा लागेल.

टेरेसवर. आणखी काही?>> बिल्डिंगमधील सर्व सभासदांच्या संमतीने पत्रे टाकून टेरेस आच्छादित करता येईल. Dr. fixit पेक्षा किफायतशीर आणि अधिक फायदेशीर आहे. उष्णतेचा त्रासही कमी होईल.

मनि बहुतेक सगळ्या ५+ बिल्डींगच्या टेरेस बंद असतात. शनिवारी पोलिसांनी/महापालिकेन आमच्या सोसायटीत सगळ्यांना " General Safety Precautions" च सेशन घेतल. त्यात टेरेस बंद ठेवा. हा मुद्दा होता. कोणी काही वाळवण्यासाठीपण वापरु नका अस होत त्यात.

टॉप फ्लेअरचा फायदा म्हणजे ड्रेनेजची लाईन ब्लॉक झाली तरी खालचे लोक आपोआप नीट करतात. आपल्याला काहि कराव लागत नाहि. वरून कचर्याचा पण त्रास नाहि.

मी चौथ्या आणि शेवतच्या मजल्यावर राहतो. आमचे टेरेस चेअरमन कुलूप लावून बन्द ठेवतात त्यामुळे चोरभाऊ वरून न येता घोरपड लावून खालूनच येण्याची शक्यता. मला स्वतःला एफ ओ एफ म्हणजे फिअर ऑफ फॉलिंग आहे. म्हनजे उंचावरून पाहिले की मला गरगरल्यासारखे होते . गलरीतून , शिडीवरून, कड्यावरून पाहिले की मला गरगरल्या सारखे होते आणि केवळ त्यामुळे मी पडेल की काय असे वाटते.
मुले आणि पेट्स विशेश्त; मांजरे पडण्याचा धोका सर्वाधिक असतो.गॅलरीला ग्रिल असले तरी हे दोन्हीही नग उचापती असतात. आमचेच मांजर चौथ्या मजल्यावरून पडले त्याला लागलेही.(डॉक्तरांच्या म्हणण्यानुसार इतक्या वरून पडल्यावर त्यांच्आ जबडा फ्रॅक्चर होतो) पण त्यांची स्मृती क्षीण असल्याने ते पुन्हा पुन्हा तिथेच जाते.

वरून खाली पडणारा ऐवज उदा. स्वतः कुंड्या, अथवा त्यातले जादाचे पाणी, गॅलरी धुतल्यावरचे पाणी.केसांचे गुन्तवळ, पानाच्या पिचकार्‍या, सिगरेटची थोटके ही शिव्याशाप मिळण्यास कारणीभूत होऊ शकतात Happy

ग्यालरीत वाळत घातलेले कपडे वार्‍याने उडून दुसर्‍यांच्या ग्यालरीत पडणे व ते कुलूप लावून सुटीवर गेलेले असणे,किंवा तुमची त्यांची भांडणे असणे., तुमच्या वाहनाचे काही बरे वाईट झाल्यास दुसर्‍या दिवशी सकाळीच कळणे. जड वस्तू, कपाटे फ्रीज वाहून नेणे.काही विसरले असल्यास खालून कुटुम्बियानी मारलेल्या हाका टीव्ही च्या आवाजाने ऐकू न येणे., शेजारीपाजारची भांडणे ऐकू न येणे त्यामुळे करमणूकीस मुकणे. सगळ्यात शेवटी दूध, पेपर मिळणे.खालच्याखालीच लोकांनी लिफ्ट वरखाली करणे व तुमचा चडफडाट होणे. तुम्ही बाहेर गेल्यास चोरात निवान्त घरफोडी करता येते त्याला जाता येता पहायला कोणी नसते.
फायदे.: पत्ते विचारणारे येत नाही. उलट तुमच्या पत्त्याचाह खालचांना त्रास होतो. बाजूला झाडे असतील तर् त्याचा व्यू दिसतो. वायुविजन होते. टेरेस तापतेच. डासांचा त्रास कमी प्रमाणात होतो. पेट्स च्या टोयलेट्ची विशेष काळजी घ्यावी लागते.

माझा एक वर्षाचा अनुभव चांगला होता. काही निरिक्षणे
१. टॉप फ्लोवर असल्यामुळे फ्लॅट मधे धुळ जास्त जमते.
२. कबुतरं त्रास देतात. हाकलून फायदा होत नाही.
३. टेरेसवर मोबाईलचे टॉवर नसावेत.
४. लिफ्टला जनरेटर बॅकअप हवाच.

घर टॉप फ्लोअरला आणि त्यावर कॉमन टेरेस आहे की टॉप फ्लोअर + स्वतःचा टेरेस (म्हणजे पेंटहाऊस) आहे?
हे दोन स्वतंत्र फायद्या-तोट्याचे विषय आहेत आणि स्वतंत्र वैतागही आहेत.

माझ्या पेंटहाऊसमध्ये टेरेसवरच्या लॉन आणि गार्डन मुळे खाली ठिबक सिंचन होत होतं. ते शोधण्यात आणि वॉटरप्रुफिंगमध्ये लाखभर रुपये आणि एक संपूर्ण वर्ष गेलं. लॉन काढून टाकावं लागलं. गार्डन काढून मोठ्या कुंड्या ठेवल्या. अजून ते संपूर्ण बंद झाल्याची खात्री नाही. पुढल्या पावसाळ्यातच कळेल.

बाकी खिडक्यांतून पाणी, लिफ्टरूमचा आवाज, कबुतरं, चोरीची भिती इ. इ. अनेक आहेतच.

पण फायदेही बरेच आहेत. स्वतःचा टेरेस ही मोठी चैन आहे. आणि हौस मोठी की म्हैस मोठी, सांगा बघू. Happy

आणखी काही फायदे,
१. उन्हाळ्यात टेरेसवर जाऊन झोपता येते.
२. थंडीमधे तंबू ठोकून टेरेसमधेच रहाता येते. (ट्रीपला जायची गरज नाही)
३. सायकल्स, किंवा तत्सम सामान टेरेसमधे ठेवता येते.
४. क्रिकेट, बॅडमिंटन, इ. खेळ खेळता येतात.
५. पापड, कुरड्या, मिरच्या, इ. वाळवण करता येते.

१. माझाही फ्लॅट शेवटच्या मजल्यावर आहे.....अर्थात पुणे-मुंबई-नाशिक-नागपूर या महानगरांच्या तुलनेत कोल्हापूरसारख्या शहरात फ्लॅटधारकांमध्ये खरेच एकत्र कुटुंबामध्ये राहण्यासारखी भावना आढळत असल्याने वरील असो वा तळमजल्यावरील असो.....मुलांच्या दंग्याचा त्रास अगदी वैताग येण्यासारखा जाणवत नाही. पतंग मोसमात जरूर ही मुले आपल्या मित्रांना घेऊन टेरेसवर येऊन पतंग उडविण्यात दंग होतात.....त्याकडे दुर्लक्ष करण्याबद्दल मी आमच्या मजल्यावरील अन्य दोघा फ्लॅटधारकांना शिकविले आहे. कित्येकवेळी आम्हीच त्या पतंग महोत्सवात सामील होतो. त्यामुळे त्या हालचालीचा एक भागच बनून जातो.

फक्त हाच म्हटला तर टेरेसचा एक त्रास असतो....तोही महिना-पंधरवडा. एरव्ही टीव्ही/केबल्/डिशमुळे मोठीच काय पण मुलेमुलीही घरकोंबडे झाली आहेत.

२. आज २० वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला असला तरी अद्यापि एकदाही पावसाचे पाणी भिंतीच्या आतील बाजूने झिरपलेले नाही. फ्लॅटला आतून कसल्याही प्रकारचे अ‍ॅडिशनल काम केलेले नाही. याचाच अर्थ बिल्डरने उत्कृष्ट प्रकारे टेरेसच्या भक्कमपणाची काळजी घेतलेली आहे. पाण्याची टाकीही अजून ठणठणीत आहे.

३. मात्र धागाकर्ते श्री.रंगासेठ वर मजकुरात म्हणतात त्याप्रमाणे उन्हाळ्यात 'सूर्यनारायणराव' आपला हिसका जरूर दाखवितात. टेरेस शिजत असतो त्या दोन-तीन महिन्यात आणि त्याचा परिणाम फ्लॅटचे गरम तव्यात रुपांतर होते.... किमान दुपारचे काही तास. त्याबाबत बिल्डरला तरी कसला व का दोष द्यायचा ? मग त्यावर उपाय म्हणून सुरुवातीला आम्ही तिघांनी टेरेसवर नारळाच्या झाडाच्या झावळ्या खूप पसरून ठेवल्या व टेरेसच्या पाणी निचरा होण्याची सारी होल्स बंद करून घेतली व त्या झावळ्यांवर भरपूर पाणी सोडून दिले होते. त्याचा सुपरिणाम दिसून आला.....पण तो तात्पुरता असतो हेही खरे.

४. पुढे काहीसे आर्थिक स्थैर्य आल्यानंतर {सहावा वेतन आयोग देव कृपेने} आम्ही तिघांनाही आवश्यक त्या क्षमतेचे ए.सी. बसवून घेतले आणि उष्णतेबाबतचा प्रश्न कायमचाच निकालात निघाला.

५. सुरक्षेचा प्रश्न आजतागायत कधी निर्माण झालेला नाही. कारण अपार्टमेन्ट अगदी महालक्ष्मी देऊळ परिसरात असल्याने एरव्हीही तिथे जाग चांगलीच असते आणि चोरराव त्यामुळे उद्योगधंद्यासाठी आपली नजर उपनगराकडे वळवितात.

६. बाकी....टेरेस चटदिशी चार पावलाच्या अंतरावर असल्याने गार हवेत मुलांचा अभ्यास घेणे, मित्रांसमवेत पार्टी, कॅरम, पौर्णिमेच्या रात्री झोपायला जाणे, स्त्रीवर्गाला प्रामुख्याने कपडे, सांडगे, शेवया, पापड वाळत घालण्यासाठी मिळणारी अघोषित मालकी....हीदेखील जमेची बाजू जरूर असते टॉप फ्लोअरवाल्यांसाठी.

अशोक पाटील

मी नैरोबीला, वरच्या मजल्यावर राहिलो होतो. वरचे सगळे प्रॉब्लेम असतातच. पण भारतात सहसा एकाच दिशेने ( महाराष्ट्रात पश्चिम दिशेने ) पावसाचा मारा असतो, त्यामूळे त्याच दिशेच्या भिंतीचे संरक्षण केले म्हणजे ओल येणार नाही. तसेच खिडक्यांना वर झडप असतेच..

नैरोबीत, पाऊस कुठल्याही दिशेने येतो, खिडक्यांना झडपा नसतात, त्यामूळे घरबसल्या पावसाचा आनंद घेतला.
परीसरात जर दुसरी उंच इमारत नसेल, तर घरातूनही छान दृष्य दिसते. पण शेजारीच, तेवढ्याच उंचीची इमारत असेल, तर ...

त्या घराला वर लाकडी छप्पर आणि वर पत्रे होते, त्यामूळे पावसाचा आवाज खुप यायचा, अधून मधून गळायचेही.
पण फोन आणि टिव्ही यांचे रिसेप्शन चांगले असायचे. ( भारतात हा प्रश्न नसावा. )

दिनेश....

"पण फोन आणि टिव्ही यांचे रिसेप्शन चांगले असायचे. ( भारतात हा प्रश्न नसावा. )"
~ हा मुद्दा इथे तुम्ही छेडलाच आहे, तर माझा अनुभव सांगतो याबाबतीतील. पावसाळी दिवसात....विशेषतः धो-धो पावसाच्या समयी....टॉप फ्लोअरवरील फ्लॅट्समधील टाटा स्काय आणि व्हिडिओकॉन डिश {आम्हा दोघांकडे टाटा स्काय, तर तिसर्‍याकडे व्हिडीओकॉन डिश अ‍ॅन्टेना आहेत} यांची प्रॉपर फंक्शनिंग अ‍ॅबिलिटी पूर्ण थंडावते.... मरतेच. फक्त एक मेसेज स्क्रीनवर झळकतो.....May be due to heavy rain, signals are poor. Wait...". हा 'वेट' किती काळ चालतो हे पाहिले होते एकदा, तर पाऊस थांबून आकाश निरभ्र झाले तरी टाटा सिग्नल पूर्वस्थितीत आले नव्हते, मात्र व्हिडिओकॉन सुरू झाल्याचे शेजार्‍याने सांगितले.

फोनबाबतची रड {आय मीन, लॅण्डलाईन जमान्यात} तर पावसाळ्यातच काय तर उन्हाळ्यातही होतीच. पण आता मोबाईलची रेन्ज टॉप फ्लोअरवर असो वा पावसात असो...गायब होत नाही असा अनुभव आहे.

टॉप फ्लोअरवरील तुमच्या जागेतून बाहेरील दृश्य सुखदायी दिसते का, हा मूल्यमापनातील एक अत्यंत महत्वाचा
घटक असावा. वरील सर्व अडचणी थोड्या फार फरकाने जाणवल्या तरीही त्या सर्वांची भरपाई करण्याची जादू या
एका घटकात असूं शकते ! स्वानुभव.

अशोक, टॉवर्स वाढलेत ना आता..

नैरोबी आधीच ऊंचावर, त्यात माझा मजला सहावा... अगदी बेडवरून उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसायचा. वरती भाऊ म्हणताहेत तसे.. हा घटक फार महत्वाचा.
विल्सन एअरपोर्टवरची छोटी छोटी विमाने उतरताना दिसायची. पक्ष्यांच्या भरार्‍या, पावसाच्या ढगाचे आगमन, नैरोबी नॅशनल पार्कातले डोंगर, न्यायो स्टेडीयमवरचे कार्यक्रम सगळे घरबसल्या, दिसायचे.

वरील बरेच प्रश्न येण्यासाठी टॉप फ्लोअरची आवश्यकता नसते. आपल्याकडे वीज जाते आणि साबांना जीने चढ उतार करताना त्रास होऊ नये म्हणून आम्ही खालच्या मजल्यावरचा (पार्कींगच्या वरचा) फ्लॅट घेतला तर लिफ्टचा संबंध आला नाही पण चोर्‍या आधी खालच्या मजल्यावरच जास्त होतात हे दिसून आले. वरच्या मनुष्याचे बाथरूम (२० वर्षांनी) आमच्या बाथरूमध्ये गळायला लागले आहे. तो मनुष्य बर्‍यापैकी को-ऑपरेटीव्ह आहे म्हणून दुरुस्तीला त्रास होणार नाही असा अंदाज. आता भारतात जाईन तेंव्हा ती दुरुस्ती करून घेईन. पण त्याच फॅमिलीच्या बाल्कनीतील झाडांचे पाणी सतत ठीबकत असते. सगळे उपाय करून झाले, उपयोग नाही. खालचा मजला असूनही कबुतरे नेहमी असतात त्याचबरोबर बाल्कनीइतक्या उंच झाडावरून खारोट्या ये जा करतात. टॉप फ्लोअरला राहणार्‍यांना हा खारींचा त्रास नाही, कबूतरांचा आहे. टेरेसवर कधीकाळी नकोसे झालेले पण फेकवत नसलेले सामान कोणीतरी नेऊन टाकल्यापासून तिथे कोणीही फिरकत नाही. आजकाल पापड्या कुर्डया, गव्हाला ऊन देणे ही कामे करण्याकडे कल नसतो म्हणूनही कोणी टेरेसकडे फिरकत नाही. सगळ्यांकडे एसी असल्याने उन्हाळ्याचा प्रश्न निकालात निघालाय. विद्युत मंडळाची वीज बरेचदा जाते म्हणून जनरेटरची सोय झाल्याने लिफ्टचाही प्रश्न राहिला नाही. खालच्या मजल्यावर सगळ्यांची ये जा जास्त असल्याने केबल दुरुस्तीला आलेली माणसे, मीटर रिडींगला आलेली माणसे, झाडूवाले, मोलकरणी, वर (कधीतरी) प्यायचे पणी न चढल्यास खालच्या नळावरून पाणी न्यायला आलेला महिलावर्ग, मुलांना शाळेत न्यायला, पोहोचवायला आलेले रिक्षावाले यांचा गोंधळ असतो. ते लोक पचापच थूंकून ठेवतात. वॉचमन तासभर जेवायला गेल्यावर रस्त्यावरचे लोक येऊन सावलीला बसणे असे प्रकार पहावे लागतात.
असो, बराच मोठा प्रतिसाद झाला.

केसांचे गुन्तवळ, पानाच्या पिचकार्‍या, सिगरेटची थोटके <<<
ही घरातून खाली टाकायची नसतात. कुठल्याही मजल्यावर असलात तरी.

रंगासेठ, मुंबईत रहात असाल आणि बिल्डींग जुनी असेल तर टॉप फ्लोरचा विचार करू नये. घराचे तळे, भिंतींना आतून बुरशी असा सगळा प्रकार होऊ शकतो. त्या भयानक अनुभवातून गेले आहे (रेन्टल असल्याने सोडता आले).

७ वा मजला मुंबईत असेल तर उन्हाने तापण्याचं एवढं नाही आणि वारा भरपूर असा प्रकार असतो. पाऊस मात्र आडवातिडवा येऊ शकतो. हवेशीर घर जे मुंबईत अभावानेच असते, ते मिळू शकते. Happy

बाकी मजला कुठलाही असला तरी प्लसेस आणि मायनसेस आहेतच.

अशोकजी, दिनेशदा आणि इतर सर्वांना, धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. Happy माझा फ्लॅट पुण्यात आहे, आणखी एक, आमच्या टेरेसवर सोलर पॅनेल बसवणार आहेत. त्यामुळे कदाचित फरक पडेल. टॉप फ्लोअर वरुन व्यू म्हणजे आजूबाजूला सगळ्या इमारतीच आहेत, आणि त्या सात मजलीच असल्यामुळे तसा चांगला आहे आणि झाडी आहेत आजूबाजूला.