जनरल सिंग यांना लक्ष्य कां केले जात आहे?

Submitted by sudhirkale42 on 18 May, 2012 - 18:55

जनरल सिंग यांना लक्ष्य कां केले जात आहे?
मूळ लेखकः RSN सिंग, अनुवादः सुधीर काळे
(या लेखात "जनरल सिंग" म्हणजे आपले लष्कर प्रमुख विजय कुमार सिंग व "कर्नल सिंग" म्हणजे या लेखाचे मूळ लेखक RSN सिंग. दोघांच्या नावांत "सिंग" असल्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून हा खुलासा केलेला आहे.)
भारतीयांसाठी आज प्रामाणिक असणे हा एक शापच झाला आहे. जर जनरल सिंग यांनी त्यांना देऊ केली गेलेली लांच खिशात टाकली असती तर ते सत्ता कंपूच्या गळ्यातला ताईत बनले असते आणि सेवानिवृत्तीनंतर एकाद्या राज्याचे राज्यपालपदही त्यांना मिळाले असते.
एका ले. जनरलने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लांच देण्याच्या केलेला प्रयत्न त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उघड केला. ही घटना या लेखाचा मूळ लेखक (कर्नल RSN सिंग), कांही जाणकार पत्रकार मंडळी व इतर कांही जणाना आधीपासूनच माहीत होती. लांच देऊ पहाणारा ले. जनरल आणि जनरल सिंग यांच्यामधील या संभाषणाची ध्वनीफीतही उपलब्ध आहे ही बातमीसुद्धा कांहीं नवी नाहीं! भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या् लॉबीच्या वतीने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लाच देऊ पहाणार्या् या ले. जनरलच्या प्रतापांची माहिती सदर लेखाचे मूळ लेखक कर्नल सिंग यांनी “Who’s trying to fix the Army Chief by raking up his age?” या त्यांच्या जुलै २०११ च्या लेखात दिलीच आहे. या लेखाचे वितरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
"तात्रा" नावाच्या वाहनांची अवाच्या सवा किंमतीला विक्री करण्यासाठी दबाव आणणे हाच उद्देश ही लांच देण्यामागे होता. एक विशिष्ठ कंपनी जुनी, वापरलेली "तात्रा" वाहने खरेदी करत होती व ती "भारत अर्थ मूव्हर्स लि. (BEML) या कंपनीमार्फत दुप्पटीपेक्षा जास्त भावाने विकत होती. ३०-४० लाखाला विकत घेतलेली ही वहाने शस्त्रास्त्रे पुरविणारी "लॉबी" आपल्या लष्कराला सुमारे एक कोटी रुपयाला विकत होती असे सांगितले जाते. आपल्यासारख्या करदात्यांकडून जमा केल्या गेलेल्या पैशांचा असा दुरुपयोग करणे आणि लष्कराचे आणि देशाचे असे नुकसान करणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मग या ले. जनरलने उपरिनिर्देशित १४ कोटी रुपयांची लांच जनरल सिंग यांना देऊ केली. तरी जेंव्हां जनरलसाहेब बधले नाहींत तेंव्हां या ले. जनरलने "ही ’तात्रा’ वहाने १९८६ पासून खरेदी केली जात असून जनरल सिंग यांच्या आधीच्या लष्करप्रमुखांनी असाच व्यवहार केला होता आणि त्यांचे उत्तराधिकारीसुद्धा असाच व्यवहार करतील" असे जनरल सिंगना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
जनरल सिंग यांनी ताबडतोब वरील माहिती आपल्या संरक्षणमंत्र्यांना दिली आणि ते जर लष्करप्रमुखपदासाठी योग्य नसतील तर त्यांनी आपला राजीनामा देण्याची तयारीही दाखविली. (जनरल सिंग यांच्या राजीनामा देण्याच्या तयारीतील आशय गर्भित आणि महत्वपूर्ण आहे आणि त्याचे धागेदोरे किती खोल आणि कुठेपर्यंत पसरले आहेत हे अजून उघडकीस यावयाचे आहे.)
वरील घटनेची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती अशी कबूली आपले सद्सद्विवेकबुद्धीपूर्ण आणि पापभीरू संरक्षणमंत्री अँटनी यांनी राज्यसभेत दिली आणि आपले कपाळ आपल्या ओंजळीत टेकवले. त्यांची आपले कपाळ असे आपल्या ओंजळीत टेकविण्याची कृती त्यांच्या मनातील व्यवहारबुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षामुळे होती कीं त्यांच्या वैयक्तिक सचोटी आणि राजकीय लाचारी यांच्यातील संघर्षामुळे होती?
जनरल सिंग यांच्या वैयक्तिक सचोटीमुळे संरक्षणमंत्र्यांना जनरल सिंग यांच्याबद्दल अतीशय आदर आहे आणि हे सहाजीकही आहे कारण स्वत: संरक्षणमंत्रीसुद्धा याबाबतीत त्यांच्यासारखेच आहेत. विधिमंत्रालयाकडून सुरुवातीला जनरल सिंग यांचा त्यांच्या वयाबाबतचा युक्तिवाद नि:संदिग्धपणे मान्य केल्यानंतर संरक्षणमंत्रांनी या वादात जनरल सिंग यांच्या बाजूने जवळ-जवळ निर्णय दिलाच होता पण यावेळी संरक्षणमंत्र्यांपेक्षा जास्त शक्तिशाली लोकांनी त्यांना आपला निर्णय मागे घ्यायला लावला आणि ही केस विधिमंत्रालयाकडे पुन्हा पाठवायची सक्ती केली. यामुळे संरक्षणमंत्र्यांना सदसद्विवेकबुद्धीची टोचणी तीव्रपणे जाणविली. अँटनी यांच्या सदसद्विवेकबुद्धीला याची टोचणी लागून राहिली होती व सत्य आणि न्याय यांच्याविरुद्ध जाणून-बुजून अनेक मार्गांनी केलेल्या कारवाईची भरपाई म्हणून त्यांना अनेक राजकीय प्रलोभने आणि आश्वासने देण्यात आली [असे कांही सूत्रांकडून या लेखाच्या मूळ लेखकांना (कर्नल सिंग यांना) समजले आहे.?]
आपल्या चारित्र्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तडजोड स्वीकारणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मध्यस्थांनी खूप प्रयत्न केले पण जनरलसाहेब या तडजोडीला तयार झाले नाहींत व त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यावेळी राजीनामा दिल्यास शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या मर्जीनुसार ठरविलेला उत्तराधिकारी निवडण्याची योजना उधळली गेली असती. तसेच राजकीय पक्षांना मिळणार्या आर्थिक देणग्यांवर त्याचा परिणाम झाला असता आणि त्यातून प्रतिकूल आणि अस्वीकारार्ह परिणाम झाले असते अशी भीती स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारी नोकरशाहीला वाटत होती व ही नोकरशाही सातत्याने राजकीय नेतृत्वाला ढोसत होती. परिणामत: या नेत्यांकडून जनरल सिंग यांना धमक्या मिळू लागल्या कीं त्यांनी राजीनामा दिल्यास तो मंजूरच होणार नाहीं.
अशा परिस्थितीत जनरल सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाहीं.
सरकार व त्याहीपेक्षा संरक्षणमंत्री अँटनी यांच्याही ज्येष्ठ सत्ताधीशांची पाचावर धारण बसली कारण त्यांना माहीत होते कीं जनरल सिंग यांची केस अजीबात गुंतागुंत नसलेली, साधी, सरळसोट केस होती. मोठे-मोठे कायदेपंडित राहिले बाजूला पण अगदी विधिमहाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यालासुद्धा याबद्दल खात्री वाटली असती. यानंतर जे कांहीं झाले सर्वांना सुपरिचितच आहे. भारतातील प्रत्येक संस्थेने जनरल सिंग यांच्या वयाबद्दलच्या या वादात स्वत:चे नाक कापून घेतले आहे!
लष्करातील अधिकार्यांच्या जन्मतारखांच्या चुकीच्या नोंदींतून उद्भवणार्याब समस्यांना याआधी लष्कराला तोंड द्यावे लागले नव्हते असे नाहीं. अशा केसेस नित्याच्या आहेत व त्यांच्याबद्दलचा निर्णय योग्यपणे व तांतडीने घेतला जातो. १९९०च्या दशकात सेवानिवृत्तीच्या फक्त एक दिवस आधी कर्नल रमेशचंद्र दीक्षित यांच्या हुबेहूब अशाच एका वयाबद्दलच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात आलेले होते. जनरल सिंग यांच्या केसला पहिला आणि शेवटचा अपवाद केले गेले आहे. "शेवटचा अपवाद" असे म्हणायचे कारण म्हणजे संरक्षणमंत्रालयाने किंवा सेनेच्या मुख्यालयाने जनरलासाहेबांच्या केसमध्ये एकदा का MS शाखेतील नोंदीप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय दिला कीं त्यानंतर कायदेशीर मार्गाने लष्कराची यादी किंवा MS शाखेची यादी AG शाखेपेक्षा जास्त ग्राह्य धरली जाईल असे कायदेशीर रीतीने ते म्हणूच शकत नाहीं.[१]
म्हणजेच जनरल सिंग यांच्या बाबतीतील निर्णय एक कपट, एक फसवणूकच होती. ही फसणूक इतकी अवाजवी आहे कीं या कारवाईने भारताला एक "बनाना प्रजासत्ताका"च्या [२]पायरीवर आणून बसविले आहे. कुणी रचले हे कपट कारस्थान? हे दोन पाठोपाठच्या माजी लष्करप्रमुखांनी रचले आहे! घृणास्पद आणि किळसवाण्या कपटी भानगडींत सामील झाल्यामुळे यांच्या इज्जतीच्या, प्रतिष्ठेच्या आज ठिकर्या उडाल्या आहेत. उदाहरणार्थ कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी राखून ठेवलेल्या सदनिका हडप करणार्या आपल्या माजी लष्करप्रमुखांना काय म्हणाल आपण? अशा कृत्यांपेक्षा दुसरे कुठले नीच कृत्य असू शकते? याच माजी लष्करप्रमुखांनी आपल्या वडीलकीच्या नात्याने आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जनरल सिंग यांच्यासारख्या अधिकार्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सचोटीचे आणि नीतिमूल्यांचे रक्षण करायच्याऐवजी जनरल सिंग यांनी एक विशिष्ठ जन्मतारीख मान्य करावी म्हणून त्यांच्यावर सक्ती केली आणि त्यांनी असे मान्य न केल्यास हा विवाद वापरून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची आगगाडी रूळावरून घसरविली जाईल अशी गर्भित धमकीही दिली! या माजी लष्करप्रमुखांनी खरे तर लष्कराच्याच मुख्यालयातील एका शाखेने केलेल्या चुकांबद्दल जनरल सिंग यांची माफी मागायला हवी होती! संघटनात्मक निर्बंधांच्या नावाखाली वारंवार केलेल्या आवाहनांच्या दबावापोटी या चुकीच्या जन्मतारखेबाबत जनरल सिंग यांच्याकडून स्वीकृती मिळाल्यानंतर या माजी लष्करप्रमुखांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या पसंतीचा उत्तराधिकारी निवडण्याची योजना आता सुरक्षित झाली होती! जनरल सिंग यांनी संघटनात्मक निर्बंधांबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी केलेल्या नंतरच्या आवाहनाबाबत सर्वांनीच कानावर हात ठेवले.
तात्पर्याने अशा लष्करप्रमुखांच्या हाताखाली भारतीय लष्कर आणि लष्करातील अधिकारी सुरक्षित नाहींत.
नोकरशहा या प्रकारात ओढले गेले ते जनरल सिंग यांनी स्वत: लष्करप्रमुख झाल्यावर आपल्या जन्मतारखेच्या चुकीच्या नोंदीचा पाठपुरावा सुरू केल्यावरच. आदर्श चारित्र्य असलेल्या (impeccable credentials ) चार माजी सरन्यायाधीशांनी जनरल सिंग यांच्या बाजूने केलेले मतप्रदर्शनही मंत्रालयाच्या नैतिकतेवर परिणाम करू शकले नाहीं. विधिमंत्रालयाने जनरल सिंग यांची बाजू नि:संदिग्धपणे उचलून धरल्याचाही कांहींही उपयोग झाला नाहीं. हा प्रश्न त्यांनी कांहीं अतिरिक्त महिने काम करण्याचा नसून त्यांच्या इज्जतीचा आहे असे जनरल सिंग यांनी सांगूनही त्याचा उपयोग झाला नाहीं. केवळ राजकीय नेत्यांनी आणि नोकरशहांनीच त्यांची टर उडविली असे नाहीं तर कांहीं सेवानिवृत्त जनरल्सनीही त्यांच्यावर टीका केली.
वारंवार चित्रवाणीच्या वाहिन्यांवर जनतेने त्यांना पाहिलेले असल्यामुळे या सेवानिवृत्त जनरल्सचे चेहरे आता जनतेला चांगलेच परिचित झालेले आहेत. या सर्वांचे गतायुष्य संशयास्पदच आहे. बायकांच्या बाबतीत चारित्र्य चांगले नसल्याबद्दलच्या गुप्तहेरखात्याच्या अहवालामुळे त्यातल्या एकाला सक्तीने राजीनामा द्यावयास लागला होता. दुसर्यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या पत्नीबरोबर पळून गेल्याचा ठपका होता आणि तिसरा त्याच्या पदव्या खोट्या असल्यामुळे अडचणीत आला होता. ही आहे जनरल सिंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्यांची लायकी!
हे आणि असले लष्करी अधिकारी आपल्या लष्करातली ही घाण कशी कित्येक वर्षांपासून साचलेली आहे याचीच ग्वाही देतात. कारगिलच्या युद्धानंतर यातल्या कांही जनरल्सनी निर्लज्जपणे स्वत:लाच कसे भूषवून घेतले यावरूनही हे स्पष्ट होते. कुठल्याही तर्हेचे शौर्य किंवा युद्धातील डावपेचांबाबतचे कसलेही कौशल्य त्यांनी दाखविलेले नव्हते. यातल्या कांहींना तर घरीच पाठवायला हवे होते. पण त्या काळातल्या राजकारणाने त्यांना वाचविले.
लष्करी सामुग्रीच्या खरेदीशी संबंधित भ्रष्टाचार कांहीं नवा नाहीं. त्याची सुरुवात तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच सुरू झाली होती. त्यात कृष्ण मेनन यांच्या काळात झालेले जीप खरेदीप्रकरणही होते. "तेहेलका"ने ध्वनीफितींवर आणि चित्रफितींवर "रंगे हाथ" पकडल्यामुळे प्रसिद्धीला आलेल्या भानगडीच्या मुळाशीसुद्धा असला भ्रष्टाचारच होता. मग आता जे बाहेर येत आहे यात नवे ते काय आहे?
आपला लष्करप्रमुख कोण असेल आणि त्याची कारकीर्द किती वर्षें चालेल हे ठरवू शकेल इतक्या उच्च थरावरील प्रभाव या लष्कराला शस्त्रास्त्रे पुरविणार्याी लॉबीला प्राप्त झाला आहे हीच नवी धक्कादायक आणि घातक गोष्ट म्हटली पाहिजे! या लॉबीची पोच, तिची पाळेमुळे सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या संस्थांमध्ये अगदी खोलवर घुसली आहेत. या लॉबीने जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेचे कुभांड टिकून रहावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत असे बोलले जाते. या लॉबीचा प्रभाव इतका खोलवर घुसला आहे कीं प्रत्येक प्रामाणिक भारतीयाला नि:संदिग्धपणे माहीत असलेल्या सत्याचा विजय होण्यासाठी एकादा ईश्वरी हस्तक्षेप घडून यावा लागेल. आणि ते सत्य कोणते? ते आहे नैतिकदृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीने जनरल सिंग यांची खरी जन्मतारीख १० मे १९५१ हीच आहे आणि दोन माजी लष्करप्रमुखांनी शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेबरहुकूम त्यांच्यावर लादलेली १० मे १९५० ही त्यांची जन्मतारीख खरी नाहीं! आपल्या लष्करात इतक्या जास्त प्रमाणावर अप्रामाणिक अधिकारी आहेत ही गोष्टही नक्कीच नैराश्य निर्माण करणारी आहे.
या लॉबीने सर्वात आधी जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेबद्दलचा विवाद उभा करून एक कट रचला, पाठोपाठ त्यांनी "जनरल सिंग-संरक्षणमंत्री" आणि "नोकरशाही-लष्करी अधिकारी" यांच्यात मतभेदांची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात आधी जनरल सिंग यांच्या सचोटीची वाखाणणी करून संरक्षणमंत्र्यांच्या अडमुठेपणावर भर दिला, मग परंपरा व आधीपासून रुळलेल्या प्रथा (precedences) वापरून जनरल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये असा प्रयत्न केला, नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका जनरल सिंग यांनी मागे घ्यावी यासाठी या लॉबीने मोहीम सुरू केली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जनरल सिंग यांच्या जन्मतारखेबद्दल कांहींच उल्लेख नव्हता म्हणून जनरल सिंग यांच्यावर राजीनामा देण्यासाठी मानसिक दबाव आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि जेंव्हां जनरल सिंग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तेंव्हां त्यांच्या बडतर्फीसाठीही मोहीम याच लॉबीने सुरू केली!
संरक्षणमंत्र्यांच्या ऑफीसमधील संभाषण चोरून ऐकण्यासाठी जनरल सिंग यांच्या सांगण्यावरून तिथे एक छुपा माइक्रोफोन बसवला गेला होता या आवईकडेसुद्धा याच पार्श्वभूमीवरून पाहिले पाहिजे. पण हे कपट इतके निकृष्ठपणे योजले होते कीं ते लगेच कोसळले! हे कपट रचणारी माणसं मात्र अद्यापही शिक्षेची भीती नसल्यासारखे राजरोसपणे मिरवत आहेत. जनरलासाहेबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातला मजकूर फुटल्याबद्दलच्या बातमीकडेही याच पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. यासाठी लष्करप्रमुखांना नोकरीवरून काढून टाकण्याची अजब मागणीसुद्धा शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेवरूनच करण्यात आली होती!
"जनरल सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे" ही मोहीम पूर्वी भारताच्या सुरक्षिततेला बाधा आणण्यास कारणीभूत झालेल्या आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या एका जराजर्जर माजी मुत्सद्द्याला वापरून सुरू करण्यात आली पण हे करणार्यांना इतकेही माहीत नव्हते कीं अशी तरतूद लष्करासंबंधींच्या कायद्यात अंतर्भूतच नाहीं. या मुत्सद्द्याची स्वत:चीच स्थिती डळमळीत असल्यामुळे त्याला "जनरल सिंग यांना नोकरीवरून काढून टाकावे" असे सांगावेसे वाटले नाहीं. या सर्व प्रकरणाबाबत बोलण्याचा कांहींही अधिकार नसलेला आणि लष्कराच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल कांहींही माहिती नसलेला आणखी एक माजी मुत्सद्दी जनरल सिंग यांच्यावर टीका करण्यात खास उत्साहाने भाग घेत आहे. असे करण्यात या गृहस्थांना एकाहून जास्त हेतू आहेत हे उघड दिसत आहे. या मुत्सद्द्यानुसार जनरल सिंग यांच्याविरुद्ध उत्तर भारतातून प्रकाशित होणार्या एका दैनिक वृत्तपत्रातील ही अभूतपूर्व मोहीम पंतप्रधानांच्या मूक संमतीनेच होत आहे. हे जर खरे असेल तर एकाद्या पंतप्रधानाने आपल्याच लष्करप्रमुखाविरुद्ध अशा कारवाया करण्याची घटना फक्त "बनाना प्रजासत्ताकां"तच[२] होऊ शकते.
कांही वर्षांपूर्वी एक अधिकारी कमांडर नदीम यांना ते सकाळी शांति पथावरील हिरवळीवर आपला नेहमीचा "जॉगिंग"चा व्यायाम घेत असताना त्यांना एका ट्रकने उडविले होते. कांहीं संवेदनशील शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या घटनेमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबीच होती असा दाट संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता व त्या संशयाचे अद्याप निराकरण झालेले नाहीं. संरक्षण मंत्रालयातील एक अधिकारी कुमार यशकर सिन्हा आणि त्यांची पत्नी यांचा अलीकडेच झालेला मृत्यूही बुचकळ्यात पाडणारा आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि मग स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्त्या केली असे पोलिसांना वाटले होते. पण त्या अधिकार्याच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केल्यावर तो सुस्वभावी आणि अतीशय चांगल्या चारित्र्याचा गृहस्थ होता व त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत चांगला वैवाहिक सुसंवाद होता असे आढळून आले. म्हणून त्याच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असण्याची शक्यताच नसावी. गुन्ह्याच्या जागी मिळालेल्या पत्रात असलेल्या "कामात वरिष्ठ अधिकार्यांच्याकडून आलेला दबावा" या उल्लेखावरून पोलिसांना त्याच्या आत्महत्येचा संशय आला असावा. पण हे सारेच अजब आहे. कारण कामावरील तणावामुळे आपल्या पत्नीचा खून कुणीच करणार नाहीं. आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून कुणीच स्वत:ला पेटवून घेणार नाहीं. असा यातनामय मृत्यू पत्करण्यापेक्षा त्याने स्वत:ला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असती. हा अधिकारी संरक्षणमंत्रालयातील एका माहिती मिळविण्याच्या अधिकाराच्या (RTI) केसवर काम करत होता. या अधिकार्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या हत्येमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीं.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या कारस्थानांनी आपल्या लष्करातील अत्युच्च नेतृत्वाला बरेच डळमळीत करून टाकले आहे असे दिसते. एका माजी लष्करप्रमुखाने शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी, नोकरशाही आणि राजकीय नेते यांच्या दुव्यातून राजकीय देणग्या मिळविण्याच्या प्रथेचा प्रारंभ केला. बिनीच्या "खेळाडूं"ची आणि बिनीच्या संस्थांची हातघाई आणि क्रौर्य पहाता या मागे २०१४च्या निवडणुकांची प्रेरणाही असू शकेल.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या आदेशानुसार आपल्या लष्करातील उत्तराधिकाराची योजना बनत आहे ही फारच गंभीर आणि काळजी करण्यासारखी स्थिती आहे. उच्चपदावरील कांहीं अधिकार्यांना बाहेर काढण्यापुरता हा प्रश्न उरला नसून त्यांचा एका पाठोपाठ दुसरी अशी घटनांची शृंखला निर्माण होऊन त्यातून लष्कराच्या संपूर्ण निवड-प्रक्रियेतच बाधा येण्याची आणि परिणामत: भारताच्या संपूर्ण लष्करालाच दगाफटका होण्याची शक्यता आहे.
"एक देश म्हणून भारताचे अस्तित्व टिकून राहील ते केवळ भारतीय लष्कराच्या जिद्दीवर, चिकाटीवर" हे लॉर्ड वेव्हेल यांचे विधान आपले लष्कर एक परिणामकारक आणि निर्दोष संस्था आहे या आधारावर त्यांनी केले होते. ही संस्था आता केवळ तिच्या कडांवरच उसवू लागलेली नसून तिला आता अधिकार श्रेणीच्या शिखराकडूनच धोका निर्माण झालेला आहे. ही घसरण अशीच चालू राहिली तर संपूर्ण भारतच उसवून जाईल. खरे तर आता आपले सरकारच आपला नैतिक अधिकार झपाट्याने घालवत आहे. अशा परिस्थितीत जर हा शेवटचा बुरूजही कोसळला तर आपला देश खरोखरच एक "बनाना प्रजासत्ताक" म्हणूनच जिवंत राहील.
म्हणूनच आपण आपल्या लष्कराला आणि देशाला वाचविले पाहिजे.
---------------------------------------------------------
All opinions in this translated article are of the original author Mr RSN Singh.
(RSN Singh is a former military intelligence officer who later served in the Research & Analysis Wing. The author of two books: Asian Strategic and Military Perspective and Military Factor in Pakistan, he is also a columnist for Canary Trap. This post was first published on Firstpost on April 6, 2012)
Original article can be read on:
http://canarytrap.in/2012/04/06/why-is-gen-vk-singh-being-targetted/
---------------------------------------------------------
टिपा:
[१] इथे लिखाण उलट-सुलट झाले आहे असे वाटते. कारण जनरल सिंग यांच्या बाबतीत संरक्षण मंत्रालयाने AG शाखेच्या नोंदीनुसार निर्णय न घेता तो MS शाखेतील नोंदीनुसार निर्णय घेतला. म्हणजेच primacy मिळाली MS शाखेतील नोंदीला!
[२] आर्थिक दृष्ट्या फळे, खनिज द्रव्यें यासारख्या फारच मोजक्या साधनसंपत्तीच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या आणि संख्येने अगदी छोटा पण अतीशय श्रीमंत असा सत्ताधारी समाज (राजकारणी, उद्योगपती आणि लष्करशहा) आणि संख्येने प्रचंड पण अती गरीब असा कष्टकर्यांचा समाज अशी अतीशय विषम विभागणी असलेल्या राजकीय दृष्ट्या अस्थिर राष्ट्राला "बनाना रिपब्लिक" म्हणतात. अशा राष्ट्रात साधारणपणे "हम (सत्ताधारी) करेसो कायदा" असा सामाजिक न्याय असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी येथील प्रतिसादांवर एक मेसेज कर्नल सिंगना कॅनरी ट्रॅपद्वारा लिहितो आणि ते काय म्हणतील ते इथे कळवतो.

ही बातमी देताना कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले होते. यातून जाणारा संदेश पाहता कटाची शंका घेणं अशक्य नाही
------ पण नंतर केंद्र सरकारने त्याचे स्पष्टीकरण दिले होते... तो सैन्याच्या नित्याचा हालचालींचा भाग होता आणि त्या बाबतची माहिती सैन्याने आमच्या कडे रितसर दिली होती (किंवा द्यायलाच पाहिजे होती असे बंधन नाही).
भारतात असा कट होणे अशक्य आहे. अशी थोडी जरी शक्यता असती तर जनरल साहेब एका क्षणांत बडतर्फ झाले असते. काही वर्षांपुर्वी कुठलेही स्पष्टीकरण न देता भारताच्या नैदल प्रमुखांना केंद्र सरकारने बडतर्फ केले आहे. कुठलिही खळ-खळ करता येत नाही किंवा करायला जागा नसते.

हजारो कोटींचे शस्त्रास्त्र खरेदीचे व्यावहार थकलेले आहे त्यामुळे टक्यांच्या बाजारांत बेरिज, वजाबाकी चुकली असेल म्हणुन अशा प्रकारची कुरघोडी सुरु आहे. एकंदरित प्रकार सैन्य प्रमुखांची आणि सरकारची शोभा वाढवत नाही.

माझा रोख प्रसारमाध्यमांवर आहे हे बरोबर...

कर्नल सिंह यांना संपक करून काय साध्य होणार आहे ? सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि लष्कराच्या एम एस ब्रँच बद्दल त्यांनी घेतलेला आक्षेप या पार्श्वभूमीवर त्या शाखेचे कामकाज काय याबद्दल त्यांचा खुलासा ऐकायला आवडेल...

मी त्यांना या प्रतिसादातील मुद्दे वाचून जास्त focussed लेख लिहायला सांगणार आहे. कारण लष्कराच्याच दोन शा़खांत वेगवेगळ्या जन्मतारखा कशा 'नांदत' रहातात हे पहाणे जरूरीचे आहे. एक तर AG Branch ने १९५० मान्य करायला हवी होती किंवा MS Branchने १९५१ मान्य करायला हवी होती. दोन्ही शाखा दोन तारखा १९८५ पासून घेऊन बसतात व संरक्षण मंत्रालय गप्प बसते हे कसे? या बाबत अनेक "नको ते" मुद्दे रोज वाचायला मिळत आहेत. त्यांचा उल्लेख करणेसुद्धा मला बरोबर वाटत नाहीं.

मी माझ्या माहितीतल्या दोन श्रेष्ठ लष्करी अधिकार्‍यांकडे (त्यातल्या एका अधिकार्‍याने तर थेट त्यांच्या हाताखाली काम केलेले होते!) चौकशी करता ज. सिंग यांची प्रतिमा "स्वच्छ अधिकारी" अशीच आहे आणि ते सर्वांना प्रिय असे अधिकारी आहेत असे कळले. अधीक माहिती कर्नल सिंग यांच्याकडून मिळाली तर इथे पुन्हा लिहीन.

मी माझ्या माहितीतल्या दोन श्रेष्ठ लष्करी अधिकार्‍यांकडे (त्यातल्या एका अधिकार्‍याने तर थेट त्यांच्या हाताखाली काम केलेले होते!) चौकशी करता ज. सिंग यांची प्रतिमा "स्वच्छ अधिकारी" अशीच आहे आणि ते सर्वांना प्रिय असे अधिकारी आहेत असे कळले. अधीक माहिती कर्नल सिंग यांच्याकडून मिळाली तर इथे पुन्हा लिहीन.

त्याला वरिष्ठ म्हणतात बहुतेक.
श्रेष्ठ हा शब्द दर्जाशी संबंधित आहे. उदा : श्रेष्ठ कथाकार जी.ए. कुलकर्णी

ज. सिंग यांची 'टाइम्स'मधील आजची मुलखत पहाता १ जूनपासून दोन्ही बाजूंकडून बरेच हल्ले-प्रतिहल्ले होणार असे वाटते. बघू काय नवा प्रकाश या प्रकरणावर पडतो ते!
खरे तर असली मलीन वस्त्रें चवाठ्यावर धुतली जाऊ नयेत!

काळे सर

कुणाची एकाची बाजू घेणं हे चुकीचं आहे हेच जनरल सिंहांबद्दल लिहीताना दाखवून द्यायचं होतं. सरकारचा गलथानपणा, भ्रष्टाचार याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक आहे असं नाही. पण या प्रकरणात ज. सिंह म्हणजे कुणी अवतार आहेत हे चित्र रंगवलं जातंय या मागे लांबचं प्लानिंग आहे. शेषन, खैरनार प्रकरण आठवतंय का ?

ज. सिंह यांनी देखील शिस्त पाळलीय असं दिसत नाही. लष्कराचं मनोधैर्य खच्ची होणं न होणं हे सरकारपेक्षा त्यांच्या हातात जास्त होतं. लष्करप्रमुख अशा प्रकारची पत्रे पंतप्रधानांना का लिहीतात हे कळत नाही. सरकारमधे प्रॉपर चॅनेलने पत्र गेलं पाहीजे हे त्यांना माहीत नसेल का ?

काल कोणत्या इंग्रजी वृत्तवाहिनीवर जनरल सिंग यांची 'एक्स्क्लुजिव्ह' मुलाखत नव्हती?

लष्करप्रमुख अशा प्रकारची पत्रे पंतप्रधानांना का लिहीतात हे कळत नाही.
----- माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक लष्करप्रमुख असे पत्र लिहीत असतो... सिंग यांनी लिहीले म्हणजे काही वेगळे केले नाही... फरक हाच आहे हे पत्र प्रसिद्धी माध्यमांपर्यंत (कुठल्या तरी कारस्थानाचा भाग म्हणुन) पोहोचवले गेले. पत्र ज्या चॅनेलने ने गेले तेथे कुठेतरी गळती नक्कीच आहे.

लष्करप्रमुख अशा प्रकारची पत्रे पंतप्रधानांना का लिहीतात हे कळत नाही.
----- माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक लष्करप्रमुख असे पत्र लिहीत असतो... >>>>>>>>

मागच्या बर्याच लष्करप्रमुखांनी लिहिली आहेत

लष्करप्रमुखास संरक्षण मंत्रालय, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव यांना पत्र लिहीता येते. एखादी बाब लक्षात आणून द्यायची झाल्यास नोटिंग शीट किंवा मिनट शीट वर स्वतःची सही करून संरक्षण मंत्री अथवा सचिवाचे अनुमोदन घेऊन ते मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालकडे पाठवण्याचा मार्ग आहे. अर्ध सरकारी पत्र त्यांना लिहीता येते पण ते फक्त समकक्ष अधिका-याला. पंतप्रधान हे त्यांचे समकक्ष नव्हेत. तसंच मंत्री, प्रतिनिधी यांना सरकारी अधिकारी अर्ध सरकारी पत्र पाठवू शकत नाही.

संदर्भ : सरकारी सेवा शर्ती

अर्ध सरकारी पत्र त्यांना लिहीता येते पण ते फक्त समकक्ष अधिका-याला. पंतप्रधान हे त्यांचे समकक्ष नव्हेत.
----- जन सिंग यांनी प्रोटोकॉलमधे थोडी जरी चुक केली असती तर तत्काळ त्यांना बडतर्फ केले गेले असते. तसे झालेले नाही.

बडतर्फ होण्याआधीच भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने सबुरीने घेण्याचं ठरवलं गेलं असेल. सत्ताधारी भ्रष्ट असतातच.. असो. जर तर ला अर्थ नाही.

लष्करप्रमुखांना असं थेट पत्र लिहीता येण्याच्या अधिकाराबद्दलचा संदेह ( युद्धसदृश्य परिस्थिती वगळता ) दूर होत नाही.

कारगिल मधली घुसखोरी सर्वप्रथम निदर्शनाला आणून देणारे आणि त्याकडे दुर्लक्ष झाल्यावर ले. जनरल, जनरल, संरक्षणमंत्री, पंतप्रधानांचे कार्यालय या सर्वांना संभाव्य धोक्याची कल्पना देणारे ब्रिगेडियर त्यांच्या पत्रप्रंपंचामुळे आणि स्वतःची बाजू माध्यमात मांडल्याने बडतर्फ झाले होते..

http://www.flonnet.com/fl1813/18130410.htm

जनरल व्ही के सिंह तेव्हा का गप्प राहीले ? कर्नल आर एस एन सिंह यांची लेखणी या घटनेबद्दल काय म्हणते हे जाणून घ्यायला आवडेल.

ज. सिंग यांची 'टाइम्स'मधील आजची मुलखत पहाता १ जूनपासून दोन्ही बाजूंकडून बरेच हल्ले-प्रतिहल्ले होणार असे वाटते.
------ असे काही होण्याची शक्यता कमी वाटते. शनिवारी पंतप्रधानांनी निरोपाची जेवणावळ दिली.
http//तीwww.hindustantimes.com/India-news/NewDelhi/PM-hosts-farewell-dinner-for-...

लष्करप्रमुखांनी संरक्षण मंत्र्यांच्या सचोटी आणि प्रामाणिक पणाबद्दल आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण हाताळण्यात त्यांनी दाखवलेल्या कौशल्याची स्तुतीच केलेली आहे.

मीही क. सिंह यांना "Canary Trap"द्वारा पाठविलेल्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहात आहे. "Canary Trap" अधिकार्‍यांना एकदा आठवणही करून दिली (reminder) आहे. उत्तर आल्यास आणि आल्याबरोबर मी इथे लिहीन. मलाही या प्रकरणात उत्सुकता आहेच.

१९९९-२००० मध्ये नौदल प्रमुख विष्णू भागवत यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा आदेश धुडकावून आपल्या मर्जीतल्या एका व्यक्तीला पदौनती देऊन नौदलातल्या एका वरीष्ठ पदावर नेमणूक केली होती. संरक्षणमंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा त्यांनी त्या व्यक्तीला त्या पदावरून हटविण्यास नकार दिला. शेवटी विष्णू भागवत यांची जॉर्ज फर्नांडिस आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हकालपट्टी करून 'हू इज द बॉस' हे दाखवून दिले होते.

या विशिष्ट प्रकरणात जनरल सिंह यांनी सरकारविरूद्ध बंड केले त्याक्षणीच अँटोनी व मनमोहन सिंह यांनी योग्य ती कठोर पावले उचलून जनरल सिंह यांना आवर घालायला पाहिजे होता. पण या प्रकरणात या दोघांनी निव्वळ बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारून वेळकाढूपणा केला व स्वतःचे व सरकारचे हसे करून घेतले.

मास्तुरे

अ‍ॅक्शन घेण्यासाठी स्वतःकडे नीतीधैर्य असावे लागते. नेमकी हीच कमजोरी प्रशासनातील महत्त्वाकांक्षी अधिका-यांना माहीत असते. आता त्यात लष्करी अधिकारीही आले..

या विशिष्ट प्रकरणात जनरल सिंह यांनी सरकारविरूद्ध बंड केले त्याक्षणीच अँटोनी व मनमोहन सिंह यांनी योग्य ती कठोर पावले उचलून जनरल सिंह यांना आवर घालायला पाहिजे होता>>>>>

बंड केले ? मास्तुरे जरा नीट वाचत चला, पहात चला आणी एकत चला Proud

१९९९-२००० मध्ये नौदल प्रमुख विष्णू भागवत यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा आदेश धुडकावून आपल्या मर्जीतल्या एका व्यक्तीला पदौनती देऊन नौदलातल्या एका वरीष्ठ पदावर नेमणूक केली होती. संरक्षणमंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा त्यांनी त्या व्यक्तीला त्या पदावरून हटविण्यास नकार दिला. शेवटी विष्णू भागवत यांची जॉर्ज फर्नांडिस आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हकालपट्टी करून 'हू इज द बॉस' हे दाखवून दिले होते
-------- हे असे (क्षुल्लक) कारण होते असे वाटत नाही. सर्व गोष्टी चव्हाट्यावर आणल्या जात नाही.

विष्णू भागवतांवरचे आरोप गंभीर होते. त्या ही वेळी त्यांना मध्यवर्ती सरकारने फसवल्याचे गळे काढले गेले. रशियन युद्धनौकेमधे मिळणारे कमिशन अ‍ॅडमिरल भागवतांमुळे बुडते अशा बातम्या त्या वेळी येत असत. अ‍ॅडमिरल भागवत देखील दणादण मुलाखती देत सुटले होते आणि कारवाई ओढवून घेतली.

मात्र कारगिल युद्धाच्या सुरूवातीला पाक सैन्याच्या हालचालीची सूचना देणा-या ब्रिगेडीयर वर अन्याय झाला असावा असं नक्की वाटतं. जनरल सिंग हे जर करप्ट प्रॅक्टीसेसच्या विरोधात रणशिंग फुकणारे वगैरे असते तर ब्रिगेडीयर सुरिंदर सिंग यांना त्यांनी मदत केली असती. पण त्यांनी असं केलं नाही. त्या वेळी शिस्त पाळली. कारण पुढे करियर होतं हे एक कारण असावं. मात्र स्वतःचा प्रश्न आला कि सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी करायलाही त्यांनी मागे पुढे पाहीलेलं नाही. लष्करप्रमुखासारखे पद भूषविणा-या व्यक्तीकडून न्यायालयासारख्या संस्थेवर असा जाहीर अविश्वास दाखवणं हे चिंताजनक आहे. त्यांचं म्हणणं खरं जरी मानलं तरीही उच्चपदस्थ व्यक्ती काय आणि का जाहीर करतेय हे पहायलाच हवं..

काळे सर

ज्या संस्थळावर कर्नल सिंह नेहमी लिहीतात त्याचं स्वरूप काय आहे ? त्या संस्थळाची विश्वासार्हता काय आहे ?

कर्नल सिंह यांचा आणखी एक लेख त्या संस्थळावर वाचला. सत्य सांगतोय असा आभास करायचा आणि केवळ दिशाभूल होईल असं लिखाण ते करताहेत असं वाटू लागलंय. उदाहरणार्थ त्यांनी एका ब्रिगेडीयरचं एक उदाहरण तिथं दिलेलं आहे. त्यांच्या बाबतीत जन्मतारीख १९४० एम एस ब्रँच मधे होती पण एजी ब्रँच ममधे १९४१ होती. त्यामुळे त्यांची निवृत्ती एक वर्ष आधी येत होती. एम एस ब्रँच कडून त्यांच्या सेवानिवृत्तीचा आदेश निघाला. त्यांनी सर्वांना याबाबत सांगून पाहीलं. शेवटच्या दिवशी त्यांनी हेडक्वार्टरला याबाबत एक सिग्नल केला आणि संध्याकाळी त्यांना फॅक्स मिळाला ज्यात त्यांची सेवानिवृत्ती रोखण्यात आली आहे असा आदेश होता. कर्नल सिंग म्हणतात हे एकमेव उदाहरण आहे.

पुढच्याच लेखात (ज्याचा अनुवाद आपण केलेला आहे) कर्नल सिंह म्हणतात कि एजी ब्रँचची तारीख ग्राह्य धरण्यात येत असताना जनरल सिंह यांच्याच बाबतीत अपवाद का केला गेला ? हे अर्धसत्यच नाही तर धादांत असत्य आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे एमएस ब्रँचकडे भरती करून घेणे, बढत्या आणि निवृत्ती ही कामे असतात तर एजी ब्रँचकडे पगार आणि भत्ते. इथे जन्मतारखेचा उपयोग फक्त वार्षिक वाढ पाहण्यासाठी होतो. कर्नल सिंहांनी दिलेल्या उदाहरणातच त्या ब्रिगेडीयरच्या सेवानिवृत्तीचा आदेश एमएस ब्रँचने काढला. तसंच त्या लेखात ते म्हणतात कि हे एकमेव उदाहरण आहे.

मग पुढच्याच लेखात अपवाद केला जातो असं दिशाभूल करणारं विधान का केलं गेलंय ?

माझ्या समजण्यात काही चूक होत असेल किंवा एकंदरच आकलनशक्तीचा काही दोष असेल तर क्षमा असावी. पण तो लेख त्याच संस्थळावर इच्छुकांनी नजरेखालून घालावा ही विनंती. वर एका पोस्टमधे द हिंदूचा दिलेला लेखही वाचला असेलच. इतर सर्व संस्थळांवर या दोन ब्रँचचं काम काय चालतं हे पाहता येईलच...

Pages