धुळ्यातील माझं काम आटोपुन मी परत जळ्गांवला निघालो होतो. नासिक - जळ्गांव गाडी फलाटावर लागली, मी गाडीत चढलो. जवळ्पास सगळीच आसनं भरली होती. एक अगदीच शेवटचं आसन रिकामं होतं, मी तेथर्यंत जाण्याचा कंटाळा केला. हळुहळु नवीन प्रवासी गाडीत चढावयास सुरुवात झाली तसा मी मागे सरकु लागलो.
गाडीच्या मध्यभागी आल्यावर मला एक स्त्री एकटीच बसलेली दिसली. तिच्या शेजारची जागा रिकामी होती, तिथे तीने आपली प्रवासाची पिशवी ठेवली होती. मी आसनाच्या वरच्या बाजुस बघितले. ती जागा स्त्रीयांसाठी राखीव नव्हती. तिच्या हे लक्षात आले. तीने संपुर्ण आसनांवर एक कटाक्ष टाकला. रिकामी जागा शिल्लक नाहीये हे बघुन तिने आपली पिशवी मांडीवर घेतली व मला बसावयास जागा दिली.
गाडी सुटावयास अजुन अवकाश असावा. लवकरच स्थानकातील किरकोळ विक्रेत्यांनी गाडीचा ताबा घेतला व तारस्वरांत आपल्याकडील वस्तुंची विक्री करावयास सुरुवात केली. यथावकाश गाडीच्या वाहकाने गाडीत प्रवेश केला व त्याने त्या विक्रेत्यांना गाडीबाहेर जाण्यास सांगितले. त्यावर त्यांनी काही उलट उत्तरं दिली व त्यांच्यात वाद सुरु झाला. शेवटी एकदाचे ते बाहेर पडले.
चालकाने उडी मारुन गाडीत प्रवेश केला. स्थानकांत इतर गाड्यांची प्रचंड गर्दी होती, गाड्यांच्या गर्दीतुन वाट काढणे जिकरीचे होते हे बघुन वाहकाने त्यास मदत करण्यास सुरुवात केली.
हे सगळे होत असतांना माझ्या शेजारील स्त्रीची विलक्षण चुळबुळ सुरु होती. ती अर्धवट उभी राहुन वारंवार खिडकीतुन बाहेर बघत होती. सुरुवातीस वाटले तिचं कुणीतरी बाहेरचं राहीलं असावं. गाडी मार्गस्थ झाल्यावर मात्र ती स्वस्थ बसली. तिच्या चेहेर्यावर समाधान होतं.
"तुम्ही कंडक्टर आहात का ?" - मी
"हो." - खिडकीतुन बाहेर बघत तीनं उत्तर दिले.
"लोकं कसेही चालतात. एकदमं गाडीसमोर किंवा मागे येतात, गाडी बाहेर काढतांना फार लक्षं द्यावं लागतं. कंडक्टर चं काम एकदम कठीण. बाईच्या लायकीचं काम नाही हे." - ती.
अरे वा. ही तर चांगलीच बोलकी दिसतेय. तीन तासांचा प्रवास सहज करावयाचा असेल तर हीला बोलतं ठेवावयास हवे. मी मनात विचार केला.
"असं का म्हणतां तुम्ही ? काम कुठ्लही असो, त्यात कष्ट असतातच ना ? " - मी.
"ते खरयं, पण कंडक्टरचा जॉब फार खराब, बाईसाठी तर फारच खराब. " - ती
"तुम्ही हा जॉब मनापासुन निवड्लात नां ? कधीपासुन करतांय ?" - मी
"मला जॉईन होऊन आठच दिवस झालेत. धुळे नासिक डयुटी असते. आज शेवटची डयुटी करुन घरी परत जातेय. उद्या रविवार, मला सुटी असते." - ती
गाडी शहरातुन बाहेर पडली, गाडीने वेग घेतला. वाहक प्रवाश्यांना तिकीटं (तिकीटाला मराठीत काय म्हणतात ? आठवलं - परवाने) देत होता. अचानक त्याचा एका प्रवाश्याशी वाद सुरु झाला. प्रवाश्याच्या अपेक्षित ठिकाणी गाडी थांबत नाही यावरुन त्यांच्यात चांगलीच जुंपली. शेवटी त्या प्रवाश्यास खाली उतरावे लागले.
"तुमचे दिवसांत किती जणांशी भांडण होते ?" - तीने मला विचारले.
"दोघांशीच. बायको आणि बॉस." - मी. तिला हसु आलं.
"सांभाळा बरका, एखादे वेळी महागात पडेल. आमचं प्रत्येक वेळी नवीन माणसांशी त्याच त्याच मुद्दयांवर भांडण होत असते, तेही कारणं नसतांना. आता बघा, मघाशी त्या विक्रेत्यांशी आणि आता या प्रवाशाशी. यात कंडक्टर ची काय चुक होती मला सांगा." - ती.
"एक नेहेमीचा वाद म्हणजे सुटे पैसे. लोकं सुट्या पैश्यांना सोन्याप्रमाणे का जपतात तेच कळत नाही. त्यांना असं वाटतं कंडक्टर म्हणजे पैश्यांच मशिन आहे. त्याच्याकडे सुटे पैसे असलेच पाहीजेत." - ती
"दुसरं म्हणजे खराब नोट. प्रवाश्यांनी चार तुकडे जोडलेली नोट कंडक्टर ने घ्यावी मात्र त्याने थोडी खराब नोट दिली तर ती प्रवाश्याना नको असते. नोटा खराब करण्यात सगळ्यात मोठा वाट बायांचा (बायकांचा). अगदी बारिक घडी करुन नोटा ठेवतांत." - ती
"तुमचं परिवहन मंडळ तरी असली भाडी का ठरवतात ? ११ रु, किंवा १७ रु. त्याना सरळ १० किंवा २० रु. अशी भाडी ठेवायला काय होतं ? जर सुट्या पैश्यांवरुन वाद होतात हे माहीत आहे तर मग त्यावर इलाज का करित नाहीत ?" - मी
"ते मला माहीत नाही, मी त्यावर काही बोलु शकत नाही."
"प्रत्येक प्रवाशाला खिडकीची जागा हवी असते. नसल्यास गाडीच्या दाराजवळ्चे सीट पाहीजे असते. दरवेळी मागे सरका, मागे सरका ओरडावे लागते. प्रत्येकाला वाटते आपण गाडीत बसलो म्हणजे लगेच गाडी सुरु व्हायला हवी. कंडक्टर जरा उशिरा आला म्हणजे यांचे टोमणे सुरु होतात." - ती
मला नेहेमी हा प्रश्न पडतो कुठे गायब होतात ही मंडळी.
"अहो पण तुम्ही लोकं वेळेवर गाडीत का येत नाहीत ? तुमच्यामुळे लोकांची कामं खोळंबतात नं ?" - मी
"तुम्हाला माहीत आहे का ? दररोज ८ तासांची डयुटी असते. माझंच बघा. धुळे नासिक सकाळी ८ ची गाडी. साडेतीन - चार तासात नासिक. सकाळी निघतांना जेवणाचा डबा घेऊन गाडीत चढायचे. साडे अकरा - बारा वाजेपर्यंत नासिक. १० मिनीटांचा ब्रेक, परत तीच गाडी घेऊन धुळ्याला सुटणार. परत ४ तासांचा प्रवास. मला सांगा १० मिनीटांत जेवण उरकायचे. तुम्ही एसटी चं उपहार गृह एकदा बघा. जेवणाचा घास खाली उतरत नाही एवढी घाण असते तिथे. या आठ दिवसांत ३ वेळा मी जेवणाचा डबा परत आणला आहे." - ती
"तुम्ही एकदा लेडीजचे टॉयलेट्स कशी असतात ते बघा. नरक असतो नरक. १० मिनीटांत जेवणं, टॉयलेट, झाला तर कंट्रोलर शी वाद. एवढं करुन प्रवाशांचे बोलणे खा." - ती
लेडीज टॉयलेट्स कशी असतात हे बघणे मला काही शक्य नव्हते त्यामुळे मी ते माझ्या परिने समजुन घेतले.
"तुम्ही धुळ्याला रोज येता का जळ्गांवहुन ?" - मी
"नाही, आम्ही चौघींनी रुम घेतली आहे धुळ्याला. नवीन कंडक्टरला ३००० रु. महिना पगार मिळतो. १५०० रु. बाहेर राहण्यामुळे खर्च होतात." - ती
वाहक आमच्या आसनापर्यंत पोहोचला. मी पैसे काढले.
"शक्य झाल्यास नेमके पैसे द्या." पैसे देतांना तिने मला हळुच सुचना केली. मला ते शक्य होते, मी तसे केले. तिच्या व वाहकाच्या चेहेर्यावर खरंच समाधान होते.
"माझ्या रुममेट्स पैकी दोघींची डयुटी औरंगाबाद रुट्वर असते. कधीतरी अगदी रडकुंडीला येतात. तासंतास गाडी कन्नड घाटात अडकते. गाडी सोडुन जाता येत नाही. परत यायला अपरात्र होते. दुसर्या दिवशी पहिले पाढे ५५." - ती
"प्रायव्हेट गाड्यांमुळे आम्हालाही प्रवाशांसाठी ओरडावे लागते. प्रत्येक गाडीच्या ट्रिपचे साधारण उद्दिष्ट असते. ते पुर्ण करण्यासाठी चालक गाडी पळवतो. दुसर्या गाडीच्या पुढे जाण्यासाठी कधीतरी भयानकपणे गाडी दामटतो. प्रवासी भरवश्याने झोपु शकतात. आमच्या जीवाला घोर असतो." - ती
"सगळ्यात वाईट काम दुसर्या राज्यात रात्रीच्या मुक्कामाला जाणार्या गाड्यांचे. लांबच्या प्रवासात प्रवासी ओकतात. दिवसभर गाडीत घाण करतात. लेडीजला मुक्कामाची डयुटी देत नाहीत, पण जेन्ट्स लोकांचे फार हाल. गाडी सोडुन जाऊ शकत नाहीत. तसेच गाडीत झोपावे लागते. सकाळी निघतांना अंघोळीचा पत्ता नसतो."
"आता इल्केट्रॉनिक मशिन्स आहेत, पुर्वी तिकीटं देणे त्यांचा हिशोब ठेवणे कठिण असायचे. एखादी गाडी रस्त्यात बंद पडली तर काही विचारु नका. दुसरी गाडी आली की सगळे प्रवासी त्या गाडीत चढ्वा. सगळा हिशोब, प्रवाश्यांचे राहिलेले पैसे नवीन वाहकाला द्या. कुणी विनातिकीट असलं आणि तपासणी पथक आलं तर जो वाहक असेल त्यास जवाबदार ठरविले जाते. त्याला मेमो मिळतो, इंन्क्रिमेंट थांबते." - ती
गाडी पारोळ्याला पोहोचली होती. गाडीतली गर्दी आंणखीनच वाढली. दोन आसनी जागेवर तिघे तिघे बसले होते. एक लेकुरवाळी बाई आमच्या आसनाजवळ येऊन उभी राहीली. तिला बसायला जागा हवी होती. ते शक्य नव्हते म्हणून मी उठून उभा राहिलो. तासाभराने गाडी एरंडोलला पोहोचली. पारोळ्यास बसलेली स्त्री एरंडोलला उतरली. मला परत बसायला जागा मिळाली.
गाडी एरंडोलहून सुटली तशी तिने आपली पर्स उघडली, मोबाईल बाहेर काढला.
"मी एरंडोलहून निघालेय, तुम्ही एका तासात शिव कॉलोनी स्टॉपवर मला घ्यायला या." - ती
"घरी कळवलतं का ?" - मी
"हो पहिल्यांदाच घरी जातेय ना, सगळे काळजीने चौकशी करतात." - ती
"कोण कोण असतं घरी ?" - मी
"मी, माझे मिस्टर, आमची मुलगी आणि सासुबाई." - ती
"मुलगी केवढी आहे ?" - मी
"२ वर्षांची" - ती
"राहते का तुमच्याशिवाय ?" - मी
"नाही, रडते रोज रात्री. शेवटी फोन करावा लागतो तेव्हा कशीतरी समजुत घालते. सासुभाई सांभाळतात. ८ दिवसांपुर्वी घराबाहेर पडले तेव्हा मलाच रडु येत होते. पण काय करणार, संसारासाठी करावे लागते." - ती
"मिस्टर काय करतात ?" - मी
"खाजगी पतपेढीत आहेत, नोकरी कायमस्वरुपी नाही. एवढी महागाई, त्यांच्या पगारात भागत नव्हते म्हणून नाईलाज म्हणून ही नोकरी करतेय." - ती
"जळगांव डेपो नाही मिळाला का तुम्हाला ?" - मी
"१-२ वर्षे झाल्यावर मग बदली साठी प्रयत्न करता येतील तोपर्यंत नाही." - ती
संध्याकाळ होत आली होती. जळ्गांव १५ मिनिटांच्या अंतरावर होते. आम्ही दोघेही शांत बसलो होतो. आता माझ्या मनातील विचार सुरु झाले.
८ दिवसांनी घरी जातेय ही. कोणत्या भावना असतील तिच्या मनात. घराची ओढ. ८ दिवसांचा शीण. मुलीची आस. सासुबद्दलची कर्तव्ये. काय होईल ती घरी गेल्यानंतर. तिच्या नवर्याला ती प्रसन्न पणे सामोरी जाईल का ?
उद्याची सुटी झाल्यावर परत निघावे लागणार.
शिवकॉलोनी आली तशी ती उतरली. बाहेरुन माझ्याकडे बघुन हात हलवत निरोप दिला. तिचा नवरा तिला घ्यायला आलाच होता. त्याच्या चेहेर्यावर आनंद दिसत होता. मी त्या दोघांना हात हलवून निरोप दिला.
संसाराचा गाडा ओढणारं हे दुसरं चाक - शांत, सोशिक, अदृश्य, न कुरकुरणारं. गाडी जळगांव स्थानकाकडे निघाली.
शेवट तुम्हीच केलात का ?
शेवट तुम्हीच केलात का ? असो
छान आहे ..
छान
छान
आवडले.
आवडले.
आवडले. तशा या नोकरीच्या
आवडले. तशा या नोकरीच्या बर्याच समस्या स्त्री आणि पुरुष, या दोघांनाही सामायिक आहेत.
एस्.अजित, परत आले , त्या शेवट
एस्.अजित,
परत आले :-),
त्या शेवट सुचवा चे काय केले हो ?
(No subject)
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मित्रांनो.
छानच. स्त्री कंडक्टर...खरच
छानच. स्त्री कंडक्टर...खरच कटकटीची नोकरी. गाडीत गर्दि असेल तर पुरूषांची काय हालत होते तर ती स्री किती सहन करत असेल वर आणी अरेरावी करणारे असतातच.
एक बातमी -
एक बातमी - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14504772.cms
याविषयी पूर्णपणे नाही - पण थोडी संबंधित आहे.
प्रतिसाद अयोग्य वाट्ल्यास सांगा. चु.भु.दे.घे.
छान
छान