आईच्या कविता-१

Submitted by झुलेलाल on 20 July, 2008 - 01:14

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परी गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि

गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात

कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
असा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं

काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला

(http://zulelal.blogspot.com)

गुलमोहर: 

>>नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं
>>द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला

वा. भक्तीभावाने ओथंबलेली निरागस कविता. खूप आवडली.