बरेचदा आधुनिक भारताचा इतिहास वाचताना असे वाटते की फाळणी झाली ते योग्य झाले का? ती टाळता आली असती का? कोणी पुढाकार घेतला? यावर बरीच पुस्तकं वाचताना मला खालील दोन भाषणं सर्वात महत्त्वाची वाटली. दोन्ही मुसलमान पुढार्यांची आहेत. एक काँग्रेसचा तर दुसरा आधी काँग्रेसचा, पण नंतर मुस्लिम लीगचा पुढारी.
MAULANA ABDUL KALA AZAD, Congress Presidential address, 1940:
"It was India's historic destiny that many human races and cultures should flow here, finding a home in her hospitable soil, and that many a caravan should find rest here. .. Eleven hundred years of common history (of Islam and Hinduism) have enriched India with our common achievements. Our languages, our poetry, our litreature, our culture, our art, our dresses, manners and customs, the innumerable happenings of our daily life, everything bears the stamp of our joint endeavour. .. These thousand years of our joint life moulded us into a common nationality. Whether we like it or not, we have now become a Indian Nation, united and indivisible. No fantasy or artificial scheming to separate and divde can break this country."
M.A.JINNAH. Muslim League Presidential address, 1940:
"The problem in India is not of an interconmmunal but manifestly of an international character, and must be treated as such. .. It is a dream that Hindus and Muslims can evolve a comman nationality, and this misconception of one Indian nation has gone far beyond the limits, and is the cause of most of our troubles, and will lead India to destreuction, if we fail to revise our actions in time. The Hindus and Muslims belong to two different religious philosophies, social customs, and literature. They neither intermarry, nor interdine together, and indeed they belong to two different civilizations which are based mainly on conflicting ideas and conceptions. Their aspects on and of life are different."
१९४७.
१५ ऑगस्ट, १९४७ या दिवसाला प्रत्येक भारतीयाच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला. माझे आजोबा मात्र 'जय हिंद' झाला असे म्हणायचे, 'स्वातंत्र्य मिळाले' असे नाही. आपल्या शालेय इतिहासात १९४७ सालातील फक्त १५ ऑगस्ट हाच दिवस येतो. बाकीच्या ३६४ दिवसात काय झाले याची संपूर्ण माहिती मात्र मिळत नाही (निदान मी शिकलेल्या शालेय इतिहासात). माझ्या या छोट्याशा लेखात फाळणी व त्या घटना म्हणजे १९४६ चा शेवट ते १९४८ जानेवारी मधील महत्त्वाच्या घटनांना मी मांडणार आहे. लेखनात भारताचे स्वांतत्र्य हा विषय असल्यामुळे पर्यायाने हिंदू - मुस्लिम दंगली व फाळणी हेही येणारच. लिहीताना मी ज्या घटनांना पुरावे आहेत त्याच लिहील्या आहेत, कुठेही माझे वैयक्तिक मत मांडण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे वाचताना देखील इतिहास म्हणूनच वाचले गेले तर बरं. विस्तारभयामुळे बरेच छोटे मोठे मुद्दे घेतले नाहीत पण त्या १५ ते १६ महिन्यात भारताला कलाटणी देणार्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. कदाचित हा लेख रुक्ष वाटेल पण इतिहास जशाचा तसा लिहीताना कल्पनाविस्ताराला बंदी आहे त्यामुळे जसेच्या तसे मांडले.
१९४६ च्या सुरुवातीला जिनांनी मुस्लिम लीगचा डायरेक्ट ऍक्शन डे घोषित केला. त्यानुसार बंगाल प्रांतातील मुस्लिमांनी बंगालात दंगली सुरू केल्या. ह्या दंगली सुरू करण्याचे प्रमुख कारण पाकिस्तानची निर्मिती करणे हेच होते. इंग्रज जायच्या आत जिनांना त्यांना पटवून द्यायचे होते की भारत हा हिंदू देश आहे व येथे मुस्लिम लोक राहू शकत नाहीत (त्यांचे भाषण). हे सिद्ध करण्यासाठी जोरदार दंगली होणे आवश्यक होते. जेव्हा दंगल सुरू झाली तेव्हा त्याचा भडका इतका भयानक होता की अल्पावधीत हजारो हिंदू मारले गेले. गांधीजींना हे सहन होणे शक्यच नव्हते. त्यांनी बंगालचा दौरा करायला सुरूवात केली. सात आठवड्यात १२६ मैल पायी चालून साधारणपणे शंभर गावात त्यांनी प्रार्थनासभा आयोजित करून दंगली थांबविण्याचा प्रयत्न केला व बर्याच अंशी त्या थांबविल्या. सरकारी आकडेवारीनुसार मे १९४७ पर्यंत ४,०१४ लोकांचा मृत्यू दंगलीमुळे झाला. सरकारी आकडेवारी ही बर्याच अंशी खोटी होती कारण जे हिंदू गांधीजींकडे येऊन तक्रार करत होते त्यांची संख्या ही काही हजारो होती. दंगल जशी बंगालमध्ये झाली तशीच पश्चिम पंजाब म्हणजे लाहोर वगैरे भागातही झाली. या आकडेवारीत ३००० शीख मारले गेले याची नोंद आहे. यावरूनच ही आकडेवारी किती खोटी आहे हे सिद्ध होते. एकट्या बंगालमध्ये अंदाजे काही हजार लोक मरण पावले असावेत.
भारत स्वतंत्र होणार हे साधारण २० फेब्रुवारी, १९४७ ला ठरले. साधारण १९४८ च्या मध्यापर्यंत भारताला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळणार होती. पण प्रश्न होता भारत व पाकिस्तान हे दोन देश निर्माण कसे करायचे, हा. नंतर अचानक १९४८ च्या ऐवजी १५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवशीच स्वातंत्र्य मिळणार असे घोषित केले गेले. भारताची अधिकृत फाळणी करण्यासाठी सर सिरील रॅडक्लिफ हे १९४७ च्या जुलैच्या सुरूवातीला भारतात आले. याआधी ते एकदाही भारतात आले नव्हते व ना त्यांना भारताची माहिती होती. त्यांना फाळणीसाठी फक्त ५ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला. त्यांचा सहकारी डब्ल्यू. एच. ऑडन याने त्यांच्या कामाबद्दल लिहीलेय "between two people fanatically at odds with their different diets and incompatible Gods" with "the maps at his disposal .. out of date and the census returns almost certainly incorrect he has to divide India." (वरील दोनच वाक्य कदाचित आजही भारताला लागू होत असावीत.)
एकाचे दोन की तीन देश?
फाळणीसाठी मुख्य राज्ये दोनच होती. बंगाल व पंजाब. बंगालची फाळणी त्यातल्या त्यात सोपी होती पण पंजाबची विभागणी करणे ही सर्वात अवघड बाब होती. १ ऑगस्ट या दिवशी पंजाब बाऊंड्री कमिशनची स्थापना झाली. पश्चिम पंजाब (म्हणजे लाहोर) ही शीखांची जुन्या जमान्याची राजधानी. तसेच लाहोरमध्ये लाखो हिंदू लोक देखील राहात होते. फाळणी कशी करायची हा मोठा प्रश्न होता. कमिशनमध्ये एक हिंदू, एक शीख व दोन मुसलमानांना समाविष्ट केले गेले. ७ ऑगस्टच्या पहिल्या ड्राफ्ट मध्ये टी. डब्ल्यू. (पीट) रॉस लिहीतात "This would please no one entirely. It may well detonate the Sikhs" या दिवसापर्यंत बंगाल व इतर भागाची फाळणी निश्चित झाली होती पण पंजाबची फाळणी निश्चित होत नव्हती. बंगालमधील हिंदूंना काय होणार याची कल्पना असल्यामुळे त्यांनी भारतात राहणार्या बंगालकडे स्थलांतर करण्यास आधीच सुरूवात केली पण पंजाबमध्ये राहणार्या शीखांना लाहोर आपल्या हातून जाणार याची कल्पनाच नव्हती. त्यांच्या दृष्टीने लाहोरमधील 'नानकाना साहेब गुरुद्वारा' हे सर्वस्व होते. तसेच अजूनही सीमारेषा नक्की न झाल्यामुळे गोंधळ वाढला होता. त्यांना ना मुस्लिमांसोबत रहायचे होते ना हिंदूंसोबत.
त्यांच्यातील राजकीय नेत्यांनी नवाच डाव मांडला अन् स्वतंत्र खलिस्तानाची घोषणा केली जी हाणून पाडण्यात आली. ती हाणून पाडताना मुख्यत: दोन-तीन गोष्टींचा विचार केला गेला. शीख हे जरी एकदेवेश्वरवादी असले तरी ते हिंदूंच्या जास्त जवळचे आहेत, त्यांच्यात रोटी-बेटीचे व्यवहार होतात त्यामुळे शीखांची सरमिसळ हिंदूंत केल्याने फारसा फरक पडणार नाही. अशा रीतीने खलिस्तानाची घोषणा झाली, पण खलीस्तान निर्माण मात्र झाले नाही. पुढे बर्याच वर्षांनंतर या मागणीने जोर धरला, हिंदू-शीख दंगली झाल्या व पंतप्रधान इंदिरा गांधींना मारण्यात आले पण तो ह्या लेखाचा विषय नाही त्यामुळे विषयांतर करण्याचा मोह टाळतो. पंजाब विभागणी ही शेवटी १५ ऑगस्ट पर्यंत झालीच नाही. फक्त बंगाल विभागला गेला. पश्चिम पंजाब व पूर्व पंजाब हे अजूनही एकत्र भारतातच राहिले. यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. मुसलमान व शीख दोघांनीही कुठे जावे हे अजूनही कळत नव्हते.
दुसरा मोठा प्रश्न होता भारतात असणार्या प्रिन्सली स्टेट्सचा. संपूर्ण भारतावर ब्रिटीशांचे राज्य नव्हते. काश्मीर, हैदराबाद सारखी साधारण ५२१ ते ५६५ संस्थाने भारतात स्वतंत्र होती. त्यांचे भवितव्य काय असणार होते? २६ जून रोजी वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन झाली व महाराज सायाजीराव गायकवाड (बडोदा) व पान्नीकर या बिकानेरच्या दिवाणाने पुढाकार घेऊन सर्व राजांना स्वतंत्र भारतात 'भारत' म्हणून सामील होण्याचे पत्र पाठविले. हैदराबाद हे संस्थान नंतर कारवाई करून ताब्यात घ्यावे लागले पण इतर सर्व संस्थानिकांनी भारतात सामील व्हायची तयारी दाखविली. काश्मीरच्या राजाने स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला.
तिकडे बंगालात गांधीजींनी दंगलींवर बर्याच प्रमाणात रोख लावला होता. १३ ऑगस्टच्या दिवशी एक प्रार्थना सभा घेतली व १५ ऑगस्टला आपण उपास करणार आहोत हे घोषीत केले. १५ ऑगस्ट उजाडला अन् बंगालात चमत्कार घडला. कलकत्त्यात हिंदू आणि मुस्लिम दोघे एकत्र येऊन स्वांतत्र्यदिन साजरा करु लागले. रस्त्यांवर मिरवणुका निघाल्या. हिंदू व मुसलमान दोघे एकत्र येऊन 'वंदे मातरम' व 'जय हिंद' चा जयघोष करू लागले. १९४६ पासून १५ ऑगस्ट, १९४७ पर्यंत एकही दिवस शांत नसणार्या कलकत्त्यात निदान त्या दिवसापुरती शांतता नांदली.
दिल्लीत जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होणार होते. १५ ऑगस्ट ह्या दिवशी त्यांचा दिनक्रम असा होता:
8.30 a.m.: Swearing-in of Governer-General and Ministers at Govt House
9.40 a.m.: Procession of Ministers to Constituent Aseembly
9.50 a.m.: State drive to Constituent Aseembly
9.55 a.m.: Royal Salute to Governor General
10.30 a.m.: Hoisting of National Flag at Constituent Assembly
10.35 a.m.: State Drive to Govt House
6.00 p.m.: Flag ceremony at India Gate
7.00 p.m.: Illuminations
7.45 p.m.: Fireworks
8.45 p.m.: Official Dinner at Govt House
10.15 p.m.: Reception at Govt. House
इतका सारा भरगच्च कार्यक्रम नेहरुंसाठी होता तर त्या दिवशी गांधीजी मात्र कलकत्त्यात उपास करत होते. हिंदुस्थान टाईम्सच्या एका वार्ताहराला गांधीजींची मुलाखत हवी होती ती त्यांनी नाकारली.
वल्लभभाई पटेलांना मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यास नेहरुंचा विरोध होता असे लॉर्ड माउंटबॅटन यांच्या चरित्रात लिहीले आहे. त्यांनी बळजबरी करून पटेलांना मंत्रीमंडळात घ्यायला लावले असा उल्लेख आहे.
लाहोरमध्ये मात्र १४ आणि १५ ऑगस्टला दंगली चालू होत्या. अजूनही पंजाब कसा विभागला जाणार हे माहीत नव्हते. १६ ऑगस्टच्या दिवशी पंजाबचे काय होणार हे ठरले. ती वाटणी ऐकून मुसलमान अधिकच चिडले. त्यांचा दृष्टीने गुरुदासपूरही पाकिस्तानात जायला हवे होते पण ते तेथील शीखांच्या संख्येमुळे भारतातच राहीले. शीखही चिडले कारण पवित्र नानकाना साहेब गुरुद्वारा असणारे लाहोर हे पाकिस्तानकडे गेले. या वाटणीमुळे एक भयानक दंगल सुरु झाली. फक्त ऑगस्टच्या महिन्यात सरकारी आकडेवारीनुसार १५,००० लोक ठार झाले होते आणि गव्हर्नर जनरलच्या मते खरा आकडा निदान ३ ते ४ पट असण्याची शक्यता होती.
२ सप्टेंबर या दिवशी सीमारेषेचा ताबा भारत व पाकिस्तान यांना घ्यायचा होता. आत्तापर्यंत असलेल्या पंजाब बाऊंड्री फोर्सने तो ताबा दोन्ही देशांच्या मिलिट्रीला दिला. दंगलीच्या बातम्या वाचून महात्मा गांधी विचलीत होत होते अन् अचानक शांत असलेल्या बंगालमध्ये पुन्हा एकदा मोठी दंगल चालू झाली, निमित्त झाले एका हिंदूला एका मुसलमानाने मारण्याचे. शेकडो हिंदू गांधीजींकडे येऊन तक्रार करत होते की आता त्यांनी काय करावे, त्यांची सरेआम कत्तल चालू झाली. ती थांबविण्यासाठी गांधीजी पुन्हा एकदा उपोषणाला बसले. स्वतंत्र भारतातील त्यांचे हे पहिलेच उपोषण. त्यामुळे बर्याच अंशी दंगल थांबली व हिंदू मुस्लिमांनी आपली शस्त्रे खाली ठेवायला सुरूवात केली. पंजाबमधील परिस्थितीमुळे गांधीजी तिकडे जाऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी बालीघाटवरून प्रयाण केले व ते दिल्लीला आले. तेथे येताच त्यांना निर्वासित शीख व हिंदू बांधव भेटायला आले. त्यांनी त्यांची गार्हाणी मांडायला सुरुवात केली व दिल्लीत राहणार्या मुसलमानांना धडा शिकवण्याची मागणी केली. गांधीजींनी ती नाकारली. मुस्लिम पुढारी (भारतात राहू इच्छीणारे) गांधीजींना भेटायला आले व त्यांनी दिल्लीत दंगल थांबवावी व येथील मुस्लिमांना येथेच राहू द्यावे ही विनंती केली. ती गांधीजींनी मान्य केली व त्यांचे पंजाबला जाणे तसेच राहीले.
सप्टेंबरच्या सुरुवातीपासून निर्वासितांचे लोंढे भारतात व पाकिस्तानमध्ये यायला सुरुवात झाली. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत दोन्ही देशात काही लाखांनी निर्वासीत आले. एका (ब्रिटीश) आकडेवारीनुसार या दंगलीत दहा लाख लोक मारले गेले तर दुसर्या आकडेवारीनुसार वीस लाख लोक एकतर बेपत्ता होते वा मारले गेले.
त्यातल्या त्यात नेहरुंनी एक मोठी दंगल वाचवली. १ लाख लोकांचा कबिला पाकिस्तानमधून भारतात येत होता तर ७०,००० लोकांचा दुसरा कबिला तिकडे जात होता. नेहरुंनी लाहोर ते अमृतसर मधील रस्ता बुलडोझरद्वारे पाडून टाकला त्यामुळे ही दंगल टाळली गेली.
ऑक्टोबरनंतर पाकिस्तानने स्वतंत्र काश्मीरवर हल्ला केला. हा हल्ला अनधिकॄत होता. काश्मीरचा हिंदू राजा हरीसिंग हा भारताकडे मदतीला आला व भारताने मदत केली. या घटनेमुळे सरदार वल्लभभाई पटेल व्यथित झाले. अशातच करारानुसार ५५ कोटी देण्याची मागणी पाकिस्तानने केली. भारत सरकार (मुख्यत: नेहरु व पटेल) यांचा ५५ कोटी द्यायला विरोध होता कारण पाकिस्तानने करार न पाळता काश्मीरवर हल्ला केला. जर करार एक पक्षाने तोडला तर दुसरा पक्ष तो पाळायला बंधनकारक कसा असेल असे भारताचे म्हणने होते. पाकिस्तानला मात्र भारताची दुखरी नस म्हणजे गांधीजी माहिती होती. गांधीजी जरी सरकारात नव्हते तरी ते सरकारवर कंट्रोल ठेवून होते. पाकिस्तानने गांधीजींकडे मागणी केली. गांधीजींनी ती मान्य केली. त्यांच्यामते हे दोन देश असूच शकत नाहीत. तो एकच देश आहे व मोठ्या भावाने जसे लहान भावाच्या अपराधाकडे दुर्लक्ष करावे तसे भारताने ते ५५ कोटी द्यावेत. सरदार पटेल हे गांधीजींचे निस्सीम भक्त पण त्यांनी खूप मोठा विरोध केला. गांधीजींनी जुमानले नाही. स्वतंत्र भारतात ते उपोषणाला बसले व १५ जानेवारी, १९४८ ह्या दिवशी ते पैसे भारताला पाकिस्तानकडे सुपूर्त करावे लागले. गांधीजींचे उपोषण संपले. ते अजूनही दिल्लीत होते.
शीख व तेथील हिंदूंच्या झालेल्या कत्तलीमुळे व परत दिलेल्या पैशामुळे हिंदू व शीख गांधीजींपासून दूर जाऊ लागले. गांधीजींच्या गप्प बसण्याला लोक कंटाळले. २० जानेवारी, १९४८ रोजी गांधीजी प्रार्थनासभेत असताना मदन लाल या व्यक्तीने त्यांच्यावर चिडून जाऊन बॉम्ब फेकला. तो बॉम्ब गांधीजींपासून काही फुटांवर फुटल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. पण हे जीवनदान त्यांना जास्त दिवस लाभले नाही. ३० जानेवारी, १९४८ रोजी त्यांचा वध झाला. एक पर्व संपले.
वरीलपैकी कुठले भाषण योग्य, कुठले अयोग्य हे मला अजूनही ठरवता येत नाही, कारण अजूनही तसा फारसा बदल झालेला नाही. दोन्ही धर्म भारतात एकत्र राहूनही "सोबत" नाहीत. कोणाचे म्हणणे खरे ठरवणार हे सर्व भारतीयांच्या हातात आहे. गेल्या वेळेस खलिस्तान निर्माण झाले नाही, पण कदाचित ह्या वेळेस तसे होणार नाही.
-केदार जोशी
संदर्भ-
India After Gandhi - Ramchandra Gupta
'India' by Stanley Wolpert