|
Neela
| |
| Wednesday, November 14, 2007 - 4:26 pm: |
|
|
स्टेशनचा गजबजलेला परिसर.. लोकल पकडण्याची प्रत्येकाची धांदल.. कोणाच्या मनात शानिवार, रविवार आता आनंदात घालवायची स्वप्ने.. कोणी शुक्रवारची संध्याकाळ ’ति’च्या सहवासात घालविण्यासाठी आतुर.. कोणी दोन दिवसांची सुट्टी एकट्याने कशी घालवावी या चिंतेत.. तर कोणी पाच माणसांच्या घरात एकांत कसा मिळेल याचा मनात विचार करतो आहे. त्याच्याही मनात एक विलक्षण व्याकुळता.. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडण्याची ही पहिली वेळ नव्हेच.. नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षापूर्वीपर्यंत तर ते रोजचे आयुष्य होते.. मग पुण्यात नोकरी मिळाली. सुंदर, समजूतदार बायको.. एकुलता एक मुलगा.. घर, गाडी .. सगळे काही गेल्या पाच वर्षात जमले. आईला समजून घेणारी बायको मिळाल्याने तो दॆवावर जास्तच खुष होता. वडील गेल्या वर्षी गेले.. सावत्रपणाचा दुरावा वडिलांच्या वागण्यात कधी आला नाही. ते गेल्याचे दु:ख ताजे होते.. पण.. पण स्वत:च्या सख्ख्या वडिलांना न पाहिल्याची खंत मनातून कधीच गेली नाही. आईला जास्त वाईट वाटेल म्हणून शाळेत कालेजमध्ये मित्रांसोबत झालेली चर्चा तो घरी कधीच बोलून दाखवत नव्ह्ता.. पण मित्रांचे वडिल हक्क दाखवून रागवायचे.. चुकीच्या गोष्टींवर डाफ़रायचे.. ते ’सुख’ त्याला लाभले नाही. हा आपला सख्खा मुलगा नाही हे त्याच्या सावत्र वडीलांच्या मनातून कधीच गेले नाही. भरपूर खेळणी.. खाऊ.. कपडेलत्ते.. हवे ते शिक्षण घेण्याची मुभा .. सगळे काही त्यांनी दिले.. पण एक अंतर दोघांच्या दरम्यान कायम राहिले.. आईचे दु:ख त्याला लहानपणापासूनच जाणवायचे. अतिशय विलक्षण पध्दतीने तिची व वडिलांची ताटातूट झालेली होती. १९४५ च्या काळात त्याचे आजोबा मुलानातवंडांना घेऊन कराचीला उद्योगधंद्यासाठी गेले.. दोन वर्षे सगळे आलबेल होते. भारत पाकिस्तान फ़ाळणी ही स्वातंत्र्याची किंमत घेऊन आली.. त्याच धामधुमीत दंगली उसळल्या आणि त्याच्या वडिलांची इतर कुटुंबियांशी ताटातूट झाली. पुष्कळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. आपला जावई दंगलीत मारला गेला या विचाराने कितीही दु:ख झाले तरी ते दाखवायलाही क्षणाची उसंत नव्हती. नाईलाजाने आजोबा लेकीला व नातवंडांना घेऊन भारतात परत आले. त्याची आई तेव्हा जेमतेम पंचविशीची.. तिच्यासमोर तर सगळे पुढचे आयुष्य पडले होते.. दोन मुले पदरात होती.. शिक्षण फ़ारसे नाही.. आजोबांनी एक धाडसी निर्णय घेऊन मुलीचे एका होतकरू तरूणाशी मुलीचे लग्न लावून दिले. यावेळेस तो होता जेमतेम पाच वर्षांचा. पुढचे जीवन सुखात गेले. पण मनावर एक चरा उमटलेला घेऊन.. वडिलांचा फ़ोटोसुध्दा कधीच पाहिलेला नव्हता.. वर्षांमागून वर्षे उलटत गेली. काळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. आणि अखेरीस कोणाचेच कोणावाचून अडत नसते. मनात एक ठसठसणारी वेदना घेऊन आपण सर्वजण पुढे जातो. मागच्या आठवड्यात मात्र या सगळ्याला छेद देणारी एक विलक्षण घटना घडली. त्याला एक फ़ोन आला.. “….. तुम्हीच ना ?” “होय , बोला काय काम आहे”? “हं.. काम जरा वॆयक्तिक आहे.. आपण भेटू शकतो का?” अनेकविध विचार त्याच्या मनात डोकावून गेले. पण अखेरीस फ़ोनवर पलीकडच्या माणसाच्या बोलण्यातल्या आर्जवाला त्याने होकार दिला. दोन दिवसांनंतर संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेट ठरली. अतिशय उत्सुकतेने तो ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचला. ’तो’ आलेलाच होता.. अंदाजावरुन त्याने नाव विचारुन पडताळणी केली व हस्तांदोलन घडले. त्याला पाहिल्यापासून काहीतरी विलक्षण भावना मनात दाटत होत्या. त्या माणसाने त्याला स्वत:चे पूर्ण नाव सांगितले .. ते ऎकून तो उडालाच. त्याच्या सख्ख्या वडिलांचे आईने सांगितलेले नाव त्याही माणसाच्या वडिलांचे होते.. “कसे शक्य आहे ?.. जाऊ दे.. एकाच नावाच्या व आडनावाच्या दोन व्यक्ती असणे फ़ार दुर्मिळ नाही..” दुस-या मनाने लगेच उत्तर दिले.. तो पुढे ऎकू लागला. तो माणूस हसला.. म्हणाला.. ’होय, तुझ्या मनात जे विचार चाललेत ते योग्य आहेत’. तुझे व माझे वडिल एकच होते.. “ “पण हे कसे शक्य आहे ?.. ते तर कधीच ..कित्येक वर्षांपूर्वीच गेले. आणि मी एकटाच मुलगा आहे त्यांचा..” हा म्हणाला. तो माणूस म्हणाला.. “नाही.. ते पाकिस्तानातून जीव बचावून कसेबसे आले. तुम्हा सर्वांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. तुम्ही सापडला नाहीत. मग त्यांनी पुनर्विवाह केला. माझा जन्म झाला. तुम्हा सर्वांची ते खूप आठवण काढायचे. त्यांच्या दृष्टिने तुम्ही दंगलीत मारले गेलात. अनेकदा त्यांच्या ओठांवर तुझे नाव यायचे. मागच्या वर्षी ते गेले. मागच्या महिन्यात अचानक तुला पुरस्कार मिळाला तेव्हाचा तुझा फ़ोटो व त्याखालचे नाव पाहून मी चमकलो. मग माहिती काढत गेलो. तुझ्या आईची माहिती कळली.. मग खात्री पटली की आपण दोघे भाऊ लागतो. तुझा फ़ोन नंबर शोधून फ़ोन केला. आणि आज आपण येथे आहोत”.
|
Itgirl
| |
| Wednesday, November 14, 2007 - 4:50 pm: |
|
|
पुढचे भाग टाका पटपट
|
Anaghavn
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:46 am: |
|
|
छान चाललंय.ताणून धरु नका. अनघा
|
Aashu29
| |
| Friday, November 16, 2007 - 9:29 pm: |
|
|
अर्रे, मला वाटते कथा इथेच संपलिये!! चांगलि होति, वेगळी!
|
Anaghavn
| |
| Thursday, November 22, 2007 - 11:49 am: |
|
|
लिहीण्याची शैली छानच!!!आवडली पण हा शेवट आहे का कसं? कळालं नाही खरंच. अनघा
|
I don't think so this is the ending. नीलाबाई, प्लीज खुलासा करावा.......
|
|
|