|
Shravan
| |
| Monday, April 09, 2007 - 1:40 am: |
| 
|
यात्रा चैत्राचा महिना आणी गावोगावच्या जत्रांबद्दल काहीच गप्पा नाहीत? असं कसं चालेल? चैत्राच्या आगमनाबरोबरच महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रांची चाहुल लागते. ग्रामीण संस्कृतीची ओळख सांगणार्या या यात्रा म्हणजे एक उत्सवच असतो. मी इथे अशाच एका यात्रेची गोष्ट सांगणार आहे. खोडद.. पुणे जिल्ह्यात शिवनेरीच्या कुशीत वसलेले माझे गाव. या वर्षी खूप दूर असल्याने मला यात्रेला जाता आले नाही. मनाच्या कोपर्यात साठलेल्या यात्रेच्या आठवणी पुन्हा पुन्हा उचंबळून येत आहेत. चैत्रात येणार्या रामनवमीच्या दिवशी खोडदची यात्रा भरते आणी दोन दिवस चालते. यात्रेचा प्रत्येक कार्यक्रम ग्रामीण संस्कृतीची ओळख सांगणारा असतो. मुळातच ग्रामदैवत मुक्ताई देवीवर सगळ्या गावची प्रचंड श्रद्धा असल्याने ही यात्रा भरगच्च भरते. पहिल्या दिवशी सकाळी मांडव डहाळे असतात. म्हणजे गावातील प्रत्येक बैलगाडी, ट्रक, ट्रक्टर, इतर वाहने सजवून त्यामध्ये आंब्याच्या व कडूनिंबाच्या डहाळ्या देवापुढे मंडप करण्यासाठी एकत्र मिरवणूकीने वाजत गाजत नेले जातात. अगदी गावातील एकूण एक वाहन, बैलगाडी या मिरवणूकीत सहभागी असते. उद्देश हा की देवीचा मंडप टाकताना गावातील प्रत्येक घराचा त्यात सहभाग असावा. मिरवणूकीच्या पुढे ढोल, ताशे, लेझीम अगदी ग्रामीण ढंगाने खेळले जातात. मांडव डहाळ्यांनी देवीचा मंडप सजल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा होतो. किर्तनातून रामकथा ऐकल्यावर मध्यान्हीच्या सुमारास फुले उधळून रामजन्माचा आनंद व्यक्त केला जातो. नंतर घरोघरचे पुरणपोळीचे नैवद्य देवीसाठी नेले जातात. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास शेरणी चा कार्यक्रम असतो. म्हणजे देवीसाठी गुळ, पेढे यांचा प्रसाद मंदिराकडे एकत्र मिरवणूकीने नेऊन मंदिराजवळ वाटला जातो. पुन्हा ढोल, ताशे, झांज, लेझीम. सगळ्या गावातील लहान, मोठे, बायका, मुली, जेष्ठ, तरुण या शेरण्यांमध्ये सहभागी होतात. हा कार्यक्रम खुपच मोठा असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक वर्षातून एकदाच फक्त एकत्र येतात. अगदी देशाच्या कानाकोपर्यातून गावातील माणूस यात्रेसाठी खात्रीने येतोच. मग आपसूकच देवीच्या प्रसादाबरोबरच जमलेल्या माहेरवाशीणी, सुना, पोटापाण्यासाठी गावापासून दूर गेलेले चाकरमाने आणी त्यांचे जुने सवंगडी यांची आपापसातील ख्याली खुशालीचीही देवघेव होते. रात्री देवीची पालखी निघते. पालखी तर धमाल असते. भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील विविध करमणूकीचे खेळ, भारुडे, लेझीम, झांज पथके, ढोल, ताशे, मुख्य चौकात टाळकर्यांचे रिंगण करुन नाचणे, महिलांच्या फुगड्या, तरुणांचे बेहोश होऊन नाचणे.. सगळे जबराच. पालखीलाही प्रचंड गर्दी असते. मग रात्र जागवली जाते ती गावातील तरुणांनी सादर केलेल्या नाटकाने.. दुसर्या दिवशी कलगी तुर्याचा कार्यक्रम असतो. ग्रामीण भागात कलगी तुरे हा शाहिरीचा प्रकार आहे. काही जुने लोक या प्रकारात कवने रचतात. त्यामध्ये सवाल जवाब पण असतात. अशा गावोगावच्या शाहिरांना एकत्र आणून, खास जुन्या लोकांसाठी त्यांचा कलगी तुर्याचा कार्यक्रम असतो. दुपार नंतर ग्रामीण भागाचे वैशिट्ये असलेल्या बैलगाड्याच्या शर्यती असतात. तुफान वेगात धावणार्या बैलगाड्यामागे फेटे उडवत धावणारा बेभान शेतकरी अनुभवणेही रोमांचकारी असते. शर्यतीचा धुराळा खाली बसतो नाही तोच तमाशाची हलगी तडतडू लागते, ढोलकी घुमू लागते. दुसरी संपुर्ण रात्र मग तमाशाने जागविली जाते. मी बर्याच इतर गावातील यात्रा पाहिल्या पण लोकांचे एवढे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करणे मात्र दुसरीकडे अनुभवले नाही. आमच्यासाठी यात्रा म्हणजे नोकरीनिमीत्त बाहेर स्थायीक असणार्या आणी गावामध्येच असणार्या सगळ्या जुन्या मित्रांना एकत्र येण्याची संधी असते. मस्त ओली भेळ, मिसळ, दादाभाऊच्या व बबूच्या हॉटेल मधील जिलेबी, भजी, बर्फाची गारिगार, उसाचा रस असा सगळा मेवा मनसोक्त हादडायचा असतो. एकत्र येऊन जुन्या आठवणींमध्ये रमायचे असते. कुणाचीही भीड न बाळगता पालखीपुढे घाम गळेपर्यंत नाचायचे असते. बाकी जग, नोकरी, शहर सगळे दोन दिवस विसरून ज्या मातीत आमची लहान पावले खेळली, उमटली त्या मातीच्या वासात धुंद होऊन जायचे असते. आणी आम्ही ते सगळे करतो. अगदी स्वत:ला विसरुन ते दोन दिवस जगतो. ही माझी पहिलीच यात्रा की जी माझी चुकली. मात्र मला आतापासूनच पुढच्या वर्षीच्या यात्रेचे वेध लागलेत.
|
श्रावण छान लिहीलेय. गावची जत्रा खरंच खूप ओढ लावणारी असते.
|
Zpratibha
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:12 am: |
| 
|
श्रावण थोडक्यात पण अतिशय चांगल वर्णन.
|
Srk
| |
| Wednesday, April 11, 2007 - 12:37 pm: |
| 
|
श्रावण तुमच्या लेखानं माझ्या लहानपणीची यात्रा आठवली. लाल लाल टरबुजं, घरुन नेलेली भेळ, तिथलं आईस्क्रीम, पिघलती लडकी, मौत का कुआ, २५ पैशात गोल पाळणा, गोड शेव, बघणार्याला स्वत.ःची मजेशीर रुपं दाखवणारे आरसे, आजीबरोबर ऐकलेली किर्तनं छे! यादी संपणारच नाही. आमच्याकडे वैशाखात यात्रा असते.
|
Monakshi
| |
| Thursday, April 12, 2007 - 7:24 am: |
| 
|
हाय श्राव ण, ख़ूप सुन्द र लिहिले आहे तुम्हि ज त्रे चे व र्ण न. मला गाव नाहि, त्यामुळे ज त्रा क शी अस ते ते माहित न व्ह ते. एक दा मुद्दाम ज त्रेला जाउन याय ला ह व
|
Shravan
| |
| Thursday, April 12, 2007 - 10:03 pm: |
| 
|
माझ्या गावाकडच्या एका मित्राने, विक्रांतने ही यात्रा अशी कँमेर्यात पकडली आहे.. http://in.pg.photos.yahoo.com/ph/avadhut_kharmale/album?.dir=/4f19re2&urlhint=actn,ren%3as,2%3af,0
|
Shonoo
| |
| Friday, April 13, 2007 - 12:27 pm: |
| 
|
श्रावण वर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख. सगळ्यांच्या चेहर्यावरला आनंद किती छान टिपलाय. वर्णन आणखीन सविस्तर लिहिलं तरी चालेल. इतर सणांबद्दल पण लिहीत रहा.
|
Madhura
| |
| Friday, April 13, 2007 - 4:45 pm: |
| 
|
श्रवण , मला आवडले हे वर्णन आणि फोटो.बैलगाडीचा फोटो खासच!
|
Mandarp
| |
| Monday, April 16, 2007 - 8:00 am: |
| 
|
श्रावण, खूप सुंदर वर्णन आहे. फोटो ची साईट बघता येत नाही कारण ऑफ़िस मधे बन्दी आहे त्या साईट ला. पण हे सर्व वाचताना समर्थांच्या एका ओळीची आठवण येते. "दास डोंगरी रहातो, यात्रा देवाची पहातो".... खूपच मस्त लिहीले आहेस. मंदार
|
|
|