|
Chaffa
| |
| Wednesday, April 04, 2007 - 8:23 pm: |
|
|
पैज ******* "दिन्या तु म्हणजे माठ आहेस" विल्सचा शेवटचा झुरका घेत रव्या म्हणाला. दिन्या, रव्या, मध्या, नित्या, ही नेहमीची चांडाळ चौकडी नेहमीप्रमाणे आजही कट्ट्यावर जमली होती. संध्याकाळी कट्ट्यावर जमुन चोरुन सिगारेटी ओढण्याबरोबरच दिवसभराच्या घडामोडींचा आढावा घेणे हा त्यांचा नित्यक्रम आजही चालुच होता. फ़क्त आज भर पडली होती ती नव्याने या मंडळीत सामील झालेल्या गौरवची, हा त्या सोसायटीत नविनच आलेल्या खेडकरांचा मुलगा आभ्यासात हुशार पण दुनियादारी माहीत नसलेला. आजही त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या रव्या मन लाउन दिन्याला शेजारच्या अंकिताला पटवण्यासाठी उगिच प्रयत्न करत आहे हे पटवुन देण्याच्या प्रयत्नात मग्न होत मनोभावे त्याच्याच सिगारेटचा धुर हवेत सोडत उपदेश करत होता. "आयला! रव्या आता मी काय माठगिरी केली रे ?" दिन्या वैतागला. "अरे गाढवा, रोज अशी गॅलरीतुन फ़ुले फ़ेकण्या पेक्षा सरळ एकदा रस्त्यात अडवुन विचार की !" रव्याचे तत्पर उत्तर. "दिडशहाणाच आहेस तिने चप्पल काढली तर ?" "च्यामारी, भेदरटच आहेस अरे यार चप्पल काढली तर काढली, नाहीतरी तु कुठे तिला लग्नाची मागणी घालतोयस दोनचार महीन्याचा तर प्रश्न आहे". रव्याने मुक्ताफ़ळे उधळलीच. "नाही यार रव्या या वेळी दिन्या खरच सिरीयस आहे !" ईतकावेळ विल्सच्या धुराची रिंगणे सोडण्यात व्यस्त असलेला मध्या संभाषणात भाग घेता झाला. "अरे छोड यार मध्या दिन्याचं कुठलं प्रकरण आजपर्यंत सिरीयस नव्हतं ?" आता रव्याच्या बाजुने नित्याने उडी मारली. एकंदरच दिन्याचे चारित्र्य या विषयावर जोरदार वाद झाले. बराचवेळ वाद रंगल्यावर अखेर सर्वानुमते दिन्या हा एक चारित्र्यशुन्य माणुस असुन माठही आहे या त्याच्या गुन्ह्याबद्दल दुसर्या दिवशीच्या विल्सच्या पाकीटाचा खर्च करायलाच पाहीजे या मुद्याशी सगळे सहमत झाले. "अरे सुर्य मावळुन बराच वेळ झालाय काळोखही आज जरा जास्तच पडलाय आता घरी जाउया का ?" ईतकावेळ चौकडीचे वाद ऐकत बसलेला गौरव म्हणाला. "हां यार, खरच आज काळोख जरा जास्तच वाटतोय." दिन्याने अनुमोदन दिले. "आज आमावस्या तर नाही ना ?" नित्याने अक्कल पाजळली "अबे, अमावास्या म्हणजे आज भुतांचा दिवस नाही का ?" रव्या गंभीर आवाजात म्हणाला. "चला यार, घरी माझी वाट पहात असतील." गौरवने आपला प्रॉब्लेम सांगितला. "हं हा घ्या आणखी एक शेळपट भुताचे नाव काढल्याबरोबर याची फ़ाटली." रव्याने फ़िरकी घेतलीच. आणी तिथे एकच हस्यस्फ़ोट झाला. आणी सगळी मंडळी घरी जायला निघाली. "यार नित्या आज खरंच आमावास्या आहे का ?" मध्याचा थरथरला आवाज. "आयला, टांग त्या नित्याची! साला हा घरी कालनिर्णय बघतो ते फ़क्त पुढची सुटी कधी आहे ते शोधायला याला काय विचारतोस?" ईती रव्या. "आणी असलीच आज आमावास्या तर तुला कुठे स्मशानात पिकनिकला जायचेय काय ?" "आयला ते पिकनिकवरुन बरं आठवलं यार आपल्या त्या चांभारमाळाच्या पिकनिकचे काय? सगळे येणार आहेत ना ?" नित्याला अचानक आठवले. हा दर महीन्यात एकदा संपुर्ण रात्र कुठेतरी लांब पिकनिक काढायचा या चौकडीचा रिवाजही जुनाच. ही अशी पिकनीक काढून आपली दारु पिण्याची हौसही ते घरच्या मंडळींच्या नकळत पुरी करुन घेत. पिकनिकचा विषय निघताच बाकीच्या मंडळीत पुन्हा जोश आला. ईतक्यात चंद्रावरचा ढगही दुर झाला आणी रस्ताही स्पष्ट दिसायला लागला. पिकनीकची चर्चा आता आणखी जोरात सुरु झाली. येता रविवार ठरवला होताच फ़क्त वर्गणी किती काढायची कोणाजवळ द्यायची? बाटल्या कोण आणायला जाणार? त्या कुठे ठेवायच्या? चाखण्याची सोय काय? ह्या प्रश्नांवर काथ्याकुट झाला. निर्णयाला येइस्तोवर समोर सोसायटीचे गेट दिसायला लागले आणी बोलणे आपोआप थांबले. "आयला गौर्या तु येणार की नाही?" रव्याला गौरवची आठवण झाली. "नाही बाबा मी दारु बिरु पित नाही". गौरवने स्पष्टीकरण दिले. "तुला कोण पी म्हणतय पण कंपनी म्हणुन तर येशील की नाही ?" रव्या समजुत काढता झाला. तोपर्यंत सोसायटीचे गेट पार करुन सगळे आपापल्या घराकडे जायला निघाले. पुढेही कट्ट्यावरच्या मिटींग रंगत राहील्या सिगारेटचा धुर निघत राहीला आणी रविवारच्या पिकनिकची आखणी होत राहीली. आणी महत्वाचं म्हणजे या सगळ्यात गौरवला सामील करण्यात चौकडीला यश आले. रविवार, रविवार करता करता तो दिवस अखेर उजाडलाच सकाळपासुनच चौकडी गडबडीत होती. सगळी तयारी करुन उन्हे कलत असतानाच गाड्यांना किक बसल्या रव्या दिन्या एका गाडीवर तर नित्या,मध्या आणी गौरव दुसर्या गाडीवर सगळा सारंजाम आर्थातच रव्याकडे होता. चांभारमाळ हे काही फ़ार मोठे अंतर नव्हतेच मुळी आगदी घड्याळ लाउन आर्ध्या तासाचा रस्ता, फ़क्त निवडलेला स्पॉट एकदम आडरत्याला त्यामुळे गाड्या वाटेत ठेउन पुढे आणखी आर्धातास रानातुन वाट काढत जायला लागले एवढेच. चारही बाजुला झाडी असलेला जमिनीचा तो मोकळा सपाट तुकडा पहाताच सगळ्यांच्या चेहर्यावर समाधान पसरले. एव्हाना सुर्य मावळायला लागला होता आणी हवेतही गारवा जाणवायला लागला होता. शेकोटी पेटवण्याची नितांत गरज भासायला लागली. मध्या, नित्या वाळकी लाकडे शोधायला गेले तर रव्याने हुकुम सोडत दिन्या आणी गौरव कडुन सगळा सारंजाम मांडला. लाकडांचा शोध घेत गेलेले दोघे जोर लाउन एक मोठी फ़ांदी घेउन येताना दिसताच दिन्याने कपाळावर हात मारुन घेतला. काय झालं रे कपाळ बडवायला रव्या वैतागला. "यार ते दोन शहाणे बघ केवढी मोठी फ़ांदी घेउन येतायत ती." "मग शेकोटी रात्रभर ठेवायची तर लाकुड भरपुरच पाहीजे ना ! " "हो यार पण ईतकी मोठी फ़ांदी काय वणवा लावायचाय काय ? " तिचे तुकडे करता येणार नाहीत का रव्याची बेफ़िकीरी ओसंडुन जात होती. पण तुकडे काय दाताने करणार का ईथे साला कांदा कापायचा एकच चाकु तो पण एवढासा" दिन्याने असमर्थता व्यक्त केली. अबे मुर्ख बालक तु त्याची चिंता करु नकोस रव्या त्याच्या भल्यामोठ्या सॅकमधे हात घालत म्हणाला. आपल्या सॅकमधुन रव्याने एक रुंद पात्याची पण लहान जेमतेम दोन फ़ुट लांब दांड्याची कुर्हाड बाहेर काढली आणी ती गौरवकडे देत तो म्हणाला " गौर्या आज हे लाकुडतोड्याचंकाम तु करायचे. गौरव कामाला लागलेला पहाताच चौकडीच्या सिगारेटी पेटल्या. लाकडे तोडुन त्यांची शेकोटी पेटवेपर्यंत दिवस पार मावळला होता. त्या थंडीत शेकोटी जवळ बसुन पहील्या बाटलीचे झाकण उघडल्या गेले त्या बरोबरच गप्पानाही उत आला. मध्येच शेकोटीतल्या लाकडांवर राखेचा थर जमा झाला आणी आजुबाजुचा काळोख नित्याच्या लक्षात आला. यार आज काळोख जरा जास्तच वाटतो नाही का नित्याने आपले मत मांडले. च्यायला मठ्ठडा तुला रोज कसला काळोख जास्त वाटतो रे रव्याला मागची आठवण आली. नाही यार रव्या आज खरच काळोख जास्तच आहे मध्याने पुष्टी जोडली. आणी वर बघा चांदणेही दिसत नाहीये. गौरवचा इरकलेला आवाज. च्यायची अरे कसले रे भेदरट तुम्ही परत त्या दिवशीसारखाच ढग आला असेल, रव्या भडकला. रंगाचा बेरंग नका करु चला आपापले ग्लास उचला. आयला यार आज खरच आमावास्या आहे आमची कामवाली आज लवकर गेली ती सांगत होती तिच्याकडे कुणाचा तरी उतारा काढायचा आहे म्हणुन. दिन्या पचकला. आणी सगळे वातावरण एकदम गंभिर होउन गेले. मध्या आणी गौरव एकमेकांच्या जवळ हळुच सरकले. नित्याने एका दमात ग्लास खाली केला.थोडावेळ असाच शांततेत गेल्यावर रव्याची बेफ़िकीर वृत्ती उफ़ाळली. "यार अमावास्या म्हंटल्यावर शेपुट कसले घालता? मस्त एन्जॉय करा अश्या रात्री काय सारख्या सारख्या येतात? आणी इथे कोण येणार आहे मरायला ?" सगळ्यांनाच त्याचे म्हणणे पटले आणी हळूहळू सगळे पुन्हा गप्पांमध्ये रंगत गेले हास्यविनोद वाढत गेले ग्लास खाली होत राहीले. आणी बघता बघता एकेकाच्या मेंदुवर नशेची पुटे चढायला लागली. गप्पांची गाडी हळूच कधी भुताखेतांच्या गप्पांवर वळली ते कुणाच्याच लक्षात आले नाही. ईकडच्या तिकडच्या भुतांच्या गोष्टी सांगुन झाल्यावर तांबारलेल्या डोळ्यांनी रव्या म्हणाला "तुम्ही सगळे एकजात टरकु आहात. साला नुसता आमावास्येचा विषय निघाला तरी एकेकाच्या शेपट्या पायात गेल्या." "काय पण बोलु नको रव्या मी आजिबात घाबरलो नव्हतो". नित्याने फ़ेटाळले "आणी मी पण नाही हां." मध्या बिघडला "हा गौर्याच साला भित्रा मघाशी हळूच मध्याला चिकटला". दिन्याने आपले निरिक्षण सांगितले. एव्हाना चौकडीच्या आग्रहाखातर चव म्हणुन थोडीशीच घेतलेला गौरव तडकला. "कोण साला म्हणतो मी भित्रा आहे? अबे गावी असताना आमच्या परसातल्या विहीरीचे पाणी मी एकटा रहाटून घरात आणायचो आणी ते पण रात्री अपरात्री कधिही." बस चर्चेला आणखी वेगळी कलाटणी मिळाली जो तो आपण किती बिनधास्त आहोत हे पटवायला लागला. "चुप बसा रे च्यामारी एवढे शुर विर आहात तर दाखवता का रे त्या मघाशी येताना दिसलेल्या पांढर्या चौथर्यावर एकटे जाउन हा रुमाल ठेउन. साला आपण शंभर रुपये हारायला तयार आहोत." क्षणभर तिथे दाट शांतता पसरली कुणीच काही बोलेना तेवढ्यात दिन्याला वाचा फ़ुटली. "च्यायला हा गौर्या मघाशी मोठा रुबाब करत होता, जातो का आता?" दिन्याच्या प्रश्नाला उत्तर न आल्याने नित्या चेकाळला "सोड रे हा काय जातोय ते बालिश बहु बायकात बडबडला तसा प्रकार आहे हा." आपण नक्की काय बोलतोय याचेही नित्याला भान नव्हते. "क्यु रे चपडगंजु, बोलती बंद का आता ?" रव्या आणखी खिजवत राहीला. त्याच्या खिजवण्याचा आणी कधी नव्हे त्या घेतलेल्या दारुचा एकत्रीत परीणाम म्हणुन गौरव जायला तयार झाला. कुणालाच माहीत नव्हते पुढे काय वाढून ठेवले आहे ते. मध्याच्या पुढ्यातला ग्लास एका दमात रिकामा करत गौरव उठला. तो जायला निघणार ईतक्यात रव्या त्याला म्हणाला "तो टॉर्च ठेव ईथेच असच जायच." गौरवने गपचुप हातातला टॉर्च खाली ठेवला आणी नित्याच्या पुढ्यातली कांदा कापायची सुरी उचलली त्याच्याकडे लक्ष जाताच रव्या उखडला "च्यायची, काहीही न्यायचे नाही म्हणालो ना फ़क्त हा रुमाल घेउन जायचा बस". "हे बरोबर नाही हा रव्या ती सुरी नेली तर काय बिघडले ?" मध्याने विरोध दर्शवला. त्यावरुन परत एकदा वादंग झाले आणी अखेरीस बहुमताने गौरवने रुमाल सोडुन काहीही न्यायचे नाही हे ठरले. नाईलाजास्तव गौरव निघाला तो थोडा दुर जातो नाही तो रव्या ताडकन उठला आणी दिन्याला म्हणाला "चल आता आपण जाउ तिकडे पण दुसर्या रस्त्याने " "अरे पण पैज एकट्याने जायची लावली होतीस ना ?" काहीच न उमगल्याने दिन्या गोंधळला. "तु चल तर साला जाम गमज्या करत होता तिथे जाताना वाटेत असा घाबरवु ना की पॅट ओली झाली पाहीजे साल्याची" जवळजवळ ओढतच रव्या दिन्याला घेउन गेला. गौरव त्या सुनसान रस्त्याने एकटाच चालत राहीला जो पर्यंत शेकोटीचा उजेड आणी बाकीच्यांचा गोंधळ ऐकु येत होता तो पर्यंत त्याला काही वाटले नाही पण जसा तो पुढे चालत राहीला तसा उजेड दिसेनासा झाला आवाजही ऐकु येईनात. तसा हळूहळू गौरवच्या मनात भिती शीरकाव करु लागली. आजुबाजुच्या झाडांचे आकार अभद्र वाटायला लागले. संध्याकाळी येताना जो निसर्ग सुंदर दिसत होता तोच आता भयाण वाटायला लागला, दिवसा रम्य वगैरे वाटणारी झाडी आता घास गिळायला जबडा वासुन बसल्यासारखी वाटायला लागली, पायाखाली मोडलेली काटकीदेखील मागे कुणीतरी असल्याची जाणीव वाटायला लागली. मेंदुवरचा अल्कोहोलचा अंमल पार उतरुन गेला. त्यातच एका घुबडाने भेसुर घुत्कारत आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. अभावितपणे गौरवचा हात शर्टावर गेला आणी तिथे अपेक्षित वस्तुचा स्पर्श होताच त्याला जरा धिर आला. आजुबाजुच्या झुडुपातुन निशाचर वेगवेगळ्या आवाजात त्याची दखल घेत होते मधेच एखाद्या झुडुपामागुन चमकदार डोळ्यांची एखादी जोडी चमकताना दिसली की त्याच्या काळजात धऽऽस्स होत होते आणी हात पुन्हा पुन्हा शर्टाकडे जात होता. दचकत बाचकत अखेरीस तो त्या पांढर्या चौथर्याच्या जवळ आला आणी त्याच्या लक्षात आले की तिथे तो एकच नाही तर आणखीही चौथरे होते आणी येताना न पाहीलेली आणखी एक गोष्ट त्याच्या नजरेस पडली ती म्हणजे प्रत्येक चौथर्यावर एका बाजुला एक अर्धगोल दगड होता. आणी क्षणार्धात त्याच्या लक्षात आले की ते एक मुस्लिम कब्रस्थान होते. आत्तापर्यंत एकवटून धरलेला त्याचा धिर एकदम सुटला आणी तो परत वळून मागे फ़िरणार ईतक्यात त्याला ते भयंकर हास्य ऐकु आले, कुणीतरी भयाण हसत होते. आता जोडीला त्यात कुणाच्यातरी भेसुर रडण्याची भर पडली. आतामात्र त्याचे आवसान गळाले आणी तो जिव घेउन मागे पळाला पण तेही त्याच्या नशीबात नव्हते थोडा पुढे जातो नाही तो त्याच्या समोर अंधारातुन दोन आकृत्या आडव्या आल्या आता त्याच्या भितीने उच्चांक गाठला आणी आत्यंतीक भितीच्या अंमलाखाली त्याच्या शरीराकडुन ती कृती घडली. आपल्या शर्टाच्या आतुन त्याने मघाशी लाकडे तोडायला घेतलेली रव्याची ती छोटीशी पण धारदार कुर्हाड काढली आणी मागचा पुढचा विचार न करता दोन्ही अकृत्यांवर चालवली पाठोपाठ वातावरणात किंचाळ्या उठल्या आणी गौरवच्या अंगावर रक्ताचा सडा पडला तोंडात रक्ताची खारट चव जाणवताच गौरवचा ताबा सुटला आणी तो मागे वळुन धावत सुटला. कशाची तरी ठेच लागुन तो पडला आणी बेशुद्धीच्या गर्तेत जाण्यापुर्विची त्याची शेवटची जाणीव ईतकीच होती की आपण त्या चौथर्यावर कोसळतोय. गेलेले तिघेही बराचवेळ परत आले नाहीत हे पाहुन नित्या आणी मध्याला काळजीने ग्रासले झक मारली आणी ही पैज लावली असे वाटायला लागले. त्यांची वाट पाहुनही ते येत नाहीत म्हंटल्यावर दोघे एकमेकांच्या जोडीने त्यांना शोधायला निघाले. हातातले टॉर्च क्षणभरही न विझु देता दोघे त्या दिशेने चालु लागले. जराजरी कुठे खस्स झाले की दोघांचे प्राण कंठापाशी येत, जमतील तितक्या देवांची नावे घेत दोघेही त्या चौथर्या जवळ पोहोचले. वाटेत नित्या कशाला तरी अडखळला,आणी टॉर्चच्या उजेडात त्याला एकटक त्याच्याकडे पहाणारा दिन्याचा चेहरा दिसला दिन्याच्या डोळ्यातले भितीचे भाव नित्याचे काळीज चिरत गेले आणी तोंडातुन किंकाळी कधी निघाली ते त्यालाही कळले नाही एव्हाना मध्यालाही काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव झाली होतीच त्यानेही आपल्या टॉर्चचा उजेड तिकडे टाकला आणी समोरचे दृश्य पाहुन त्याची दातखीळच बसली. रव्या आणी दिन्या दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांच्या विस्फ़ारलेल्या डोळ्यांवरुनच कळत होते की त्यांचे प्राण केंव्हाच हा देह सोडुन पंच्त्वात विलीन झाले आहेत. एकाएकी नित्याने मध्याचा खांदा हलवुन त्याचे लक्ष समोर वेधले, समोर त्या पांढर्या चौथर्यावर आता काहीतरी हालचाल दिसत होती, दोघांनीही सगळा धिर एकवटून समोर उजेड टाकला आणी रक्ताळलेल्या भेसुर चेहर्याचे काहीतरी हातातील कुर्हाड सावरत उठताना दिसल्यावर दोघांच्याही काळजाने ठाव सोडला हातातले टॉर्च कधी गळून पडले ते कळलेच नाही आता त्यांना फ़क्त ईतकीच जाणीव राहीली होती की ईथुन कुठेतरी दुर पळायला हवे बऽस्स मेंदुकडुन ईशारा यायच्या आत शरीराने हलचाल सुरु केली होती आणी ते दोघेही वाट फ़ुटेल त्या दिशेने पळत होते. कधिपर्यंत कदाचित सुरक्षेततेची जाणीव होईपर्यंत कदाचीत ह्दयाचा शेवटचा ठोका पडे पर्यंत, बेशुध्दीच्या गर्तेतुन बाहेर पडत असलेला गौरव त्या किंचाळीने हादरला मागे वळून पहाताना त्याला जाणवले की मघाच्या त्या दोन्ही आकृत्या आजुनही तेथेच आहेत, समोरच्या आकृतिने आणखी एक किंकाळी फ़ोडली आणी गौरवच्या चिमुकल्या ह्दयाची साथ श्वासांनी सोडली तो पुन्हा नेणीवेच्या काळोखात बुडाला पण या वेळी पुन्हा न उठण्यासाठी.
|
Jhuluuk
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:08 am: |
|
|
जबरदस्त आहे ही भयकथा..
|
Psg
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:30 am: |
|
|
जबरी!! मस्त वातावरणनिर्मिती! ...
|
Milindaa
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:34 am: |
|
|
भयकथा कसली.. फारतर मस्करी ची कुस्करी होते असं म्हणता येईल. माझ्या मते अतिशय बकवास कथा आहे. Chaffa, you can do better than this.
|
चाफ़्फ़ा.. शैली छान आहे, असा प्रकारच्या कथा आधी वाचल्या अहेत. पण तरीही ही कथा वाचताना मजा आली.
|
R_joshi
| |
| Thursday, April 05, 2007 - 11:25 am: |
|
|
चाफा अतिशय सुरेख कथा. कथेची मांडणी आणि वातावरणनिर्मिती छानच केलिस.
|
चाफ़ा, कोणी काहिही म्हणोत. आपल्याला तर सॉलिड आवडली बुवा!
|
Disha013
| |
| Thursday, April 05, 2007 - 4:44 pm: |
|
|
आवडली रे चाफ़्फ़ा! एका दमात वाचुन काढली.खरच जबरी आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:25 pm: |
|
|
चाफ़्फ़ा, शैली छान आहे. पण धक्का अपेक्षित होता. यापेक्षा चांगले नक्कीच लिहिता आले असते. वाट बघतोय.
|
Sunidhee
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:32 pm: |
|
|
चाफ्फा लिखाण शैली छानच आहे तुझी..
|
Zakasrao
| |
| Friday, April 06, 2007 - 4:42 am: |
|
|
चाफ़ा दिनेश दा ना अनुमोदन. थोडस अजुन प्रयत्न कर you can do better than this because you have it in you. so come on.
|
चाफ़ा,वातावरणनिर्मिती छान रे.. शेवट फ़ार वेगळा वाटला नाही पण एकुण कथा मांडण्याची शैली आवडली
|
Sneha21
| |
| Friday, April 06, 2007 - 6:39 am: |
|
|
चाफ्फा , लिखाण शैली छानच आहे तुझी.. maja aali wachun... keep it up.....
|
Manogat
| |
| Friday, April 06, 2007 - 9:59 am: |
|
|
चाफा, छान आहे कथा, एक वेगळिच कथा वाचुन मस्त वटल.. अगदि बालपण आठवल, सुट्यान मधे आमचि पण अशि चांडळ चौकडि बसायचि अणि तेव्ह याच गोष्टि रंगायच्या.... सगळ्यात छान वातावरण निर्मिति वाटलि Keep it up
|
चाफ्या, मस्तच रे.. पण अपेक्षित शेवट!
|
Chaffa
| |
| Sunday, April 08, 2007 - 3:33 pm: |
|
|
'पैज' विषयी थोडेसे, मुळात पैज ही कथा संपुर्ण काल्पनिक नाहीच म्हणता येणार. ईथल्या जवळच्याच एका गावात रात्री स्मशानात जायच्या पैजेची अशी कुस्करी झाल्याचा किस्सा बर्याच वर्षापासुन ऐकवला जातो आता तो किती खरा ते काही मला माहीत नाहीये पण त्याच घटनेला मध्यवर्ती धरुन बाकी कथानक लिहीले आहे आर्थात ते काल्पनिकच आहे.
|
Srk
| |
| Monday, April 09, 2007 - 4:24 am: |
|
|
चाफ़ा वातावरणनिर्मिती जबरदस्त. शेवट प्रेडिक्टेबल होता पण मजा आली.
|
|
|