|
Chaffa
| |
| Sunday, April 01, 2007 - 9:50 pm: |
|
|
एक नवा प्रयोग म्हणुन मी मायबोलीवर ही कथा देतो आहे हा कथाप्रकार कुणी हाताळलेला दिसला नाही म्हणुन हा प्रयास. रात्रीचा चित्रपट संपला आणी आम्ही बाहेर आलो, मी आणी निशा. ती तर मला बिलगुनच चालत होती. निशा, हजारात नाही लाखोत शोधुन सापडणार नाही अशी लावण्यवती. तिची आणी माझी भेट काही फ़ार दिवसांपुर्वीची नव्हती दोनच दिवसांपुर्वी ती मला एका नाइटक्लबमधे भेटली. असे नाइटक्लबना भेटी देणे हे माझे नित्याचेच आहे. तेच माझे आयुष्य आहे असे म्हणा ना त्या दिवशीही मी असाच त्या नाइटक्लबमधे एका निवांत जागी बसलो होतो. तिथेच मला तिचे दर्शन झाले. तिचे एकुणच रहाणीमान एकदम बिनधास्त दिसत होते ना समाजाची फ़िकीर ना घराची, शेकडो तरुण जिव ओवाळुन टाकायला तयार होतिल असे सौदर्य,आणी त्याची तिला पुर्ण जाणीव होती. तिथल्या अंधुक प्रकाशात तीला पहाताच मी मनातल्या मनात ताबडतोब तिची निवड करुन टाकली. फ़क्त आता प्रश्न होता तो तिची नजर माझ्याकडे जाण्याचा. तिने माझ्याकडे पाहीले आणी तत्क्षणीच माझ्याकडे यायला निघाली, तिचे हे असे माझ्याकडे आकर्षीत होणे हे ही मला नविन नाही, माझ्याकडे पहाताच आजवर अनेक तरुणी भुलल्या आहेत. सुरुवातीचे हाय, हॅलो झाल्यावर मी तिला ग्लास ऑफ़र केला तिने तो घेतला याचेही मला नवल वाटले नाही एकंदरीत तिच्या वागण्यावरुन तो अंदाज मला आधिच आला होता. खुप उशिरापर्यंत गप्पा मारल्यावर ती तिच्या ग्रुप बरोबर निघाली पण दुसर्या दिवशी पुन्हा तिथेच भेटायचे हे ठरवुनच. पुन्हा दुसर्या दिवशी आम्ही भेटलो, डान्स फ़्लोअरवर डान्स केला, माझ्या बाहुपाशात ती अशी विरघळली की तिलाच आजुबाजुचा गोंधळ सहन होइना. म्हणुन आज रात्रीचा हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम आम्ही ठरवला होता. परस्पर तिकीटे मिळवुन ती थेट मला चित्रपटाला घेउन आली. चित्रपटाचे नाव होते 'ड्रक्युला', एकंदरीत चित्रपट पहाताना पडद्यावरील दृश्ये पहाताना मी जरा अस्वस्थच होतो आणी माझी ही अवस्था निशाच्याही नजरेतुन सुटली नव्हती. बाहेर येउन माझ्या गाडीकडे जाताना तिने हा विषय काढलाच. " का रे तु पिक्चर पहाताना इतका अस्वस्थ का होतास ?" "काही काही दृश्य पहावत नाहीत!" मी गुळमुळीत उत्तर दिले. यावर खो खो हसत तिने माझी टिंगल सुरु केली. " अरे तु म्हणजे एकदम भित्रा भागुबाइच दिसतोस! अरे आपण आता एकविसाव्या शतकात आहोत, हे ड्रक्युला वगैरे सगळ एकदम कल्पनेच्या भरार्या आहेत. मी म्हंटलो "अगं ही इतकी जुनी कथा, त्यात काहीतरी सत्य असेलच ना ! "एव्हाना आम्ही माझ्या गाडीजवळ आलो होतो. "अरे कसलं सत्य घेउन बसलायस? आणी असेलच सत्य तर त्याला फ़ार वर्षे लोटलीत आता निव्वळ करमणुक म्हणुन हा विषय चांगला आहे आणी त्यातल्या त्यात तुझ्यासारख्या डरपोकला घाबरायला काहीतरी कारण म्हणुन तर एकदम बेस्ट्च" गाडीच्या दरवाजाकडे जात ती म्हणाली. "अगं पण जुन्या गोष्टी काही कायमच्या संपतात असचं नाही जुने वाडे, किल्ले आजही आहेतच की! " यावर पुन्हा एकदा चांदण्यासारखे हसुन ती म्हणाली. " बऽर बाबा तु म्हणतोयस ते खरं जरी मानलं तरी पुन्हा तो ड्रक्युला आणी त्याची ती काळी घोडागाडी आता या रस्त्यावर कशी काय हाकणार बरं तशी एखादी घोडागाडी दिसलीच तर आपण पाहु हं काय करायचे ते आता चल पाहु सगळे लोकही गेलेत इथे रस्त्यावर उभे राहुन ड्रक्युलाचा नाही पण दुसर्या कुणाचा तरी बळी ठरु". मी आजुबाजुला पाहीले रस्त्यावर खरच चिटपाखरुही नव्हते. मी निशाकडे पाहीले तिच्या नजरेत आव्हान होते. मंद हसत मी तिच्याकडे पाहुन हात पसरले, " काय हे! इतकी कसली घाई तुला " असे म्हणत ति माझ्या बाहुपाशात शिरली. मादक नजरेनी तिच्याकडे पहात मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तिच्या अंगावर फ़ुललेले रोमांच मला जाणवत होते, हळूहळू माझे ओठ तिच्या चेहर्यावरुन खाली घसरत चालले आणी तिच्या मानेवर ओठ टेकवताच तिच्या गळ्याजवळ माझे दात मी रोवले. जाणीवेच्या पलीकडे जाण्यापुर्वी तिच्या चेहर्यावर आश्चर्याची एक रेषा चमकुन गेली. माझी तहान भागल्यावर मी तिचा देह घेउन गाडीबाहेर आलो आणी पुन्हा एकदा मी तिच्या कडे आणी माझ्या गाडी कडे पाहीले. पौर्णीमेच्या चांदण्यात माझी काळीकुट्ट स्कार्पीओ गाडी चमकत होती.
|
Sakhi_d
| |
| Monday, April 02, 2007 - 3:57 am: |
|
|
सही.......... चाफ़ा मस्तच. पण हे असच होईल अशी अपेक्षा होती. पण छान लिहिले आहेस...
|
R_joshi
| |
| Monday, April 02, 2007 - 4:36 am: |
|
|
चाफा....खरोखरीच उत्तम कथा आहे. लघुकथा छान लिहितोस.
|
Zakasrao
| |
| Monday, April 02, 2007 - 5:33 am: |
|
|
चाफ़्या तु अजुन जरा घाबरवायला हव होत. थोड अजुन विस्ताराने आल असत तर जास्त परिणाम जाणवला असता. असो तु लिहायला सुरु केलस हे जास्त छान झाल.
|
मस्त.. शेवटचा पंच चांगलाच जमला आहे.
|
Soha
| |
| Monday, April 02, 2007 - 7:05 am: |
|
|
माफ करा. पण मला वाटते ही कथा रत्नाकर मतकरी यांच्या कथे वरून उचलली असावी. त्यांचीही एक ड्रक्युला नावची कथा आहे. त्याचा शेवट अगदी असाच आहे. फक्त सुरुवात जरा वेगळी आहे. शेवटचा पंच अगदी असाच आहे.
|
Jhuluuk
| |
| Monday, April 02, 2007 - 9:41 am: |
|
|
सही, वेगळा बाज, मला वाटले मुलगी ड्रक्युला आहे की काय..
|
Dhumketu
| |
| Monday, April 02, 2007 - 10:11 am: |
|
|
कुठेतरी वाचली आहे... त्यात त्या पोरीची मैत्रीणही असते.. आणी ती पोरगीच बहुतेक ड्रक्यूला असते...
|
Chaffa
| |
| Monday, April 02, 2007 - 6:20 pm: |
|
|
मंडळी धन्यवाद, सोहा,धुमकेतु, तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे कारण या प्रकारच्या कित्येक भयकथा आजवर लिहील्या गेल्या आहेत.
|
Arch
| |
| Monday, April 02, 2007 - 6:35 pm: |
|
|
ही काय गोष्ट आहे? तो Dracula आहे वगैरे समजायच. आणि डोंबलाची भयकथा
|
Disha013
| |
| Monday, April 02, 2007 - 6:54 pm: |
|
|
घाबरवण्यासाठी लिहिली होती का कथा? मी तर अजिबात नाही घाबरले बुवा.
|
Chaffa
| |
| Monday, April 02, 2007 - 7:12 pm: |
|
|
O K आर्च, दिशा तुमचा मान राखुन मी माझे पोष्ट एडीटत आहे.
|
Saurabh
| |
| Monday, April 02, 2007 - 11:31 pm: |
|
|
चाफ़्फ़ा, अशीच्या अशी गोष्ट रत्नाकर मतकरींची आहे. मलाही आधी तीच आठवली. धुमकेतु म्हणतो तसे ती मुलगी ड्रॅक्युला असते आणि मला जर नीट आठवत असेल तर तिच्या शिकारीने ( victim ) तिला लीफ़्ट दिलेली असते. निव्वळ अशा अनेक भयकथा लिहिल्या गेल्या आहेत म्हणून हि वचल्यासारखी 'वाटत' नसून खरोखरच वाचलेली आहे हा हे सांगण्याचा उद्देश!
|
Bhagya
| |
| Monday, April 02, 2007 - 11:44 pm: |
|
|
रत्नाकर मतकरींची ती गोष्ट मी पण वाचलेली आहे. पण मला चाफ़्फ़्याची गोष्ट त्यावरून उचललेली वाटत नाही.
|
Disha013
| |
| Monday, April 02, 2007 - 11:59 pm: |
|
|
अहो चाफ़्फ़ा,तुम्हाला वाईट वाटले असेल तर sorry . तुमच्या कथाशैलीवर माझा रोख न्हवता. माझे एवधेच म्हणणे होते की भिती वाटावी असे मला या कथेत काही आढळले नाही.
|
Princess
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:13 am: |
|
|
चफ्फा, मला आवडली ही कथा. छान लिहिलीय.
|
Soha
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:24 am: |
|
|
चाफा, मतकरींची गोष्टीतही शेवटी हेच वाक्य आहे "पौर्णीमेच्या चांदण्यात माझी काळी गाडी चमकत होती." ह्या तुमच्या वाक्यामुळे मला अधिक प्रकर्षाने मतकरींच्या गोष्टीची आठवण झाली. पण मतकरींच्या कथेचे नाव ड्रक्युला नाही. दुसरेच काहीतरी आहे. असो. भयकथा हा प्रकार गुलमोहरावर सुरु केल्याबद्दल धन्यावाद.
|
Chyayla
| |
| Tuesday, April 03, 2007 - 6:21 am: |
|
|
चाफ़्फ़्या आजच तुझी कथा वाचली.. तुझा ड्र्यान्कुला फ़ारच रोमान्टीक होता रे... काही तरी नवीन वाचायला मिळाल. तुझ्या पहिल्या प्रयत्नाबद्दल शुभेछा:
|
Sunidhee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 6:59 pm: |
|
|
चाफ्फा, ही गोष्ट वेगळी वगैरे मुळीच नाही बर का... अश्या खुप खुप गोष्टी आहेत.. मला तर वाटते तु १ एप्रील ला लिहिलीस ती काही उद्देश ठेउन तर नाही ?? म्हणजे 'वेगळं' वाचायला मिळेल म्हणुन आम्ही येणार आणि फसणार.. रागावु नको रे..
|
चाफ़ा, गोष्ट अगदीच फ़सली रे...! पण प्रयत्न स्तुत्य आहे.
|
|
|